दास कविकृत सखु चरित्र

संकीर्ण वाड्मय साहित्य.


( पै. शिकंदर लाल आतार )
संत सखूबाईंची मध्वमुनिकृत व विठ्ठलकृत दोन जुनीं चरित्रें उपलब्ध असून तीं अनुक्रमें सर्वसंग्रह व काव्यसंग्रह यांतून प्रकाशित झालीं आहेत असें कळतें. प्रस्तुत दास कविकृत ‘ सखु - चरित्र ’ उपलब्ध झालें आहे. रचना अभंगात्मक असून त्यांची संख्या ४७ आहे. रचना रसाळ आहे.
रचना दास कवीची आहे. हा दासकवि कोण ? श्रीसमर्थ आपणांस दास म्हणवीत असत. परंतु त्यांची ही कृति नव्हे हें निर्विवाद सिद्ध आहे. सूचिकार ‘ दास ’ या कविनामाखालीं लिहितात - “ दुसरें मुकुंद ( नाथांचें चरित्रकार ) यांचे शिष्य ‘ दास ’ म्हणून होते. ” तेच दास या सखुचरित्राचे कर्ते असावेत किंवा हे कोणी तरी नवीनच दासकवि असतील.

॥ श्री सकुचरित्र प्रारंभ ॥

संताचे चरीत्र ॥ हो ऐकावे सादर ॥ करितो नमस्कार ॥ संतजना ॥१॥
कराडाचा वीप्र ॥ क्रीष्णा - बाईचे तीरी ॥ द्वीज घराच्यारी ॥ होता एक ॥२॥
कांता पुत्र पीता ॥ तीघे भक्तीवीण ॥ सकु त्याची सून ॥ भक्तराज ॥३॥
अन - उदकावीण ॥ तीघेही गांजीते ॥ परी तीचे चीती ॥ नारायण ॥४॥
अशाडीचा महीना ॥ अला पर्वकाळ ॥ जाती संत सकळ ॥ गावावरुणी ॥५॥
येउनीया संत ॥ उतरले तेथे ॥ सासुने धाडीले ॥ जीवनालागी ॥६॥
घेउनी घागर ॥ भरावे जीवन ॥ ऐकुनी कीर्तन । लुब्द जाली ॥७॥
सासु मारो देवा घेवो माझा प्राण ॥ परी मी जाईन ॥ पंढरीसी ॥८॥
घेउनी घागर ॥ धावे सजारीन ॥ म्हणे हात धरुणी ॥ सुन जाती तुझी ॥९॥
बोलाउनी पुत्रा ॥ सांगे वर्तमान ॥ तयेस ताडन ॥ करीत नेली ॥१०॥
पंधरा दीवसा ॥ पढरी राहीली ॥ सांभाळील ॥ हीसी अता ॥११॥
प्रयेत्ने करुनी ॥ म्हणती येक येका ॥ अन्न उदक नका ॥ देउ हीसी ॥१२॥
बीचार करुनी ॥ खांबासी बांधीली ॥ चराटे बुडाली ॥ मासामाझी ॥१३॥
सकुबाई म्हणे ॥ पंढरीच्या राया ॥ अंतरले पाया ॥ चांडाळीन ॥१४॥
स्वामी वीठला सर्व ॥ श्रुत जाले वर्तमान ॥ पाही वीचारुनी ॥ अंतर्यामी ॥१५॥
रखमाबाई पुसे ॥ कोण हो गाजीला ॥ हेत गुतला ॥ कोठे देवा ॥१६॥
पांडुरंग सांगे ॥ भक्त हो गांजीला ॥ आज्ञा द्यावी मजला ॥ जाईन तेथे ॥१७॥
मध्यान रात्री ॥ येउनी द्वारासी ॥ सकु सकु तीसी ॥ हाका मारी ॥१८॥
सकु म्हणे ॥ कोटील तु कोण ॥ म्हणे मी यात्राकरीन ॥ पंढरीची ॥१९॥
तुज धाडावया ॥ हेत आहे माझा ॥ कैसी जाऊ बाई ॥ बंधन पै केले ॥२०॥
वीठाई म्हणे ॥ सोडीते मी तुला ॥ तेथे बांध मला ॥ येच वेळे ॥२१॥
सकुबाई तेंव्हा ॥ पंढरीसी गेली ॥ मूर्ती ती देखीली ॥ वीठेवरी ॥२२॥
सकुबाई म्हणे ॥ पंढरीचा राया ॥ सवसाराची माया ॥ दाउ नको ॥२३॥
ऐसे म्हणुनीया ॥ केले लोटांगण ॥ सोडीयेला प्राण ॥ तात्कालची ॥२४॥
कराडाचा वीप्र ॥ येक अला होता ॥ त्याने तीच्या प्रेता ॥ वोळखीले ॥२५॥
मीळोनीया वीप्र ॥ चौघे जमा जाले ॥ नेउनी दहन केले ॥ चंद्रभागे ॥२६॥
पूर्णमेचा काला ॥ वेणु - नादी जाला ॥ कळवळा अला ॥ कंतां तीच्या ॥२७॥
सोडोनी सांगती ॥ स्वयंपाक करी ॥ नको या वीचारी ॥ पडु पुन्हा ॥२८॥
खेद काही सकु ॥ मनु नको देही ॥ वडीलाचे ठाई ॥ लाज कैची ॥२९॥
भक्तासाठी देव ॥ कांता जाली ॥ करु जो लागली ॥ घरधंदा ॥३०॥
मंध्यान रात्रीं त्याच्या ॥ बैसोनी पलंगावरी ॥ चरण त्याचे चुरी ॥ नारायण ॥३१॥
येकांतात देखुनी ॥ कामातुर जाला ॥ देवासी कळला ॥ भाव त्याचा ॥३२॥
रखुमाबाई देवी ॥ पुंडलीका वीच्यारी ॥ का न ये श्रीहरी ॥ अझोनीया ॥३३॥
जीचे साठी गेला ॥ तीची सायोजता ॥ झाला तीची कांता ॥ नारायेण ॥३४॥
रखुमाबाई ॥ चंद्रभागे आली ॥ सकुं उठवीलीं ॥ तात्काळची ॥३५॥
सकुबाई तेव्हां ॥ घरासी चालीली ॥ घरासी होती आली ॥ जीवनालागी ॥३६॥
वीठाबाई म्हणे ॥ यात्रा कैसी झाली ॥ सकु म्हणे केली ॥ तुझे धर्मे ॥३७॥
पूर्ण ब्रह्मरूप ॥ सकु द्रीष्टी पाहे ॥ धावोनी घेई ॥ घागर ती ॥३८॥
सकुबाई म्हणे ॥ हेत माझा आहे ॥ वर्षावर्ष पाय ॥ दावी तुझे ॥३९॥
पांडुरंग म्हणे ॥ सहजची जाले ॥ सागावे काही न लगे ॥ आता ॥४०॥
यात्रा गेली ॥ वीप्र सांगु अले घरी ॥ झाड लोटकरी ॥ सकु तेथ ॥४१॥
पाहोनी तेथे ॥ ब्राह्मण बोलती ॥ सकु मेली होती ॥ यात्रे मध्य ॥४२॥
चंद्रभागेमध्य ॥ अंम्ही हो जाळीली ॥ ती पुन्हा देखीली ॥ अज ये ॥४३॥
नगरजन तेव्हां ॥ आले लोटांगणी ॥ म्हण म्हण भक्तराज ॥ सकबाई ॥४४॥
सकु - सगे तीघे ॥ जाली वारकरी ॥ वर्षावर्षीं पंढरी ॥ जाती चौघे जन ॥४५॥
सकु - चरित्र असे ॥ ज्याचे घरी ॥ लक्षुमी श्रीहारी ॥ राहे तेथे ॥४६॥
दास म्हणे ऐसा ॥ नामाचा महीमा ॥ कीलीच सीमा वेद च्यारी ॥४७॥
ईती श्री सकु चरित्र सर्पुण मस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP