प्रवेश चौथा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : स्वप्नातील तीन चार खणांची खोली. समोरील भिंतीजवळ एक टेबल असून, त्याच्याच डाव्या बाजूस आरामखुर्चीवर गणपतराव वाचीत बसले आहेत. इतक्यात एक बावीस तेवीस वर्षाची बाई आत येते, व टेबलाच्या उजव्या बाजूकडील खुर्चीवर बसून कागदावर काही लिहू लागते. ]

बाई : ( लिहिता लिहिता मध्येच थांबून ) का आज फार...
गणपतराव : नाही काही विशेष....
बाई : मला आपल्याला एक...
गणपतराव : काही वि़चारायचे आहे ?
बाई : आपण ऐकाल तर...
गणपतराव : अगदी जरुर...
बाई : मला की नाही इकडचा स्वभाव...
गणपतराव : अरेरे ! अशा एकदम...
बाई : भारीच जाय हो ! ... तुम्हाला दिसत नाही... पण...
गणपतराव : मला नव्हते ठाऊक इतका तो...
बाई : किती पण... भारीच हो...
गणपतराव : मग त्याला आता...
बाई : आपण जर...
गणपतराव : बरे आहे, मी पाहतो सांगून...
बाई : सांगू नका गडे...
गणपतराव : मग ?
बाई : जा मेले ! अजून सुध्दा...
गणपतराव : म्हणजे !... माझ्यावर ?....
बाई : आता सांगायला का पाहिजे ?
गणपतराव : खरेच का माझ्यावर... ?
बाई : जा गडे !
गणपतराव : मग इतके दिवस...
बाई : आपण जर मजकडे मुळी ढुंकूनच पाहानात...
गणपतराव : मला तरी काय रे ठाऊक...
बाई : रात्रंदिवस आपली...
गणपतराव : इतके का तुझे माझ्यावर... ?
बाई : पण आपले मात्र...
गणपतराव : खरे जर विचारशील तर तुजकडे... माझा ओढा...
बाई : मला वाटले, आपले प्रेम... बायकोवरच...
गणपतराव : ए: ! ती कसली आली आहे !
बाई : हं: !
गणपतराव : तो कोठे, बाहेर....
बाई : हो, आणि आता... लवकर नाही यायचे...
गणपतराव : वा ! मग काय... ( उठून दार लावून आतून कडी लावतो, व तिच्याजवळ जातो ) अगदी खरे ना ?
बाई : अगदी खरे !
गणपतराव : मग आता.... ( असे म्हणून तिला आलिंगन द्यायला जातो, तोच दाराची कडी आपोआप निघून दार उघडले जाते, व दोघेजण आत येतात. बाई नाहीशी होते. )
पहिला : पापी माणूस !.... लाज नाही वाटत ?
दुसरा : पाहतोस काय ! लाथ मारुन...
पहिला : लाथ कशाला.... चांगला जोडाच... ( फडाफड मारतो. )
गणपतराव : ( थरथर कापत व रडत ) नको !
दुसरा : नको कसे ? स्नेही म्हणवतोस...
पहिला : मला तर चांगला सज्जन...
दुसरा : सज्जन कशाचा ! बदमाश...
पहिला : मोठा अभिमान...
गणपतराव : ( रडत ) आता नाही !
दुसरा : नाही कसे ! लगाव आणखी...
पहिला : शरम नाही ! ( आणखी गणपतरावांना जोड्याने फडाफड मारतो. ) चला नीघ... !
गणपतराव : ( रडत ) जातो !.... पण दार कुठे आहे ! ( दार सापडत नाही. इकडे तिकडे धावू लागतो. आणखी पुष्कळ माणसे धावून येतात व सगळेजण जोडे मारु लागतात. अंधार पडतो व खोली दिसेनाशी होते, पण सारखे जोडे बसत असल्याचा भास होतो. ) दारच सापडत नाही ! हाय !...


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP