प्रवेश दुसरा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : गणपतरावांची खोली. पण ती त्यांना स्वप्नांत दिसत आहे. कोपर्‍यातील दाराचे कुलूप आपोआप निघून कडीही निघते. नंतर दार उघडले जाते. खोलीत तांबडा उजेड पडतो. दारातून एक मोठी आकृती बाहेर येते. पायांपर्यंत काळा झगा घातलेला असून, डोक्याचे व दाढीचे काळे केस पाठीवर, खांद्यावर, व छातीवर लांबवर पसरले आहेत. आकृतीच्या तोंडाचाही रंग काळाच आहे. गणपतराव बिछान्यावर तोंडापर्यंत पांघरुण घेऊन निजले आहेत. ]

गणपतराव : ( बरळत ) कोण तू !
काळी आकृती : ( गणपतरावाजवळ उभी राहून ) मी आहे.
गणपतराव : ( बरळत ) कोठून ?....
काळी आकृती : अंधारातून. ( थांबून ) तुला न्यायला आलो आहे. सगळे बोलणे तुझे ऐकले. तू येशील असे वाटते. मग काय ?
[ इतक्यात पेटीपलीकडील खिडकी उघडून, एक तेज:पुंज व पांढरी शुभ्र आकृती आत येत. तिच्या अंगात पांढरा झगा असून, तिच्या दाढीचे व डोक्याचे पांढरे केस पाठीवर, खांद्यावर व छातीवर पसरले आहेत. मधून मधून तांबूस रंगाची झाक मारणारा असा पांढरा प्रकाश खोलीत पडतो. ]
पांढरी आकृती : चल दूर हो. ( गणपतरावाजवळ जाऊन उभी राहते. )
गणपतराव : ( बरळत ) को - ण ?
पांढरी आकृती : मी प्रकाशातून आलो.
गणपतराव : ( बरळत ) कशाला -
पांढरी आकृती : तुला वाचवायला.
काळी आकृती : नाही, तो आता तुझ्या ताब्यात राहीलसे दिसत नाही.
पांढरी आकृती : पण मी रात्रंदिवस सारखा त्याच्याजवळ....
काळी आकृती : मीसुध्दा आहे.
पांढरी आकृती : तो वागतो माझ्याच तंत्राने...
काळी आकृती : काही नाही. मी आता त्याला पकडला आहे.
पांढरी आकृती : तो कसा ?
काळी आकृती : त्याच्याच अभिमानाने....
पांढरी आकृती : हो, खरेच.
काळी आकृती : तेव्हा आता प्रत्यक्ष सृष्टीतील कोणाला तरी चिथावून मी ह्याला ताबडतोब आपल्या ताब्यात - हं: ! त्याला वाटले माझे कोणी ऐकलेच नाही !
पांढरी आकृती : आधी माझे ऐक, मी काय म्हणतो...
काळी आकृती : एकदा सोडून शंभर वेळा.
पांढरी आकृती : ह्याला, ताब्यात आणण्याकरिता....तू जे प्रत्यक्ष करणार....
काळी आकृती : ते आधी....स्वप्नसृष्टीत....येवढेच की नाही ?
पांढरी आकृती : हो तसेच.
काळी आकृती : ठीक आहे. पण मला नाही वाटत त्याचा काही उपयोग...
पांढरी आकृती : असे का म्हणतोस ?
काळी आकृती : कारण...किती तरी वेळा असे आपण करतो... पण कोणी लक्षच ...
पांढरी आकृती : आपल्याकडून जितके आधी दाखवायचे तितके....
काळी आकृती : बरे आहे, काही हरकत नाही.... मला पुष्कळच धीर.... हं !
पांढरी आकृती : का हासलाससा ?
काळी आकृती : कारण... मी इतक्या तुला सवलती देतो... तरी... गर्दी माझ्याकडेच .... याचा कधी शेवट नाही का ?
पांढरी आकृती : नाही, हे असेच चालायचे....
काळी आकृती : पण दिवसेंदिवस जग तर.... तो पहा.... तो मनोरा किती उंच.... उंच....
पांढरी आकृती : भोवळ येऊन तितकाच सपाट्याने खाली....

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP