भक्तवत्सलता - अभंग ६ ते १०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


६.
एके दिवशीं न्हावयास । पाणी नव्हतें विसणास ॥१॥
देव धांवोनियां आले । शीतळ उदक घे घे बोले ॥२॥
आपुल्या हातें विसणीं । घाली जनीच्या डोयी पाणी ॥३॥
माझ्या डोईच्या केसांस । न्हाणें नव्हतें फार दिवस ॥४॥
तेणें मुरडी केसांस । कां म्हणे उगीच बैस ॥५॥
आपुल्या हातें वेणी घाली । जनी म्हणे माय झाली ॥६॥
७.
तुळशीचे बनीं । जनी उकलीत वेणी ॥१॥
हातीं घेऊनियां लोणी । डोई चोळी चक्रपाणी ॥२॥
मझे जनीला नाहीं कोणी । म्हणुनी देव घाली पाणी ॥३॥
जनी सांगे सर्व लोकां । न्हांऊं घाली माझा सखा ॥४॥
८.
साळी सडायास काढी । पुढें जाउनी उखळ झाडी ॥१॥
कांडितां कांडितां । शीण आला पंढरिनाथा ॥२॥
सर्व अंगीं घाम आला । तेणें पितांबर भिजला ॥३॥
पायीं पैंजण हातीं कडीं । कोंडा पांखडूनि काढी ॥४॥
हाता आला असे फोड । जनी म्हणे मुसळ सोड ॥५॥
९.
ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥
उणें पडों नेदी त्याचें । वारें सोसी आघाताचें ॥२॥
तयावीण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥३॥
आंगा आपुले ओढोनी । त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥
ऐसा अंकित भक्तांसी । म्हणे नामयाची दासी ॥५॥
१०.
पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा ॥१॥
घार हिंडते आकाशीं । झांप घाली पिल्लापासी ॥२॥
माता गुंतली कामासी । चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥
वामर हिंडे झाडावरी । पिलीं बांधुनी उदरीं ॥४॥
तैंसी आम्हासी विठ्ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 31, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP