भक्तवत्सलता - अभंग ४६ ते ५१

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४६.
आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार ॥१॥
सांडूनियां थोरपण । करी दळण कांडण ॥२॥
नारिरूप होउनी हरी । माझें न्हणें धुणें करी ॥३॥
राना जाये वेंची शेणी । शेखीं वाहे घरीं पाणी ॥४॥
ठाव मागें पायापाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥
४७.
धुणें घेऊनि कांखेसी । जनी गेली उपवासी ॥१॥
मागें विठ्ठल धांवला । म्हणे कां टाकिलें मला ॥२॥
कां गा धांवोनि आलासी । जाय जाय राउळासी ॥३॥
चहूं हातें धुणें केलें । जनी म्हणे बरें झालें ॥४॥
४८.
जनी जाय शेणासाठीं । उभा आहे तिच्या पाठीं ॥१॥
पितांबराची कांस खोवी । मागें चाले जनाबाई ॥२॥
गौर्‍या वेंचूनि बांधिली मोट । जनी म्हणे द्यावी गांठ ॥३॥
मोट उचलून डोईवर घेई । मागें चाले जनाबाई ॥४॥
४९.
राना गेली शेणीसाठीं । वेंचूं लागे विठो पाठी ॥१॥
पितांबर ओचे खोंवी । पायीं शोभा पारखावी ॥२॥
रिती बांधितांचि मोट । जनी म्हणे द्यावी भेट ॥३॥
५०.
जनचिया बोले करी नित्य काम । वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥
जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं । तयाचें चरणीं ओढवी माथा ॥२॥
महेशादिदेव तेहि तया ध्याती । जे आवडे गाती जनी ध्याती ॥३॥
५१.
आई मेली बाप मेला । मज सांभाळीं विठ्ठला ॥१॥
हरीरे मज कोणी नाहीं । माझी खात असे डोई ॥२॥
विठ्ठल म्हणे रुक्मिणी । माझे जनीला नाहीं कोणी ॥३॥
हातीं घेउनी तेलफणी । केंस विंचरून घाली वेणी ॥४॥
वेणी घालुन दिधली गांठ । जनी म्हणे चोळ बा पाठ ॥५॥
जनी म्हणे बा गोपाळा । करी दुबळीचा सोहळा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 31, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP