उत्तरार्ध - अध्याय ३८ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


नाकींहि न जें कौतुक, करि शक्रप्रोक्त विश्वकर्मा तें; ।
द्वारवतीच्या न शके वर्णाया लेश विश्व कर्मातें. ॥१॥
द्वादश योजन दीर्घ द्वारवती शुद्ध रत्नकनकाची, ।
तैसीच अष्ट्योजन विस्तीर्णा वसति विश्वजनकाची. ॥२॥
पूर्वेसि रेवताचळ, अद्रि लतावेष्ट दक्षिणेसि असे, ।
अक्षय पश्चिमदिग्गिरि, उत्तरदिक् वेणुमनगेंहि लसे. ॥३॥
चित्रक, नंदन, पुष्पक,  ऐशीं अतिरम्य उपवनें चवदा,  ।
जीं म्हणति पहात्यांतें, “ ‘झालों कृतकृत्य सुपवनेंच,’ वदा”. ॥४॥
प्रासाद रुक्मिणीचा कांचन; तैसाचि भोगवन्नामा ।
तो ख्यात, ज्यां नांदे श्रीकृष्णाची मन: प्रिया भामा. ॥५॥
जांबवतीचा दिव्य प्रासाद व्यक्त संजनननामा; ।
नाग्नजितीचा मेरुप्रासाद, स्तुत्य जिष्णुच्या धामा. ॥६॥
भीमेचा प्रासाद ख्यात पुरीं पद्मकूल या नांवें; ।
प्रासाद लक्ष्मणेचा सूर्यप्रभ, बहु जयासि वानावें. ॥७॥
परनामा प्रासाद श्रीव्यासें फार वर्णिला आहे, ।
ज्यामाजि मित्रविंदा श्रीकृष्णाची मन:प्रिया राहे. ॥८॥
जीचें नाम सुवार्ता भगवन्महिषी, तिचा महारुचिर ।
प्रासाद केतुमान्. जो प्रेक्षावा प्रेक्षिला तरी सुचिर. ॥९॥
देवद्विजपूजा ज्या प्रासादीं, परम रम्य तो विरजा, ।
शिल्पींद्र विश्वकर्मा जपुनि रची, करुनियां मन स्थिर, ज्या; ॥१०॥
प्रभुच्या प्रासादाचें अत्यद्भुतरूप, आठही याम ।
ज्यामध्यें परमोत्सव बहु, ज्याचें वैजयंत हें नाम. ॥११॥
त्या हंसकूटगिरिचें शिखर, तया मेरुचेंहि जें रम्य, ।
तें द्वारकेंत नेलें प्रभुनें, केलें नरांसही गम्य. ॥१२॥
आला केशव ऐशा अतिरम्य द्वारकेंत निजगेहीं, ।
भरल, यादव तेथें जे, सात्विक भाव सर्व तद्देहीं. ॥१३॥
बहु देवकी यशोदा हर्षे, तैसीच रोहिणी देवी; ।
सर्वहि जन नयनांहीं भगवन्मुख, तृषित अमृतसें, सेवी. ॥१४॥
ज्या श्रीपतिच्या भार्या,  सौभाग्यें त्यांत उत्तमा भामा; ।
प्रभुच्या दे वैदर्भी सर्वकुटुंबेश्वरी प्रभा धामा. ॥१५॥
प्रियसख जसा प्रियसखें, कृष्णें सत्कारुनि स्वयें प्रेमें ।
पक्षिपति स्वस्थाना पाठविला, यत्प्रभा नुता हेमें. ॥१६॥
आला, सकाळ जावुनि, संपादुनि विजय, कृष्ण जरि सांजे; ।
गुरुपूजेनें लाजवि ते, भेटति गुरुसि फार दिवसां जे. ॥१७॥
धन आणिलें परांतें जिंकुनि, तेणें सवृष्णि तज्जाया ।
तर्पी, अर्पी अभिमत, निजजन सुखसागरांत मज्जाया. ॥१८॥
श्रीमत्सांदीपिनि गुरु, आहुक, वसुदेव, वृद्ध जे, वाहे ।
तच्चरणीं मस्तक; कीं रीति रुचे फार फार देवा हे. ॥१९॥
त्या एका नंदातें आलिंगिति रामकृष्ण बाहूंनीं, ।
प्रेमें हुंगिति माथा, पूजिति वृष्षिस्त्रियाहि पाहूनी. ॥२०॥
सत्कीर्ति यशोदेची तनुजा दे भेटि, योगमाया जी; ।
सर्व म्हणति, “कल्पलता, सुरभि, गुरुगुणें तुम्ही गमा, या, जी !” ॥२१॥
म्हणती, “या अनुजेनें अग्रज गोविंद रक्षिला, गावें, ।
पूजावें नित्य इला, ईच्या चरणींच अक्षि लागावें.” ॥२२॥
प्रभु यादवांप्रति वदे, “तुमच्या पुण्येंचि दुष्ट हे खपले, ।
जपले बहु, दारुण जे शक्राचें पद हरावया तपले.” ॥२३॥
यादव वदले, “प्रभु तूं सद्यश शारदसुधांशुगौर विसी, ।
त्या निज विभूषणें बा ! आम्हां, पुत्रांसि तेंवि, गौरविसी.” ॥२४॥
तों सुरराजप्रेषित ये नारद प्रभुचरित्र जें भूत, ।
जें वर्तमान, भाविहि, वर्णी, जग होय ज्या यशें पूत. ॥२५॥
जनमेजय नृपति पुसे, “कैसा प्रद्युम्न शंबरें हरिला ? ।
अरि लाधला कसें तो विवर ? तनयशोक द्यावया हरिला. ॥२६॥
प्रद्युम्नें तो शंबर कैसा वधिला ? अशेष सांगावें.” ।
त्यासि मुनि म्हणे, “राजा ! ऐकसि तूं रसिक, मग न कां गावें ? ॥२७॥
प्रभुद्दक्‌पातें झाला पूर्वीं जो दग्धदेह, तो काम ।
आला श्रीच्या पोटा, त्याचें प्रद्युम्न हें नृपा ! नाम. ॥२८॥
सुररिपु शंबरनामा, होय तया सप्तरात्र जों पूर्ण, ।
पळवी निशीथसमयीं वृक मृगतोका जसा, तसा तूर्ण. ॥२९॥
जाणुनि करी उपेक्षा प्रभुवर, सुरकार्यसिद्धि साधाया; ।
नाहीं तरि, कोण क्षम सुतशोकें ईश्वरासि बाधाया ? ॥३०॥
मायावत्यभिधाना निजभार्या, जी रतिप्रतिच्छाया, ।
राया ! तीस प्रभुसुत दे सुतसा, सरिहि तो करी माया. ॥३१॥
काळप्रेरित शंबर, कीं स्वगृहीं ने स्वकाळ पोषाया; ।
पावुनि कांता, हर्षे, पाळी ती असुरराजयोषा या. ॥३२॥
स्तनपानदान अनुचित, यास्तव तो काम कांत रतिदायी ।
पोषविला, प्रार्थुनियां, देवुनि धनवस्त्र, साधुमति दायी. ॥३३॥
मायावती सुनिपुणा स्मरुनि करी प्रेम वाढ वीरा या, ।
सुरसायनप्रयोगें मदनातें शीघ्र वाढवी, राया ! ॥३४॥
त्या धात्रीच्या कथितें मानी मायावतीस तो मात, ।
झाला तरुण, तया ती शिकवी माया सुरारिच्या घाता. ॥३५॥
हास्य विनोद बहु करी ती, इच्छुनि अंगसंग, वदनातें ।
सादर पाहे, समजे कां सुज्ञा इंगितें न मदना तें ? ॥३६॥
मायावतीस समजुनि निजसुंगीं लोल, बोल तो लावी; ।
‘होसी माय कसी स्त्री ? सुरसरितेसीं सुरा न तोलावी. ॥३७॥
रीति मनीं त्वां धरिली हे धर्माधर्म नेणत्या पशुची; ।
स्पष्ट घडेलचि येणें सकळा नरकांत नरक तो अशुची.” ॥३८॥
मायावती म्हणे, “तूं जरि मज म्हणतोसि, ‘सत्य वद नातें;’ ।
मदना ! तें ऐक, तुला कथितें सद्नुणसुकीर्तिसदनातें. ॥३९॥
तूं प्रिय, तुझी प्रिया मी, प्रद्युम्ना ! मज म्हणों नको ‘माता,’ ।
शंबर तव तात नव्हे, असुराधम योग्य होय हा घाता. ॥४०॥
यदुवंशीं जन्म तुझा, तात श्रीकृष्ण, रुक्मिणी माता, ।
सप्तम दिवसीं असुरें हरिलासि अरातिघनघटावाता ! ॥४१॥
रडली बहु वैदर्भी, रात्रिदिवस बहु तुलाचि आठवि ती, ।
शोकें सा विति बहुधा होइल, तुज भेटतांचि आठ विती. ॥४२॥
नेणति, येथें तूं, हें प्रमुवर ते राम कृष्णमामाजी, ।
पडले पुत्रवियोगं स्वमतिश्रीसांत्वनश्रमामाजी.” ॥४३॥
मायाशस्त्रास्त्रस्वज्ञान प्रथम प्रियासि दे, मग ती ।
मायावती सुतेजहि, जेणें शत्रु न तयापुढें तगती. ॥४४॥
प्रद्युम्न बहु क्षोभे, दीर्घोष्ण श्वास सर्पसा सोडी, ।
खोडी कलहार्थ करी, भल्लें तो रणगत ध्वजा तोडी. ॥४५॥
तो असुर चित्रसेनप्रमुख शत सुत स्मरासि माराया ।
आज्ञापी, समरार्थ स्वरथीं बैसे रतीश बा ! राया ! ॥४६॥
युद्ध प्रवर्ततांचि त्रिदशसहित शक्र, नारद, महा या ।
बसुनि विमानीं आला, गंधर्ववराप्सरांसह पहाया. ॥४७॥
विनवी देवेंद्रातें अद्भुतनामा महाप्रतीहार, ।
“प्रभुजी ! जी विजयश्री, घालिल कोणासि आजि ती हार ? ॥४८॥
शंबरसुत शत, यांसीं रण करितो एक कृष्णसुत, राया ! ।
न कळे, कैसी होइल असुरचमूसिंधु आजि सुतरा या.” ॥४९॥
हांसुनि सुरराज म्हणे, “श्रीरुद्रकोधवन्हिनें काम ।
केला पूर्वीं भस्म, प्रभुचें साहे न लंघना धाम. "॥५०॥
प्रभुसि शरण जाय, धरी प्रणताचे कल्पवृक्ष पाद रती, ।
गौरविली अभयवरें त्या वरदवरें, करूनि आदर, ती. ॥५१॥
प्रभुवर वदला रतिला, “वत्से ! सत्सेव्य विष्णु नरतेतें ।
वरिल, करिल यश, तरतिल जीव, पळहि विसरतील न रते ! तें. ॥५२॥
द्वाखतींत वसेल, त्वत्पति होईल तत्तनय पहिला; ।
त्या हरिल सप्तम दिनीं शंबर मरणार्थ, शिशु जसा अहिला. ॥५३॥
जा शंबरसदनीं तूं, हो, मोहाया तयासि, तज्जाया, ।
लज्जा जास्तव न धरीं, वरिजे शवही, नदीं न मज्जाया. ॥५४॥
तव हस्तीं, पाळाया बाळा यादववरात्मजा कामा, ।
देइल शंबर; होइल सिद्धचि तें, वांच्छिसील ज्या कामा. ॥५५॥
तूं यत्नें कांतातें तोषासह, जपुनि, शीघ्र वाढीव. ॥५६॥
होवुनि तरुण तुझा पति अतितेजा, शंबरासि मारील, ।
वारील त्वच्चिंता, तो शोकीं रुक्मिणीस तारील. ॥५७॥
जायिल तुजसह, जोडुनि वर विजय, द्वारकेसि काम, रते !
सामर तेजस्वी जे वीर, उडवितील कीर्तिचामर ते. ॥५८॥
हाया नगतनयेसीं नगतनयेसीं जसा रमे, यश तें ।
जोडिल रमोनि तुजसीं; हरि परिभविला न सारमेयशतें.” ॥५९॥
ऐसा रतिस तपोंतीं वर देवुनि, हरुनि शोक, शैलास ।
श्रीशंकर जाय, करी स्वनिवासें विश्ववर्ण्य कैलास. ॥६०॥
शंबरभार्या होवुनि, त्याच्या अंत:पुरांत वास रती ।
करि, अरितें मायेनें मोही, कंठी उदंड वासर ती. ॥६१॥
“पुरुषोत्तम शिव वदला तें सत्य असें मनांत बाणावें, ।
प्रद्यूम्न रणीं वधितो सुतशतसह शंबरासि जाणावें.” ॥६२॥
ऐसें शक्र वदे, मग समरीं प्रद्युम्न शतहि तो खपवी, ।
त्या विजयें बहु पावे बळवृत्रघ्नापरीस तोख पवी. ॥६३॥
कामें शंबर, शंभार सुत मारुनि, संगरांत कोपविला; ।
द्विरद कुसुमहाराला, तेंवि न मानी मनांत जो पविला. ॥६४॥
ऋक्षसहस्त्रयुत रथीं शंबर संगर करावया चढला, ।
सुतशोकप्रभव महाकोपें, अनळें कटाहसा, कढला. ॥६५॥
दुर्धर, तथा प्रतर्दन,  रिपुहंना, केतुमालि, हे सचिव ।
पाहुनिं म्हणे गुरु, ‘सुभटपूजासाहित्य सुरपते ! रचिव.’ ॥६६॥
उत्पत फार झाले, परि दानव रण करावया आले, ।
नाहीं मरणा भ्याले, भट लोकीं शस्त्रहत सुखें धाले. ॥६७॥
केशवचक्रसमप्रभ सोडी तो केतुमालि चक्रातें, ।
तेणेंचि तया मारी, वाटे आश्चर्य फार शक्रा तें. ॥६८॥
तो केतुमालि चक्रें वधुनि, निववितां रतीश्वरें द्दष्टी, ।
गंधर्व, अप्सरा, सुर, कुसुमाची करिति मन्मथीं वृष्टी. ॥६९॥
बळ मथुनि, क्षतजनदी वाहवुनि रणांगणांत, कामानें ।
अत्युप्र शत्रुहंता वधिला, प्लवगेंद्रा जेंवि रामानें, ॥७०॥
क्रोधें वदे प्रतर्दन, “रडविन मी रुक्मिणीस हरिसहित; ।
म्यां देखिल्या न साधे या लोकीं तों कदापि अरिस हित.” ॥७१॥
उचली प्रतर्दनाचा सारथि तुरगासमेत बाहूंनीं, ।
निमिषांत जाय मकरध्वज सध्वज रथ नभांत वाहूनी. ॥७२॥
गरुड व्यालासि,  तसा घेवुनि, नेवुनि महाजवें दूर, ।
चूर, क्षितिवर टाकुनि, करि; परि तो, सजुनि रथ, निघे शूर. ॥७३॥
हाणी रतिपतिचें उर, परि दुखवी लेशमात्र न गदा तें, ।
परवश होय, फिरे, स्त्री पतिवरिच जसी मिळूनि नगदातें. ॥७४॥
त्याच्याचि गदेनें तो स्वर्गपथा लाविला सचिव, राया ! ।
शौर्यें रिझोनि, जाणों प्रभुपुत्रें हा विलासचि वराया. ॥७५॥
वधितां प्रतर्दन, सुटे त्रासें पळ शेषदैत्यसमुदाया, ।
अविसंघ सारमेया भ्याला, तैसाचि शत्रु समुदा या. ॥७६॥
जसि रुधिरदिग्धवस्त्रा, गतशोभा, स्त्री रजस्वला, राया ! ।
संकोचे परपुरुषा, शंबरसेना तसीच ती बा ! या. ॥७७॥
सेनासचिवविनाशें शंबर कोपें करी महासमर, ।
त्यासि म्हणे श्रीनारद, “देव कराया  जयें सहास, मर.” ॥७८॥
अस्त्रें सुटतां कांपे भूमि, मुनि म्हणे, धरित्रि ! अंब ! रहा, ।
स्थिर धैर्य धरुनि, होतो प्रद्युम्नकरें परासु शंबर हा.’ ॥७९॥
अग्न्यस्त्र तया योजी, प्रकटी जैं वृक्षवर्ष देवारी, ।
अस्त्रातें प्रत्यस्त्रें प्रद्युम्न, सुरसि हर्ष दे, वारी. ॥८०॥
शंबर सिंह प्रकटी, काम तयावरि महाशरभ, राया ! ।
शुद्धीं पिशाचसें, न क्षम अरिचे प्रभुसुतीं शर भराया. ॥८१॥
शस्त्र न चाले कांहीं, अस्त्रहि, शंबर म्हणे, “निदानींच्या ।
मी मुद्नरें वधिन या, करुनि द्दढ उर:स्थळीं भिदा नीचा. ॥८२॥
तप करुनि रचुनि, जेणें शुंभनिशुंभांसि संगरीं निवटी, ।
तो मुद्रर मज दे ती, जी शत्रुबळीं, जसी तमीं दिवटी,” ॥८३॥
ज्यासि अवध्य न कोणी, त्या दुर्गादत्त मुद्ररें अरि तो ।
कामवध मनीं योजी, शक्र म्हणे, “हाय ! हा यशा हरितो.” ॥८४॥
प्रार्थी नारदमुनिला, “उपदेशीं वैष्णवास्त्र कामातें, ।
रावणवधार्थ सांगें सूर्यह्रदय घटज जेंवि रामातें. ॥८५॥
जा, जातिस्मरण, तथा कवच अभेद्यहि मुने ! तया दे हें; ।
समयीं साहित्य करुनि, उद्धरिले बहु तुवां दयादेहें.” ॥८६॥
केलें सक्रोक्त सकळ, भेटोनि प्रभुसुतासि सत्वर, तें; ।
दुर्गास्तवनहि कथिलें देवर्षिवरें विशुद्धसत्वरतें. ॥८७॥
असुरें मुद्रर धरितां, झाले उत्पात, न स्फुरे तर्क, ।
रोमांच देवदेहीं उठले, द्वादश नभीं नृपा ! अर्क, ॥८८॥
क्षम दुर्गोद्भव मुद्नर अमरादिप्राणिलक्ष माराया, ।
कांपे ब्रम्हांडहि, मग धृति कोठुनि आणिल क्षमा ? राया ! ॥८९॥
उतरें रथावरूनि रतिपति, म्हणूनि ‘नमो नम:,’ स्तवी तीतें, ।
‘श्रितकल्पलता,’ जीतें म्हणती हें जग समस्त वीतीतें. ॥९०॥
होय प्रसन्नचित्ता, दर्शन देवुनि, म्हणे तया आर्या, ।
“वत्स्प ! वर माग, शरण ज्यास्तव आलासिम करिन त्या कार्या.” ॥९१॥
बद्धांजलि काम म्हणे, “माते ! मज जय रणीं घडावा गे ! ।
त्वदनुग्रहेंचि, भगवति ! जीव सुखें, वरुनिही जडा, वागे. ॥९२॥
माझ्या उरीं विराजो, होवुनियां पद्महार मुद्नर हा; ।
म्हणसील सति ! अपथ्या माषा ‘होवोनि पथ्य मुद्न रहा.’ ” ॥९३॥
दुर्गा, “तथास्तु” ऐसें बोलुनियां, गुप्त होय जों, अरि तों ।
स्वमनांत म्हणे, गरगर मुद्नर फिरवीत, “घात मी करितों.” ॥९४॥
सोडी शंबर मुद्नर, उद्नरधर कोपला जसा काळा, ।
परि तो शिवाप्रसादें पद्माची होय, लागतां, माळा. ॥९५॥
जयजयकार करिति  सुर, मुनि, जे गगनांत दाटले होते; ।
दुर्गाप्रसाद मुदिरचि, शक्रादि मयूर वाटले हो ! ते. ॥९६॥
मग वैष्णवास्त्र योजी तो जीमूताभदेवसुत, राजा ! ।
सोडी वर खरतर शर, परसेनासिंधुकोटि सुतरा ज्या. ॥९७॥
शर, शंबरोर भेदुनि, धरणींत शिरे, फणी जसा शिरतो; ।
जाणों “भोगवतीच्या” काम म्हणे “पिवुनि हा रसाशि रतो.” ॥९८॥
त्या शंबरासि म्हणती कवि ‘सिकतासेतु’ सायका ‘पूर,’ ।
किति अंधकार तो, शर खरकर, तो दीप, काय कापूर ? ॥९९॥
श्रीवैष्णावास्त्रतेजें झाला नाहींच त्या शरें काय; ।
प्रद्युम्न म्हणे, “केलों पूर्वीं ऐसाचि मी हरें काय ?” ॥१००॥
झाला भस्म, परि नृपा ! गेला उत्तम गतीस शंबर तो, ।
तरिच प्रभुसुरभीतें स्मरुनि सदा, साधुवत्स हंबरतो. ॥१०१॥
सुर गधर्व निवाले, हर्षें नर्तन वराप्सरा करती, ।
वर्षति दिव्यें कुसुमें, जयजयकारें  नभासि ते भरिती. ॥१०२॥
सुर गेले स्वर्गातें गात प्रद्युम्नकृष्णशर्वांतें, ।
रतिलक्ष्मीदुर्गांतें ज्यांचें यश निववितेंच सर्वांतें. ॥१०३॥
स्मर ऋक्षवंत नगरीं जावुनि, मायावतीस घेवून, ।
सेवून स्वतुतितें, गगनपथें द्वारकेसि येवून, ॥१०४॥
देवून प्रथम प्रभु गुरुच्या अंत:पुरांत सहसाच ।
मातेस हर्ष, विस्मय मातृसपत्नीस, होय मह साच. ॥१०५॥
वैदर्भीच्या अंत:पूर्वा ससुरर्षि हरि पुरा गेला, ।
कळवी सुतवृत्त प्रभु, वाटवि हितकरचि, न रिपु रागेला. ॥१०६॥
भुलवी रूपें, चरितें, द्वारवती पुत्र जलजनाभाचा, ।
रुक्मीसि गमे हरिपरिभवकर, भंगूनि खळजना, भाचा. ॥१०७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP