उत्तरार्ध - अध्याय ३० वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


असुरांतें भस्म करी त्रिपुरासह अस्त्रपावकें त्र्यक्ष, ।
देवें, प्रधान उरले जे संख्यें करुनि साठ, ते लक्ष ॥१॥
जंबूमार्गीं तपले. त्यांच्या विधि नाठवूनि परमागा, ।
होय प्रसन्न, भगवान तो त्यांसि म्हणे, ‘अभीष्ट वर मागा.’ ॥२॥
असुर हरद्वेषी वर न वरिति हरपरिभवाविणें इतर; ।
त्यांसि म्हणे, “मज म्हणतां भलतेंचि अशक्य तें कसें ‘वितर’ ? ॥३॥
कैसें या ब्रम्हांडप्रासादाच्या खणाल जोत्यातें ? ।
न घडेलचि द्दढ निश्चय, उग्र तप:क्षम म्हणाल जो, त्यातें,” ॥४॥
गेले शरण प्रभुतें किति, ऐकुनि पद्मयोनिबोधातें; ।
असुर उमजले अतुळें भाग्यें लोकत्रयकयोधातें. ॥५॥
नच रव्यभाव होयिल खद्योतशता, न पव्यभाव नगा, ।
ईशपरिभव न जीवा, हें समजति असुर भव्यभावन, गा ! ॥६॥
कुमतींस म्हणे, “वेतन ठेवावें प्रभुवरें न दासाचें. ।
रुद्रक्रोधावांचुनि मागा, घ्या, इष्ट तें वदा साचें.” ॥७॥
वदले असुर, “असावीं सुसमृद्धें षट पुरें रहायाला. ।
तीं धरणींत वसावीं, न शकावे सुर तयां पहायाला. ॥८॥
पहिलें, दुसरें, तिसरें, चवथें, कीं पांचवें, अयन सावें, ।
देवून, परां आम्हां देवांचें लेशही भय नसावें. ॥९॥
रुद्रापासुनि आम्हां मरण नसो; मारिले बहु ज्ञाती; ।
हृदयांत तसीच असे, बा ! झाली भीति जी, बहुज्ञा ! ती.” ॥१०॥
त्यांतें चतुरास्य वदे, “हें सर्व दिलें तुम्हां जसें इष्ट; ।
व्हाल सुरांसि अवध्य, श्रीरुद्रासहि. न मोघवाक् शिष्ट. ॥११॥
चिर नांदाल सुखानें, सुब्राम्हाण एकतरि न भाजाल; ।
माजाल, न वांचाल स्पष्ट, विलंघूनि जरि नभा जाल. ॥१२॥
नारायण साहेना ऐकुनि विप्रोपघात कानांहीं, ।
स्मरुनि प्रभुवर होत क्षुब्ध असा अन्य पातका नाहीं.” ॥१३॥
आज्ञा होतां गेले इष्टस्थानीं सुरारि, वर वरुनी. ।
देव तप:संकोचें करिती दुष्टीं प्रसाद वरवरुनी. ॥१४॥
श्वेतीं वृषभीं बैसुनि शिव ये शरणागतांसि ताराया, ।
ज्याची कीर्ति क्षीरधिलहरीहुनि शतगुणें सिता, राया ! ॥१५॥
असुरांतें शंभु म्हणे, “आलां जरि देवरिपु मला शरण, ।
मजसह कर्मरण तसा, श्रीरामासीं जसा पलाशरण ॥१६॥
ज्यांहीं दीक्षा दिधली, त्यांसूह उत्तमगतीस पावाल. ।
ऋण शरणागति खंडी, देणें स्वर्गादिलोक हा वाल. ॥१७॥
तुमच्या सुतप:स्थानीं तीन दिवस मात्र आपुल्या धर्में, ।
वर्ततिल, तयाम मिळतिल उत्तमलोकीं तुम्हांअसीं शर्में. ॥१८॥
तरतिल बहु जन तुमच्या शुद्धतप:स्थानवासिसहवासें; ।
चंदनसंगि नग वरिति पूजा, देवुनि जनासि मह वासें. ॥१९॥
पूजील प्रेमें जो सन्मनुज श्वेतवाहना, मातें, ।
पावेल सद्नतिस तो, घेवुनिहि श्वेतवाहनामातें.” ॥२०॥
ऐसें वदुनि, तयांसह गेला श्रीरुद्र रुद्रलोकाला, ।
आहे गात्यां श्रोत्यां, शोकाला हरुनि, देत ओकाला. ॥२१॥
‘जंबूमार्गा जायिन, जंबूमार्गीं वसेन,’ हें बोले, ।
तो पुरुष, रुद्रलोकीं पूजा पावोनि, बहु सुखें डोले. ॥२२॥
श्रीब्रम्हादत्तनामा पंडितवर याज्ञवलक्यशिष्य गुणी, ।
जो पद्महस्तहि सदा घ्याया दुष्टप्रतिग्रहासि कुणी. ॥२३॥
श्रीवसुदेवाकरवीं करवी हयमेध हा कविप्रवर; ।
देणारा अर्थिजना सर्व, न देतांहि हाक, विप्रवर. ॥२४॥
तो एका वर्षाचें प्रारंभी शंभुसा सुधी सत्र, ।
अध्वर्यु सहाघ्यायी श्रीवसुदेवासि पाठवी पत्र. ॥२५॥
वसुचेव देवकीसह सत्राला षट्‌पुरस्थळीं गेला, ।
स्वौपाध्याय सखा तो, सदनीं येवूनियां, सुखी केला. ॥२६॥
आवर्तेच्या तीरीं मुनिसंकीर्णीं सुसत्र राया ! तें, ।
बहुदक्षिण बव्हन्न स्तविलें सत्कविजनें समायातें. ॥२७॥
गुरुसत्रीं हरि जावा सादित्य सरुद्र साश्विवसु देव, ।
त्या ब्रम्हादत्तसत्रीं तैसाचि सदार  जाय वसुदेव. ॥२८॥
जैमिनि, सुमंतु, कृष्णद्वैपायन, याज्ञवल्क्य, जाजलि, हे ।
मुनि देवलादि, मीही, होतों; ज्यां तो सुविप्रराज लिहे. ॥२९॥
भूप ब्रम्हाण म्हणती, “वसुदेवाचा सखा खरा होय.” ।
तो यजमान करि सुखी, धन वांटी देवकी जसें तोय. ॥३०॥
श्रीश सुत जिचा, द्याया विप्राला धन तिला उणें काय ? ।
देतां, घेतां, वदतां, श्रमवी सत्रांत शतगुणें काय. ॥३१॥
तें सत्र होत असतां, षटपुरवासी निकुंभमुख दैत्य ।
आले, ज्यांसि पहातां यावें अमराधिपासही शैत्य. ॥३२॥
यजमाना ख्ळ म्हणती, “आम्हां प्राशावयासि दे सोम, ।
दे कन्या, दे रत्नें, चालों देवूं तरीच हो ! होम.” ॥३३॥
यजमान म्हणे, “नाहीं असुरांला यज्ञभाग वेदांत, ।
मानधनाला योग्यहि वस्तु न देवूनि, भागवे दांत. ॥
झाला संकल्प खरा, द्याव्या सद्दशांसि आपल्या कन्या; ।
धन्या मिळति न अन्या, अन्यायेंकरुनि पंडितंमन्या. ॥३५॥
रत्नें देयिन सख्यें मी येतां सबहुमान सत्रास. ।
हा कृष्णाश्रित; पावे स्वप्नींही न बहु मानस त्रास.” ॥३६॥
क्रोधांधें असुरांच्या कटकें बा ! यज्ञवाट तो लुटिला, ।
कुटिला रक्षकजनही, मर्यादा काय हो तया कुटिला ? ॥३७॥
कीं तो तद्दैवाला विलयाला अज्ञ वाटला जावा; ।
वरद्दप्त निकुंभ असुर कां, लुटितां यज्ञवाट, लाजावा ? ॥३८॥
तें यज्ञवाटलुंठन सत्रीं तैसें प्रवर्ततां क्षिप्र; ।
करि शौरि रामकृष्णध्यान, सुखी व्हावया सखा विप्र. ॥३९॥
कृष्ण म्हणे, “प्रद्युम्ना ! जा, कन्या रक्ष, समय हा, निघ रे ! ।
बा ! साधुमनीं पाडू खरशरततिसी न कीर्तिहानि घरे. ॥४०॥
येतों. यादवसेना घेवुनि, मी षटपुरास सत्वरची; ।
तो रक्षीं यज्ञसद. स्वजनसमवना सुधी ससत्व रची.” ॥४१॥
कृष्णातें नमुनि निघे, कार्यार्थ यशोर्थ असुहि ओपावे, ।
प्रद्युम्न निमेषांतरमात्रें त्या षटपुरासितो पावे. ॥४२॥
प्रभुपुत्र षट्‌पुरा ये, सत्या सत्रांत लोपवी कन्या, ।
तो मायामय कन्या स्थापुनि तैशाच सुंदरी अन्या. ॥४३॥
कन्या रक्षुनि, सांगे प्रद्युम्न नमुनि रहस्य आजीतें, ।
कीं, ‘आला यदुसेनासह कृष्ण करावयासि आजीतें.’ ॥४४॥
त्या मायामय कन्या हरुनि, सुराराति षटपुरा गेले; ।
चालविलें सत्र, सुखी वसुदेवें सर्व विप्र ते केले. ॥४५॥
यजमाननिमंत्रित नृप सर्व जरासंध, दंतवक्र, तथा ।
शिशुपाळ, सुकीर्ति सगुण पांडव, ज्यांची महापवित्र कथा, ॥४६॥
विंदानुविंद, रुक्मी, शल्य, शकुनि, धार्तराष्ट्र, मालव, ते ।
बहु आले, जे वातचि, ज्यांचे रिपु ते दिवेचि मालवते. ॥४७॥
भूप उतरले होते बहु सेनायुक्त षटपुराजवळ, ।
पाहुनि देवर्षि म्हणे, ‘देतें यश हरिस हें सुराजवळ. ॥४८॥
येथें कांहीं आपण युक्ति करावी.’ असें मनीं आणी, ।
दे भेटि निकुंभाला, ज्याची सर्वां रुचे सुधावाणी. ॥४९॥
त्यासि म्हणे, “स्वस्थ कसे बसलां ? निश्चिंत वर्ततां स्वैर ? ।
यशशालियादवांसीं करुनि तुम्ही असुर हें असें वैर. ॥५०॥
जो ब्रम्हादत्त, तोचि श्रीकृष्ण स्पष्ट, कीं, सखा त्याचा, ।
काळाअशाहि उतरों देणार ग्रास जोन खात्याचा. ॥५१॥
जीं ब्रम्हादत्तकन्यारत्नें, द्यायाहि नृपजनीं कांहीं ।
व्हा युक्त, नरवरांच्या विजय रणीं व्हावया अनीकांहीं,” ॥५२॥
ऐसें त्या असुरांतें सिकवुनि देवर्षि सटकला गाया, ।
यश करि, पांडववारीं विलयातें दुष्टकटक लागाया. ॥५३॥
सिकवुनि मुनि जाय, असुर मग मगधवरादिकांसि ते रत्नें ।
देती कांहीं, कन्यारत्नेंही, जीं सुदुर्मिळें यत्नें. ॥५४॥
राजे म्हणति, “निकुंभा ! प्रत्युपकृपि सर्व वांछिती आर्य, ।
केलें आतिथ्य तुम्हीं, सांगा चित्तीं असेल जें कार्य.” ॥५५॥
माहात्म्य सत्य वर्णुनि नरनाथांतें निकुंभ तो मागे, ।
“व्हावें सहाय युद्धीं, कीं, निजधर्मीं तुम्ही सदा जागे.” ॥५६॥
त्या पांडुसुतांवांचुनि म्हणति नृप सकळ ‘अवश्य’ ते, राया ! ।
तों वृष्णिसैम्न्य घेवुनि, हरि आला त्या खळासि घेराया. ॥५७॥
सत्रसमीप प्रांतीं प्रभु यादवसैन्य उतरवी, उतरे; ।
नारद म्हणे, “असुरहो ! आला असुरारि देवकीसुत, रे ! ॥५८॥
वचन महादेवाचें चित्तांत धरून, चक्रधर आला, ।
यद्यश म्हणे परांला, ‘चळदळदळसेचि थरथरां हाला.’ ॥५९॥
रक्षार्य परिभ्रमणीं प्रद्युम्नास स्वयेंचि तटकारी, ।
जो आकळी खळांतें सहजें, चटकांसि जेविं चटकारी. ॥६०॥
भवतें गुल्मस्थापन करि सेनासन्निवेश रक्षाया, ।
हें नयदर्शन; कालहि दक्ष न हरिसंश्रितांसि लक्षाया. ॥६१॥
आवर्तागंगेंत स्नान करुनि, राम, कृष्ण, युयुधान, ।
गरुडीं बसले वंदुनि, घेवुनि बिल्वोदकेशवरदान. ॥६२॥
प्रद्युम्नातें गगनीं स्थापी सेनेपुढें रमाकांत, ।
पांडूसुतांतें सत्रीं, कीं, हे शुचि, शूर, शुद्धधी, शांत. ॥६३॥
जीमाजि षट्‌पुरांची वसति, नृपा ! त्या गुहेचिय निकट ।
विकत स्वरिपु वधाया, यादवसेनेसि विभु म्हणे, ‘चिकट.’ ॥६४॥
मग जगदीश जयंत प्रवर स्वमनांत आठवी, राया ! ।
शक्रसुता, शक्रसखा, तत्समचि परान्त पाठ वीरा या. ॥६५॥
आले प्रवरजयंत, प्रद्युम्नसमीप ठेविले व्योमीं, ।
सादर रणीं तिघेहि, श्रोत्रिय जैसे सदैवही होमीं. ॥६६॥
रचिला सांबगदांहीं जो मकरव्यूह परशताभेद्य ।
अनिरुद्धोद्धव रक्षिति, ज्यांसि असे विदित सर्वही वेद्य. ॥६७॥
मग रणदुंदुभि वाजे, आधीं प्रभु युद्धसिद्धता करवी; ।
सुरकार्य, तोंचि नरतारीति धरी, जोंचि सिद्ध ताक, रवी. ॥६८॥
असुरहि षट्‌पुरवासी सर्व गुहेंतून सरति बाहेर, ।
मुनि आपणा म्हणे, “हे, व्यर्थ अनय करुनि, मरति, बा ! हेर. ॥६९॥
तरले, परि भक्तिसुखा अंतरले मूढ सर्व दानव, रे ! ।
भक्त कसे हे मिरवति मुक्तिवधूसहित सर्वदा नवरे ! ॥७०॥
भक्तिसुख श्रवणकरुनि, करिसीलचि, म्हणुनि ‘हा ।’ निकुंभा रा. ।
कुळपुरुषहानि साहे प्रभुहिन, सत्कलाहानि कुंभार.” ॥७१॥
नानावाहनगत ते मणिकांचनभूषितांग गगनातें ।
व्यापिति, कां न सुरांसीं वाद्यांचें लावितील मग नातें ? ॥७२॥
भूमितळा जेंवि, करी दैत्यांची तेंवि पद नभा सेना. ।
शर ईश्वरावरि धरी, कां कविस निकुंभ मदन भासेना ? ॥७३॥
राजे सहाय झाले असुरांला, असुरहित करायास. ।
सफळ कधींतरि झाला काय जगीं असुरहितकरायास ? ॥७४॥
मागध, विराट, कौरव, रुक्मी, भगदत्त, शल्य, शकुनि, असे ।
नृप असुरांसि मिळाले; कीर्ति न, लोभें नया न शकुनि, असे. ॥७५॥
दैत्य निकुभ महाशरवृष्टि करी, लेशही न भागे हा; ।
वृष्णिबल असो, व्यापी ग्रहसिद्धसुरांचिया नभा गेहा. ॥७६॥
झांकी सबळ निकुंभा तो यादवसैन्यपति अनाधृष्टी, ।
उघडूं न देचि तच्छरसंहतिविद्युत परा जना द्दष्टी. ॥७७॥
मोहुनि, गुहेंत ने तो, हरुनि अनाधृष्टितें, महामाय, ।
जय मानुनि, कृतगर्ग ब्रम्हांडींही कुधीन हा माय. ॥७८॥
षटपुरगुहेंत नेवुनि, दैत्य अनाधृष्टितें ठकवि, रोधी, ।
कृतवर्म्यातेंहि हरी तो, मायावी, महाठक, विरोधी. ॥७९॥
तैसाचि चारुदेष्णहि, वैतरण, सनत्कुमारही नेला, ।
ऋक्ष, निशठ, उल्मुकही; थोर निकुंभें अनर्थ तो केला. ॥८०॥
नेतां यादव. कोणा तो मायेच्या न दाविला पदरें. ।
वीरवधू परि करित्या, ऐकुनियां हें, तदा विलाप दरें. ॥८१॥
श्रीकृष्ण म्हणे, “नेले, रे ! यादव वीरमणि कसे ? चोरा ! ।
होरा साधुनि, बहुधा केलें त्वां घोर कदन हें, घोरा !” ॥८२॥
वीरपुरुषरत्नांच्या अपहारें फार राम रागेला, ।
हांसुनि, म्हणे, “सरुनि कीं तव आयुर्दाय, पामरा ! गेला.” ॥८३॥
युयुधान म्हणे, “यावरि न जगाचा हेतु वांचविल यातें, ।
दुष्ट ! नेले अनयें निज आश्रित हे तुवांच विलयातें. ॥८४॥
प्रद्युम्न बहु क्षोभे, खवळे अनिरुद्ध, सांब नच साहे, ।
यादव भट कडकडले, एकाच्याहि न मनीं क्षमा राहे, ॥८५॥
सज्ज करुनि शार्ङधनु, प्रभुनें बहुकोटि सोडिले बाण, ।
प्राण हरिति असुरांचे, त्यां प्रभुची काय घातली आण ! ॥८६॥
सर्वासुरसर्वायुधवृष्टीतें स्वस्थचित्त हरि साहे, ।
वृष जेविं वृष्टि, सज्जा निंदा, द्दष्टांत योग्य परिसा हे. ॥८७॥
प्रभुबाणांतें, समरीं परसमुदाय न विशाळही साहे, ।
सिकतासेतुशतांत न एकहि वृष्टींत बा ! जसा राहे. ॥८८॥
समरीं असुर हरिपुढें न टिके, सिंहापुढें जसा बैल, ।
मेघ जसा वायुपुढें, अथवा शक्रापुढें जसा शैल. ॥८९॥
नारायणापुढें ते हतबळ झाले समस्त मग नीच, ।
गेले उडोनि वरि, परि अरि हरिसुतमित्र वधिति गगनींच. ॥९०॥
पाडिति शिरें परांचीं, जेंवि फळें उग्र वायु ताडांचीं, ।
ते तपन, दहन, राहों देती त्या जीवनें न आडांचीं. ॥९१॥
प्रद्युम्न कर्णमागधमुख मार्यांमयगुहांतरीं कोंडी, ।
पडले मोहीं, निघणें नेणति ते, जेवि कर्दमीं धोंडी, ॥९२॥
धृतराष्ट्रसुत, विराट, द्रुपद, शकुनि, शल्य, मनुजवर विंद, ।
अनुविंद, कोंडिले हे. प्रभुसुत विधु, भूपवृंद अरविंद. ॥९३॥
भीष्महि तयांत खळगुण ! हा तो कवि काय कोंडला जावा ? ।
ज्या षडरिवर्ग उग्रहि बहु दावायासि तोंड लाजावा. ॥९४॥
भगदत्तहि, शिशुपाळहि, त्या गतितें मान्य तो करी रुक्मी; ।
कुदसा अरिलाहि नसो,म्हणतो, “तीहूनि बहु बरी रुक्” मी. ॥९५॥
त्यांतें प्रद्मम्न म्हणे, “मायेसि तुम्ही दिलां उपायनसे, ।
संबंधगुरुत्व कळे, प्रभुच्या आज्ञेपुढें उपाय नसे. ॥९६॥
बिल्वोदकेश्वराच्या आज्ञेनें घातलां गुहागर्भीं, ।
अर्भीं तात, तसा प्रभु विनतीं, अनतीं शिखी जसा दर्भीं. ॥९७॥
शिशुपाळ राजसेनापति धरितां प्रथम खवळला भारी, ।
मारी प्रद्युम्नातें खरशर परकीर्तिधवळलाभारी. ॥९८॥
बिल्वोदकेश्वरातें वंदुनि,ते बद्ध नृप करायास ।
प्रद्युम्न सिद्ध झाला जों, सहदितशक्तितें  हरायास; ॥९९॥
तों, ज्याच्या आज्ञेनें चळवळति न शैल मेरुशैलादी, ।
त्याचा पार्षदवर जो, तो तेथें प्रकट होय शैलादी. ॥१००॥
नंदी प्रद्युम्नातें बोले, “बिल्वोदकेश्वरें पाश ।
पाठविले, घे, नृप हे बांध, कराया कुबुद्धिचा नाश. ॥१०१॥
प्रभुनें आज्ञा केली, ‘कथिलें रात्रौ जसें, तसेंचि करी, ।
बांधुनि गुहेंत घाली राजे, यांच्या नसो दया निकरीं, ॥१०२॥
आधीं नृप बांधावे, वधिल्यावरि सर्व दैत्य, सोडावे; ।
कृष्णासहि सांग, ‘रणीं असुर मथुनि, कीर्तिराशि जोडावे. ॥१०३॥
जे, असुरांसि मिळाले मुनिकन्यांच्या धरूनि लोभातें, ।
जें कलुष कर्म केलें, दीन करीलचि हरूनि शोभा तें,”’ ॥१०४॥
सांगुनि नंदी गेला, ते दिव्य सहस्त्र पाश ओपून. ।
प्रद्युम्न मग नृपातें बांधुनि, टाकी, गुहेंत कोपून. ॥१०५॥
बांधुनि बळपति, धनपति, करि हरिचा पुत्र सुगुणखनि रुद्ध, ।
सर्वस्व हरुनि त्यांचें, ठेवी तद्रक्षणासि अनिरुद्ध. ॥१०६॥
केलें कर्म निर्वदी प्रद्युम्न; मग स्वतातमित्रास ।
प्रभु सत्रीं नमुनि, म्हणे, “कर्म करीं, मन करूनि वित्रास. ॥१०७॥
ज्या रक्षक पांडव, त्या पाहेना शक्र वक्र नयनांहीं, ।
अर्जुन पहा, असुर किति ! तुज काळाचेंहि लेश भय नाहीं. ॥१०८॥
ताता ! त्या असुराहीं हस्तेंही स्पर्शिल्या न तव कन्या. ।
तुझियाचि यज्ञवाटीं मायेनें ठेविल्या, पहा, धन्या.” ॥१०९॥
त्या ब्रम्हादत्तविप्रा सांगुनि ऐसें, सुरारि माराया,
ताराया विश्व यशें, तो होय मुरारि सिद्ध बा ! राया ! ॥११०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP