अप्रस्तुतप्रशंसा अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


यांपैकीं पहिलीचें उदाहरण :--- “मदानें ज्यांचीं गंडस्थळें मलिन झालीं आहेत असे हत्ती, दिशांच्या टोंकाला आहेत असें ऐकिवात आहे. हत्तिणी (म्हणाव्या तर) त्या दयेचा विषय आहेत; इतर पशु (म्हणावें तर) ते त्याच्या तोलाचे नाहींत. तेव्हां आतां, या जगांत, ज्यांतीं टोकें अनुपम आहेत अशा आपल्या नखांचें चातुर्य, ह्या मृगराजानें (सिंहानें) कोणाचे ठिकाणीं प्रकट करावें बरें ?”
किंवा ह्या पहिल्या प्रकाराचें हें दुसरें उदाहरण :---
“जो खेळायला लागला असतां चोहोंकडे उसळणार्‍या लाटांच्या गर्जनांनीं लोकपालांना मंदराचलाचें घुसळणें होत असल्याचा भास (भ्रम) होत असे; तिमिंगिल माशाचें जगडव्याळ शरीर गट्ट करून टाकणें हें काम जो सहज कौतुकानें करतो; आणि क्रीडा करण्याच्या गडबडींत, ज्यानें समुद्र सोडून दिला आहे; अशा या देव माशानें (आतां) कोणाच्या पोटांत क्रीडा करावी बरें ?” अथवा हें तिसरें उदाहरण :--
“पूर्वी मानस सरोवरांत, विकसित झालेल्या कमळांच्या झुबक्यांतून गळून पडणार्‍या परागांनीं सुवासिक झालेल्या पाण्यांत ज्याचें वय गेलें, तो हंसाच्या कुळांतील श्रेष्ठ हंस आतां अनेक बेडूक जमा झाल्यानें भरून गेलेल्या डबक्याच्या पाण्यांत कसा राहील, सांगा बरे ?”
श्लिष्ट विशेषणानें युक्त अशी सुद्धां पहिल्या प्रकारची अप्रस्तुतप्रशंसा आढळून येते.
उदा० :--- ‘मी अत्यंत नीच आहें (मी अत्यंत खोल आहे, हा दुसरा अर्थ) असें मानून हे कुव्या ! तूं मुळीं सुद्धां खेद करू नको. कारण तूं अत्यंत रसिक ह्रदयांचा असून, (पाण्यानें पूर्ण भरलेला असून, हा दुसरा अर्थ) तूं दुसर्‍यांच्या गुणांचा गौरव करणारा आहेस. (पाणी काढण्यास लावलेली दुसर्‍यांची दोरी पकडतोस, हा दुसरा अर्थ)’
या ठिकाणीं (म्हणजे वरील श्लोकांत) समासोक्ति मदत करणारी आहे. असें म्हणू नये; कारण, ती प्रस्तुत अलंकाराच्या विरुद्ध स्वरूपाची असल्यानें, या अलंकाराला उपकारक होऊच शकत नाहीं.
आतां ‘येनास्यभ्युदितेन चंद्र गमित: क्लान्तिं रवौ तत्र ते युज्येत प्रतिकर्तुमेव न पुनस्तस्यैव पादग्रह:’ (काव्यप्रकाश उल्लास १० श्लोक ४४४) ह्या ठिकाणीं, समासोक्ति अप्रस्तुत प्रशंसेला उपकारक आहे असें जे मम्मटांनीं म्हटलें आहे, त्यावर विचार करू या. या ठिकाणीं विशेषणांच्या सामाच्या बळावर सूचित झालेला क्षुद्र पुरुषांचा वृत्तांत प्रस्तुत आहे का अप्रस्तुत आहे ? प्रस्तुत असेल तर हा श्लोक समासोक्तीचा विषयच नव्हे; कारण परोक्तिर्भेदकै: श्लिष्टै: समासोक्ति:” (म्हणजे श्लिष्ट विशेषणांच्या योगानें अप्रस्तुताचें कथन करणें ही समासोक्ति) असें समासोकींचे लक्षण त्यांनींच सांगितलें आहे. त्यांच्या या वरील व्याख्येंतील ‘पर’ या शब्दाचा अर्थ अप्रकृत असा आहे. बरे, क्षुद्र पुरुषाचा वृत्तांत वरील श्लोकांत अप्रस्तुत आहे, असें म्हटलें तर, हा श्लोक अप्रस्तुतप्रशंसेचा विषयच होऊ शकत नाहींं; कारण “अप्रस्तुतप्रशंसा तिला म्हणावें कीं जी प्रस्तुताचा आश्रय करते” असे ह्या अलंकाराचें लक्षण (त्यांनीच० केले आहे. ‘प्रस्तुताश्रया’ या (वरील) पदाचा अर्थ, “प्रस्तुत आहे आश्रय म्हणजे प्रधान जिच्यांत, ती” असा आहे. म्हणून ‘श्लिष्ट विशेषणानें सुचविलेला दुसरा अर्थ, म्ह० समासोक्ति’ एवढाच वरील (मम्मटाच्या) लिहिण्याचा (म्ह० येनास्यभ्युदितेन इत्यादि श्लोकावरील टीकेचा) अभिप्राय समजून त्याची कशीतरी संगती लावावी.
वरील अप्रस्तुतप्रशंसेला साद्दश्यमूला असें म्हणतात. हिच्यांत वाक्याचा अर्थ कुठें कुठें सुचित अर्थाहून अलगच राहतो. (म्ह० अप्रस्तुत अर्थ स्वतंत्र सरळ बसतो, त्याकरतां प्रस्तुतार्थ घ्यावा लागत नाहीं.) वर आलेल्या अनेक उदाहरणांत असेंच आढळतें; पण कुठें हा वाक्यार्थ स्वत:तील विशेषणांचा अन्वय योग्य व्हावा म्हणून (म्ह० अप्रस्तुतार्थ चपखळ बसावा म्हणून) सूचितार्थाशीं स्वत:च्या अभेदाची अपेक्षा करतो. उदा० :---
“हे कुटज्याच्या फुला ! दैवयोगानें तुझ्याजवळ आलेल्या या भुंग्याची तूं हेटाळणी करू नको; करण मधानें तुडुंब भरलेल्या कमळांचा हा अत्यंत सन्मान्य असा (पाहुणा) आहे.”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP