अप्रस्तुतप्रशंसा अलंकार - लक्षण ५

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


कार्यानें काय सूचित झाल्याचें उदाहरण हें :---
“तुला पूर्वीं सृष्टिकर्त्यानें सर्व जगाचें रक्षण करण्याकरतां उत्पन्न केलें असूनही, हे सूर्या ! तूं आपल्या ज्वालानीं भरलेल्या किरणांनीं निष्ठुरपणे जाळीत आहेस; त्या अर्थी रागानें ज्याचे डोळे लाल झाले आहेत व रणांगणावर जो जाण्याच्या बेतांत आहे, अशा दिल्लीच्या राजाची तुला माहिती नाहीं, असें आम्हाला वाट्तें.”
ह्या ठिकाणीं राजाच्या (म्ह० दिल्लीश्वराच्या) वर्णनाचें अंग म्हणून, सूर्याच्या मनांत भयानें धडकी भरणें हा जो प्रस्तुत अर्थ त्याला, दिल्लीश्वर रणांगणावर जाण्याच्या बेतांत आहे, हा जो अप्रस्तुत अर्थ तो, प्रत्यक्षपणें अनुकूल नाहीं; म्हणून वरील अप्रस्तुत अर्थानें स्वत:ला अनुकूल असलेला, शत्रूंकडून, रणांगणावर पडल्यावर, केला जाणारा सूर्यमंडळाचा भेद हा अर्थ सूचित होतो. आतां ह्या ठिकाणीं सूर्याला धडकी भरणें हें कार्य प्रस्तुत, व सूर्यमंडलभेदन हें कारणही वरील कार्याला अनुकूल असल्याकारणानेम प्रस्तुत, अशा कार्य व कारण दोन्हींही प्रस्तुत असल्यानें, येथें अप्रस्तुतप्रशंसा कशी, असें जर म्हणत असाल तर, अप्रस्तुत कारणानें प्रस्तुत कार्य सूचित केल्याचें हें निराळें उदाहरण घ्या :---
“माझ्या पाया पडून मधुर शब्दांनीं तिनें मला जायला आडकाठी केली असतांही, रागावून मी दूर देशाला निघून जायला तयार झालों असतां, त्या बालिकेनें, आपल्या हाताच्या बोटांनीं दिलेल्या हुकमाला पाळणार्‍या, घरांत गमतीनें बाळगलेल्या मांजराच्या पिल्लाकडून, माझा मार्ग अडविला” (मांजराला माझ्या रस्त्यांत आडवें व्हायला सांगितलें.) ह्या ठिकाणीं, ‘मी प्रवासाचा बेत रहित करून परत आलों’ हें प्रस्तुत कार्य. तें वरील श्लोकांत वाच्यार्थानें सांगितलेल्या अप्रस्तुत कारणानें सूचित केलें गेलें आहे.
अप्रस्तुत सामान्यानें प्रस्तुत विशेषाचें सूचन केल्याचें उदाहरण :---
“केलेल्या मोठया उपकाराला दुधाप्रमाणें पिऊनही निश्शंक मनानें उलट, परोपकार करणारालाच ठार मारण्यास प्रवृत्त होणारा दुष्ट मनुष्य, खरोखर सापाचा सख्खा भाऊ आहे.”
या ठिकाणीं, “सामान्य (अप्रस्तुत) अर्थानें प्रस्तुत विशेष अर्थ (म्हणजे अमुक गृहस्थ अत्यंत दुष्ट आहे हा अर्थ) सूचित होतो.” या प्रकाराला या ठिकाणीं उपमेनेंहीं, अनुकूल होऊन, मदत केली आहे.
अप्रस्तुत विशेषानें प्रस्तुत सामान्य सूचित केल्याचें उदाहरण :---
“ज्याच्याकरतां आम्ही आमच्या विद्वत्तेला दूर लोटून भाटाचा धंदा पत्कारला (म्हणजे भाटाप्रमाणें स्तुति करूं लागलों) आणि मनानेंही मिळण्याला कठिण अशा उच्च पदावर, अत्यंत कष्ट करून, ज्याला आम्ही चढविला, तो दुष्ट, त्या ठिकाणीं स्थिर होतांच, पूर्वींचें केलेले सगळे उपकार विसरून (गिळून ठाकून) पुन्हां आमच्याशींच बाकून वागू लागला (आमच्यावर उलटला). तेव्हां आतां आम्ही कुणाला काय सांगावें ?”
ह्या ठिकाणीं दुष्टावर केलेला उपकार शेवटीम सुख देणारा नसतो, हें प्रस्तुत सामान्य असून तें अप्रस्तुत वाच्य विशेषानें सूचित केलें गेलें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP