रूपक अलंकार - लक्षण १५

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


‘‘हे श्रीहरी, तुझ्या कृपारूपी अमृताचें, संतापानें मूर्च्छित झालेल्‍या माझ्यावर सिंचन कर. हे जगज्‍जीवना, तसें केले तरच मी जिवंत राहीन यांत संशय नाहीं.’’
ह्या श्र्लोकांत, कृपा आणि सुधा ह्या दोहोंतील अभेदाचें प्रथम स्‍प्‍ष्‍ट ज्ञान झाल्‍यावरच, कृपेचा सेचन ह्या क्रियेशी करण म्‍हणून अन्वय (म्‍ह० ‘कृपाकरणकसेचनक्रिया’ असा) होऊं शकतो आणि तशा तर्‍हेचें कृपारूप अमृताचें सेचन झालें असतां, तें जीवनाला कारण होतें, असेंही म्‍हणतां येते. थोडक्‍यांत हा विषय संपला.
आतां, ‘‘गांभीर्याच्या बाबतीत हा समुद्र आहे; व सौंदर्याच्या बाबतींत मदन आहे.’’ ह्या वाक्‍याचा शाब्‍दबोध कसा करायचा? (असें विचाराल तर), ऐकाः-
प्राचीनांच्या मतें, वरील वाक्‍यांत समुद्र ह्यावर लक्षणा करून त्‍याचा प्रथम समुद्र-सदृश असा लक्ष्यार्थ करावा. नंतर त्‍या लक्ष्यार्थाचा (सादृशाचा) एक भाग जो सादृश्य त्‍याचा, सादृश्याचें कारण अथवा त्‍या सादृश्याची अभिन्न असा जो (गांभीर्येण पदांतील) तृतीया विभक्तीचा अर्थ, त्‍याच्याशीं अन्वय करावा. आणि मग (१) गांभीर्यानें उत्‍पन्न केलेलें जें समुद्राचें सादृश्य त्‍यानें युक्त असलेल्‍या पदार्थाशीं अभिन्न असा हा आहे. अथवा (२) गांभीर्याशी अभिन्न असलेला समुद्रांतील सादृश्यरूपी धर्म, तद्‌युक्त पदार्थाशीं अभिन्न असा हा आहे, असे दोन प्रकारचे शाब्‍दबोध वरील वाक्‍याचे होतात. परंतु लक्षणेवाचूनच केवळ अभेदसंबंधानें दोन नामार्थांचा अन्वय होतो असे मानणार्‍यांच्या मतें, वरील वाक्‍याचा शाब्‍दबोध होईल, तो असाः-
मुखचंद्र इत्‍यादि पदार्थ हे वस्‍तुतः खरे नसतात. कारण ते कवीनें केवळ स्‍वतःच्या इच्छेनें कल्‍पिलेले असतात; तरीपण ते कवीच्या अंतःकरणाच्या वृत्तिरूप असून त्‍या रूपानें साकार झालेले असतात. आतां त्‍या त्‍या मुख व चंद्र (इत्‍यादि) पदार्थांमध्ये (कसले तरी) साधारण धर्म असतातच; आणि ते त्‍या चंद्र व मुख या दोहोंमधील सादृश्याला कारणही होतात. कारण कीं, ते साधारण धर्म दृष्‍टीस पडण्यावरच मुखचंद्र इत्‍यादि रूपकाची (म्‍ह० अभेद्राची) निर्मिति अवलंबून असते. अशी वस्‍तुस्‍थिति असल्‍यानें वरील ‘गांभीर्येण’ इत्‍यादि वाक्‍याचा, ‘‘गांभीर्य वगैरे साधारण-धर्मानें उत्‍पन्न केलेले जे, समुद्र (वगैरे काल्‍पनिक) पदार्थ त्‍याच्याशी हा अभिन्न आहे,’’ असा शाब्‍दबोध निर्वेधपणानें होऊं शकतो. अथवा, (मतांतरानें) वरील वाक्‍याचा आणखी निराळ्या रीतीनेंही शाब्‍दबोध होऊं शकेल, तो असाः-
वरील वाक्‍यांतील तृतया विभक्तीचा अर्थ, ‘ज्ञानानें उत्‍पन्न केलेल्‍या ज्ञानाचा प्रकार म्‍ह० विषयविशेषण होणें’ असा करावा. असाच अर्थ पंचमी विभक्तीचाही, ‘वह्निमान्‌ धूमात्‌’ इत्‍यादि वाक्‍यांत केल्‍याचें दृष्‍टीस पडते. अशा प्रकारें तृतयेचा अर्थ केल्‍यास, वरील वाक्‍याचा, ‘गांभीर्याच्या ज्ञानानें उत्‍पन्न झालेले जें ज्ञान (समुद्राविषयीचें ज्ञान) त्‍या ज्ञानाचा विषय असलेला जो समुद्र, त्‍याच्याशी अभिन्न हा,’ असा शाब्‍दबोध होईल. अशाप्रकारे होणारें हें रूपक, त्‍यांतील वाक्‍यांत, विषय व विषयी हे पदार्थ समानविभक्तीत असतील तर, त्‍या दोहोंमधील अभेद, संबंधरूप असतो. म्‍हणजे हा अभेद संबंध अशा स्‍थलीं कोणत्‍याही शब्‍दानें सांगितलेला नसतो. (तो केवळ अभेदसंबंधाच्या माहात्‍म्‍यानेंच प्रतीत होतो.) उदाहरणार्थ, ‘बुद्धि र्दीपकला०’ इत्‍यादि पूर्वी येऊन गेलेल्‍या श्र्लोकांत संबंध अपदार्थ आहे. पण, ज्‍या रूपकवक्‍यांतील विषय हे भिन्न विभक्तींत असतील, त्‍या ठिकाणी मात्र त्‍या दोहोंमधील अभेदसंबंध शब्‍दानें सांगितला जातो म्‍ह० अभेद हा शब्‍दाचा अर्थ असतो. (तो अभेद कुठें विशेषणरूपानें येतो, तर कुठें विशेष्‍यरूपानें येतो.) उदाहरणार्थ, (खालील श्र्लोकांत विषय व विषयी ह्यांतील अभेद विशेष्‍यरूपानें आलेला आहे.)
‘‘ह्या सुंदर तरुणीच्या शरीरांत तिचें बालवय क्रमाक्रमानें कमी कमी होत असतां, व अखिल जगताचा प्रभु जो मदन तो (लौकरच) तेथे येऊन राहणार असल्‍यानें, त्‍याच वेळी त्‍या त्‍याच्या आज्ञेनें त्‍या तरुणीच्या मुखावर पूर्णचंद्राचा भाव (म्‍हणजेच चन्द्रत्‍वाभेदसंबंध) उत्‍पन्न झाला. डोळ्यामध्ये कमळांचें तादात्‍म्‍य (म्‍हणजेच कमलाभेद) दिसूं लागलें. आणि तिच्या तिरकस स्‍मितामध्यें, अमृताचा, खरोखरीचा अभेद प्रकट झाला.’’
ह्या ठिकाणी शशांकता, तादात्‍म्‍य, भेदविगम इत्‍यादि शब्‍दांनीं सांगितलें गेलेलें तादात्‍म्‍यरूपक, म्‍हणजेच अभेद हा, ज्‍याच्या मतें वाक्‍यांतील प्रथमांत शब्‍द विशेष्‍य होतो, अशा नैयायिकांच्या मतें, विशेष्‍यरूपानें आला आहे. आतां, वाक्‍यांतील क्रिया हीच विशेष्‍य (अतएव प्रधान) असते, असें ज्‍यांचें मत त्‍यांच्या (म्‍ह० वैयाकरणांच्या) मतें, वरील श्र्लोकांतील आसीत्‌, ह्या क्रियापदाच्या ऐवजीं मूळ श्र्लोकांत थोडा बदल करून व ‘संपन्नो हि’ असें भूत कृदन्ताचें रूप घातलें तर, ह्या श्र्लोकांतही संपन्नः ह्या क्रियारूप विशेष्‍याच्या रूपानें अभेद आला आहे असें म्‍हणतां येईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP