रूपक अलंकार - लक्षण १०

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां सावयवरूपकांतही एक आरोप, दुसर्‍या आरोपाला उपाय म्‍हणून, (म्‍ह० समर्थक म्‍हणून) केला जातो, ही गोष्‍ट खरी असली तरी, त्‍या सावयव रूपकांत, पहिला आरोप न करतांनासुद्धां, (केवळ) कविसंकेतावरून प्रसिद्ध असलेल्‍या सादृश्याच्या योगानेंही, दुसर्‍या आरोपाची सिद्धी संभवते. उदाहरणार्थ पूर्वी आलेल्‍या ‘हे सुंदरी, तूं पौर्णिमेची रात्र आहेस, यांत शंका नाही.’ ह्या काव्यवाक्‍यांत, मौक्तिक वगैरेंच्यावर तारा वगैरेंची आरोप न करूनही केवळ उज्‍वलता या सादृश्याच्या जोरावर सुंदर स्त्रीवर पौर्णिमेच्या रात्रीचा आरोप सिद्ध होऊं शकतो. परंतु ह्या परंपरित रूपकांत डोळ्यांच्या लालीवर ज्‍वालांचा आरोप करण्यावरच, राजावर होणार अग्‍नीचा समारोप, निश्र्चितपणें, अवलंबून आहे. अशाच प्रकारें, ‘कारुण्यकुसुमाकाशः खलः’ (दयारूपी फुलांच्या बाबतीत दुष्‍ट पुरुष साक्षात्‌ आकाशच आहेत.) ह्या परंपरित रूपकाच्या उदाहरणांत, दुष्‍ट पुरुष व आकाश ह्या दोहोंमधील सादृश्य मुळींच प्रसिद्ध नाहीं. म्‍हणून या ठिकाणी खलावर आकाशाचा आरोप सिद्ध व्हावा यासाठी दयेवर कुसुमाचा आरोप करणें हाच उपाय आहे. अशा रीतीनें सावयव-रूपक व परंपरित रूपक ह्या दोहोंमध्ये फरक आहे.
पण या बाबतीत कुणाचे म्‍हणणें असें कीं, सावयव रूपकांत पुष्‍कळ आरोप असतात; तर परंपरित रूपकांत (परस्‍परावलंबी) असे दोनच आरोप असतात, हें या दोहोंतील फरकाचें बीज आहे.
‘‘रसिक लोकांना काव्य हेंच अमृत; रंगेल पुरुषांना स्त्री हेंच अमृत; लोभी माणसाला धन हेंच अमृत; आणि संन्यासी लोकांना शांति हेंच अमृत.’’
ह्या श्र्लोकांत अनेक विषयांची माला (साधलेली) आहे, तरीपण्ण, त्‍या विषयांच्या मालेवर केलेल्‍या एकाच अमृताच्या आरोपांमुळें, कांहीं विशेष प्रकारचा चमत्‍कार (उत्‍पन्न झालेला) नाहीं आणि म्‍हणूनच, ह कया प्रकाराची, इतर प्रकारांबरोबर (आम्‍ही येथें) गणना केली नाही. परंतु आरोप्यमान म्‍ह० विषयींची माला विशेष प्रकारच्या चमत्‍कारानें शोभत असल्‍यानें, (रूपकाच्या प्रकारांत) ह्या विषयिमालारूपकाची मात्र आम्‍ही गणना केली आहे.
आतां येथे एक शंका मनांत येते, ती अशी-श्र्लिष्‍ट परंपरित रूपकाच्या ‘कमलावासकासारः’ इत्‍यादि उदाहरणाच्या वाक्‍यांत, एक आरोप दुसर्‍या आरोपाला उपाय होतो. (असें तुम्‍ही म्‍हणतां) तें कसें काय? कारण वरील उदाहरणांत लक्ष्मीचें निवासस्‍थान हेंच कमलांचें निवास्‍थान असा, ‘कमलावास’ या एकाच श्र्लिष्‍ट शब्‍दानें होणारा, अभेदच केवळ प्रतीत होतो. पण ह्या ठिकाणी, एकावर (लक्ष्मीच्या निवासावर) दुसर्‍याचा (कमळांच्या निवासाचा) (प्रत्‍यक्ष) आरोप केलेला तर कांहीं येथे दिसत नाहीं; आणि आरोप करण्याकरितां विषयाचा वाक्‍यांत स्‍वतंत्रपणें (म्‍ह० पृथक्‌) निर्देश करण्याची जरूर असते. तुम्‍ही म्‍हणाल, ‘‘केवळ अभेदाचें ज्ञान ह्यालाच आरोप म्‍हणा.’’ पण तसें म्‍हणतां येणार नाही. कारण तसें म्‍हटलें तर विषयाचें निगरण जिच्यांत असतें, अशा अतिशयोक्तीमध्ये हे परंपरित रूपकाचें लक्षण अतिव्याप्त होण्याचा प्रसंग येईल. आणि रूपकांत नुसतें अभेदाचें ज्ञान होऊन काम भागत नाही; त्‍या अभेदाचें कारण जो आरोप तो प्रत्‍यक्ष दिसावा लागतो. आतां ‘‘ज्‍या दोन संबंधीं पदार्थांचा अभेद असतो त्‍या दोन (संबंधी) पदार्थांशी संबंद्ध असणार्‍या दोन पदार्थांचाही संबंध असतोच.’’ ह्या न्यायशास्‍त्रांतील सिद्धांताप्रमाणें, प्रस्‍तुत वाक्‍यांत राजाशी संबद्ध असलेल्‍या लक्ष्मीचा निवास यावर, कासाराशी संबंद्ध असलेल्‍या सरोजाश्रयाचा होणारा जो अभेदारोप त्‍याच्या बळावर, राजावर होणार्‍या कासाराच्या आरोपाचें समर्थन करणें शक्‍य आहे खरें, पण प्रस्‍तुत वाक्‍यांत, तसेंही होणार नाही. कारण कीं, येथील ‘कलमावास’ यांतील श्र्लेषामुळें, लक्ष्मीचा आश्रय हा राजाचा विशेषणरूप धर्म, व कमलांचा आश्रय हा कासाराचा विशेषणरूप धर्म, ह्या दोन धर्मांमधील अभेद सिद्ध होईल (हें कबूल.) आणि त्‍या धर्मांच्या अभेदाच्या बळावर राजा व कासार या दोन तत्‍संबंधी धर्मांमधील अभेद सिद्ध होऊं शकेल (हें ही कबूल). परंतु या दोन धर्मांमधील अभेदावरून, प्रकृत म्‍हणजे राजा या धर्मीवर (विषयावर) कासार या धर्मीच्या (विषयीच्या) आरोपाची सिद्धि कधीही होणार नाहीं. एकाच्या (म्‍ह० धर्माच्या) अभेदावरून दुसर्‍या (म्‍ह० दोन धर्मींच्या) अभेदाची सिद्धि करणें ही गोष्‍ट येथे अप्रस्‍तुत असल्‍यामुळें, अर्थात कमलावास ह्या श्र्लिष्‍ट शब्‍दांतून निघणार्‍या विषयाच्या धर्मावर विषयीच्या धर्माचा आरोप शोधून काढणें भाग आहे, आणि तो आरोप तर श्र्लेषाच्या बळावर कधीही साधतां येणार नाहीं. (यावर जगन्नाथाचें उत्तर-) शंकाकारांचें हें म्‍हणणें खरें आहे पण ह्या ठिकाणी दुसर्‍या) म्‍ह० राजा या विषयावर कासार या विषयीच्या आरोपाच्या सिद्धीकरितां, पहिल्‍या म्‍ह० श्र्लिष्‍ट शब्‍दांतून प्रतीत होणार्‍या दोन धर्मांच्या अभेदाच्या ज्ञानानंतर, कमलवास (लक्ष्मीचा आवास) ह्या विषयधर्मावर, कमलावास (म्‍ह० कमलांचा आवास या) विषयिधर्माचा मानसिक आरोप, प्रकृत राजा या विषयावर कासाराच्या आरोपाच्या समर्थनाकरितां त्‍याच्या पूर्वी, मध्येंच केल्‍यास कोणत्‍याही तर्‍हेची अडचण वाटणार नाहीं. (म्‍हणजे पहिला कमलवास व दुसरा कमलवास ह्या दोहोंचा श्र्लेषानें अभेद साधल्‍यावर, त्‍या दोन शब्‍दांमधील पहिल्‍यावर दुसर्‍याचा आरोप येथें अभिप्रेत आहे व सिद्धही आहे, अशी वाचकांनी आपल्‍या मनांशीं कल्‍पना केल्‍यास, कसलीही अडचण या दुसर्‍या आरोपाच्या बाबतीत उपस्‍थित होणार नाही.)

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP