शुकाख्यान - अभंग १५१ ते १७५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


आतां कायसें जिणें । शोक दुर्ग जाणणें । व्यर्थ जिणें पुत्राविण । जाण माझें ॥१५१॥
निपुत्री जन मज म्हणती । देव पितर स्वर्गीं कष्टती । ऐसें काय केलें गा श्रीपती । मजलागीं ॥१५२॥
शुक नये काकुलती । वनांत हिंडतो मोह चित्तीं । पुत्रा पुत्रा हें वदती । साद देता श्वापदें ॥१५३॥
पूर्व जन्मींचा तूं पिता । कय पाळिलें ताता । कर्मावसानीं आतां । आह्मी वृद्ध झालों ॥१५४॥
ऐसी ऐकोनि वाग्वाणी । नाद न माय गगनीं । मग व्यासऋषि तेथुनी । परतला मागें ॥१५५॥
इतुका वृत्तांत झाला । व्यास आश्रमा आला । शुक-देव पावला । सुख सरोवरां ॥१५६॥
योगेश्वरीं देखिला । धांवो-नियां आलंगिला । आपले आश्रमसी आणिला । तापसी जाणोनियां ॥१५७॥
तये गुंपे भीतरीं । तेजोरूप अवघ्या नारी । एकीहुनी एक सुंदरी । परी विकल्प अंतरीम । येऊं न दे ॥१५८॥
मग निघो-नियां बाहेरी । वस्त्रें टाकिती सुंदरी । शुक देवासी कवणीये परी । मानविती ॥१५९॥
मग शुक्रें अर्ध्यदान केलें । दर्भासन घातलें । त्यावर आपण बैसले । ऋषिसुत ॥१६०॥
यज्ञ विभूति आणिली । शुकें सर्वांगीं लविली । मग वस्त्रें घेतलीं । भगवानरूपें ॥१६१॥
वृक्ष चंपके वेल पत्रीं । गुंफेमाजी मिरवती । विश्रांत वनीं विज्ञान-वल्ली । ते स्वीकारी तळभरीं ॥१६२॥
शुक आसनीं बैसला । ध्यानीं निश्चल राहिला । आवर्ण आपण विसरला । ब्रह्मयोगी ॥१६३॥
शुकदेवें मांडिलें ध्यान । मुखीं धरिलें मौन्य । नासाग्रीं लोचन । लक्षीत असे ॥१६४॥
ब्रह्मनिष्ठ निरंतरीं । वनामाजी तप करी । एक चरणांगुष्ठावरी । करी निद्रा ॥१६५॥
ऐसा ब्रह्ययोगी निरंतरीं । वनामाजी तप करी । व्यास घरीं चिंता करी । शुक देवाची ॥१६६॥
यावरी प्रार्थितो इंद्रासी । येरे नाभिकार दिधला तयासी । मग तप ढळावयासी । इंद्रें रचिला उपाय ॥१६७॥
इंद्रानें रंभेसी केली हाकार । तंव ते पावली सत्वर । जियेचा महा थरार । तापसीयांसी ॥१६८॥
तिनें नमिला इंद्रराज । ह्मणे कां जी पाचारिलें मज । जें असेल योजिलें काज । तें सांगा स्वामिया ॥१६९॥
तीतें सांगे इंद्रराव । निर्भय तप करीतसे शुकदेव । त्याच्या तपाचा करावा क्षय । त्वां जाउनी ॥१७०॥
तंव बोलली ते सुंदरी । विडा दीजे माझे करीं । आतां शुकदेव सत्वरी । आणिन मी तुह्मांपुढें ॥१७१॥
इंद्र ह्मणे गे सुंदरी । शुका आणसी जरी । तरी तुज अमरपुरीं । मानवती जन ॥१७२॥
मग तियेसी विडा दिधला । रंभेनें शिरीं वंदिला । मग शृंगार केला । नाना परीचा ॥१७३॥
अंग तियेचें पातळ । गौरवर्ण विशाळ भाळ । नेत्र जैसे अंबुजदळ । चंपकवर्ण । तियेचा ॥१७४॥
कांसें कासुनियां वीरगुथी । बरवी वेणी रुळे पृष्ठीं । कटि सामावे मुष्टीं । तये रंभेची ॥१७५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP