शुकाख्यान - अभंग ७६ ते १००

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


माझी विनंति परियेसी । बारा वर्षें झालीं जन्मासी । नग्र आहे शरिरासी । कसें यावें बाहेरी ॥७६॥
आतां स्वयंभ कासोटी । देईं मज जगजेठी । लाज स्वयंभ कासोटी । देईं मज जगजेठी । लाज राखे सृष्टि । पैं माझी ॥७७॥
इतुकें शुकदेव बोलिला । देवें स्वयंभ कौपीन दिला । मग शुक श्रवणद्वारीं बाहेर आला । योगीराय ॥७८॥
शुकयोगी ब्रह्म परिपूर्ण । मुळजेसी जाहला हर्ष पूर्ण । येरु स्मरे नारायण । धरिले चरण कृष्णाचे ॥७९॥
देवें हस्त ठेविला माथां । तैसाच निघाला तीर्था । मागे न पाहे सर्वथा । शुकदेव योगी ॥८०॥
निघाला तो लवलाहे । मागें पुढें न पाहे । सुईण म्हणे वोमाय । गर्भांतून भूत कायसें आलें ॥८१॥
हें अद्‍भूत लेंकरूं । करी राम नाम उच्चारू । याचे नाभीचा जारू । वाळला नाहीं ॥८२॥
लेंकरूं नव्हे हें सांचा । राक्षस हा मायेचा । न करावा गजर लेंकराचा । हें अपूर्व चोज जाणा ॥८३॥
गेला तरी सुखी जावो । राहतां तरी अनर्थ पैं हो । सुलजा वांचली हें अपूर्व । माना सकळां ॥८४॥
व्यासा चंद्रबळ लाधलें । किंवा सुकृत फळासी आलें । येवढें विघ्न वारिलें । कुळ देवतेनें ॥८५॥
एकी अबाळा वांचलों ह्मणती । एकी जितावण करिती । एकी क्षेमा आळंगिती । आप्त वर्गासी ॥८६॥
मग म्हणे सुलजा । आतां मज दवा पुत्र माझा । द्वादश वरुषें कष्टली वोजा । वाहिला उदरीं ॥८७॥
करुणा करी लवलाही । म्हणे पुत्रा स्तनपान घेईं । बारे कांटे खडे रुतती पायीं । परतोनी येईं लवकरी ॥८८॥
तुजलागींरे कुमरा । स्तनीं लागल्या पयोधारा । बारे येईं सामोरा । घेईं स्तनपान ॥८९॥
ऐसी करुणा करी माता सती । थोर येतसे काकुळती । परी शुक न धरी चित्तीं । दूर गेला ॥९०॥
आतां काय करूं वो साजणी । शुक नये परतोनी । योगी राजा कृष्ण वचनीं । पुत्र माझा ॥९१॥
पोटीं वागविला वर्षें बारा । थोर कष्ट झाले माझिया शरिरा । शेवटीं माझिया पुत्रा । निराशा जाहली ॥९२॥
बारे तूं तप तीर्थ काय जाणसी । कवणें चालविलें तुजसी । जवळी होता ह्लषिकेशी । तेणें नवल काय केलें ॥९३॥
आतां न जाईं तूं तपा । उष्णें करोनी श्रम पावसी बापा । मार्गीं चोरां सर्पा । करुणा नाहीं बाळा ॥९४॥
मग विनवीत भास्करू । म्हणे माझें तान्हें लेंकरूं । तूं देवा तपों नको उग्रु । माझ्या बाळकावरी ॥९५॥
अगा देवा करुणा । लेकराची करावी जाणा । अति कोमल चरणा । न पोळावे देखा ॥९६॥
अहो वसुंधरे माते । जतन करीं शुकातें । वंदीन तुझ्या चरणातें । विनंति तुळजेची ॥९७॥
तूं कृपाळु परियेसी । उदरीं राखिलें सीतेसी । बाळ तैसें माझे आपत्यासी । जतन करीं ॥९८॥
विनंति सिंह सर्पा । रिसा असवला वृश्चिका । तुह्मीं न करावें कोपा । राखा बाळ माझें ॥९९॥
ऐसी ती सुंदरी । कर जोडोनि विनंति करी । तो शुक गेला दुरी । ध्यान करी हरीचें ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP