मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
भाऊसारखा मोहरा । आम्हांवर...

पानपतचा दुसरा पोवाडा - भाऊसारखा मोहरा । आम्हांवर...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


भाऊसारखा मोहरा । आम्हांवर का रूसला पंचीप्यारा ॥ध्रु०॥
बहुत दिवस झालो शाहूला । जावे निजभवनाला ॥ नाना राखावे तुम्ही राज्याला शिक्क दिधला त्याला ॥ अष्ट प्रधान भाऊ बाजूला । हवालले राज्याला ॥ मुलूख मारून केला चकचुरा । दुसमान कापे थराथरा ॥ भाऊसारखा० ॥१॥

बारा वर्षे झाली राज्याशी । कळून आले त्याशी ॥ धाड पडो रे त्या मुलखाशी । कुणिकुन आली इवशी ॥ भाऊने हकारले राव सकळाशी ॥ कुळ दक्षिणभाईशीं ॥ दिली नौबद गेला दिल्लीशीं । हालीवलें तक्ताशीं ॥ रणखांब रोवुनि मारितो तलवार । काशी तीर्थ अवधारा ॥ भाऊअ सारखा० ॥२॥

तखत फोडुनि केली धुळधाणी । असा नाहि झाला कोणी ॥ या त्रिभौंण रायाची करणी । नाव गेले राहुनि ॥ विश्वासराव बसविले नेऊनी ॥ लिहिले होते कर्मी ॥ धडले टांकसाळि रुपये आणि मोहोरा । दिला अवध्यांशी रोजमुरा ॥ भाऊसारखा० ॥३॥

पहिली लढाई झालि कुंजपर्‍यावर । सकळ घेउनि दळभार ॥ म्होरें रोखले कमाणतीर ॥ मार होती चौफेर ॥ कुतुबाशहा मारूनि केला चकचूर । त्याचे कापिले शिर ॥ लुटला कुचपुरा दौलत फार । झाले आभय लष्कर । आला दक्षिणचा राजा धुरंधर ।(आणि) भाऊसारखा वीर ॥ सुटला अबदालीशी दरारा । म्हणे आतां सल्ला करा ॥ भाऊसारखा० ॥४॥

सल्ला ऐकेना झाला विघोड । अवघा मुलुख सोड ॥ रुपये देत होता दोन क्रोड । धरिली भाऊनी आड ॥ “तुजला मारिन मी, करिन वेड ॥ कंधार पाहिन पुढं ॥ रोवला रणखांब होती धडाधड । नदि जमुनेच्या कड ॥ खेत्री हाणा म्हणती रणशूरा । कुळक्षेत्री धरिल थारा ॥ भाऊसारखा० ॥५॥

पहिली लढाई झाली फार ठिक । केले मोचे तकीप ॥ भोता खांदलासे खंदक । मधे भाऊचे लोक ॥ कुणिकुन आला लबंडिचा घातक । होती बातनी ठिक ॥ दोन वेळा फिरविला माघारा । गिलचा केला घाबरा भाऊसारखा ० ॥६॥

प्रथम पडला गोविंदपंत बुंदेला । केला भाऊनी हल्ला ॥ विसा हजारांशी गिलचा आला । हुजरातीवर पडला ॥ मग साहिना बळवंतरायाला । ढिगांत जाउनि पडला ॥ भाऊ विनवितो बहादरा । रणी राहिला बिचारा ॥ भाऊसारखा० ॥७॥

एक दिवस नेमला मरणाचा । वखत निर्वाणीचा । भाऊनी पैगम केला सगळांचा । धंवशा वाजे त्याचा ॥ शाइसी हजार खासा नावाचा । धुंरधुर भाऊचा ॥ एकाएकी आला सामोरा । दिला कुचाचा नगारा ॥ भाऊसारखा० ॥८॥

मोरचे वाटु न दिले लवकरी । तमाम फौजा सारी ॥ बुनगे घातलेसे माघारी । हाकारिली मग स्वारी ॥ जसा चंद्र निघाला बाहेरी प्रभा पृथिमीवरी ॥ यकायकी झाकळली बरी । धनकर त्याची थोरी । जनगुजी मार देतसे झराझरा ॥ जसा आगनीचा आगारा ॥९॥

गिलच्ता मार देतसे चवुफेर । मधी वुभे लष्कर ॥ विभ्रामखान खासा बिनिवर । यशवंत पवार ॥ दिवस उरला घटका दोच्यार ॥ मग धरवेना धीर ॥ एकला तिथ टिकल कुठवर । सोन्या तुटली पाहारा ॥ इभ्रामखान खासा खराखुरा । रणी आला पायउतारा ॥१०॥

विश्वासराव शिपाई रणशूर । भले राजकुवर ॥ मारितो फौजा हाती तलवार । रणात होऊनि स्थीर ॥ भोवती गोळ्या वर्षती अपार । मधे उभे सरदार ॥ गिलचा कापला बेसुमार । भाऊ म्हणे मागे फिर ॥ अवचित गोळि लागली धुरंहरा । मुखी बोलला हराहरा ॥ भाऊसारखा ० ॥११॥

समशेर बहादर रणशूर रणगाडा । रणी वाजे चौघडा ॥ हटकुन गिलचे हाणितो धडाधडा । ढाल तलवार जमदाडा ज्याणे रणी अडविला तीस घोडा । सन्मुख दावी मुखडा ॥ राव बाजीला पुत्र जसा हिरा । येती जखमाच्या लहरा ॥ भाऊसारखा० ॥१२॥

जनकोजी शिंदे रणशूर रणगाजी । चढती तुरंग तेजी ॥ त्याला भाऊसाहेब होते राजी । बाजू राखा माजी ॥ मग फुरारले राव जनकोजी । शिरीं छत्र सोभे जी । नित्य नेम गिलचा कापतो चरांचरां शिर धाडितो पहा नजार । भाऊसारखा० ॥१३॥

चेतली जणुं खुप झालि लढाई । मार होती सवाई ॥ त्याचा रंग बारगीर बिलाई । गिलचा करितो घाई ॥ झाला मोड पडती कुळशाही । पालखिस गणती नाहीं ॥ एक एक पळुन आला माधारा । रणीं राहिला बिचारा ॥ भाऊसारखा० ॥१४॥

सोनजी भापकर मानाजी पायगोडे । रणीं टाकिले घोडे ॥ तुकोजी शिंदे पडले पायांपुढे । जैसे अग्रीचे हुडे ॥ आणखी दमाजी गायकवाड । होळकर रणभिडे ॥ अवघ्या शाहीवर आली घाड । अवचित झाला मोड ॥ एकएक पळुन आले माघारा । का परतुन घातले सैन सारा ॥ भाऊसारखा० ॥१५॥

कशि गत झाली गडयांनो भाऊला । जनकोजी शिंद्याला ॥ लोक पुसती एकुनेराला । आम्ही नाहिं पाहिला ॥ भाऊसारखा मोहरा हरपला । काय सांगावें नानाला ॥ भाऊला नाहीं कोणाचा आसरा । वेढा घातला चौफेरा ॥ भाऊसारखा० ॥१६॥

ज्याला पडली भाऊची भ्रांत । ते राहिले रणांत ॥ फितुरी पळुनि आले दखणांत । वांचविली दौलत ॥ त्यांचा ईश्वर करिल सत्यनाश । यश दिले गिलचांस ॥ भाऊची भ्रांत पडलि नारिनरां । सकळ जनां लहानथोरां ॥ भाऊसारखा० ॥१७॥

कागद आला राव नानाला । होते उजन्या नगराला ॥ कागद वाचितां आंग टाकि धरणीला । मोठा अतिशो केला ॥ आम्हांवर श्रीहरि देव कोपला । विक्षोप आणिला राज्याला ॥ दाटला गंहिवर गोपिकाबाईला । अति कहर वर्षला ॥ नाना फिरुनि चालले माघरां । दिला कुचाचा नगारा ॥ भाऊसारखा० ॥१८॥

भाऊसाठीं झुरतीं जनावर । जंगलची पांखर ॥ राघू मैना आणि खबुतर । टाहो करिती फार ॥ कुणीकडे गेला आमचा मनोहर । सपन झाल खर ॥ पैसा मिळेना म्हणती सार । बंद झाले सावकार ॥ फुटला पर्वतीशी घाम दरदरां । वाडा गजबजला सारा ॥ भाऊसारखा० ॥१९॥

आम्ही पद बांधिले “ वैताग । जिवास केला त्याग? ॥ कोणीकडे गेले भाऊ श्रीरंग । नानाचे जिवलग ॥ कधीं भेत देईल आम्हां संग । जिवा होईल खुषिरंग ” ॥ एथुन झाला पदाचा अभंग । म्हणे महादु कविरंग ॥ रामा सटवा म्हणे दातारा । वाट पाहतो खरोखरा ॥ भाऊसारखा० ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP