शिवाजी राजांचा पोवाडा - भाग ६

शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.


सर्व तयारी केली राजपद जाडी नांवास ।
शिक्का सुरु मोर्तबास ॥
अमदानगरी नटून पस्त केलें पेठेस ।
भौती औरंगाबादेस ॥
विजापूरची फौज करी बहुत आयास ।
घेई कोकणपटीस ॥
सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस ।
ठोकून घेई सर्वास ॥
जळीं फौज लढे भौती मारी गलबतास ।
दरारा धाडी मक्केस ॥
माल्वणीं घेऊन गेला अवचित फौजेस ।
पुकारा घेतो मोगलास ॥
जाहाजावर चढवी फौज गेला गोव्यास ।
लुटलें बारशिलोरास ॥
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास ।
लुटलें मोंगल पेठांस ॥
पायवाटेने फौज पाठवी बाकी लुटीस ।
आज्ञा जावें रायगडास ॥
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जाहाजास ।
निघाला मुलखीं जायास ॥
मोठा वारा सुटला भ्याला नाहीं तुफानास ।
लागले अखेर कडेस ॥
औरंगजीब पाठवी राजा जयशिंगास ।
दुसरे दिलीरखानास ॥
ठेविले मोगल अमीर येऊन पुण्यास ।
वेढिलें बहुतां किल्ल्यांस ॥
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस ।
सुचेना कांहीं कोणास ॥
बाजी परभू भ्याला नाहीं दिलीरखानास ।
सोडिलें नाहीं धैर्यास ॥
हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस ।
संभाळी पुरंधरास ॥
चातुर्यानें लढे गुंतवी मोगल फौजेस ।
फुरसत दिली शिवाजीस ॥
फार दिवस लोटले पेटला खान ईर्षेस ।
भिडला किल्ल्या माचीस ॥
दुर्जाखाली गेला लागे सुरंग पाडायास ।
योजी अखेर उपायास ॥
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास ।
पिडींले फार मोगलास ॥
मोगलाने श्रम केले बेत नेला सिद्विस ।
चुकले सावधपणास ॥
यशस्वी भासले लागले निर्भय लुटीस ।
चुकले सावधपणास ॥
हेटक-यांचा थाट नीट मारी लुटा-यास ।
मोगल हटले नेटास ॥
बाजी मावळयां जमवी हातीं घेई खांडयास ।
भिडून मारी मोगलास ॥
मोगल पळ काढी पाठ दिली मावळयास ।
मर्द पाहा भ्याले ऊंद्रास ॥
लाजे मनीं दिलीरखान जमवी फौजेस ।
धीर काय देई पठाणास ॥
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास ।
जाऊन भिडला मावळयास ॥
बाजी मार देई पठाण खचले हिमतीस ।
हटती पाहून मर्दास ॥
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास ।
लावीला तीर कमानीस ॥
नेमाने तीर नारी मुख्य बाजी परभूस ।
पाडिला गबरु धरणीस ॥
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस ।
भोगिती स्वर्गी मौजेस ॥
बाजी स्वर्गी बसे मावळे हटले बाजूस ।
सरले बालेकिल्ल्यास ॥
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस ।
धमकी देती मावळयास ॥
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस ।
वरती इशानी कोणास ॥
वज्जगडाला शिडी लाविली आहे बाजूस ।
वरती चढवी तोफांस ॥
चढला मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास ।
आणले बहु खरावीस ॥
हेटकरी मावळे भ्याले नाहीं भडिमारास ।
मोगल भ्याला पाऊसास ।
मोगल सल्ला करी शिवाजी नेती मदतीस ।
घेती यवनी मुलखास ॥
कुलद्रोही औरंगजीब योजी कपटास ।
पाठवि थैलि शिवाजीस ॥
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस ।
नजरकैद करी त्यास ॥
धाडी परत सर्वं मावळें घोडेस्वारांस ।
ठेविलें जवळ पुत्रास ॥
दरबा-या धरीं जाई देई रत्न भेटीस ।
जोडिला स्नेह सर्वांस ॥
दुखणे बाहणा करो पैसा भरी हाकीमास ।
गूल पाहा औरंगजीवास ॥
आराम करुन दावी शुरु दानधर्मास ।
देई खाने फकीरास ॥
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदीस ।
जसा का मुकला जगास ॥
दानशूर बनला हटवि हातिमताईस ।
चुकेना नित्यनेमास ॥
औरंजीवा भूल पडली पाहून वृत्तीस ।
विसरला नीट जप्तीस ॥
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास ।
चढला मोठया दिमाखास ॥
जलदी करीती चाकर नेती टोकरास ॥
करामत केली रात्नीस ॥
दिल्ली बाहेर गेले खुलें केलें शिवाजीस ।
नेली युक्ती सिद्वीस ॥
मोगल सकाळी विचकी दांत खाई होटांस ।
लावि पाठी माजमास ॥

॥चाल॥
औरंगजीवा धूर दीला । पुत्रासवें घोडा चढला ॥
मधीच ठेवी पुत्राला । स्वतां गोसावी नटला ॥
रात्रिचा दिवस केला । गाठलें रायगडाला ॥
माते चरणी लागला । हळूच फोडी शत्रूला ॥
स्नेह मोगलाचा केला । दरारा देई सर्वांला ॥

॥चाल॥
हैद्राबादकर । विजापूरकर ॥
कापे थरथर । देती करभार ॥
भरी कचेरी । बसे विचारी ॥
कायदे करी । निट लष्करी ॥
शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा ।
बंदोबस्त केला किल्ल्याचा ॥
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजि-याचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP