अध्याय बारावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


फणस टाकोनि रसाळ ॥ प्रीतीनें घेतलें कनकफळ ॥ मुक्त सांडोनि तेजाळ ॥ गुंज जैसी घातली ॥१॥

गार घेऊनि टाकिला हिरा ॥ अंधकार घेऊनि त्यजिलें दिनकरा ॥ पाच भिरकावूनि सत्वरा ॥ कांच बळें रक्षिली ॥२॥

परिस त्यागून घेतला खडा ॥ पंडित दवडूनि आणिला वेडा ॥ चिंतामणि टाकोनि रोकडा ॥ पलांडु घेतला बळेंचि ॥३॥

अमृत टाकूनि घेतली कांजी ॥ कल्पवृक्ष तोडोनि लाविली भाजी ॥ कामधेनु दवडोनि सहजीं ॥ अजा पूजी आदरें ॥४॥

निजसुख टाकोनि घेतलें दुःख ॥ कस्तूरी टाकूनि घेतली राख ॥ सोने टाकूनि सुरेख ॥ शेण जैसें घेतलें ॥५॥

सांडोनियां रायकेळें ॥ आदरें भक्षी अर्कींफळें ॥ ज्ञान सांडोनि घेतलें ॥ अज्ञान जाण बळेंचि ॥६॥

तैसें कैकयीनें केलें साचार ॥ वना दवडोनि जगदोद्धार ॥ मज द्यावया राज्यभार ॥ सिद्ध जाहली साक्षेपें ॥७॥

सर्व अपराध करूनि क्षमा ॥ अयोध्येसी चलावें श्रीरामा ॥ याउपरी जगदात्मा ॥ काय बोलिला तं ऐका ॥८॥

सूर्य मार्ग चुके करितां भ्रमण ॥ नेत्रीं अंधत्व पावे अग्न ॥ मशकाची धडक लागून ॥ जरी मेरु पडेल ॥९॥

पाषाण प्रहार लागून ॥ वायु पडेल मोडोनि चरण ॥ कीं पिपीलिका शोषी सिंधुजीवन ॥ विजूस धांवूनि मशक धरी ॥११०॥

धडधडीत अग्निज्वाळ ॥ कर्पूरतुषारें होय शीतळ ॥ हेंही घडेल एक वेळ ॥ परी वचनास चळ नोहे माझे ॥११॥

एक बाण एक वचन ॥ एकपत्नीव्रत पूर्ण ॥ चौदा वर्षें भरल्याविण ॥ कदापि आगमन घडेना ॥१२॥

ऐसें निश्र्चयाचें वचन ॥ बोलता जाहला रघुनंदन ॥ अग्नीनें आहाळे जैसें सुमन ॥ तैसें भरता जाहलें ॥१३॥

मग भरतें चेतविला जातवेद ॥ प्राण द्यावया जाहला सिद्ध ॥ म्हणे हा देह करीन दग्ध ॥ रामवियोग मज न सोसवे ॥१४॥

महाराज वाल्मीक मुनि ॥ भरतास एकांतीं नेऊनी ॥ मूळकाव्यार्थ अवघा कानीं ॥ भविष्यार्थ सांगितला ॥१५॥

तो ऐकतां कैकयीसुत ॥ उगाच राहिला निवांत ॥ मग येऊनि जनकजामात ॥ हृदयीं धरी भरतातें ॥१६॥

आपुल्या हस्तेंकरून ॥ पुसिले भरताचे नयन ॥ करें कुरवाळिलें वदन ॥ समाधान करीतसे ॥१७॥

देव बंदींचे सोडवून ॥ चौदा वर्षांत येतों परतोन ॥ मग वरदहस्त उचलोन ॥ भाष दीधली भरतातें ॥१८॥

चौदा वर्षें चौदा दिन ॥ पंधरावे दिवशीं पूर्ण ॥ माध्यान्हा येतां चंडकिरण ॥ भेटेन येऊन तुजलागीं ॥१९॥

भरत म्हणे हा नेम टाळतां ॥ मग देह त्यागीन तत्वतां ॥ श्रीरामचरणीं ठेविला माथा ॥ प्रेमावस्था अधिक पैं ॥१२०॥

भरत मागुता उठोन ॥ विलोकी श्रीरामाचें वदन ॥ अमलदलराजीवनयन ॥ तैसाचि हृदयीं रेखिला ॥२१॥

भरत सद्रद बोले वचन ॥ मी अयोध्येसी न जाय परतोन ॥ सकळ मंगळभोग स्नान ॥ त्यजूनि राहीन नंदिग्रामीं ॥२२॥

अवश्य म्हणे रघुनायक ॥ मणिमय पादुका सुरेख ॥ भरतासी दिधल्या शोकहारक ॥ येरें मस्तकीं वंदिल्या ॥२३॥

शिवमस्तकीं विराजे चंद्र ॥ तैशा शिरीं पादुका सुंदर ॥ शोक हारपला समग्र ॥ शरीर शीतळ जाहलें ॥२४॥

जैसें कंठीं धरितां नामस्मरण ॥ शीतळ जाहला पार्वती-रमण ॥ तैसाचि प्रेमळ भरत जाण ॥ अंतरीं पूर्ण निवाला ॥२५॥

शत्रुघ्नासी म्हणे रघुनाथ ॥ तूं आणि प्रधान सुमंत ॥ राज्यभार चालवा समस्त ॥ यथान्यायेंकरूनियां ॥२६॥

सदा स्तवावे संतसज्जन ॥ श्रीगुरुभजनीं सावधान ॥ दूर त्यागावे दुर्जन ॥ त्यांचें अवलोकन न करावें ॥२७॥

परदारा आणि परधन ॥ येथें कदा न ठेविजे मन ॥ वेदमर्यादा नुल्लंघावी पूर्ण ॥ प्राणांतही जाहलिया ॥२८॥

जरी क्लेशकाळ पातला बहुत ॥ परी धैर्य न सोडावें यथार्थ ॥ गुरुभजन पुण्यपंथ ॥ न सोडावे सर्वथा ॥२९॥

साधु संत गोब्राह्मण ॥ त्यांचें सदा करावें पाळण ॥ सकळ दुष्टांस दवडोन ॥ स्वधर्म पूर्ण रक्षावा ॥१३०॥

कथा कीर्तन पुराणश्रवण ॥ काळ क्रमावा येणेंकरून ॥ आपुला वर्णाश्रमधर्म पूर्ण ॥ सर्वथाही न त्यजावा ॥३१॥

संतांचा न करावा मानभंग ॥ हरिभजनीं झिजवावें अंग ॥ सांडोनि सर्व कुमार्ग ॥ सन्मार्गेंचि वर्तावें ॥३२॥

ऋषींचे आशीर्वाद घ्यावे ॥ वर्म कोणाचें न बोलावें ॥ विश्र्व अवघें जाणावें ॥ आत्मरूपीं निर्धारें ॥३३॥

सत्संग धरावा आधीं ॥ नायकावी दुर्जनांची बुद्धि ॥ कामक्रोधादिक वादी ॥ दमवावे निजपराक्रमें ॥३४॥

मी जाहलों सज्ञान ॥ हा न धरावा अभिमान ॥ विनोदेंही पराचें छळण ॥ न करावें सहसाही ॥३५॥

शमदमादिक साधनें ॥ स्वीकारावी साधकानें ॥ जन जाती आडवाटेनें ॥ त्यांसी सुमार्ग दाविजे ॥३६॥

शोकमोहांचे चपेटे पूर्ण ॥ आंगीं आदळत येऊन ॥ विवेकवोडण पुढें करून ॥ ज्ञानशस्त्र योजावें ॥३७॥

काम क्रोध मद मत्सर ॥ हे गृहासी येऊं न द्यावे तस्कर ॥ आयुष्य क्षणिक जाणोनि साचार ॥ सारासार विचारावें ॥३८॥

क्षणिक जाणोनि संसार ॥ सोडावा विषयांवरील आदर ॥ सद्रुवचनीं सादर ॥ सदा चित्त ठेविजे ॥३९॥

दैवें आलें भाग्य थोर ॥ त्याचा गर्व न धरावा अणुमात्र ॥ एकदांचि जरी गेलें समग्र ॥ कदा धीर न सांडावा ॥१४०॥

कमलपत्राक्ष कृपानिधान ॥ वर्षत स्वातीजल पूर्ण ॥ ते सुमंत आणि शत्रुघ्न ॥ कर्ण शुक्तिकेंत सांठविती ॥४१॥

शब्दामृत वर्षे रामचंद्र ॥ निवाले भरत कर्णचकोर ॥ कीं रामवचन क्षीरसागर ॥ उपमन्यु भरत साचार तेथें ॥४२॥

सूर्य उगवतां निरसे तमजाळ ॥ तैसें श्रीरामवचनें जाहलें हृदय निर्मळ ॥ मग भरत परतोनि तात्काळ ॥ नंदिग्रामीं राहिला ॥४३॥

करूनि मातेचे समाधान ॥ सकळ ब्राह्मण प्रजाजन ॥ सुमंत आणि शत्रुघ्न ॥ पाठवी परतोनि अयोध्ये ॥४४॥

श्रीरामपादुका सिंहासनीं ॥ शत्रुघ्नें वरी छत्र धरूनि ॥ मग राज्य चालवी अनुदिनीं ॥ नामस्मरणें सावध ॥४५॥

क्षणक्षणां येत नंदीग्रामासी ॥ मागुता जाय अयोध्येसी ॥ सकळ पृथ्वीच्या राजांसी ॥ धाक भरत शत्रुघ्नांचा ॥४६॥

प्रतिसंवत्सरीं करभार ॥ भूपाळ देती समग्र ॥ असो नंदिग्रामीं भरतवीर ॥ निर्विकार बैसला ॥४७॥

नंदिग्रामाजवळ अरण्यांत ॥ पर्णकुटी करून राहे भरत ॥ श्रीरामपादुका विराजित ॥ रात्रंदिवस मस्तकीं ॥४८॥

जे आवडते श्रीरामभक्त ॥ तेही भरताऐसे विरक्त ॥ कनक कामिनी गृह सुत ॥ त्याग करूनि बैसले ॥४९॥

वटदुग्धीं जटा वळूनि ॥ सकळ मंगळभोग त्यजोनि ॥ वल्कलें वेष्टित तृणासनीं ॥ बैसले ध्यानीं श्रीरामाचे ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP