अध्याय पाचवा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


सिंधुपूर महामुंडेश्र्वर ॥ भीमाशंकर धोपेश्र्वर ॥ सोरटीसोमनाथ लिंग थोर ॥ भीमचंडि पुण्यालयें ॥१॥

शिवकांचि विष्णुकांचि ॥ गोरक्षमठ आश्रम काळ हरती ॥ वेदपुर गया अरुणावती ॥ उडूपी शेषशायी सर्वेश ॥२॥

त्रिपति अहोबळ स्वामी कार्तिक सत्य ॥ सुब्रह्मण्य किष्किंधा मातंग पर्वत ॥ हंपीविरूपाक्ष मूर्तिमंत ॥ पंपासरोवर निर्मळ ॥३॥

चित्रकूट रुक्मकूट लोणार ॥ अंबु अयोध्या महंकापुर ॥ काळचंद्रिका अधोंदय पवित्र ॥ गोकर्ण कृष्णसागर पैं ॥४॥

हरिहर तीर्थ जंबुकेश्र्वर ॥ अनंतशायी विमळेश्र्वर ॥ मथुराविकर्ण प्रभाकर ॥ विश्रांतिवन तपोवन ॥५॥

कुंभकोण मंजरथ ॥ मातुलिंग धूळखेट त्रिविक्रमतीर्थ ॥ मुद्रल मांधाता आंवढ्या नागनाथ ॥ पंढरीक्षेत्र चंद्रभागा ॥६॥

त्रिकोण आणि कर्णमूळ ॥ नागगौर रंगजुगुळ ॥ आशापुरी नेपाळ त्रिमल्ल ॥ मथनकाळेश्र्वर कुशतर्पण ॥७॥

मीनाक्षी कामाक्षी मातुलिंग थोर ॥ सीता असीता चिदंबरेश्र्वर ॥ ब्रह्मकटाह हरिद्वार ॥ आदित्यवैश्र्वानर महातीर्थ ॥८॥

ब्रह्मानंद म्हणे श्रीकटाधर ॥ इतुकीं तीर्थें करूनि रघुवीर ॥ अयोध्येसी दीनोद्धार ॥ परतोनि आला गजरेंसीं ॥९॥

वसिष्ठासी साष्टांग नमन ॥ दशरथाचे चरण वंदून ॥ तिघी मातांसी रघुनंदन ॥ करी नमन अभेदत्वें ॥११०॥

तीर्थें करोनि आलिया श्रीराम ॥ सदा विरक्त आणि निष्काम ॥ नावडे लौकिक संभ्रम ॥ वैराग्य पूर्ण बाणलें ॥११॥

षड्रस अन्न उत्तमासन ॥ हास्य विनोद श़ृंगार गायन ॥ नावडे मृगया गमनागमन ॥ एकांतपूर्ण आवडे ॥१२॥

नावडे स्त्रियांसी संभाषण ॥ नेणें कामिनीचें विलोकन ॥ नासाग्रीं दृष्टि ठेवून ॥ आनंदघन डोलत ॥१३॥

याचिप्रकारें तिघे बंधू ॥ महाविरक्त निष्काम साधू ॥ श्रीरामसेवा करितां आनंदू ॥ तिघांसही सर्वदा ॥१४॥

तंव तो प्रतिसृष्टि करणार ॥ सिद्धाश्रमी गाधिजपुत्र ॥ महातपस्वी विश्र्वामित्र ॥ अयोध्येसी पातला ॥१५॥

आला ऐकोनि गाधिसुत ॥ सामोरा धांवे दशरथ ॥ साष्टांग करोनि प्रणिपात ॥ क्षेमालिंगन दीधलें ॥१६॥

दृष्टीं देखोनि ब्राह्मण ॥ जो न उठे करी अपमान ॥ त्याच्या आयुष्या होय खंडण ॥ आलें मरण जवळी त्या ॥१७॥

जो ब्राह्मणासी नेदी अभ्युत्थान ॥ तो दुसरे जन्मीं होय श्र्वान ॥ विघ्नें शोधीत येती त्याचें सदन ॥ कोठें नांदतो म्हणोनियां ॥१८॥

तैसा नव्हे राजा दशरथ ॥ महाराज केवळ ब्राह्मणभक्त ॥ कौशिकाचा धरोनि हात ॥ सिंहासनीं बैसविला ॥१९॥

वस्त्रालंकारादि उपचार ॥ देऊनि पूजिला विश्र्वामित्र ॥ मानसीं भावी अजपुत्र ॥ धन्य दिवस आजिचा ॥१२०॥

ऋषीस म्हणे दशरथ ॥ आजि मज हर्ष वाटे बहुत ॥ तुझे पुरवीन मनोरथ ॥ कांही इच्छित माग आतां ॥२१॥

म्हणोनि केला नमस्कार ॥ मग आशीर्वाद देत विश्र्वामित्र सूर्यवंशभूषण तूं उदार ॥ अनंत कल्याण तुजला हो ॥२२॥

तुष्टि पुष्टि तुजलागीं बहुत ॥ धर्म ऐश्र्वर्यवृद्धि अद्भुत ॥ सार्थकायुष्य सुख समस्त ॥ तुजप्रति हो दशरथा ॥२३॥

विवेकज्ञान समृद्धि बहुत ॥ विप्रविष्णुभक्ति घडो सतत ॥ प्रताप प्रज्ञा यशवंत ॥ सुभद्र अत्यंत तुजलागीं हो ॥२४॥

तव शत्रुक्षय हो कां बहुत ॥ अक्षय कल्याणपद हो कां प्राप्त ॥ भूतदया घडो सतत ॥ कुळवृद्धि बहुत हो कां तूंतें ॥२५॥

चिंतित हो पूर्ण मनोरथ ॥ सर्व अरिष्ट हो कां शांत ॥ सर्वाभीष्ट हो तुज प्राप्त ॥ रविकुलअवतंसा ॥२६॥

निर्दोष यश वाढो बहुत ॥ तव कीर्ति वर्णोत साधुसंत ॥ याचकांचे मनोरथ ॥ पुरोत सर्व तुझेनि ॥२७॥

अनाचारीं नसो आदर ॥ संतभजनीं होईं तूं सादर ॥ माझे आशीर्वाद घेईं ॥ माझें चिंतित कार्य सर्वही ॥ हो तुझेनि समस्त ॥२९॥

मी मागत नाहीं संपत्ति धन ॥ नलगे राज्य सिंहासन ॥ माझा मख मोडिती राक्षस येऊन ॥ देईं रघुनंदन रक्षावया ॥१३०॥

सिद्धि न पावे कदा यज्ञ ॥ मारीच सुबाहु ताटिका येऊन ॥ जाती होमद्रव्यें भक्षून ॥ देईं रघुनंदन रक्षावया ॥३१॥

कुंड वेदिका मोडून ॥ यज्ञपात्रें टाकिती फोडून ॥ मखमंडपासी लाविती अग्न ॥ देईं रघुनंदन रक्षावया ॥३२॥

मनुष्यांचें अस्थिमांस आणून ॥ अकस्मात टाकिती वरून ॥ गिळिले तिहीं असंख्य ब्राह्मण ॥ देईं रघुनंदन रक्षावया ॥३३॥

ऐकोनि ऋषीचा वचनार्थ ॥ भयभीत जाहला दशरथ ॥ वाटे अंगावरी कोसळला पर्वत ॥ कीं विद्युत्पात जाहला ॥३४॥

वाटें हृदयीं खोंचलें तप्त शस्त्र ॥ कीं अकस्मात गेले नेत्र ॥ कीं उभे ठाकले तस्कर ॥ धन हरावया कृपणाचें ॥३५॥

पाहे राजा अधोवदन ॥ कांही न बोले प्रतिवचन ॥ विवेकचातुर्य गेलें हरपोन ॥ भयें करोनि तेधवां ॥३६॥

बोले हळूचि भिवोन ॥ महाराक्षस मोडिती यज्ञ ॥ केवळ बाळ रघुनंदन ॥ राजीवनयन ॥ सुकुमार ॥३७॥

लीलाकार्मुक घेवोनि हातीं ॥ मजपुढें खेळे रघुपति ॥ नाहीं देखिली युद्धरीती ॥ अद्यापवरी श्रीरामें ॥३८॥

धनुविद्येचा अभ्यास ॥ अद्यापि नाहीं श्रीरामास ॥ कोमळ तनु डोळस ॥ कैसा युद्धासी देऊं तूतें ॥३९॥

राज्य संपत्ति गृह धन ॥ सर्व देईन तुजलागून ॥ परी नेदीं मी रघुनंदन ॥ राजीवनयन सुकुमार जो ॥१४०॥

राक्षस मारावया समस्त ॥ मी सेनेसहित येतों तेथ ॥ तुझिया कार्या वेंचीन जीवित ॥ परी रघुनाथ न देववे ॥४१॥

कृपणासी न देववे धन ॥ मीनासी न सोडवे जीवन ॥ तैसा मज न देववे रघुनंदन ॥ युद्धकंदन करावया ॥४२॥

श्रीराम माझें तान्हें अत्यंत ॥ कधीं नेणें उष्णवात ॥ ऐसें बोलतां अश्रुपात ॥ नेत्रीं रायाच्या चालिले ॥४३॥

ऐसें बोलतां अजनंदन ॥ ऋषि जाहला कोपायमान ॥ म्हणे तूं बोलिलासी वचन ॥ इच्छित पूर्ण देईन ऐसें ॥४४॥

म्यां न मागतां निश्र्चित ॥ तूं बोलिलासी माग इच्छित ॥ अरे सूर्यवंशी नृपनाथ ॥ डाग लाविला कुळासी ॥४५॥

येचि वंशी हरिश्र्चंद्र जाण ॥ लटकें साच करोनि स्वप्न ॥ राज्य मज दीधलें दान ॥ घेतलें विकून डोंबाघरीं ॥४६॥

तेचि वंशीं तूं जन्मोन ॥ कैसें असत्य केले वचन ॥ सूर्यवंशासी दूषण ॥ तुझेनि पूर्ण लागलें ॥४७॥

येचि वंशी शिबिराव आपण ॥ कपोतपक्ष्याच्या समसमान ॥ आपुलें मांस तुकिलें पूर्ण ॥ मिथ्या वचन न करीच ॥४८॥

येचि वंशीं रुक्मांगद ॥ एकादशीव्रत साधी शुद्ध ॥ केला पुत्राचा शिरच्छेद ॥ मिथ्या शब्द न करीच ॥४९॥

पैल शेजारीं श्रियाळ ॥ त्यासी दान मागे जाश्र्वनीळ ॥ केला पुत्रवध तात्काळ ॥ सत्वासी चळ होऊं नेदी ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP