पूर्वीच म्यां स्वरुप देखियलें अनंता
तें वर्णितां म्हणउनी विनयी विधाता
कीं देखिले बहु जगीं निज - कर्म - योगी
जे कर्म सर्वहि समर्पिति तूजलागीं ॥६१॥
आवश्यकें करुनियां विहितें स्वकर्मे
निष्काम तीं तुज समर्पिति विष्णु - धर्मे
कर्मार्पणेंचि तुझि आवडि त्या जनांला
तूझ्या कथा मग हरी रुचती तयांला ॥६२॥
कर्मार्पणें तव - कथा - श्रवणेंचि ज्यांला
त्वभ्दक्तिचा परम - दुर्लभ लाभ झाला
आत्मैक्य आवडि तुझी कळली मुकुंदा
झालेच सिद्ध नकरोनिहि योग - धंदा ॥६३॥
अनायासें ऐशा तय - चरण - दास्यें करुनियां
गति श्रेष्ठा तूझ्या तुजचि भजती जे नर तयां
त्यजूनी जे अन्या मग शरण आले तुज परी
तयांही त्या सिद्धि श्रम गण - समृद्धी बहु करी ॥६४॥
जाणोनि जे चिदचिदात्म विवेक मात्रा
मानूनि धन्य भजती न सरोज - नेत्रा
त्यांला श्रमाविण नसे फळ अन्य ऐसा
श्लोकांत यांत कथिला स्फुट भाव तैसा ॥६५॥
गर्भस्तुतींतहि असें दशमींच येथें
श्लोकद्वयें विधिभवादिक भाव तेथें
हा स्पष्ट अर्थ वदले श्रुतिसिद्ध देवें
गीतेंतही कथियलें स्फुट वासुदेवें ॥६६॥
गर्भस्तुति - श्लोक हरीच येथें वारवाणितो श्री हरि - भक्ति जेथें
ते संस्कृत श्लोकहि दोनि वाचा त्यानंतरें अर्थ पहा तयांचा ॥६७॥
श्लोक - द्वयार्थहि हरीच वदेल येथें
संक्षेपरुप बहु विस्तरता न जेथें
कीं आत्मता कळलि शाब्दिक - बोध - रीती
जे मुक्ति हेचि म्हणऊनि मनीं धरीती ॥६८॥
आत्मज्ञता परम तें पद त्या पदींही
यत्नें चढोनिहि अहो पडताति देही
कीं आत्मता कळलि कां सगुणास आतां
सेऊं म्हणूनि भजती न तुतें अनंता ॥६९॥
तुझा भाव जेव्हां असा अस्त झाला मतिभ्रंश तो मोह आला तयांला
जरी शुद्ध होती बरी बुद्धि त्यांची तुझा भाव जातांच ते शुद्धि कैंची ॥७०॥
दृष्टि - प्रकाश उदयाद्रिस सूर्य येतां
आंधार तीस रवि अस्त गिरीस जातां
श्रुद्धा मती सगुण - भाव - विना अशुद्धा
सिद्धी विना हरिकृपा अवघ्या असिद्धा ॥७१॥
पायीं तुझ्या आदर ज्यांस नाहीं आत्मज्ञता त्यांस फळे न कांहीं
हा आद्यपद्यार्थ दुज्यां विमुक्तां निरुपिती केवळ विष्णु भक्तां ॥७२॥
तुझी नावडी मुक्त झालों म्हणूनी जयां भ्रष्टती ते जसे ज्ञानमानी
तसे माधवा जे तुझे ते कधींही नहोती न ते चूकती मार्ग कांहीं ॥७३॥
सखा सोयरा स्वामि तूं शेषशायी म्हणूनी सुत्दृद्धाव तुझ्याचठायीं
तयां रक्षिता तूं जनीं नित्य होसी शकेना करुं विघ्न कोण्ही तयांसी ॥७४॥
महाविघ्न - सेनापती मोठमोठे तयांचे शिरीं पाय देवोनि वाटे
हरी चालती मोक्ष - मार्गी तुझे जे तशांही न ते बाधती विघ्न राजे ॥७५॥
न तें बोलवे ग्रंथ वाटे म्हणोनी अगत्यास हे बोलिलों श्लोक दोनीं
पुढें भारती भारतीच्या पतीची पहा दाविते काय शोभा स्तुतीची ॥७६॥
तूझा अतर्क्य महिमा नकळे अनंता
श्लोकांत हें दुसरिचा वदला विधाता
बोलोनि येरिति मनींच सशंक झाला
कीं मोक्ष याउपरि होय कसा जनाला ॥७७॥
देणार मुक्तिस कळे महिमा न त्याचा
लोकांस मोक्ष मग हा घडणार कैंचा
शंका असी त्दृदयिं तीस हरावयाला
हे श्लोक तीन कमळासन बोलियेला ॥७८॥
पृथ्वी छंदः अतर्क्य महिमा जरी तरिहि तूं निजात्मा हरी
प्रकाशक मनीं स्फुरे मन मुरे तया भीतरी
तथापि तव भक्तिनें तव अनुयहें या पदा
प्रपन्न - जन पावती इतर भोगिती आपदा ॥७९॥
येणें प्रसगेंच उपासकांचे प्रकारही वर्णियले स्ववाचे
सिद्धांत कीं श्री हरि - भक्ति ज्यांला ब्रम्हात्मता - प्राप्ति घडे तयांला ॥८०॥
करि हरीच अनुग्रह जेधवां अगुणिचां महिमा मग तेधवां
सहज एक चिदात्मपणें कळे सगुणिंचा महिमा तरि नाकळे ॥८१॥
श्लोकद्वर्ये करुनि हेंचि वदेल आतां
टीकामुरघें करिति जे सुख सर्व संतां
आत्मज्ञता वदति शाब्दिक ते प्रसंगें
खंडील येथ निज - केवळ - आत्म - योगें ॥८२॥
तूझा अतर्क्य महिमा नकळे तथापी
जाणावयास महिमा अगुण - स्वरुपीं
पूर्वोक्त भक्त भजतां तुज योग्य होतो
चित्तास चिन्मय करुनि तुतें वरीतो ॥८३॥
योगीं निर्गुणिंचा कळे न महिमा भक्ति - प्रतापें जरी
आत्मानात्म - विवेक तों गुरुमुखावांचूनि नेणे तरी
सांगे श्रीगुरु आत्मता मग घडे सद्भक्ति सर्वेश्वरीं
तेव्हां निर्गुणिंचा कळेल महिमा दुर्वोध तो तोंबरी ॥८४॥
दास्येंचि लभ्य हरि - भक्ति असे तथापी
जे कां निजात्म - रति केवळ चित्स्वरुपीं
ते प्रीति तों जडशवांत तया निषेधी
तो श्रीहरी गुरुपणें निज - तत्व - बोधी ॥८५॥
जो निर्निमित्त सतत प्रिय हो चिदात्मा
तो वासुदेव कळल्यावरि भक्तिवर्त्मा
जाणोनियां करि अनन्य अखंड भक्ती
तेव्हांच निर्गुण - महत्व कळोनि मुक्ती ॥८६॥
या कारणें म्हणतसे विधि कीं अनंता
त्वद्दासही गुरुकरुनिच तत्ववेत्ता
तूं विश्वरुप गुरु होउनि भेट देसी
सर्वात्मता नुभव - रुपहि तूंचि होसी ॥८७॥
तूं विश्वरुप परि तूज गुरुत्व तेथें
कीं चित्त चिन्मय स्वरुप असेल जेथें
तें चित्त चिन्मय सजीव जरी जनाचें
मालिन्य तत्व विषयात्मपणें मनाचें ॥८८॥
या कारणें अमल चित्त असे जयांचें
तें चित्त चिन्मय अखंड असे तयांचें
या कारणें विधि म्हणे अमलांतरात्मे
जे त्वन्मुखेंचि कळती निज - बोध - वर्त्मे ॥८९॥
हा आत्मशब्द मन चित्त शरीर बुद्धी
बोले तरी प्रकरणाऽनुगुणार्थ सिद्धी
या प्रस्तुतीं अमळ चित्त असा चतुर्थी
हा आत्मशब्द धरणें त्दृदयीं समर्थी ॥९०॥

N/A

References : N/A
Last Updated : July 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP