श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय पाचवा

श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा


ॐ परमात्मने नम: । श्री सद्गुरुरवे नम: । श्री सरस्वत्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥
ॐ नमो नम: परब्रह्मणे । प्रज्ञापूर निवासिने । नमो वटपत्र शायने । श्री स्वामी शिवाय नम: ॥२॥
स्वामीचे मोरेश्वरा आज्ञापन । करणे राममंदिर निर्माण । दशके गेली निघून । तरी कार्य होईना ॥३॥
मंदीर निर्मितीस । धन लागे अमूप । धन संचय करीत । पौरोहित्य विदागी कीर्तनीय ॥४॥
मंदी निर्मितीस । गर्भागार, दर्शनमंडप सभागृह । सीताराम लक्ष्मणासहीत । हनुमंत मूर्ती आवश्यक ॥५॥
पूर्वमंदीर निर्माण । मूर्ती असंख्यात सुलक्षण । चालले विचारमंथन । वदती कर्ते करविते स्वामी ॥६॥
भार वाहिला स्वामी चरणास । परी यत्न करणे अवश्य । काळबादेवी भुलेश्वरास । मुंबापुरीत मूर्ती पाहती ॥७॥
मूर्ती पाहिल्या अगणीत । परी नसती लक्षणयुक्त । एकदां होऊनि हताश । बसले ग्रँटरोड स्थानकासी ॥८॥
मयुरानंदा पानथरी विकार । गांजा धूम्रपान तया औषध । उदरी वेदनी संभावत । चिलीम ओढीत बैसले ॥९॥
तेथ एक राजस्थानी । विनवी मयुरानंदा येऊनी । तया दोन गांजागोळ्या देऊनी । दिधली चिलीम ॥१०॥
एक झुरका मारीत । निघती ज्वाळा लोट । दोन गोळ्या एका क्षणात । फस्त केल्या तयाने ॥११॥
मयुरानंदांची उदर व्यथा त्वरीत । गेली निघूण क्षणांत । पुनरपी कदापि तयांस । आजन्म उदर व्यथा न जाहली ॥१२॥
राजस्थानी पुसे तयांस । आगमन येथ किमर्थ । कविता मनीचा हेत । राजस्थानी बोले तया ॥१३॥
मी असे मूर्तिकार । श्रीराम मूर्ती आहेत पेटार्‍यांत । कोण्या संस्थानिके मज । मूर्ती करण्या कथिले ॥१४॥
परी अन्य मूर्तिकाराकडून । घेतल्या मूर्ती क्रय करुन । दिसती सत्पुरुष आपण । अवलोकावे मूर्तीसी ॥१५॥
इहपर कोणास । मूर्ती विकणे नसे आम्हांस । लक्ष्मण रामसीतेसहीत । दान आपणां देतसे ॥१६॥
मूर्ती पाहती मयुरानंद । अती तेजस लक्षणयुक्त । आणि वदले मूर्तिविकारास । मूर्ती आहेत उत्तम ॥१७॥
दान नको आम्हांस । स्वीकारावे मानधनास । दोघे नकारती एकमेकास । गाडी येता मूर्तिकार गेला ॥१८॥
वाटले तया वाईट । मूर्ती होत्या सतेज । नाही जाहली तडतोड । गेले निधान हातचे ॥१९॥
मोबदला देणे असे । तो स्विकारीत नसे । कर्माचे फासे । कैसे पडती विपरीत ॥२०॥
परंतु काही दिवसांत । विरारस्थानक नियंत्रक । आला तयांचा निरोप । यावे त्वरीत स्थानकासी ॥२१॥
मयुरानंद जाता तेथ । तया दिधले पत्र । पेटार्‍यासी करी निर्देश । आपुल्या नामे हा असे ॥२३॥
उघडता पत्र । वाचिती मूर्ती दिधल्या आपणास । अमुल्याचे मूल्य । कोणी कैसे करावे ॥२३॥
मयुरानंद स्तंभित । श्री स्वामींचे हे कृत्य । पाचारुनी विश्वकर्म्यास । धाडिल्या मूर्ती ॥२४॥
परंतु हनुमंताविण । कैसे करावे प्रतिष्ठापन । राममूर्ती प्रमाणे । स्वामी इच्छे येईल हनुमंत ॥२५॥
स्मरणगामी हनुमान । जाणती माझे अंतर्मन । एका हनुमानरुपे स्वामी दर्शन । स्मरण तया जाहले ॥२६॥
चक्रेश्वराचे डावे बाजूसी । मंदिराचा पाया खणती । त्वरीत उद्भवली मूर्ती । मारुती वायुनंदन ॥२७॥
मूर्तिकारास धाडले पत्र । आपणा येणे मूर्ती प्रतिष्ठेस । आमुच्या उत्कट इच्छेस । आपण कृपा करावी ॥२८॥
प्राणप्रतिष्ठा समयास । अचानक आला मूर्तिकार । तीनशे एक रुपये इह मूर्तीस । दिधती तया दक्षिणा ॥२९॥
विश्वकर्मा शांतचित्त । वदे मयुरानंदास । अव्हेर न करी दक्षिणेस । रामधन हनुमंताचे ॥३०॥
मयुरानंदांचे पुत्र । गोविंदबुवा नामक । प्राणप्रतिष्ठा सपत्निक । जाहली तयांचे हस्ते ॥३१॥
शुध्द द्वादशी, वैशाख मास । अठराशे बारा शक । इसवी सन अठराशे नव्वद । जाहले रामप्रभू स्थानापन्न ॥३२॥
समारंभ होता पूर्त । निघे मूर्तिकार स्वग्रामास । परंतु पाहता हनुमंतास । वाटे आश्चर्य समस्ता ॥३३॥
हनुमंताचे पदापाशी । होते दक्षिणाधन परियेसी । विश्वकर्मावच स्मरणासी । रामधन हनुमंताचे ॥३४॥
प्रात:काळी संपादूनी नित्यकर्म । मयुरानंद चिंतनी मग्न । तव अवचित यतीपरम । आले घरासी ॥३५॥
वदले मयुरानंदांस । आपण स्वामी कृपांकित । म्हणून आपल्या दर्शनास । पातलो आम्ही ॥३६॥
काही औषधे आपणांस । कथिणे ऐसा मानस । तरी लेखणी कागद । त्वरित सिध्द करावे ॥३७॥
यती सांगती जडीबुटी । मयुरानंद लिहून घेती । जया उदरी कृमी होती । तया उत्तम औषध ॥३८॥
जया नसे संतान । तयासी औषधी रसायन । जडीबुटीचे प्रमाण तैसे मिश्रण विधी ॥३९॥
कोणी रुग्णाइतास । द्यावे हे औषध विशेष । कृमिघ्न काढा नामयास । माफक धन घेईजे ॥४०॥
कोणी मागितल्यावीण । न द्यावे रसायन । श्रध्दावंतासी पूर्ण । रसायन त्रैलोक्य चिंतामणी ॥४१॥
झोळींत घालूनी हात । नाणेप्रसाद देत । नित्य धन प्राप्त । तुज होईल या योगे ॥४२॥
तुमचा योगक्षेम । मी स्वत: चालविन । ऐसे तयां आशिर्वचून । यती झाले मार्गस्थ ॥४३॥
तयां शोधू पहाता । अदृश्य झाले तत्त्वता । स्वामी वचन सत्यता । एकदां येईन वच गृही ॥४४॥
त्रैलोक्य चिंतामणी रसायन । वा काढा कृमिघ्न । बाहात्तर रोग नाशन । रामबाण असे औषधी ॥४५॥
अद्यापि तयांचे वंशज । देती काढा इच्छितास । साक्षात स्वामी भैष‍ज । असंभव रोग व्याधी ॥४६॥
जय जय स्वामी समर्था । तुम्ही कर्ता करविता । सर्वत्र तुमची सत्ता । सत्ताधीशा तुज नमो ॥४७॥
इतिश्री स्वामी कृपांकित । श्री मयुरानंद धारामृत राममंदीर निर्माणं तथा कृमिघ्न रसायन प्रदानं नामो,
पंचमोध्याय: । श्री रामसमर्थार्पणमस्तु ॥शुभम्‍ भवतु॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP