मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥२८॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२८॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीकृष्णाश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय श्रीस्वामिराया । काय करूं मी आतां सदया । धीर ना अंगीं कवन कराया । तूंचि पार घालीं झणीं ॥१॥
माझ्या अंगीं नाहीं सगुण । असें मी एक भक्तिहीन । या परी देवा तुजलागोन । सारे समान जन बापा ॥२॥
भक्त अभक्त निंदक वंदक । सारें ब्रह्मचि तुजला देख । म्हणोनि गुण दोष दिसतां सन्मुख । हर्ष खेद न बघसी ॥३॥
ऐसा तूं सद्गुरुनाथ । उद्धरिसी मजला खचित । यांत संशय न वाटे किंचित । सद्गुरुराया दयाळा ॥४॥
परी एकचि येतो संशय । कीं आमुच्या अंगीं नसतां निश्चय । कैसी तुझी कृपा होय । सांगें बापा मजलागीं ॥५॥
जरी नाहीं भक्तिभाव । तरी निश्रय असावा सदैव । तैसियांसी सद्गुरुदेव । उद्धरी हा निर्धार ॥६॥
म्हणोनि देवा आणिक कांहीं । न मागें तुजपाशीं पाहीं । निश्चयें तो एकचि देईं । ग्रंथ परिपूर्ण कराया ॥७॥
असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । कृष्णाश्रमांनीं शिष्य स्वीकार करोन । शिष्याचा महिमा दाखविला ॥८॥
आतां कृष्णाश्रम कृपाघन । यांचे आणिक ऐका सद्गुण । देह झिजविती कराया कल्याण । निजभक्तांचे दिनरजनीं ॥९॥
लाविले जन भक्तिमार्गा । आणि शिकविला स्वधर्म जगा । येथें संशय कोणता सांगा । येईल श्रोत्यांसी आतां पैं ॥१०॥
कीं जगासी कैंचा शिकविला स्वधर्म । तरी सांगतों ऐका त्याचें वर्म । जगामाजीं मनुष्य उत्तम । त्यासी शिकविती हो पाहीं ॥११॥
येथे एक येईल प्रश्न । 'उत्तम मनुष्य' म्हटले जाण । यांसीच शिकविती कृपाघन । अधमासी कां नाहीं सांगा हो ॥१२॥
तरी ऐसें कैसें घडेल । जरी अधम म्हणोनि दवडील । त्यासी सद्गुरु कोण म्हणेल । ऐसें सहसा मानूं नका ॥१३॥
याचें आतां ऐका उत्तर । मनुष्य हाचि उत्तम साचार । पशुपश्यादि समग्र । अधम योनी त्या पाहीं ॥१४॥
जो असे मनुष्य एक । तो जरी अधम पापी अधिक । तरीही न दवडिती देख । सद्गुरुस्वामी ते पाहीं ॥१५॥
विद्या गुण गरीब श्रीमंत । कांहीं न बघती साधुसंत । केवळ त्याचा भावार्थ । पाहुनी त्यासी उद्धरिती ॥१६॥
ना जरी नाहीं अंगीं भाव । महापातकीही असतां सदैव । येतां संनिधीं त्यां गुरुराव । कळवळोनि अंगीकारिती ॥१७॥
परी असावा निश्र्चय दृढतर। तेव्हां भक्ति उपजे सत्वर । म्हणोनि ऐशियासी श्रीगुरुवर । कधींही न दवडिती पहा हो ॥१८॥
त्यांचा अवतारचि जन - उद्धारा । दुजें कर्तव्य नाहीं त्या गुरुवरां । सिद्धचि होऊनि राहती त्वरा । वाट पाहात भक्तांची ॥१९॥
ऐसी आमुची माउली जाण । श्रीकृष्णाश्रमस्वामी कृपाघन । कैंच्या उपायें उद्धरावे जन । हीच चिंता त्यांलागीं ॥२०॥
म्हणोनि करिती नाना प्रयत्न । जगाचा उद्धार व्हावयाकारण । हेचि सांगूं कथा संपूर्ण । तुम्ही भाविक अवधारा ॥२१॥
श्रीस्वामी पांडुरंगाश्रम । यांसी शिष्यपट होतां उत्तम । रथोत्सव आला व्यंकटापुर - ग्राम । येथें रथसप्तमीसी ॥२२॥
तेव्हां पांडुरंगाश्रमस्वामी । म्हणती सद्गुरुसंनिधीं आज मी । जाऊं का व्यंकटापुर - ग्रामीं । रथोत्सवासी गुरुराया ॥२३॥
ऐशी प्रार्थना प्रेमपुरःसर । केली मृदुवचनें सुंदर । घातला साष्टांग नमस्कार । लडिवाळपणें गुरुचरणीं ॥२४॥
तेव्हां सद्गुरुराय बोलती । तेथे जाऊं नये निश्चितीं । संन्यासियानें खचिती । माझ्या बाळा वेल्हाळा ॥२५॥
यावरी येरु बोले वचन । कासया न जावें आपण । रथावरी बसेल लक्ष्मीरमण । हें पहावें ऐसें मज वाटे ॥२६॥
तेव्हां बोलती सद्गुरुराज । तूं बा नको जाऊं आज । हंसतील सारे जन तुज । सोडीं आग्रह हा आपुला ॥२७॥
यावरी बोले शिष्यराय । देवा धरितों आपुले पाय । मज देऊनियां अभय । पाठवा तेथें कृपेनें ॥२८॥
रथोत्सव मज परम प्रिय । काय सुंदर श्रीरघुराय । बैसतां रथीं दिसे रमणीय । देखावा उत्तम तो असे ॥२९॥
म्हणोनि देवा सद्गुरुराया । बाळावरी कृपा करोनियां । आज्ञा द्यावी हो जावया । यावेळीं व्यंकटापुर - ग्रामासी ॥३०॥
तेव्हां बोलती स्वामी दयाळ । नको जाऊं तूं बा ये वेळ । येथेंचि करूं रथोत्सव सोज्ज्वळ । धरीं धीर आतां पैं ॥३१॥  
ऐसे शब्द पडतां कानीं । आनंद झाला त्यांचे मनीं । जगाचें कल्याण होईल म्हणोनि । हर्ष झाला अनिवार ॥३२॥
जरी असे वय लहान । तरी सारें कळे त्यां पूर्ण । परी बळेंचि हट्ट धरिला जाण । जगदोद्धाराकारणें ॥३३॥
कीं आपण न जावें ऐसें शास्त्र । विदित असोनि पंकजनेत्र । सिद्ध झाले जावया अन्यत्र । स्थळीं उत्सव पहावया ॥३४॥
ऐसा धरितां आग्रह आपण । ओळेल सकळांवरी कृपाघन । येथेंचि रथोत्सव करतील म्हणोन । लडिवाळपणें घेती हट्ट ॥३५॥
यांत जगाचा काय उद्धार । म्हणाल तरी ऐका उत्तर । धर्मकार्यें करितां थोर । येती जन पहावया ॥३६॥
उत्सवमिसें येती बहुत । मठामाजीं त्यानिमित्त । देवाचा विनियोग बघाया त्यांप्रत । मिळे सहजचि सकलांसी ॥३७॥
बघतां उत्सव प्रेमपूर्वक । भक्ति वृद्धि पावे साहजिक । अभक्तांचीं पापें अनेक । नाशुनी तेही भक्त होती ॥३८॥
कामुकांची कामना पुरेल । निष्कामियांसी ज्ञान होईल । ऐसा उत्सवाचा महिमा अढळ । असे जाणा तुम्ही हो ॥३९॥
म्हणोनि उत्सवाचा त्यांनीं छंद । घेतला, त्यांचे अंतर शुद्ध । झाला तयांसी परमानंद । निजमानसीं त्या समयीं ॥४०॥
आणिक घडे स्वामींचे दर्शन । दर्शनें होय पाप दहन । पाप नासतां ब्रह्मज्ञान । होय संशय ना कांही ॥४१॥
पाप सारे नासुनी जातां । चित्त शुद्ध होय तत्त्वतां । तेणें होय परमार्था । योग्य तो नर त्या वेळीं ॥४२॥
तैसेंच बहुविध उत्सव । बघतांही पाप नासे सर्व । तेणें प्रगटे सात्त्विक भाव । कैसें तें सांगूं अणुमात्र ॥४३॥
देवाचा बघतां उत्सव थोर । अथवा गुरुदर्शन वारंवार । घडतां शांत होय मन स्थिर । पहा कैसें तें सांगूं ॥४४॥
तेथे नसे अन्य विचार । शुद्ध सात्विक तेथील आचार । केवळ सत्कर्मेंचि सुखकर । आनंदचि होय त्यामाजीं ॥४५॥
सत्कर्मांमाजी रजोगुण । किंवा नसे तमोगुण । सत्वगुणचि भरला पूर्ण । त्या क्रियेमाझारीं ॥४६॥
तसबीर घ्यावयाचे यंत्र । ठेवितां ज्या ज्या स्थळीं समोर । टक् करितां उमटे समग्र । फिल्मावरी तत्काळ ॥४७॥
तैसें येथें देहरूप । कॅमेरायंत्र ठेवितां समीप । बुद्धि फिल्म यावरी आपोआप । उमटती भाव सारे पैं ॥४८॥  
रजतमाच्या पाहतां क्रिया । मनावरी उमटती भाव ते आपसया । सत्त्वगुणाच्या कार्या । बघतां सात्त्विक भाव उमटती ॥४९॥
 म्हणोनि सत्त्वगुण वाढवावया । सत्कर्में वरिवरी दावावीं डोळियां । तेव्हां चित्त शुद्ध होऊनियां । होय ज्ञान तात्काळ ॥५०॥
 प्रपंचीं येती प्रतिबंध अनेक । जरी असे तो परम भाविक । न मिळे जावया मठासी देख । तळमळे अंतरीं तेणेंतो ॥५१॥
म्हणोनि ठेवितां ऐसा उत्सव । तया निमित्तें येती सर्व । तेव्हां लाभ होय अपूर्व । सत्कर्में तेवीं सद्गुरुदर्शन ॥५२॥
घढीघडी जरी दर्शन होय । प्रेम उद्भवे तेथें निश्चय । गुरुप्रेमें सोडी दुर्विषय । जरी तो असे मंदमति ॥५३॥
त्यागितां दुर्विषयांची श्रीति । सहजचि घडे स्वधर्म निश्र्चितीं । स्वधर्में चालतां तयाप्रती । मुमुक्षुत्व अंगीं येतसे ॥५४॥
मुमुक्षुत्व येतां अंगीं । उपरी साधकदशा ये वेगीं । मग ब्रह्मज्ञान तयालागीं । सद्गुरुकृपें होय झणीं ॥५५॥
म्हणोनि पांडुरंगाश्रमगुरूंनीं । जगदोद्धारार्थ हट्ट धरूनी । रथोत्सवाचे कार्य तें झणीं । करविलें जाणा प्रेमानें ॥५६॥
श्रोते येथें करितील प्रश्न । हल्लीं कां उत्सव टाकिला काढोन । काय सांगा त्याचें कारण । आम्हांलागीं निश्र्चयेंसीं ॥५७॥
तरी त्यांतही जनांचे हित । पाहुनी केलें कार्य समस्त । जैसी परिस्थिति ज्या काळीं असत । तैसें करणें हें योग्य ॥५८॥
सत्पुरुष जें जें करिती । तें तें योग्यचि असे निश्र्चितीं । सदा सर्वदा त्यांच्या चित्तीं । कल्याण व्हावें जनांचें ॥५९॥
त्याचें करूं पुढें विवरण । नवम आश्रमाचें सांगतां आख्यान । प्रस्तुत करूं हेंचि कथन । रथोत्सवाची पूर्ण कथा ॥६०॥
असो कृष्णाश्रमस्वामींनीं । विचार केला आपुल्या मनीं । शिष्याचा हेतु अंतरीं समजोनी । केली सिद्धता सारी पैं ॥६१॥
करितां ऐसा रथोत्सव । परमार्थलाभ घेतील सर्व । हा शिष्याचा अंतर्भाव । सत्यचि असे उत्कृष्ट ॥६२॥
ऐसा हेतु धरोनि अंतरीं । करविला रथ सुंदर भारी । तेचि वर्षीं पहा सत्वरी । चैत्र शुद्ध पौर्णिमेसी ॥६३॥
परम उत्कृष्ट केला उत्सव । बघाया आले जन सर्व । उत्सव बघोनि अपूर्व । आनंद जाहला सकलांसी ॥६४॥
ऐसा उत्सव इतुका सुंदर । कवण्या स्थानींही नसे साचार । बघतां चित्त होय एकाग्र । काय सांगूं नवलाई ॥६५॥
आतां करूं त्याचें वर्णन । परिसा आपुलें चित्त देऊन । ऐकतां पापें होती दहन । इतुकें पुण्य त्यांचें पैं ॥६६॥
 चैत्र शुद्ध दशमीपासुनी । आरंभ होय उत्सवालागुनी । कैसा तो सावध ऐका क्षणीं । करूं वर्णन अणुमात्र ॥६७॥
दशमीच्या दिवशीं गरुडस्तंभ । पुजूनि करिती उत्सवारंभ । जन अपार येउनी लाभ । घेती त्या उत्सवाचा ॥६८॥
दशमीपासुनी चतुर्दशीवरी । पांच दिवस पालखीमाझारीं । भवानीशंकर देवासी निर्धारीं । बसवुनी मिरविती प्रेमानें ॥६९॥
 माध्यान्हीं आणि रात्रीं देख । करिती उत्सव सुरेख । पुराण प्रवचन कीर्तन सकळिक । भजन अष्टाविधानसह ॥७०॥
दोन्ही वेळां दुपारी रात्रीं । देवबली देती ते अवसरीं । तैशा उत्सवाची थोरी । वर्णूं न शके कवणही ॥७१॥
ते वेळीं जें वाद्य वाजविती । परम मधुर ऐकाया अति । आनंद न समावे चित्तीं । बहु प्रेमळ उत्सव तो ॥७२॥
ग्रामोग्रामींचे येती जन । तेथेंचि सर्वां उपहार आणि भोजन । गरीब-श्रीमंतां सर्वां समान । घरच्यापरीच हो सारें ॥७३॥
म्हणोनि सारा दिवस त्यांचा । सत्कर्में पहाया जाय साचा । भार न लागे संसाराचा । राहती जोंवरी तेथे पैं ॥७४॥
माहेराहुनी अधिक होय सुख । अणुभरी मनासी नाहीं दुःख । तेणेंचि होय परमार्थ चोख । साऱ्या भक्त जनांचा ॥७५॥
असो बहुविध उत्सव थोर । पौर्णिमेदिवशीं रथोत्सव सुंदर । ओढिती रथ प्रेमपुरःसर । दिपती डोळे बघतांचि ॥७६॥
उत्सव संपूर्ण होई तोंवरी । सहस्रभोजनें तृप्त करी । न्यूनता न पडे अणुभरी । कवण्याही कार्यासी ॥७७॥
करितां सारें वर्णन । ग्रंथ वाढेल अमितचि जाण । एवं निजभक्तांकारण । देह झिजविती श्रीस्वामी ॥७८॥
यांत नाहीं अणुमात्र संदेह । कित्येक आपुल्या परिवारासह । येती बहुत भक्तसमूह । रथोत्सव बघण्यासी ॥७९॥
सर्व जनांसी समान बघोनि । दर्शन देती त्यांलागोनि । करिती सारी व्यवस्था झणीं । अन्नपाण्याची त्या समयीं ॥८०॥
केवळ भक्तप्रेमासाठीं । सहन करिती सर्व गोष्टी । उद्धारावया उठाउठी । झिजविती शरीर आपुलें हें ॥८१॥
क्षुधा तृषा शीत उष्ण । सहन करिती भक्तांकारण । एवं करिती सर्वांचे रक्षण । मातेपरी प्रेमानें ॥८२॥
यापरी सारे भक्तमनोरथ । पुरविती आळस न करितां किंचित । ऐसे स्वामी सद्गुरुनाथ । कष्टविती देह दिनरजनीं ॥८३॥
ते निजभक्तांसाठीं । सर्वही करिती कार्यें मोठीं । सांगावया न ये ओठीं । आम्हां अज्ञ मानवांसी ॥८४॥
जें जें मागती आपुले भक्त । तें तें देती सद्गुरुनाथ । त्यांच्या इच्छेपरी वर्तत । अति उत्साहें हो पाहीं ॥८५॥
इच्छेपरी वागती म्हणुनी । भलतेंचि सांगतां न घेती कानीं । विचारपूर्वक विहित करणी । करिती सर्व कृपेनें ॥८६॥
नाहीं त्यांसी मानावमान । परी न सोडिती स्वाभिमान । हेंचि ज्ञानियांचे लक्षण । शुद्ध मन त्यांचे हो ॥८७॥
असावा आपुला स्वाभिमान । दुरभिमान द्यावा सोडून । हेंचि शिकावें आपण । सद्गुरुस्वामींकडूनियां ॥८८॥
असो माता पुरवी मुलाचा हट्ट । भलतेंचि मागतां येई वीट । म्हणे भारी माजला चावट । थोबाडीं देत क्रोधानें ॥८९॥
तैसी आमुची श्रीगुरुमाय । भक्तांचे मनोरथ पुरवी निश्चयें । परी दुष्कर्में दुर्विषय । येथें जाऊं नेदी त्यां ॥९०॥
प्रवचनरूप काठी घेउनी । बडवी आपुल्या भक्तांलागुनी । स्वधर्म सत्कर्म दावी झणीं । इच्छा करितां तत्काळ ॥९१॥
असो ऐसी सद्गुरुमाय । निजभक्तांचें करी कार्य । म्हणोनि रथोत्सव करिती सदय । कृष्णाश्रमस्वामी ते ॥९२॥
ऐसें जे करिती सत्कार्य । तें आपुल्यासाठीं नव्हे हा निश्र्चय । पुन्हां पुन्हां सांगावें काय । भक्तांसाठीं म्हणोनियां ॥९३॥
पुढील अध्यायीं कथा सुरस । सांगूं महिमा अद्भुत तुम्हांस । ऐकतां पापें पावतील नाश । नाहीं संशय यामाजीं ॥९४॥
आनंदाश्रम - परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें अष्टाविंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥९५॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां होईल ब्रह्मज्ञान थोर । अष्टाविंशाध्याय रसाळ हा ॥९६॥
अध्याय २८
॥ओंव्या ९६ ॥
ॐ तत्सत् श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति अष्टाविंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP