रामदासांचे अभंग - ५१ ते ६०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.


अभंग -५१

रामभक्तीविण अणु नाही सार । साराचेंहि सार रामनाम कल्पनाविस्तार होतसे संहारु । आम्हा कल्पतरु चाड नाहीं कामनेलागुनी विटलासे मनु । तेथें कामधेनु कोण काज चिंता नाहीं मनीं राम गातां गुणीं । तेथें चिंतामणी कोण पुसे रामदास म्हणे रामभक्तीविणें । जाणावें हें उणें सर्वकांही

भावार्थ--

रामनाम हे सर्व अविनाशी वस्तुंचे सार आहे. रामनामाशिवाय सर्व असार आहे. असे सांगून संत रामदास म्हणतात कल्पतरु(इच्छिले फळ देणारे झाड) हा कल्पना विस्तार आहे, तेंव्हा त्याची ईच्छा नाही. रामनाशिवाय मनांत कोणतिही कामना नाही त्या मुळे कामधेनुची अभिलाषा नाही. श्री रामाचे गुण गातांना मनाला कसलिही चिंता नाही तर चिंतामणिची पण अपेक्षा नाही. संत रामदास खात्रीपूर्वक सांगतात की, कल्पतरु, कामधेनु, चिंतामणी हे सर्व रामभक्तीच्या तुलनेने अगदी गौण आहेत.

अभंग--५३

ऐसे आत्मज्ञान उध्दरी जगासी । पाहेना तयासी काय करुं सर्व काळ गेला दारिद्रय भोगितां । वैराग्य पाहतां तेथें नाहीं दारिद्रयाचें दु:ख केलें देशधडी । रामराज्य गुढी उभविली उभविली गुढी भक्तिपंथें जावें । शीघ्रचि पावावें समाधान समाधान रामीं रामदासां जालें । सार्थकानें केलें सार्थकचि

भावार्थ--

या अभंगात संत रामदास जीवनाची सार्थकता कशात आहे हे स्पष्ट करून सांगत आहेत.  आजवरचे सर्व आयुष्य दारिद्र्य भोगताना गेले पण तरीही जीवनात वैराग्य आले नाही हे दुःख बाजूस सारून रामराज्याची गुढी उभारून भक्तिमार्गाने जाण्याचे ठरवले.  राम भक्तीमुळे संत रामदासांना पूर्ण समाधान प्राप्त झाले.  जीवनाचे सार्थक करणार्‍या श्री रामांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले असे संत रामदास अगदी निसंशयपणे सांगतात हे आत्मज्ञान जगाला उद्धरून उजळून टाकत. पण त्या कडे कोणी लक्ष्य देत नाही अशी खंत संत रामदास व्यत्त करतात.

अभंग--५३

कौल जाला रघुनाथाचा । मेळा मिळाला संतांचा अहंभाव वरपेकरी । बळे घातला बाहेरी क्षेत्रीं मंत्री विवेक जाला । क्रोध देशोधडी केला काम देहींच कोंडिला । लोभ दंभ नागविला फितवेकर होता भेद । त्याचा केला शिरच्छेद तिरस्कार दावेदार । त्यास बोधे केला मार मन चोरटे धरिलें । नित्यनेमे जंजरिले आळस साक्षेपें घेतला । पायीं धरुनि आपटिला द्वेष बांधोनि पाडिला । खेद खाणोनि ताडिला गर्व ताठा विटंबिला । वाद विवेके झोडिला करुनि अभावाचा नाश । राहे रामीं रामदास

भावार्थ--

रघुनाथाचा कौल मिळतांच संतांचा मेळा जमला संतांनी अहंभावाला, मीपणाला जबरदस्तीने बाहेर घालविला.  देहरूपी क्षेत्राचा विवेक हा मंत्री झाला.  क्रोधाला हद्दपार केला.  कामवासनेला देहाच्या तुरुंगात कोंडला लोभ आणि दांभिकता यांचे पूर्ण उच्चाटन केले. फितुरी करणार्‍या भेदाचा शिरच्छेद केला.  तिरस्कार हा दावेदार सारखा होता त्याच्यावर उपदेशाचा मारा केला.  त्या चोरट्या चंचल मनाला धरुन ठेवले. नित्यनेमाने आळसाला पायाला धरून आपटला व त्याचा समाचार घेतला. मत्सराला बांधून कैद केले. .  खेदाचे मूळ खणून काढले.  गर्वाची विटंबना केली.  विवेकाचने वाद झोडून काढला.  अशाप्रकारे सर्व अभावांचा नाश करून रामदास रामचरण स्थिर झाले.

अभंग--५४

असोनि ईंद्रियें सकळ । काय करावीं निष्फळ नाहीं कथा निरुपण । तेंचि बधिर श्रवण नाहीं देवाचें वर्णन । तें गे तेंचि मुकेपण नाहीं पाहिलें देवासी । अंध म्हणावें तयासी नाहीं उपकारा लाविले । तें गे तेचि हात लुले केले नाही तीर्थाटण । व्यर्थ गेले करचरण काया नाहीं झिजविली । प्रेतरुपचि उरली दास म्हणे भक्तिविण । अवघे देह कुलक्षण

भावार्थ--

या अभंगात संत रामदास नवविधा भक्तीचा महिमा वर्णन करून सांगत आहेत.  कथा निरूपण न करणारे, कान असूनही बहिरे.  ,देवाचे गुणवर्णन न करणारे, जीभ असूनही मुके, देवाचे रूप न पहाणारे, डोळे असूनही आंधळे . परोपकार न करणारे हात असूनही लुळे.  पाय असूनही तीर्थयात्रा न करणारे पांगळे आहेत असे सांगून संत रामदास शेवटी म्हणतात, अशा रीतीने देवाच्या भक्तीत काया झिजवली नाही तर ती केवळ प्रेतच होय.  सर्व इंद्रिये असूनही ती जर देवाची भक्ती करण्यात वापरली नाही तर तो देह कुलक्षणी, निष्फळ समजावा.

अभंग--५५

वाणी शुध्द करीं नामें । चित्त शुध्द करीं प्रेमें नित्य शुध्द होय नामीं । वसतांही कामीं धामीं कान शुध्द करी कीर्तन । प्राण शुध्द करी सुमन कर शुध्द राम पूजितां । पाद शुध्द देउळीं जातां त्वचा शुध्द करी रज । मस्तक नमितां पादांबुज रामापायीं राहतां बुध्दि रामदासा सकळ शुध्दि

भावार्थ--

नवविधा भक्तिचा महिमा सांगणार्‍या या अभंगात संत रामदास आपल्या सर्व इंद्रियांची शुद्धी कशामुळे होते याविषयी सांगत आहेत.  देवाच्या नावाचा जप केल्याने वाणी शुद्ध होते.  देवा वरचे प्रेम मन शुद्ध करत.  देवाचे किर्तन ऐकल्याने कान शुद्ध होतात.  तर भावपूर्ण मन प्राण शुद्ध करते.  रामाचे पूजन हात शुद्ध करतात.  देवळात देवदर्शनास गेल्याने पाय शुद्ध होतात.  त्वचा धुळीचे कण शुद्ध करतात.  आणि देवाला नमन करताना मस्तक शुद्ध होते.  श्रीरामाच्या चरणकमलांना चरण स्पर्श केला असता बुद्धी शुद्ध होते.  अशा रीतीने संपूर्ण देहाची शुद्धी होते.  असे संत रामदास म्हणतात.

अभंग--५६

काम क्रोध मद मत्सर । जरी हे जाले अनावर यास करावें साधन । सदा श्रवण मनन बोलाऐसें चालवेना । जीव भ्रांति हालवेना दृढ लौकिक सांडेना । ज्ञानविवेक मांडेना पोटीं विकल्प सुटेना । नष्ट संदेह तुटेना दास म्हणे निर्बुजले । मन संसारीं बुडालें

भावार्थ--

या अभंगात संत रामदास राम कथेचे श्रवण व मननाचे काय फायदे होतात हे सांगत आहेत.  जेव्हा वासना राग द्वेष हे मनाचे शत्रू अनावर होतात, जेव्हा आपल्याला बोलण्या प्रमाणे वागता येत नाही, लौकिकाचा हव्यास सुटत नाही, विवेक सुचत नाही, मनामध्ये निर्माण झालेल्या विपरीत कल्पनां पासून सुटका होत नाही, बुद्धी नष्ट करणारा संशय नाहीसा होत नाही, गोंधळलेले मन संसार सागरात बुडून जाते.  संत रामदास म्हणतात या परिस्थितीतून सुटण्याचे एकच साधन आहे.  राम कथा श्रवण करणे आणि श्री रामाच्या विवेक व कृती यावर मनन करणे हे होय.

अभंग--५७

रामनामकथा श्रवणीं पडतां । होय सार्थकता श्रवणाची मुखें नाम घेतां रुप आठवलें । प्रेम दुणावलें पहावया राम माझे मनीं शोभे सिंहासनीं । एकाएकीं ध्यानीं सांपडला रामदास म्हणे विश्रांति मागेन । जीवींचें सांगेन राघवासी

भावार्थ--

राम कथा कानावर पडताच श्रवण केल्याचे सार्थक होते.  रामनामाचा जप सुरू होताच रामाचे रूप आठवते आणि ते पहाण्यासाठी मन आतुर होते.  सिंहासनावर विराजमान झालेला राम मनात आहे तोच एकाएकी ध्यानात सापडतो.  संत रामदास म्हणतात या राघवाला मनातील गोष्टी सांगाव्यात त्याच्याकडे मनासाठी पूर्ण विश्रांती मागावी असे वाटते.

अभंग--५८

निरुपणाऐसें नाहीं समाधान । आणिक साधन आढळेना भक्ति ज्ञान घडे वैराग्य आतुडे । भावार्थ सांपडे निरुपणें शांति क्षमा दया नैराश्यता मनीं । अवस्था उन्मनी निरुपणें भ्रांतीचा संदेह तुटे एकसरा । दास म्हणे करा निरुपण

भावार्थ--

संत रामदास या अभंगात म्हणतात की, राम कथा निरूपणा सारखे समाधान कशातच नाही.  यासारखे दुसरे साधन नाही.  राम कथा निरुपणातून भक्ती व ज्ञान या दोन्ही गोष्टींचा लाभ होतो आणि वैराग्य आवडू लागते.  कथा निरुपणातून भावार्थ समजतो.  दया क्षमा शांती या सद्गुणांचा लाभ होतो.  मनाचे नैराश्य नाहीसे होऊन निरूपणा मुळे मनाचे उन्मन होते.  संदेह मुळापासून नाहीसा होतो.  संत रामदास परत परत निरूपण करण्यास सांगत आहेत.

अभंग--५९

एकदां जेवितां नव्हे समाधान । प्रतिदिनीं अन्न खाणें लागें तैसें निरुपण केलेंचि करावें । परी न धरावें उदासीन प्रत्यहीं हा देहो पाहावा लागतो । शुध्द करावा तो रात्रंदिस प्रत्यहीं देहानें भोगलें भोगावें । त्यागिलें त्यागावें दास म्हणे

भावार्थ--

एकदाच जेवण घेतल्याने कायमचे समाधान मिळत नाही.  रोजच अन्न खावे लागते.  त्याप्रमाणे एकदा केलेले निरूपण परत परत करावे त्या बाबतीत उदासीन राहू नये.  आपल्याला आपला देह परत परत स्वच्छ करावा लागतो.  भोगलेले परत परत भोगावे लागते.  ज्यांचा त्याग केला त्याचा परत परत त्याग करावा लागतो.  रात्रंदिवस असे केल्याने देह व मन शुद्ध होते असे संत रामदास सांगतात.

अभंग--६०

कथानिरुपणें समाधि लागली । वासना त्यागिली अंतरीची नाहींआपपर कीर्तनीं तत्पर । मनीं सारासार विचारणा अर्थारुढ मन श्रवण मनन । होय समाधान निजध्यास रामीरामदासीं कथेची आवडी । लागलीसे गोडी नीच नवी

भावार्थ-- ज्याच्या मनामध्ये आपला व परका असा दुजाभाव नाही, मनात नेहमीच सार व असार काय याचा विचार करत असतो, नेहमी श्रवण व मनन करतांना अर्थाचा मागोवा घेत असतो, देवाच्या कीर्तनात अतिशय तत्पर असतो, कीर्तन रंगी रंगून जाणे हा ज्याचा निजध्यास आहे व त्यात त्याला समाधान मिळते.  संत रामदास म्हणतात अशा भक्तांना रामकथेची अविट गोडी निर्माण होते व ही गोडी नेहमी वाढतच जाते.

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP