श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय ११

श्रीकल्हळिवेंकटेश


॥ श्रीगणेशाय नम: ॥
॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥
॥ श्री दत्तात्रेयाय नम: ॥

जयजय सच्चिदानंदा ॥ चित्प्रकाशा आनंदकंदा ॥ अविदयानाशना मुकुंदा ॥ गोवर्धनोध्दारणा गोविंदा ॥१॥
कमलापते कमललोचना ॥ कर्माध्यक्षा शुध्दचैतन्या ॥ कर्मातीता निरंजना ॥ दानवदमना दयानिधे ॥२॥
जयजय पुरुषोत्तमा ॥ सर्वसाक्षी सर्वोत्तमा ॥ सर्वाध्यक्षा पूर्णकामा ॥ नामा अनामा तुज नमो ॥३॥
उध्दरावया स्वभक्तांलागोन ॥ तेविं लोकानुग्रहाकारण ॥ उपदेशिते झाले नारायण ॥ त्यांतील अणुप्रमाण परिसावे ॥४॥
जे मज भजती अनन्यभावेंकरोन ॥ ज्या नावडे मजवांचोन अन्य ॥ ते भक्त माझ्या प्राणाचे प्राण ॥ करितों अनन्यभावेंकरोन ॥ ज्या नावडे मजवांचोन अन्य ॥ ते भक्त माझ्या प्राणाचे प्राण ॥ करितों सर्वोपरी रक्षण तयांचें ॥५॥
भक्तांची केवळ मी माउली ॥ योगक्षेमाची हमीच घेतली ॥ पाठी राहोनि सदां सांभाळीं ॥ काय रक्षी प्रसवली ती मजपुढें ॥६॥
भक्तीवांचोनियां अन्य ॥ सर्वस्व केलें मदर्पण ॥ तरी हें सकळ व्यर्थची जाण ॥ त्यांकडे ढुंकोन न पाहें मीं ॥७॥
पत्र पुष्प फल जीवन ॥ भक्तीनं अर्पितां अणुप्रमाण ॥ पर्वतप्राय तया मानोन ॥ आवडीनें ग्रहण करितों मी ॥८॥
गलित तुळशीपात्र निरस ॥ जे भक्तीनें अर्पिती आपणास ॥ अत्यानंदें भक्षितों तयास ॥ तुच्छ सुधारस तयापुढें ॥९॥
अतिक्षुधित न पाहे रुची ॥ कांजीही वाटे तया अमृतची ॥ तेविं मज क्षुधा भक्तिप्रेमाची ॥ सर्वदां साची असतसे ॥१०॥
ऐशिया माझ्या सुभक्तां ॥ देतसें मी तो न मागतां ॥ जाणोनि तयांच्या मनोरथा ॥ न प्रार्थितां मोक्षही ॥११॥
जे माझ्या नामाचें कीर्तन ॥ करती नुसतें नामोच्चारण ॥ ते आवडती मज आत्म्याहून ॥ तयांचें सन्निधान मी सोडीना ॥१२॥
वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण ॥ तेविं चांडाळादिक अन्य ॥ स्त्रियापुरुष आदिकरोन ॥ सकलही समान मजलागीं ॥१३॥
कोणींही भक्तिभावें शरण ॥ मज आलिया प्रमोदें करोन ॥ ते माझ्या जीवाचें जीवन ॥ मानितों मी जाण निर्धारें ॥१४॥
ऐसें भक्तिनाम महिमान ॥ गीतेंत नवमाध्यायीं जाण ॥ उपदेशिती अर्जुनालागोन ॥ साक्षात् भगवान श्रीहरी ॥१५॥
भक्तीमुळें भक्तांचा चाकर ॥ भक्तीमुळेंच भक्ताधीन होय मंदरधर ॥ भक्तीमुळें श्रमही सोसितो अनिवार ॥ हें नवमाध्यायीं अल्पतर वर्णिलें ॥१६॥
तैशीच नाममहिमा जाण ॥ द्वितीयाध्यायीं किंचित कथन ॥ केला करावया संपूर्ण ॥ जगतित्रयीं कोण समर्थहो ॥१७॥
लक्षचवर्‍याऐशीं फेरे फिरोनि ॥ नानाविध योनींत कष्टोनी ॥ या दुर्लभ नरदेहा येतसे प्राणी ॥ कांहीं पूर्व सुकृतें करोनि जाणपां ॥१८॥
यापरीची दुर्मिळ तनू मिळोनि देख ॥ झाल्या व्यंकटपतीतें विन्मुख ॥ पुनश्च फेरे फिरतां अनेक ॥ तया अंतीं नरक निश्चयें ॥१९॥
या अनित्य शरीराचा ॥ भरंवसा नसेच काडीचा ॥ जैसा जलावरील बुद्‍बुदाचा ॥ तैसाच याचा असेना ॥२०॥
केव्हां जाईल पटकन् फुटोन ॥ नकळे कवणालाही जाण ॥ तेविं हा देह जाईल निष्कारण ॥ यास्तव उदईक म्हणोन न म्हणावें ॥२१॥
दैवें हातीं आला परीस ॥ दुजा हातीं आहे आयस ॥ सुवर्ण करावया करी आळस ॥ तो अभागी पुरुष या लोकीं ॥२२॥
यास्तव राहोनियां संसृतीं ॥ नको वाटेल ज्या पुनरावृत्ती ॥ तिहीं पूजावा व्यंकटपती ॥ अनन्य भक्तिभावानें ॥२३॥
षोडशोपचार पूजेचें विधान ॥ पंचमाध्यायीं केलेंसे कथन ॥ तेविं शुध्दांत:करणें करोन ॥ श्रीलक्ष्मीनारायण पूजावा ॥२४॥
कराया षोडशोपचार पूजन ॥ नित्य पूजाद्रव्य आणावें कोठोन ॥ ऐसें शंकित झालिया मन ॥ पंचोपचार पूजन तरी करावें ॥२५॥
तेंही वाटल्या तुह्मां कठिण ॥ मानसपूजा करा प्रेमें करोन ॥ जेथें केवळ कल्पनेची खाण ॥ कशाचीही वाण तेथें पडेना २६॥
यासी नलगे वेळही फार ॥ मिळावया नकोत सोपस्कार ॥ पूजितां मन करोनी स्थिर ॥ श्रीकमलावर पुढें उभा ॥२७॥
प्रथम करोनि व्यंकटेशावाहन ॥ दयावें रत्नजडितासन ॥ पादयअर्ध्य समर्पोन ॥ आचमन श्रीस अर्पावें ॥२८॥
केशरकस्तूरीमिश्रित जीवन ॥ तेणें घालावें प्रभूस स्नान ॥ पीतांबरादि वस्त्रें वोपोन ॥ रत्नमय भूषणें समर्पावीं ॥२९॥
सुवर्णाचें यज्ञोपवीत ॥ अर्पावें प्रभुरायांप्रीत्यर्थ ॥ मैलागिरिचंदनें रमाकांत ॥ प्रेमें अलंकृत करावा ॥३०॥
जाई जुई बकुल शेवती ॥ पुन्नाग चंपक मालती ॥ ऐशीं परिमळ पुष्पें अनेक जाती ॥ श्रीव्यंकटेशाप्रति ओपावीं ॥३१॥
एकची तुळसीदलाला ॥ इंदिरापति असे भुकेला ॥ तयाची आपाद गंफोनि माला ॥ घननीळा गळां घालावी ॥३२॥
सुगंधिक सर्व पदार्थ ॥ मिश्र करोनियां यथार्थ ॥ तो सुधूप देवा त्वदर्थ ॥ अर्पितों दिनानाथ वदावें ॥३३॥
कनकमय नीलांजनी ॥ परिमळ तैलें दीप लावोनी ॥ तो ओवाळावा मोक्षदानी ॥ श्रीगिरीशचरणीं प्रेमानें ॥३४॥
हाटकमयी सुंदरपाट ॥ त्यावरी रत्नजडित ताट ॥ शाकादि पक्वान्नें चोखट ॥ क्रमें करोनि नीट सूदलीं ॥३५॥
घृत दुग्ध पेय पायसादिकें जाण ॥ जडित वाटया ठेविल्या भरोन ॥ मिष्ट सुगंधित शीतल जीवन ॥ त्वदर्थ जगज्जीवन ठेविलें ॥३६॥
अंजीर द्राक्षें अननस ॥ चकोत्रें नारिंगादि सुरस ॥ आम्रफळें बापा जगन्निवास ॥ श्रीप्रीत्यर्थ बहुवस अर्पिलीं म्यां ॥३७॥
यापरीचा नैवेदय शोभन ॥ देवा तुज केलासे अर्पण ॥ तो दयासागरा कृपेंकरोन ॥ करावा ग्रहण स्वामिया ॥३८॥
येलची केशरादि समस्त ॥ त्रयोदश द्रव्यें करोनि युक्त ॥ तांबूल प्रभो अच्युतानंत ॥ समर्पिला तुजप्रत भक्षावा ॥३९॥
नारिकेल मोहोर दक्षिणा ॥ नमस्कार लक्ष प्रदक्षिणा ॥ तेविं मंत्रपुष्प कमललोचना ॥ देवा जनार्दना अर्पिलें म्यां ॥४०॥
गीत नृत्य वादय आंदोलन ॥ छत्रचामरें आदर्श व्यजन ॥ समस्त राजोपचार मधुसूदन ॥ भवभयहरण तुज अर्पिले ॥४१॥
केवळ कल्पोन पदार्थ नसतां ॥ केलें मानसिक पूजन तत्वतां ॥ आवडीनें बापा कमलाकांता ॥ ग्रहण करींगा समर्था व्यंकटपति ॥४२॥
ऐसें शुध्द मनोभावें ॥ श्रीहरीतें आळवावें ॥ तेविं तदांगणीं नाचावें ॥ तेणें सत्यत्वें न पावे पुनरावृत्ती ॥४३॥
हेंही सोपें विधान ॥ अवघड वाटल्या तुम्हां जाण ॥ तरि नुस्तें करावें नामस्मरण ॥ रात्रंदिन बापहो ॥४४॥
अती सुलभ नव्हे कठीण ॥ ऐसा हा नाममार्ग प्रेमेंकरोन ॥ वदते झाले भगवान ॥ तें ध्यानीं पूर्ण आणोनियां ॥४५॥
केशवा नारायणा गोविंदा ॥ माधवा हरि सच्चिदानंदा ॥ रामा कृष्णा मुकुंदा ॥ यापरि नामें सर्वदा उच्चारा ॥४६॥
अनंताचीं नामें अनंत ॥ तयाचा नसे कांहीं अंत ॥ मुखीं येतील तीं प्रेमयुक्त ॥ सदोदित जपावीं ॥४७॥
नको काळ वेळ खर्च जाण ॥ फुका मुखें वदा नारायण ॥ वदतां श्रीकृष्ण भगवान ॥ आनंदित पूर्ण होताती ॥४८॥
नको मंत्रतंत्र विलेपन ॥ नको मुद्राध्यानावाहन ॥ नको वेद कथा पुराणश्रवण ॥ एका नामांत जाण सर्व हीं ॥४९॥
प्राप्त व्हाया पुरुषोत्तम ॥ योगयागादी पंथ उत्तम ॥ असती परी सुगमांत सुगम ॥ श्रीहरिनाम सत्यत्वें ॥५०॥
महा विस्तीर्ण वैकुंठपेठ ॥ जियेची असे सुगम वाट ॥ जातां भक्तिकेणें भरोनि नीट ॥ नामावरीच दीन खटपटती ॥५१॥
रामकृष्ण हरि हरि ॥ सदा उच्चारी वैखरी ॥ तया शंकरमानसविहारी ॥ जीव कीं प्राण हरि मानतसे ॥५२॥
भक्तकामना परिपूर्ण ॥ तेविं सर्वोपरि संरक्षण ॥ कराया एका पायीं जाण ॥ उभा व्यंकटरमण सर्वदा ॥५३॥
यापरीचें दैवत ॥ अन्यत्र मिळेचिना सत्य सत्य ॥ यास्तव भाविकहो समस्त ॥ भजा दिनरात व्यंकटपति ॥५४॥
ही वेडीवांकुडी बोली ॥ वाटेल परिजगाची माउली ॥ व्यंकटरायें बोलविली ॥ तियेतें कोण न भली म्हणेल ॥५५॥
असो श्रीव्यंकटेशचरित ॥ झालें एकादशाध्यायापर्यंत ॥ प्रति अध्यायांतील सार यथार्थ ॥ कथितसें त्वदर्थ सुभक्तहो ॥५६॥
प्रथमाध्यायीं मंगलाचरण ॥ निजभक्त नागणैयाप्रति दर्शन ॥ देईन कल्हळीशिखरीं म्हणोन ॥ स्वप्नीं वदले भगवान दुसर्‍यांत ॥५७॥
दुजा भक्त त्रिमलाचारी ॥ यासह प्रत्यक्ष दर्शन गिरिवरी ॥ देते झाले भक्तकैवारी ॥ गोवर्धनधारी तिसर्‍यांत ॥५८॥
स्वभक्तवचनसिदयर्थ ॥ धनरस केला पुत्रवंत ॥ कोन्हेरीकरवीं पुष्करणी तीर्थ ॥ करविलें यथार्थ चतुर्थीं ॥५९॥
प्रात:काळ आणि सायान्ह ॥ श्रीहरीचें पूजाविधान ॥ तेविं नवरात्रौत्सवपध्दति जाण ॥ पांचव्यांत पूर्ण कथियेली ॥६०॥
आलबाळच्या पाटलाला ॥ बंदिखान्यांतूनी मुक्त केला ॥ वाचा दिली जन्ममूकाला ॥ हा प्रकार वर्णिला सहाव्यांत ॥६१॥
नरसो तुकदेव नामें गृहस्थ ॥ परशुरामभाऊ व त्यांचा सुत ॥ तेविं गणेश कृष्ण यांचें वृत्त ॥ कथिलें सातव्यांत जाणपां ॥६२॥
एका बाईचें शरीर समस्त ॥ श्वेत कुष्टें व्यापिलें अत्यंत ॥ ती ईशकृपें झाली मुक्त ॥ हेंही या अध्यायांत वर्णिलें ॥६३॥
वांझेसी दिले पुत्ररत्न ॥ नवज्वरित उध्दरिला औषध देवोन ॥ भक्तातें स्वप्नीं सांगोन ॥ नवस फेडोनि घेतला ॥६४॥
त्यजित स्त्री घेवविली घरांत ॥ ब्राह्मणवेशें वैकुंठनाथ ॥ प्रत्यक्ष वदले नैवेदयरीत ॥ हें सर्व आठव्यांत निवेदिलें ॥६५॥
आपला भक्तवर परम ॥ व्यंकणभट ज्याचें नाम ॥ तया आज्ञा देती पुरुषोत्तम ॥ चतुर्थाश्रम घ्यावया ॥६६॥
प्रभूशीं घालतां मंगल स्नान ॥ अत्युष्णजलें भाजलें करण ॥ तें दृष्टांतीं ओखद सांगोन ॥ बरें भक्ताकडोन करविलें ॥६७॥
तासगांवचा एक ब्राह्मण ॥ विसरलासे नवस करोन ॥ तयातें दृष्टांत देवोन ॥ करविला नवस पूर्ण प्रभूंनीं ॥६८॥
या सर्वाचें विवरण ॥ नवमाध्यायीं असे जाण ॥ लक्ष्मीनारायणस्वरुपवर्णन ॥ दशमाध्यायीं कथन पैं केलें ॥६९॥
उपसंहारात्मक ॥ अकरावा अध्याय सुरेख ॥ लिहविला वैकुंठनायकें देख ॥ जो जगत्पालक परमात्मा ॥७०॥
चरित्रलेखक केवळ बाहुली ॥ त्वक् मांसादिकें घडली ॥ प्रभुसूत्रधारें नाचविली ॥ तैशीच नाचली बापुडी ती ॥७१॥
तोच चरित्र चरित्रकार ॥ तोचि भाषा लिहविणार ॥ तोचि स्वयें लिहणार ॥ सर्वेश्वर तोचि एक ॥७२॥
या चरिताचें श्रवणपठण ॥ शुध्दांत:करणेंकरोन ॥ करिती तेविं निदिध्यासन ॥ जे देती अनुमोदन ययातें ॥७३॥
जे करिती ग्रंथलेखन ॥ तैसेंच त्याचें संरक्षण ॥ प्रेमभावेंकरोनी जाण ॥ श्रीव्यंकटेशचरण लक्षोनी ॥७४॥
जे होवोनियां सुस्नात ॥ प्रमोदें पूजिती हें चरित ॥ कीं प्रदक्षिणा घालिती भावयुक्त ॥ कमलानाथ मानोनियां ॥७५॥
तयां सर्वांसमान ॥ फल देती देवकीनंदन ॥ शेषशाई भगवान ॥ श्रीनारायण गोविंद ॥७६॥
श्रवणपठणें ज्ञानप्राप्ती ॥ धनधान्यादि संपत्ती ॥ इच्छित कामना परिपूर्ण होती ॥ अंतीं मुक्ती रोकडी ॥७७॥
निपुत्रिकां होय पुत्रफळ ॥ दुरावले पतिसुत भेटतील ॥ जन्ममूक उत्तम बोलतील ॥ श्रीघननीळप्रसादें ॥७८॥
कर्जबाजारी कर्जमुक्त ॥ होती शत्रू पराजित ॥ गृहीं ठेवितां हें चरित ॥ भूतपिशाच्चादि तेथ न राहती ॥७९॥
ब्राह्मणां प्राप्त होय विदयाधन ॥ क्षत्रियां शूरत्व पूर्ण ॥ वैश्यशूद्रादिकां बहु धन ॥ सौभाग्यवर्धन स्त्रियांतें ॥८०॥
कैदी बंदींतुनी सुटती ॥ रोगी रोगविमुक्त होती ॥ ऐशी श्रीची सुकीर्ती ॥ वर्णावी किती पामरें ॥८१॥
या चरिताचें पारायण ॥ अनन्यभावेंकरोन ॥ करितां महिने तीन ॥ होती कामना सुपूर्ण निश्चयें ॥८२॥
ऐसें वदती कमलापति ॥ पहावी मुमुक्षूंनीं प्रतीती ॥ पुरवाया भक्तांची कांती ॥ सदा व्यंकटपति तत्पर ॥८३॥
ज्या पाहिजे असेल स्वहित ॥ त्यांहीं भावें भजावा भार्गवीकांत ॥ काय बोलोनियां बहुत ॥ एक वेळ तरी प्रचीत पहावी ॥८४॥
भक्तां पडल्या संकट गहन ॥ करोनियां सचैल स्नान ॥ भावें श्रीशरणचिंतन ॥ करीत शयन करावें ॥८५॥
स्वप्नीं येवोनी प्रभुवर ॥ सांगती संकटपरिहार ॥ कैक उध्दरिले आजवर ॥ निजभक्तवर निर्धारें ॥८६॥
आतां बोलणें संपले ॥ पदरींचें नाहीं कथिलें ॥ प्रभूंनीं जैसें वदविलें ॥ तैसेंच वदलों तुम्हांशीं ॥८७॥
अभक्तवायस अमंगळ ॥ दुराचारी दुष्ट चांडाळ ॥ दुर्जन दुरात्मे खळ ॥ सांगोनी निष्फल तयांतें ॥८८॥
परशुरामभाऊचे पदरीं देख ॥ होते येसाजी रघुनाथ नामक ॥ कौशिकगोत्री उपनाम फाटक ॥ चाकरी मन:पूर्वक करोनी ॥८९॥
भास्करपंत तयांचे सुत ॥ तत्पुत्र दामोदरपंत ॥ ज्यांहीं मिळविली करोनी ॥८९॥
भास्करपंत तयांचे सुत ॥ तत्पुत्र दामोदरपंत ॥ ज्यांहीं मिळविली सुकीर्त ॥ जमखंडिपति सेवेंत जाण पां ॥९०॥
मजहसचार पिढयांवरी ॥ करीत आलों श्रीमंतांची चाकरी ॥ लहानमोठीं कामें परोपरी ॥ केलीं मन:पुर:सरी विश्वासें ॥९१॥
पांचव्या पिढीचा श्रीपती ॥ भाऊंची पंचम संतती जंबुपति ॥ हल्लीचें भाऊसाहेब गुणज्ञ नृपति ॥ त्यांची सेवा यथामति करिताहे ॥९२॥
असो तो दामोदर माझा पिता ॥ सगुणा सुसती माझी माता ॥ उभयतांचे चरणीं माथा ॥ ठेवोनिया सुचरिता संपविलें ॥९३॥
शके सत्राशें सदतीस ॥ संवत्सर नाम राक्षस ॥ शुध्दपक्ष श्रावणमास ॥ पूर्णिमा भौम दिवस तद्दिनीं ॥९४॥
सांप्रतचे प्रभु जंबुपति ॥ परशुरामभाऊ सुकृति ॥ गुणी गुणज्ञ सद्गुणमूर्ति ॥ न्याय नीती जाणती जे ॥९५॥
तयांचे शीतल छायेंत ॥ राहोनियां जमखंडींत ॥ हें चरित्र सादयंत ॥ जाहलें पूरित ईशकृपें ॥९६॥
हें चरित कामधेनु जाण ॥ श्रवणपठणरुपी दोहन ॥ करितां अनुग्रहदुग्ध देवोन ॥ करी कामना पूर्ण भक्तांची ॥९७॥
कीं या चरित्रामृता ॥ भक्तिभावेंकरोनि तत्वतां ॥ श्रवणपठण-पात्रें प्राशितां ॥ मुक्ति अमरता सहजचीं ॥९८॥
किंवा हें रसायन सुंदर ॥ रामबाण भवरोगावर ॥ श्रवण-पठण-अनुपानीं घेतां सत्वर ॥ करी रोगपरिहार निश्चयें ॥९९॥
अथवा हें कल्पवृक्ष निश्चित ॥ श्रवणरुपी तच्छायेंत ॥ बसतां शुध्द करोनि चित्त ॥ सर्वेच्छा सिध्दीप्रत पावती ॥१००॥
रमारमण श्रीपती ॥ उमारमण पशुपति ॥ कंसाराति व्यंकतपति ॥ पुराराति श्रीशंकर ॥१०१॥
गरुडध्वज कमललोचन । वृषभध्वज त्रिनयन ॥ मुरमर्दन अंधकमर्दन ॥ पतितपावन उभयतां ॥१०२॥
विष्णु कृष्ण हृषीकेश ॥ शंभु गिरीश व्योमकेश ॥ केशव माधव पुंडरीकाक्ष ॥ भर्ग भीम विरुपाक्ष सर्वज्ञ ॥१०३॥
हे एकरुपी सुरेश्वर ॥ भक्तवत्सल दयासागर ॥ स्वभक्तत्रितापसंहारकर ॥ समर्थ श्रीहरिहर त्रिलोकीं ॥१०४॥
तत्पदपद्माचें चिंतन ॥ करोनि साष्टांगें वंदन ॥ हें चरित बिल्व-तुळसिपर्ण ॥ प्रेमें चरणीं अर्पण करी हरी ॥१०५॥
आजवरी करोनियां करुणा ॥ पुरविल्या पुरवितसां मम कामना ॥ आतां माग ह्मणतां यास्तव चरणा ॥ करितों प्रार्थना श्रवण कीजे ॥१०६॥
नको मज एकही मुक्ती ॥ मना नये व्हावें चक्रवर्ती ॥ नलगे देवतापद निश्चितीं ॥ हें कांहीं मजप्रति आवडेना ॥१०७॥
बहुवार येवो जननमरण ॥ सुखें भोगीन तें तुमची आण ॥ परि मुखीं राहो तव नामोच्चारण ॥ कदांहि विस्मरण न व्हावें ॥१०८॥
इतुकेंच दयावें जी कृपा करोन ॥ या दीनदासा लागोन ॥ मागेना याहुनी अन्य ॥ येणेंच होईन धन्य जगतीं या ॥१०९॥
इति श्रीकल्हळीगिरिवास व्यंकटपतिचरितकथनं नाम एकादशोऽध्याय: ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ओवीसंख्या ॥१७८८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP