रसवहस्त्रोतस् - लक्षणें व कारणें

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


रसवहानां स्त्रोतसां हृदयं मूलं दशच धमन्य: ।
च.वि. ५-१२

हृदय हें रसवहस्त्रोतसाचें मूल असून हृदयांतून निघणार्‍या व सर्व शरीरभर पसरलेल्या रसवाहिनीचे जें मूलभूत असें (हृदयाशीं संबद्ध) शाखाविस्तार त्या सर्वांचे मिळून रसवहस्त्रोतस् बनतें. (या ठिकाणीं वापरलेला धमनी हा शब्द रसवाहिनींचाच बोधक आहे. परिभाषानिश्चितिप्रमाणें धमनी हा शब्द आतां शब्दादि संज्ञावाहांच्या बाबतींत वापरणें बरें !)

त्वक्सारता

तत्र स्निग्ध श्लक्ष्णमृदुप्रसन्नसूक्ष्माल्पगंभीरसुकुमार लोमा
सप्रभेव च त्वक् त्वक्साराणां सा सारता सुख-
सौभाग्येश्वर्योपभोगबुद्धिविद्याऽऽरोग्यप्रहर्षणान्यायुश्चानित्वर-
माचष्टे ।
च.चि. ८-१०५

त्वक्सारता ही रससारतेची प्रतिनिधे मानलेली आहे असें दिसतें. रक्तापासून इतर सर्व धातूंच्या सारतेचा उल्लेख आहे पण, रस सारतेचा नाहीं त्यामुळें कांहीं ठिकाणीं तरी त्वक् संबंधीचें वर्णन रसधातूचें उपलक्षण मानावें लागतें. ज्याची त्वचा स्निग्ध, गुळगुळींत, मऊ, निर्मळ, पातळ, अल्प लव असलेली अशी असतें. तसेंच त्वचा सतेज, कांतीयुक्त दिसते. त्या व्यक्तीस त्वक्सार असें म्हणावें. अशी व्यक्ती सुखी, भाग्यवान्, ऐश्वर्य शाली, विविध उपभोगाची आवड असलेली, बुद्धिमान, विद्यासंपन्न, निरोगी, उद्योगी, आनंदी, दीर्घायुषी अशी असते.

रसवहस्त्रोतोदुष्टीचीं कारणें

गुरुशीतमतिस्निग्धमतिमात्रं समश्नताम् ।
रसवाहीनि दुष्यन्ति चिन्त्यानां चातिचिन्तनात् ॥
च.वि. ५-२१ पान

गुरु, शीत, स्निग्ध अशीं द्रव्यें अधिक प्रमाणांत खाल्ली असतां रसवह स्त्रोतस दुष्ट होतें. फार चिंता करणें, मनावर कसलें ना कसलें तरी दडपण असणें यामुळेंहि रसवहस्त्रोतसाची दुष्टी होते.

रसवृद्धीचीं लक्षणें

रसोतिवृद्धो हृदयोत्क्लेदं प्रसेकं चापादयति ।
सु.सू. १५-१४

रसोपि श्लेष्मवत् ।
वा.सू. ११-८

रसाच्या वृद्धीमुळें मळमळणें (हृदयोत्क्लेद, हृल्लास) प्रसेक, तोंडास पाणी सुटणें हीं लक्षणें होतात. वाग्भटाच्या सूत्राप्रमाणें कफवृद्धीची म्हणून जीं लक्षणें सांगितलीं आहेत तीहि रसाच्या वृद्धीमुळें होतात. त्यावरुन अग्निमांद्य, प्रसेक, आलस्य, गौरव, गात्रशुक्लता, शैत्य, अंग शिथिल होणें, श्वास, कास व फार झोंप येणें हीं लक्षणेंहि रसवृद्धीचींच आहेत.

रसक्षयाची लक्षणें
बोलवत नाहीं, मोठयानें बोललेलें ऐकवत नाहीं, छातीमध्यें दुखतें, धडधडतें, थोडयाशा श्रमानेंहि हृदयामध्यें कासावीस होऊन अंधारी येते, अंग कांपतें, शरीर शुष्क व रुक्ष होतें, तहान लागतें, थकवा येतो, अंग गळून जातें व हृदयामध्यें शून्यता वाटते. (च.सू.१७-६४ सु.सू. १५-९ वा. सू. ११-१७)

रसक्षयेतिशोषश्च मंदान्नित्वं च वेपथु: ।
शिरोरुग् मंदचेष्टत्वं जायते च क्लमभ्रमौ ॥
हारित तृतीय ९ पान २६७

रसक्षयामध्यें अत्यंत शुष्कता येणें, अग्निमांद्य, कंप, शिर:शूल, हालचाली मंदावणें, गळून गेल्यासारखें होणें, चक्कर येणें हीं लक्षणें होतात.

विद्ध लक्षणें

तत्र विद्धस्य शोष: प्राणवहविद्धवच्च मरणं तल्लिंगानिच ।
सु.शा. ९-१२ पान ३८६

रसवहस्त्रोतस् विद्ध झालें असतां शोष, आक्रोश करणें, वांकणें, मोह, भ्रम, त्क्लम, मरण अशीं लक्षणें होतात. (प्राणवहाप्रमाणें)

रसदुष्टीचीं लक्षणें

अश्रद्धा चाऽरुचिश्चास्यवैरमरसज्ञता ।
हृल्लासो गौरवं तन्द्रा साड्गमर्दो ज्वरस्तम: ॥
पाण्डुत्वं स्त्रोतसां रोध: क्लैव्यं साद: कृशाड्गता ।
नाशोऽग्नेरयथाकालं वलय: पलितानि च ॥
रसप्रदोषजा रोगा: ।
च.सू.२८-२३,२४ पान ३७८

तत्र, अन्नाश्रद्धारोचकाविपाकाड्गमर्दज्वरहृल्लासतृप्तिगौरव-
हृत्पाण्डुरोगमार्गोपरोधकार्श्यवैरस्याड्गसादाकालजयलीपलित-
दर्शनप्रभृतयो रसदोषजा विकारा: ।
सु.सू. २४-९ पान ११६

अन्न खाण्याची इच्छा नष्ट होणें, जिभेला चव नसणें, तोंडाला विकृत चव येणें, पदार्थांची चव न समजणें, मळमळणें, जडपणा वाटणें, झापड येणें, अंग कचकचणें, ताप येणें, अंधारी येणें, स्त्रोतोरोध होणें, मैथुनसामर्थ्य नष्ट होणें, अंग गळून जाणें, शरीर कृश होणें, अग्नीला मंदता येणें, अंगावर सुरकुत्या दिसणें, केस पांढरें होणें, पांडुरोग, हृद्रोग, तृप्ती (पोट भरल्यासारखें वाटणें) असें विकार रसदुष्टीमुळें उत्पन्न होतात. चरकानें रसवहस्त्रोतसाच्या दुष्टीचीं लक्षणें म्हणून या रसदुष्टीच्या विकारांचाच उल्लेख केला आहे. चक्रदत्तानें आपल्या टीकेंत या विधानाचें समर्थन केलें आहे.

यद्यपि विविधाशितपीतीये रसादीनां दुष्टिलक्षणमुक्तं न
रसादिस्त्रोतसाम्, तथापि रसादिदुष्टया रसादिवहधमनी-
नामपि दुष्टे: साधारणत्वेनोक्तं ``रसादिवहस्त्रोतसां विज्ञा-
नान्युक्तानि'' इति ।
ये तु ब्रुवते - रसादिदुष्टेरभिन्नैव तद्वहधमनीदुष्टिरिति ।
तेषां मते, पृथग्धमनीदुष्टयाभिधानमनुपपन्नम् ।
तथा धमनीदुष्टया यद धातुदुष्टिं वक्ष्यति -
तेषां प्राकोपास्त्थानस्थाश्चैव'' इत्यादिना तदनुपपन्नम् ।
धमनीदुष्टया तु तद्वाह्यदुष्टिरवश्यं भवतीति कृत्वा धातुदुष्टि
लक्षणैरेव इह धमनीदुष्टिरुक्ता, रक्तादिधातुदुष्टयतिरिक्तं तु
धमनीदुष्टिलक्षणं `अतिप्रवृत्ति:' इत्यादिनाऽत्रैव वक्ष्यति ॥
टीका च. वि. ५-१५ पान ५२६-५२७

वाहिन्यांची दुष्टी व त्यांतून वाहिल्या जाणार्‍या द्रव्यांची दुष्टी ही परस्परावलंबी असते. दोष हेच स्त्रोते दुष्टीला कारणीभूत असतात. सुश्रुत `दोषदूषितेषु अत्यंर्थ धातुषु संज्ञा रसजो यं । (सु.सू. २४.८) असें स्पष्टपणें सांगतो. चरकानेंहि असेंच सांगितलें आहे.

तत्र रसादिषुस्थानेषु प्रकुपितानां दोषाणां यस्मिन् यस्मिन्
स्थाने ये ये व्याधय: संभवन्ति तांस्तान् यथावदनुव्याख्यास्याम:।
तत्र रसेत्यादौ कुपितानां दोषाणामित्यनियमेन रसे कुपितो
वायुर्वा पित्तं वा श्लेष्मा वा, संसृष्टा वा अश्रद्धादीनि कुर्वन्ति ।
सत्यपि दोषभेदे अत्राश्रयस्याभेदात्, आश्रयप्रभावेणैवाऽश्रद्धादयो
भवन्ति, परं, दोषभेदे अश्रद्धादावेव वातादिलिड्गं विशिष्टं भवति ।
किंवा यथायोग्यतया रसाश्रयिणा वातादिनाऽश्रद्धादिकारणं बोद्धव्यम् ।
यत:, न गौरवं वातदुष्टरसे भवितुमर्हति, एतच्च नातिसुन्दरम्, तेन
पूर्व एव पक्षो ज्यायान् ।
सटिक च. सू. २८-२२ पान ३७८

चक्रदत्तानें वरील टीकेंत एक वाद उत्पन्न केला आहे. दोष धातूंच्या आश्रयानें विकृत होऊन धातूंना दुष्ट करतात व लक्षणें उत्पन्न करतात. हें सर्व मान्य असलें तरी उत्पन्न होणारे लक्षण केवळ धातुवैषम्यामुळें उत्पन्न होतें कीं लक्षणाच्या उत्पत्तीस धातुविशेषानें दोषांचें वैशिष्टयहि कारणीभूत होतें हा वादाचां प्रश्न असल्याचें चक्रदत्त म्हणतो. उदा. अश्रद्धा, गौरव, ज्वर हीं लक्षणें रसदुष्टीचीं म्हणून सांगितलेलीं आहेत. कोणत्याहि दोषांनीं रसधातू दुष्ट झाला असतां, हीं सर्व लक्षणें सामान्यत: उत्पन्न होऊं शकतात हे पहिलें मत. वातानें उत्पन्न होणारी अश्रद्धा व कफानें रस दुष्ट होऊन उत्पन्न होणारी अश्रद्धा यांच्यामध्यें कारणीभूत दोषांचें वैशिष्टय असते असें दुसरें मत. सगळेच दोष रसाच्या आश्रयानें सगळींच लक्षणें उत्पन्न करुं शकणार नाहींत, गौरव कफामुळेंच येईल, ज्वर पित्तामुळेंच येईल असें प्रतिपादन करणें हें तिसरें मत. चक्रदत्ताला हे मत फारसें मान्य नाहीं. तो पहिल्या व दुसर्‍या मतांचा पुरस्कर्ता आहे. आमच्या मतें दुसरें आणि तिसरें मत अधिक योग्य आहे. कारण पहिलें मत मान्य केल्यास चिकित्सेला दोषनिरपेक्षता येतें आणि दोषनिरपेक्षचिकित्सा संपूर्ण असूं शकत नाहीं हा सिद्धान्त आहे आणि अनुभवहि तसाच आहे.

N/A

References : N/A
Last Updated : July 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP