श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय नववा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम:॥
हे श्रीशंभू त्र्यंबकेश्वरा । कर्पूरगौरा उदारा । तूं या कोथलाच्या शिखरा । अत्यंत प्रिय मानिलें ॥१॥
तुला जें जें आवडें काहीं । तें तें श्रेष्ठ ठरे जगाठायी । कस्तुरी पेक्षा भस्म कांई । श्रेष्ठ आहे सांग देवा ? ॥२॥
परी तुझे प्रेम भस्मावर । म्हणून तेंच ठरलें थोर । अत्यंत हीनदीनावर । थोर तेच करिता कृपा ॥३॥
विष अवघ्यांनी अव्हेरिलें । तें तूं आपुल्या कंठी धरलें । गजचर्मावर सरते केलें । शालजोडी होऊन जगीं ॥४॥
तैसा मी अती हीन । परी तुझा म्हणवितो जाण । हे शंभू मजकारण । आतां ना उपेक्षिणें ॥५॥
हे कोथलांचे शिखर । कल्याणरुप साचार । शिव कल्यान परमेश्र्वर । कल्याणी ती पार्वती ॥६॥
हे उभयता येथे राहिले । म्हणून शिखरा महत्व आलें । कल्याणव्रत येथेंच केले । आहे देवादिकांनी ॥७॥
तें कल्याण व्रत येणेरीती । करणें आहे निश्चितीं । या व्रताने पशुपती । प्रसन्न होतो नि:संशय ॥८॥
मीन राशीस सूर्य येतां । हे व्रत करावें तत्वतां । या व्रतें मनीची चिंता । अवघी निरसन होईल ॥९॥
मीन-राशीस नारायण । जोपर्यंत आहे जाण । त्या महिण्यात एखादा दिन । शुभ ऐसा बघावा ॥१०॥
आणि श्रोते त्या दिवशी । येऊनिया शिखराशी । स्नान करुन तीर्थासी । शिवाराधन करावें ॥११॥
मग शिव पार्वतीची प्रतिमा । कराव्या अती उत्तमा । ती करण्या पहा । हेमा-वीण दुसरी धातू नसे ॥१२॥
सुवर्णप्रतिमा करणे । अशक्य असल्याकवणा कारणें । त्यानें त्याऐवजीं चांदी घेणें । तेंही अशक्य असेल जरी ॥१३॥
तांब्याच्या प्रतिमा करीं । पूजा द्रव्ये मिळवून सारी । तांब्याच्या कलशावरी । त्या प्रतिमा ठेवाव्या ॥१४॥
या कलशाच्या खालतीं । सप्त धान्य असावें निगुती । ताम्हण पाहिजे तांब्यावरती । प्रतिमा त्या ठेवावया ॥१५॥
श्रोते तें ताम्हण । तांदळांनी भरणें पूर्ण । मग कुंकवाचें काढून । स्वस्तीक त्या तांदुलावरी ॥१६॥
मग प्राणप्रतिष्ठा मूर्तीची । सशास्त्र ती करणें साची । या मुख्य विधानाची । हेळसांड करुं नये ॥१७॥
प्रतिमेचे पूजन । सांग झाल्यावरी जाण । शिव-उमेचें लावणें लग्न । तुलसी विवाहाच्या परीं ॥१८॥
सांगता त्या कृत्याची । ब्राम्हणभोजनें होय साची । ऎशी आज्ञा शास्त्राची । आहे ती ध्यानी धरा ॥१९॥
बहुसाळ करून पक्वान्ने । ब्राह्मणभोजन घालणें । आपुल्या शक्तिनुसार देणें । तयालागी दक्षणा ॥२०॥
श्रोते त्या पक्वान्नात । पायस आहे मुख्य सत्य । जैसे सौभाग्य अलंकारात । कुंकुम तें श्रेष्ठ असें ॥२१॥
हीं कृत्यें झाल्यावरी । तीन प्रदक्षिणा अत्यादरी । शंभूस घालूनिया निर्धारीं । यावें आपुल्या बिर्‍हाडाला ॥२२॥
तेथें इष्टमित्रांसह भोजन । सुग्रास तें करणें जाण । रात्री पहुडाया कारण । दर्भासन योजावें ॥२३॥
मुखाने करावे भजन । ओम नम: शिवाय म्हणून । प्रात:काल होतां स्नान । तीर्थामाजी करावें ॥२४॥
पुन्हा येऊन शिखरासी । सांग पूजावें उभयतांसी । उमामहेश्र्वर त्या स्थलासी । आहेत पहा बसलेले ॥२५॥
प्रतिमेचे करावे दान । योग्य विप्रा लागून । शक्तिप्रमाणे देऊन । तयालागी दक्षणा ॥२६॥
हें कल्य़ाण व्रत जो जो करी । त्याच्या पातकांची होऊन बोहरी । सर्वकाल भूमीवरी । सुखोपभोगा भोगील ॥२७॥
वंध्याही होतील पुत्रवती । या कल्याण व्रतें निश्चिते । रोग अवघे पळून जाती । व्रतकर्त्याच्या शरीराला ॥२८॥
भूतबाधा समंधबाधा । तयालागीं न होत कदा । हा कोथल नव्हे साधासुधा । सर्व तीर्थाचा तीर्थराज ॥२९॥
ब्रह्मांडात कोथलापरी । तीर्थ नाहीं भूमीवरी । येथे जो अविश्वास धरी । तोच बुडेल निःसंशय ॥३०॥
शिव-उमेची निवासस्थान । हेंच आहे शिखर जाण । या शिखराहून आन । प्रिय न कांही प्रभूला ॥३१॥
येथल्या दोन लिंगांप्रती । कोणी हरिहर नाम देती । कोणी उमा-महेश्वर सांगती । परी या दोन्ही कथा खर्‍या ॥३२॥
विष्णूच पार्वती झाला । मान शिवाच्या आज्ञेला । देवुनिया मागुती भला । सृष्टिरचनेचिया वेळीं ॥३३॥
शिव हें ब्रह्म निर्गुण । आकारविकारावीण । प्रकृतीचें महिमान । आहे आगळें ख्यात जगीं ॥३४॥
या दोघांच्या संयोगानें । जग आकारा आहे येणें । म्हणून विष्णूकारणें । कांही म्हटलें तरी योग्य ॥३५॥
अध्याय तो तेविसावा । येथे पूर्ण झाला बरवा । आतां चोविसावा ऐकावा । यथामती कथितों मी ॥३६॥
कोथलाच्या दक्षिणेसी । एक्या लहानशा पहाडासी । बसला गणपती आनंदेसी । शिवाराधना करावया ॥३७॥
येथें व्रत विन्घेश्वर । करावें की साचार । ज्या व्रते परिहार । होय सर्व विघ्नांचा ॥३८॥
वृषभ राशीस येतां अर्क । हें विघ्नेश्र्वर व्रत करणें देख । शुक्रवारी नि:शंक । शुध्द पक्षा-माझारीं ॥३९॥
हेम-चांदी-तांब्याची । मुर्ती करणें गणपतीची । कलशीं स्थापना करुन त्याची । प्राणप्रतिष्ठा करुन ॥४०॥
अथर्वणशीर्षे बरवा । अभिषेक तो करावा । भक्तीनें पुष्प-दूर्वा । अर्पण करणें गणपतीसी ॥४१॥
घीवर, अनारसे, पायस । याचा नैवेद्य करणें आवश्य । मोदक आवडती विशेष । मयुरेश्वराकारणें ॥४२॥
नैवेद्य समर्पण करुन । यावें शिखरा कारण । वंदावया तो पंचवदन । मृडानीपती परमात्मा ॥४३॥
नमस्कारुनी द्वय लिंगांसी । पुन्हा यावे गणपतीपाशी । ती अवघी घालणें निशी । गणेश शिवाच्या भजनांत ॥४४॥
प्रात:काल होतां पुन्हा । सांग पुजून गजानना । विसर्जन करुन करणें दाना । प्रतिमेचें द्विजास ॥४५॥
वित्तशाठ्य न करतां भली । दक्षिणा पाहिजे त्यास दिली । व्रत करतां होईल बली । अवघ्या महीभागावर ॥४६॥
हें विघ्नेश्वराचें व्रत । पूर्वीचिया काळात । करिते झाले अत्री सत्य । पुत्रप्राप्ती कारणें ॥४७॥
सूर्य आणि शशांक । पुत्र त्यां झाले देख । हें विघ्नेश्वर अलोकिक या व्रतामध्ये खास आहें ॥४८॥
धनपती जो कुबेर । तो हें व्रत करितो साचार । तयालागी मयुरेश्वर । पहा पावता जाहला ॥४९॥
शंख पद्य निधी दोन । दिले कुबेराकारण । महादयांळू भगवान । पुत्र हेमवतीचा ॥५०॥
हें व्रत जो जो करील । वा सद्भावे ऐकील । वा जो जो कोणी होईल । या व्रतास लिहिणारा ॥५१॥
ऐसे तिघेही । प्रती पावन होतील पाही । यांत मुळी संदेह नाहीं । सत्य सत्य त्रिवाचा ॥५२॥
गणेश पर्वताच्या दक्षिणेसी । एक पर्वत परियेसी । सुब्रह्मण्य ज्या पहाडासी । शिवाज्ञेनें राहिला ॥५३॥
येथे सुब्रह्नाण्य व्रत । साधकानें करावे सत्य । तूल राशीला आदित्य । येईल त्या वेळेला ॥५४॥
व्रतारंभ शुक्रवारी । याचा करावा निर्धारीं । ऎशी दोन व्रतें याभितरीं । सामावलेली आहेत ॥५५॥
स्कंद षष्ठी, कृत्तिका व्रत । आणि तिसरें सुब्रह्नाण्य सत्य । या तिन्ही व्रतांप्रत । तुल संक्रांतीस करावें ॥५६॥
सुब्रह्नाण्य व्रताचा । आरंभ झाल्यावरी साचा । षष्ठीचा । आरंभ करणें आहें की ॥५७॥
ही आगमोक्त तिन्ही व्रतें । आहेत की हो पहा श्रोते । गणेशापरीच आहे तें । त्याचेंही पूजाविधान ॥५८॥
प्रथमच्या शुक्रवारी । सुब्रह्नाण व्रत करी । त्या दिवशीच असल्या साजिरी । षष्ठी ती विबुधहो ॥५९॥
मग त्याच एक्या दिवसास । समुच्चयानें तिन्ही व्रतांस । करणें ठेवून भावास । अतुलसा अंतरी ॥६०॥
षष्ठी नसल्या शुक्रवारी । सुब्राह्मण्य व्रत झाल्यावरी । जी षष्ठी पुढारीं । येईल त्या षष्ठीला ॥६१॥
स्कंद षष्ठीचें व्रत । करावें कृत्तिकेसहित । हाच विधी प्रशस्त । आहे ऎसे वाटातसें ॥६२॥
सुब्रह्नाण्य कृत्तिकेच्या । मुर्ती कराव्या सुवर्णाच्या । त्या शक्य नसल्या चांदीच्या । वा तांब्याच्या कराव्या ॥६३॥
विघ्नेश्वर व्रतापरी । पूजा विधियाचा करी । त्याच्यात याच्यात तिळ्भरी । फ़रक नाही पहा तो ॥६४॥
दोघे पुत्र शिवाचे । पुजाविधान तयांचे । सारखेच असावयाचें । येविषयी शंका नसे ॥६५॥
सांग प्रतिमापूजन । करुन कराव्या त्या दान । यथाशक्ती देऊन । द्विजालागी दक्षणा ॥६६॥
या तिन्ही व्रताप्रत । इद्र करिता झाला सत्य । या व्रतप्रभावे त्याप्रत । अती थोर लाभ झाला ॥६७॥
स्कंद सेनापती होऊन । इंद्र शत्रुचे केले हनन । झाले पुत्रसंतान । मुचुकुंदनृपा याच व्रतें ॥६८॥
श्रोते रौरवाची भीती । ज्याच्या की असेल चित्ती । त्यानें करावें त्वरीत गती । याच व्रताकारणें ॥६९॥
सुब्रह्नाण्यव्रतें पाही । नरकभिती समूळ जाई । तिचा लेशही उरणार नाहीं । साधकाच्या मनांत ॥७०॥
स्वामी सुव्रह्नाण्य । व्रताचे आहे पहा पुण्य । तें कर्त्याकारण । सर्व सुखे प्राप्त होतीं ॥७१॥
इहपर लोक तयाचा । सुखद होईल साचा । यांत लेश असत्याचा । नाहीं नाही विबुधहो ॥७२॥
हे सुव्रहाण्य व्रत । पंचविसाचें सार सत्य । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥७४॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुंभं भवतु ॥ इति नवमोध्याय समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP