मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|उत्तरार्ध|
अध्याय ८९ वा

स्कंध १० वा - अध्याय ८९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥१०२३॥
निवेदिती मुनी सरस्वतीतीरीं । एका ज्ञानसत्रीं ऋषिश्रेष्ठ ॥१॥
श्रेष्ठ कोण ऐसा, करितां विचार । होती निरुत्तर सकलही ते ॥२॥
अंतीं ब्रह्मपुत्र भृगुमुनींप्रति । मुनी पाठविती परीक्षेतें ॥३॥
ब्रह्मसभेसी तैं येई भृगुमुनि । स्तवन-वंदनीं रमला नाहीं ॥४॥
अपमानें ऐशा क्रुध्द होई ब्रह्मा । परी न शासना प्रवर्तला ॥५॥
वासुदेव म्हणे पुत्रप्रेम त्यासी । आड शासनाची तदा येई ॥६॥

॥१०२४॥
पुढती कैलासीं भृगु जाई हर्षे । पाहूनि तयातें उठले शिव ॥१॥
आलिंगनास्तव पुढती ठाकतां । ऐकावा भृगूचा अविर्भाव ॥२॥
म्हणे चिताभस्म, नररूंडमाला । मज, अमंगला स्पर्शू नको ॥३॥
ऐकूनि सक्रोध होऊनि शंकर । घेऊनि त्रिशूळ उगारिती ॥४॥
पार्वतीनें तदा आंवरिलें त्यांसी । वासुदेव कथी पुढती ऐका ॥५॥
 
॥१०२५॥
पु्ढती वैकुंठी येतां भृगुमुनि । निद्रिस्थ पाहूनि विष्णूप्रति ॥१॥
लक्ष्मीच्या अंकी ठेवूनि मस्तक । निद्रामग्न स्वस्थ दिसती विष्णु ॥२॥
उभय निद्रिस्थ पाहूनि विप्रानें । जागृत लत्तेनें केलें तयां ॥३॥
वक्ष:स्थळीं लत्ताप्रहार तो होतां । सोडूनि पर्यका उठले हरि ॥४॥
पाहुनि मुनीसी जोडियेले कर । उपकार थोर म्हणती मुने ॥५॥
अज्ञानें हा ऐसा झाला अवमान । पर्यकीं बैसून विश्रांति घ्या ॥६॥
क्षमावें मजसी कोमल चरण । ताडनें श्रमून श्रांत झाले ॥७॥
वासुदेव म्हणे बोलुनियां ऐसें । चरण विप्राचे चुरिती विष्णु ॥८॥

॥१०२६॥
चुरितां चरण बोलला गोविंद । विप्रा, तव पद श्रेष्ठ बहु ॥१॥
गंगादि नद्याही पुनीत या पादें । पाप, पादोदकें सकल नष्ट ॥२॥
अष्ट लोकपालांसवें मी पुनीत । करितां पादस्पर्श सन्मुनीचे ॥३॥
अज्ञान विनष्ट जाहलें सर्वथा । आतां अज्ञानाचा नुरला धोका ॥४॥
आतां न अंधत्व मज लक्ष्मीसंगें । वक्ष:स्थल माझें शुध्द होई ॥५॥
चांचल्य त्यजूनि लक्ष्मी आतां स्थिर । वक्षीं या होईल विश्वास हा ॥६॥
वासुदेव म्हणे शांति ती पाहूनि । संतोषले मनी भृगुऋषि ॥७॥

॥१०२७॥
कंठ होई सद्गदित । तेंवी देह रोमांचित ॥१॥
अश्रुधारा येती नेत्रीं । मुनि जाती ज्ञानसत्रीं ॥२॥
कथिला वृत्तांत तो सर्व । ऐकूनियां सकलां मोद ॥३॥
म्हणती सर्वदा जो शांत । निर्भय तो जगी एक ॥४॥
धर्मप्रवृत्ति, अद्वैत । तेंवी लाभतें वैराग्य ॥५॥
पापनाशें अष्टसिध्दि । ज्याच्या कृपेनें लाभती ॥६॥
निर्गुण तो निराकार । शांत देव जगीं थोर ॥७॥
वासुदेव म्हणे केंवी । त्याची श्रेष्ठता वर्णावी ॥८॥

॥१०२८॥
लोकवत्सल ते ब्रह्मनिष्ठ नित्य । ध्याती तयासीच इष्टचि तें ॥१॥
सत्वगुणप्रिय ईश भगवान । दैवत ब्राह्मण मानी स्वयें ॥२॥
विप्रही तयासी सेविती विवेकें । धन्य अन्योन्यांचें प्रेम जगीं ॥३॥
देवासुरांमाजी एकचि तो परी । श्रेयस्कर हरि साधकातें ॥४॥
वासुदेव म्हणे सगुणब्रह्मांत । हरीचें सात्विक रुप श्रेष्ठ ॥५॥

॥१०२९॥
निवेदिती शुक निर्णय मुनींचा । तारक सद्भाक्तां श्रीविष्णूचि ॥१॥
निर्णयें या ध्यान करुनियां तेंचि । पावले सद्गति मुनिश्रेष्ठ ॥२॥
सूत शौनकासी म्हणे, हें शुकोक्त । तारील अमृत भयग्रस्तां ॥३॥
शुकमहामुनि रायातें कथिती । श्रीकृष्ण विष्णूचि मूर्तिमंत ॥४॥
लोकोत्तर त्याची शांति घे ऐकून । इतिहास अन्य कथितों राया ॥५॥
वासुदेव म्हणे श्रीकृष्णचरित्र । कथिती मुनींद्र पुढती ऐक ॥६॥

॥१०३०॥
द्वारकेसी एका विप्रस्त्रीसी पुत्र । जाहला, वृत्तांत नवलकारी ॥१॥
भूमीवरी तया ठेवितांचि विघ्न । पावला मरण तत्काळ तो ॥२॥
शोकाक्कुल विप्र तदा पुत्रप्रेत । घेऊनि द्वारांत नृपाळाच्या ॥३॥
बैसूनियां करी आक्रोश त्या स्थानीं । नृपाचें हें जनीं पाप म्हणे ॥४॥
स्वैर, उच्छृंखल नृपाच्या प्रजेसी । दारिद्यादि ऐसी दु:खें बहु ॥५॥
क्रमानें विप्राचे ऐसे अष्ट पुत्र । पावतां पंचत्व तेंचि करी ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती नवम । पुत्रही मरण पावे ऐसा ॥७॥

॥१०३१॥
तेंही प्रेत विप्र नृपाच्या मंदिरीं । आणुनियां करी शोक बहु ॥१॥
तदा द्वारकेसी आला होतां पार्थ । पाहूनि तें दु:ख द्रवला मनीं ॥२॥
म्हणे त्या विप्रासी यादव हे भ्याड । नसे तयां चाड ब्राह्मणांची ॥३॥
विप्रशोकातें जो निवारी न वीर । नव्हे तो क्षत्रिय वीरश्रेष्ठा ॥४॥
विप्रा, आतां येथ करितों वास्तव्य । पाहूं केंवी पुत्र मरण पावे ॥५॥
वासुदेव म्हणे दयार्द्र अर्जुन । प्रतिज्ञावचन वदला तदा ॥६॥

॥१०३२॥
विप्रा, या पुढती होईल जो पुत्र । रक्षीन तयास निश्चयानें ॥१॥
नाहीतरी अग्निकाष्ठें मी भक्षीन । दारुण भोगीन पाप माझें ॥२॥
विप्र म्हणे मूढा, कृष्ण, बलराम । अनिरुध्द-प्रद्युम्नबल व्यर्थ ॥३॥
कार्य तें तूं केंवी करिसील, मज । नसेचि विश्वास वचनी तव ॥४॥
पार्थ म्हणे चाप अवलोकी मम । कृष्ण-बलराम न गणीं मातें ॥५॥
शिवातेंही रणीं जिंकिलें मी पाहीं । जिंकूनि यमाहि हरिन पुत्रा ॥६॥
वासुदेव म्हणे या पार्थवचनें । विश्वास विप्रातें बहु आला ॥७॥

॥१०३३॥
कांहीं काल ऐसा निघूनियां जातां । येई प्रसूतीचा पुन:काल ॥१॥
कांतेसवें विप्र तदा चिंतामग्न । पार्थासी येऊन रक्षी म्हणे ॥२॥
ऐकूनियां पार्थ मृत्युंजया वंदी । निज अस्त्रें चिंती बहुविध ॥३॥
मग सूतिकेच्या सदनाभोवतीं । दृढ पंजरचि निर्मी एक ॥४॥
संरक्षित ऐशा स्थानी ती विप्रस्त्री । होई पुत्रवती योग्य वेळी ॥५॥
टाहो फोडीतचि बाळ तो नभांत । जाहला अदृश्य गगनीं तदा ॥६॥
विप्र तैं आक्रोश करी बहु दु:खें । दोष अर्जुनातें लावी तदा ॥७॥
वासुदेव म्हणे कृष्णाच्या सन्निध । जाऊनियां विप्र निंदी पार्था ॥८॥

॥१०३४॥
शांतपणें पार्थ विप्रकृत निंदा । ऐकूनियां विद्या स्मरे निज ॥१॥
संचार विद्येनें पुरी ’ संयमनी ’ । यमाची गांठूनि शोध घेई ॥२॥
परी बाळ तेथें नसे हे पाहूनि । स्वर्गादि शोधूनि श्रमला पार्थ ॥३॥
सत्यप्रतिज्ञत्वें पावतां निराशा । पूर्ण निजशब्दा करावया ॥४॥
मेळवूनि अग्निकाष्ठें होई सिध्द । तदा त्या गोविंद बोध करी ॥५॥
परी न निश्चय ढळेचि तयाचा । पाहुनियां वाचा वदला हरी ॥६॥
थांब थांब नको होऊं उतावीळ । पहा स्तवितील निंदकचि ॥७॥
वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । घेऊनि पार्थातें हांकी रथ ॥८॥

॥१०३५॥
पश्चिमेसी हांकी स्यंदन वेगानें । सप्त सागरांतें लंघीतसे ॥१॥
लोकालोकाचल लंघितां प्रगाढ । तमांत दिड्‍.मूढ अश्व होती ॥२॥
जगन्नाथें तदा अग्रभागीं चक्र । सोडूनियां मार्ग दावियेला ॥३॥
चक्रामागोमाग चालतां स्यंदन । दिपला अर्जुन एक्यास्थानी ॥४॥
मिटूनि तैं नेत्र घेतले पार्थानें । पुढती वेगानें जाई रथ ॥५॥
आगाध उदकीं प्रवेशला अंती । दिव्य मंदिराची दिसली शोभा ॥६॥
वासुदेव म्हणे तया दिव्य स्थानी । अलौकिक प्राणि पाही पार्थ ॥७॥

॥१०३६॥
कैलासासमान विशाल शरीर । नेत्र द्विसहस्त्र कृष्णकंठ ॥१॥
शामजिव्ह शीर्षे सहस्त्र त्यांवरी । शोभताती भारी दीप्तमणी ॥२॥
महा भयंक्दर आश्चर्यकारक । पहियेला शेष, कृष्ण-पार्थे ॥३॥
शेषशायी हरी होता शेषावरी । वर्णू केंवीतरी तयालागीं ॥४॥
प्रसन्नवदन, आकर्ण नयन । कांति घन:श्याम विराजली ॥५॥
श्रीवत्सलांछित पीतांबरधारी । आपाद शोभली वनमाला ॥६॥
किरीट कुंडलें कुन्तल शोभले । कौस्तुभ झळाले कंबुकंठीं ॥७॥
वासुदेव म्हणे पाहूनि त्या हर्ष । जाहला हरीस तयास्थानीं ॥८॥

॥१०३७॥
सुनंद- नंदादि पार्षद समीप । सुदर्शनादिक आयुधेंही ॥१॥
पुष्टी, कीर्ति, माया, आणिमादि सिध्दि । जोडूनि करांसी सेवादक्ष ॥२॥
पुरुषोत्तम तो पाहूनियां ’ भूमा ’ वाटलें अर्जुना भय बहु ॥३॥
वंदितां कृष्णानें पार्थही त्या वंदी । बोले सस्मितचि भूमा तयां ॥४॥
वासुदेव म्हणे सूचक वचन । भूम्याचें ऐकून घ्यावें आतां ॥५॥

॥१०३८॥
कृष्णा, अर्जुना, त्या विप्राच्या पुत्रांसी । आणिले भेटीची धरुनि इच्छा ॥१॥
धर्मरक्षनार्थ तुह्मीं मदंशेंचि । हर्षे घेतलांती अवतार ॥२॥
धर्मच्छलकांसी वधूनि सत्वरी । आपुलिया स्थळीं प्राप्त व्हावें ॥३॥
वास्तविक तुह्मी नर- नारायण । कर्तव्व्य कांही न जगीं तुह्मां ॥४॥
सन्मार्ग लोकांसी दावूनियां यावें । अन्य न गणावें कार्य कांही ॥५॥
संतोष भेटीनें, जा आतां सुखानें । विप्रसुतासवें स्वकार्यासी ॥६॥
वासुदेव म्हणे आपुलालें कर्म । करितां प्रसन्न होई प्रभु ॥७॥

॥१०३९॥
कृष्णार्जुन तदा विप्रपुत्रांसवें । द्वारकेसी आले अनुज्ञेनें ॥१॥
सान-थोर सर्व पुत्र विप्राप्रति । अर्पितां तयासी तोष वाटे ॥२॥
श्रीकृष्णकृपेने भूम्याचे दर्शन । पावूनि अर्जुन ह्र्ष्ट होई ॥३॥
विक्रम नराचा क्रीडा त प्रभूची । बोध अर्जुनासी ऐसा होई ॥४॥
असो राया, ऐसे बहु चमत्कार । करी शाड्‍.र्गधर भक्तांस्तव ॥५॥
यथाकालीं वृष्टि करी जेवीं इंद्र । तुष्ट करी विप्र तेंवी प्रभु ॥६॥
स्वयेंही दुर्जन बहुत वधिले । पार्थाकरी केलें कार्य बहु ॥७॥
भूभार हरुनि धर्मादिकांप्रति । विजय श्रीपति अर्पी रणीं ॥८॥
वासुदेव म्हणे धर्माचे रक्षण । करी भगवान ऐशा मार्गे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP