स्कंध ७ वा - अध्याय १५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


११२

नारद धर्मासी म्हणती कर्मनिष्ठ । कोणी तपोनिष्ठ असती द्विज ॥१॥
स्वाध्याय - प्रवचन - ज्ञाननिष्ठ कोणी । योगमार्ग कोणी असती रत ॥२॥
हव्य-कव्यही जे देव-पितरार्थ । मोक्षमार्गरत अर्पी ज्ञात्या ॥३॥
अभावें सामान्य विप्रही योजावा । विप्र दोन देवां, पितरां तीन ॥४॥
अथवा एकेक योजावा उभयत्र । न व्हावा विस्तार पांचांहूनि ॥५॥
सुग्रास अन्नानें तोषवावे विप्र । भोजन निर्मांस देवप्रिय ॥६॥
पशुहिंसा देव-पितरां न रुचे । भय हिंसकांचें सकळांप्रति ॥७॥
वासुदेव म्हणे हिंसाविहीनचि । अन्नें गृहस्थासी तोष व्हावा ॥८॥

११३
विधर्म, परधर्म, आभास, उपमा । छल, या अधर्मा, पंचशाखा ॥१॥
धर्मविरोधी तो विधर्म जाणावा । परधर्म गणावा वर्णभेदें ॥२॥
बहुधर्मेच्छेनें स्वबुद्धिकल्पित । धर्म तो आभास ध्यानीं घ्यावा ॥३॥
उपमा ते वेदविरुद्ध पाखंड । विरुद्धार्थ तोच छलरुप ॥४॥
धर्म, यात्रार्थ वा महाकष्टें धन । जोडूं नये जाण कदाकाळीं ॥५॥
अजगरासम असावें संतुष्ट । संतोषचि श्रेष्ठ सौख्य जनीं ॥६॥
रति-जिव्हासौख्यास्तव श्वानासम । न वसेचि जाण ज्ञाता कदा ॥७॥
वासुदेव म्हणे उदकप्राशन । लोलुपतेहून रुचे संतां ॥८॥

११४
इंद्रियलोलुप असंतुष्ट विप्र । तेज, विद्या, तप यशहीन ॥१॥
असंतोषें ज्ञान विलयासी जाई । संतोषचि पाहीं ज्ञानदाता ॥२॥
क्षुधा तृषा करी कामनिवारण । संपतां कारण क्रोध जाई ॥३॥
परी विश्वजय पृथ्वी वा भोगितां । अंत न लोभाचा होई कदा ॥४॥
वासुदेव म्हणे नरकपतन । ज्ञात्यांतेंही जाण असंतोषें ॥५॥

११५
संकल्प त्यागितां पराभूत काम । क्रोधा कामाविण स्थान नसे ॥१॥
भोगानर्थज्ञानें जिंकावें लोभासी । जिंकावें भयासी आत्मज्ञानें ॥२॥
आत्मानात्मज्ञानें शोकमोहनाश । नष्ट होई दंभ सत्संगानें ॥३॥
योगविघ्नें मौनधारणें नासती । सुटतां देहासक्ति न घडे हिंसा ॥४॥
अपकार्‍यातेंही उपकार होतां । पुनरपि पीडा सहज टळे ॥५॥
समाधीनें मनस्ताप नष्ट होई । योग्यबळें जाई देहपीडा ॥६॥
सत्त्वान्नसेवनें रजतमनाश । निग्रहें सत्त्वास स्थैर्य येई ॥७॥
गुरुकृपा होतां निग्रह सुलभ । सद्‍गुरु प्रत्यक्ष परमेश्वर ॥८॥
मानव लेखिती तयासी ते मूढ । गजस्नान स्पष्ट ज्ञान त्यांचें ॥९॥
वासुदेव म्हणे ईशकृपेवीण । सद्‍गुरुलाभ न घडे जीवा ॥१०॥

११६
धर्मा, मानव या लेखिती कृष्णातें । परी जाण त्यातें मायाधीश ॥१॥
महायोगी त्याचें इच्छिती दर्शन । इंद्रियदमन कथिती शास्त्रें ॥२॥
संय़मूनिही त्यां योग न साधतां । लाभ काय त्यांचा केवळ श्रम ॥३॥
कृष्यादिक जेंवी बंधनचि होती । इष्टापूर्तादीही बंधक तैं ॥४॥
वासुदेव म्हणे इच्छी जो कल्याण । तयासी बंधन संसाराचें ॥५॥

११७
तीव्र मुमुक्षूनें होऊनि नि:संग । परिग्रहत्याग करणें योग्य ॥१॥
एकाकी एकांत सेवूनि रहावें । भिक्षाजीवी व्हावें मिताहारी ॥२॥
सम शुद्ध देशीं घालूनि आसन । प्रणवस्मरण करणें योग्य ॥३॥
नासाग्रदृष्टीनें बैसूनियां स्थिर । चित्त निर्विकार व्हावयासी ॥४॥
प्राणायाममग्न व्हावें दक्षतेनें । चित्त आंवरावें धांवतांही ॥५॥
हळुहळु स्थिर करावें हृदयीं । इंधनान्तीं अग्नि शांत होई ॥६॥
तैसेंचि तें शांत होतांचि वमन । विषयग्रहण वाटे तया ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसेंही तें मन । पावतें पतन वासनेनें ॥८॥

११८
ब्रह्मचारी व्रतहीन । गृही जरी त्यागी कर्म ॥१॥
वानप्रस्था नगरीं वास । यती विषयसौख्यलुब्ध ॥२॥
ऐसें होतां आश्रमासी । कलंकचि त्या त्या व्यक्ति ॥३॥
अनुकंपेनें उपेक्षा । त्यांची करावी सर्वथा ॥४॥
शुद्धचित्त विषयांचा । दास होईल कां कैसा ॥५॥
वासुदेव म्हणे ज्ञान । करी निर्विषय मन ॥६॥

११९
धर्मा, देह रथ, इंद्रियें त्या अश्व । मन इंद्रियेश लगाम तें ॥१॥
विषय तो मार्ग, बुद्धीचि सारथी । चित्तरज्जु त्यासी प्राण आंस ॥२॥
पापपुण्य चक्रें, रथी तोचि जीव । ओंकार धनुष्य करणें सज्ज ॥३॥
ब्रह्मलक्षीं शुद्ध जीव तोचि बाण । योजिल तो जाण महायोद्धा ॥४॥
राग द्वेष लोभ शोक मोह भय । शत्रूचि हे सर्व घ्यावें ध्यानीं ॥५॥
दयाही बंधन जाहलें भरता । अरुज तों संतां शरण जावें ॥६॥
पाजळूनि ज्ञानखड्‍ग वैरीनाश । साधावा, न भ्रांत विषयीं व्हावें ॥७॥
ऐसें न वागतां सदा मृत्युभय । देवा, वासुदेव हित साधा ॥८॥

१२०
प्रवृत्ति-निवृत्ति जीवातें या वाटा । परिणाम त्यांचा बंध मोक्ष ॥१॥
इष्टापूर्तकर्मे चंद्रलोकप्राप्ति । क्षीणपुण्यें लोकीं पुनर्जन्म ॥२॥
इंद्रियव्यापार ज्ञानेंद्रियांमाजी । लीन संकल्पादि करी चित्तीं ॥३॥
विकारी मनाचा वाणीमाजी लय । वर्ण तैं ओंकार पुढती क्रमें ॥४॥
बिंदु, नाद, सूत्रात्मकप्राण ब्रह्म । ऐसा लयक्रम ज्ञानीयाचा ॥५॥
निवृत्त तो क्रमें ब्रह्मलोकीं जाई । भोगी तया ठाईं सौख्यभोग ॥६॥
विश्वरुप स्थूलोपाधि त्या पुढती । तैजस पुढती सूक्ष्मोपाधि ॥७॥
कारणोपाधिक पुढती प्राज्ञत्व । पुढती साक्षीरुप तुर्यावस्था ॥८॥
शुद्धात्मस्वरुप होऊनियां अंतीं । पावतसे मुक्ति निवृत्तीनें ॥९॥
वासुदेव म्हणे ऐशा सर्वरुपा । मोह कासयाचा कदा शिवे ॥१०॥

१२१
राया, यद्यपि तें प्रतिबिंब बिंब । नसे, परी तर्क आवश्यक ॥१॥
तेंवी प्रत्यक्षही विषय हे मिथ्या । करणें योग्य ऐसा प्रथम तर्क ॥२॥
सत्यत्व तयांचें दुर्घटचि असे । भौतिक देहातें म्हणणें मिथ्या ॥३॥
भूतसमुदाय, विकार परिणाम । सिद्ध हें कांहीं न होई पहा ॥४॥
वृक्षसमुदायरुप वनामाजी । तोडितां वृक्षासी वन न तुटे ॥५॥
विकार तरी तो भिन्न कीं संयुक्त । सिद्ध अभिन्नत्व अनुभवानें ॥६॥
युक्त म्हणों जातां येई अनवस्था । मिथ्या स्वरुपता देहा ऐसी ॥७॥
बाल तोचि युवा, युवा तोचि वृद्ध । सादृश्येंचि सिद्ध, वाटे जनां ॥८॥
परी सादृश्य तें नव्हे एकरुप । भ्रमचि हा सत्य भासतसे ॥९॥
अविद्याकार्य हें नष्ट होई ज्ञानें । अद्वैतांत रमे वासुदेव ॥१०॥

१२२
मिथ्या भ्रमामाजी विधिनिषेधांची । बोलू नका प्रौढी, न म्हणें राया ॥१॥
स्वप्नींची जागृति ज्यापरी स्वप्नचि । विधिनिषेधादि जाण तेंवी ॥२॥
भाव-क्रिया-द्रव्याद्वैत हें जाणूनि । अवस्था लंघूनि जाई ज्ञाता ॥३॥
तंतूचि जैं वस्त्र तैं कार्यकारण । एकचि हें भान भावाद्वैत ॥४॥
सर्वकर्मसमर्पण ईश्वरासी । क्रियाद्वैत तेंचि म्हणती ज्ञाते ॥५॥
पुत्रवित्तादिक भौतिक हें सर्व । भोक्ता परमेश्वर एक त्याचा ॥६॥
अर्थ काम सकलांचें ऐसे एक । तेंचि द्रव्याद्वैत ज्ञानियांसी ॥७॥
यत्र यदा जैशा उपायें जें द्रव्य । शास्त्रीय तें कार्य करणें योग्य ॥८॥
नसतां आपत्तिअ निषिद्ध द्रव्यासी । कोणाही कार्यासी योजूं नये ॥९॥
धर्मा, ईशभक्ता कर्मे न बाधती । दृष्टान्त या तूंचि ध्यानीं घेईं ॥१०॥
वासुदेव म्हणे संकटविमुक्त । धर्म, यज्ञादिक कर्मे करी ॥११॥

१२३
धर्मा, अवज्ञा संतांची । घडतां विफल हरिभक्ति ॥१॥
भाग्यमूळ संतकृपा । अनुभव हाचि माझा ॥२॥
पूर्वकल्पीं मी गंधर्व । ‘उपबर्हण’ मम नांव ॥३॥
रुप, मार्दव अंतरीं । मधुरभाषणचातुरी ॥४॥
ऐशा सद्‍गुणांनीं सर्व । मज मानिती गंधर्व ॥५॥
मजवरी अनुरक्त । पुरुषाहूनि स्त्रिया देख ॥६॥
मीही लंपट तयांसि । झालों नुरलीचि शुद्धि ॥७॥
वासुदेव म्हणे मोह । नित्य पावतसे जीव ॥८॥

१२४
देवसभेमाजी हरिकथा गाना । पाचारिलें आम्हां एक्या वेळीं ॥१॥
स्त्रियांसवें हर्षे बैसूनि विमानीं । गेलों तया स्थानीं गात गात ॥२॥
मज उन्मत्तासी पाहूनियां क्रुद्ध । वदले होईं शूद्र, प्रजापति ॥३॥
धर्मा, तत्काळ मी झालों दासीपुत्र । सेविले सत्पात्र विप्र ज्ञाते ॥४॥
तेणेंचि या कल्पीं जाहलों नारद । सदनीं गोविंद वसे तुझ्या ॥५॥
यास्तवचि येथें पातलों मी धर्मा । रुचतें सज्जना हरिमंदिर ॥६॥
वासुदेव म्हणे कथूनि यापरी । नमस्कार करी हरिसी मुनि ॥७॥

१२५
शुकमहामुनि परीक्षितीलागीं । ऐसी नारदोक्ति कथिती प्रेमें ॥१॥
ऐकूनियां धर्म सद्‍गदित कंठें । नारदा-कृष्णांतें पूजी भावें ॥२॥
स्वीकारुनि पूजा नारद, हरीतें । वंदूनियां सौख्यें निघूनि जाती ॥३॥
साक्षात्कारब्रह्मरुप हा श्रीकृष्ण । ऐकूनियां धर्म चकित झाला ॥४॥
असो, परीक्षिता बहुकथायुक्त । सप्तम हा स्कंध कथिला तुज ॥५॥
शुकोक्तिसार तें गाईलें अभंगीं । चित्त हरिरंगीं रंगो तेणें ॥६॥
वासुदेव म्हणे सप्तम हा स्कंध । अर्पूं जगदानंदपादपद्मीं ॥७॥

इतिश्री वासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंध ७ वा समाप्त.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥


N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP