श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । गुरुभ्योनम: । श्रीरामसमर्थ । एकदां ओहोळ तटाकांत । बैसले तुकाराम संत ।
संनिध उभा रावजीसुत । करद्वय जोडिनिया ॥१॥
तंव तेथें लहान बालकें । क्रीडा करितां कौतुकें । तुकाराम वदती इतुकें । खडडा एक काढी बा ॥२॥
परिसोनिया वचनाप्रती । खडडा काढिला शीघ्रगती । तुकाईनें बालकें हातीं । धरुनि आणिलीं त्या ठाई ॥३॥
तीन्ही पोरें खडड्यांत । घालोनि वाळू दडपित । लीला नाटकी हे संत । काय करिती न कळेची ॥४॥
जयाची कर्तुमाकर्तु शक्ती । ते अन्यथाही करूं शकती । शिष्यावरी बैसविती । सिध्दासन घालोनि ॥५॥
म्हणती कोणासवें न बोलावें । आणि आसनही न त्यागावें । ऐसें सांगोन स्वभावें । दूर जावोन बैसले ॥६॥
सजीव बालकें गोमटीं । पुरविलीं धरणीचे पोटीं । तरी विकल्पकुतर्क गोष्टी । नाठवे सतशिष्याशी ॥७॥
सद्‍गुरु त्रिभुवन नायक । दयासागर भरले एक । मनीं ठसलें ज्या नि:शंक । तया विकल्प नाठवें ॥८॥
देह चरणी आर्पिला । ते वेळी अभिमान सांडिला । सुख दु:ख नाठवे जयाला । देहजनिक विकार ॥९॥
असो तेथें त्या वेळीं । घरची मंडळी शोधूं आली । म्हणती पोरें कोठें गेली । खेळत होती आतांची ॥१०॥
शोध शोधुनि थकले । गणपतीसी पुसूं लागले । कोठें चुकली आमुचीं मुलें । देखिलां तुम्ही नाहीं कीं ॥११॥
तो न बोलेचि कांहीं । गुरु आज्ञा मानून ह्रदयीं । तंव पाहिली तुकाई । धावून चरण वंदिले ॥१२॥
मग तुकाईस विनवित । बालकें चुकलीं निभ्रांत । तेणे उद्विग्न झालें चित्त । कांही समाचार सांगावा ॥१३॥
वदती तेथें बैसला बुवा । त्यासी समाचार पुसावा । न बोले तरी झोडावा । निष्ठुरपणें ॥१४॥
मज वाटतें खचित । यानें केला बाळघात । याची करणी अघटित । कोणासही न कळे ॥१५॥
ऐकतांचि ऐसें वचन । धांवले ते क्रोधायमान । दांभिका धरिलेसी मौन । बाळघातक्या निष्ठुरा ॥१६॥
तरी तो कांहींच न बोले । जाणोनि अधिक संतापले । लाथा बुक्या दंड मारिले । कितीयेक ॥१७॥
मारोनियां थकले बहुत । परी प्रत्त्युत्तर न मिळत । बोलती तुकाराम संत । यासी दूर ढकलावें ॥१८॥
करणी करितो निशाचरी । पोरें पुरोनी बसला वरी । वाळू काढावी सत्वरी । म्हणजे प्रत्यक्ष कळेल ॥१९॥
वाळू काढली सत्वरेंसी । पाहते झाले बाळकांसी । शोक करिती अतिशयेसी । पुन्हां मारूं धांवले ॥२०॥
मारिती झोडती पाडिती । नाना दुरुत्तरें बोलती । सदगुरु दुरोनि पाहती । अंतरी आनंद उमाळे ॥२१॥
धन्य शिष्या शिरोमणी । सत्वाची ही केवळ खाणी । देहभाव सांडोनी । चैतन्य रुपीं निमाला ॥२२॥
समस्त जनां निवारिलें । तुमचे बालकां काय झालें । अमृत दृष्टीनें पाहिलें । तंव उठोन बैसलीं ॥२३॥
शय्येवरोनि निजोन उठतीं । तैसी उठलीं शीघ्रगती । पाहोनि विस्मयचित्ती । न समाये जनांच्या ॥२४॥
तंव तुकाराम सद्‍गुरुमाउली । शिष्या समीप धांवली । कवटाळी ह्र्दयाकमळीं । मस्तकीं ठेवी वरदहस्त ॥२५॥
सद्‍गुरु कृपामृत स्त्रवलें । ज्ञानाज्ञान विराले । अमृतमय होऊन राहिलें । अंतर्बाह्य ॥२६॥
आधीं इंद्रियें अंतर्मुख झालीं । स्थूल लिंगाची वृत्ति उडाली । त्रिगुणगुणेसीं आटलीं । भूता सहित ॥२७॥
महा कारण तूर्या अवस्था । शब्दब्रह्मीं रिघाली तत्वतां । अहंब्रह्माची स्फुरणता । सोहंसह मावळली ॥२८॥
उरला आदिचिदानंद । मावळलें भासलें द्वंद्व । जे वेद श्रुतिसी प्रतिपाद्य । नोहेचि नि:शब्द ॥२९॥
चौदेहातीत झाला । मरणा मारोनि उरला । आधी मध्यांत संचला । एक आत्मा ॥३०॥
माहामाया गुणमाया । मुळयामा जाय विलया । असोनि नुरली काया । ब्रह्म चैतन्यता बाणली ॥३१॥
नग अनेक भासले । सुवर्णत्वें एकचि झाले । तैसें जग अनंत नटलें । विमल ज्ञानें ब्रह्म एक ॥३२॥
लेखना वाचना अवकाश । तेथें नलगे निमेश । द्वैत भावना नि:शेष । उडोनि होय तादात्म्यता ॥३३॥
ऐशिया आनंद्सागरांत । सद‍गुरु सतशिष्य नांदत । तेथील एक बिंदू प्राप्त । अनंत सुकृतें होईल ॥३४॥
गुरु शिष्याची भावना । समूळ उडाली कामना । स्वस्वरुपीं लीन जाणा । एकरुप जाहलें ॥३५॥
जैसे काष्ट अग्नि प्रती । भेटतां झाली अग्निमूर्ति । तैसा शिष्य गुरुप्रती । भेटतां झाला गुरुरुप ॥३६॥
सरिता सागरा मिळाली । सागररुपें पैसावली । अथवा लवणोदक भेट झाली । संचले एकरुप ॥३७॥
तैसें द्वैताद्वैतातीत ब्रह्म । चैतन्य प्रकाशलें परम । यास्तव ब्रह्मचैतन्य हे नाम । तुकाईने संबोधिलें ॥३८॥
ऐसी झाली स्थिती । शब्दी न वर्णवें निगुती । नि:शब्दें शब्द व्युत्पत्ती । चालेल कैसी ॥३९॥
स्तवनाची आर्त उपजली मोठी । परी मंद बुध्दी मराठी । न सुचे तेव्हां दिठी । सद्‍गुरुपदीं ठेविली ॥४०॥
ब्रह्मचैतन्य गुरुमाय । जी दीन अनाथांची सोय । जैसी वत्सालागीं गाय । तैसी आम्हां पान्हवली ॥४१॥
उभयतां आनंदे भेटती । जन समस्त पाहती । म्हणती साधूची कृती । ब्रह्मादिकां नेणवे ॥४२॥
व्यर्थ साधुसी छळिले । धाय मोकलोन रडूं लागलें । तुकाईनें समाधान केलें । सकळिकांचें ॥४३॥
तुकाराम ब्रह्मचैतन्य । उभयतां झाले अनन्य । संवाद झाला गहन । स्थीर चित्तें परिसावा ॥४४॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते पंचमोध्यायांतर्गत द्वितीयसमास: । ओंवीसंख्या ॥४४॥
॥ श्रीसद‍गुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP