श्रीगणेशायनम: श्रीरामसमर्थ ।
करावें सावध चित्त । तरी कळे येथीची मात । गुरुलीला अगम्य अद‍भुत । जड देहा न कळेची ॥१॥
ब्रह्मीं अष्टधा प्रकृती । तिचे कर्दमें ब्रह्मांडा उत्पत्ती । ती मूळमाया निश्चिती । जाणावी तुवां ॥२॥
प्रकृती जडा अचेतन । पुरुषसंयोगें सचेतन । पुरुष म्हणजे जाणीव ज्ञान । प्रकृतीमध्यें बिंबलें ॥३॥
ऐसा संसार वाढला । उत्पत्तिस्थितिप्रळयाला । शास्त्रा त्रिगुणरुपें झाला । परमात्मा जो ॥४॥
ब्रह्मां करी उत्पन्न । विष्णु प्रतिपाळी जाण । रुद्र संहारी आपण । कार्यभाग चालिला ॥५॥
चौर्‍यांशी लक्ष जीव - योनी । उभारिले लोक तिन्ही । जाणीव दिधलई वांटोनी । सकलां ठायीं ॥६॥
विशेष जाणिवेचें स्थान । तो हा नरदेह जाण । येथीचे उत्तम जन । पावती मूळरुपा ॥७॥
अखंडा प्रकृतीचेनि संगें । जाणीवही भंगो लागे । जाणिवेसी करावया जागे । सिध्द पुरुष ॥८॥
जाणीव स्थीर रहावया । वेदें ज्या दाविल्या क्रिया । आचरितां मार्गे तया । विमल ज्ञान होतसे ॥९॥
हरिहर अवतरती । अथवा अंशरुपें अवतार घेती । जाणीवेसी जागविती । वेळोवेळां ॥१०॥
तैसे माझे सद्‍गुरुराव । हनुमदंश स्वयमेव । जगदुध्दाराचें लाघव । करुनी दाविती ॥११॥
एकादश रुद्रहनुमंत । सदाशिव अंश निश्चित । वेळोवेळां स्थापित । भक्ती ज्ञान उपासना ॥१२॥
ऐसे अवतार किती होती । कोणा न करवे गणती । कथानुरोधें उपपत्ती । करूं कांहीं ॥१३॥
त्रेतायुगीं अवनीवरी । दैत्य मातले अहंकारी । विपरित ज्ञानें अघोरी । क्रिया करूम लागले ॥१४॥
वर्णाश्रमांते बुडविती । यज्ञ साधनें तुडविती । दीन अनाथा रडविती । छळ्छळोनी ॥१५॥
गाई ब्राह्मण स्त्रियादिका । छळिती भ्रष्टाविती जे कां । आचरिती नित्य पातका । दुष्टबुध्दी ॥१६॥
कृषिकर्मे मंदावलीं । यज्ञकृत्यें थांबली । रणीं माजों लागलीं । नानाप्रकारें ॥१७॥
भूलोकी केली पीडा । देव लोकांचा चुराडा । मदमत्सर वाढला गाढा । देव बंदी घातले ॥१८॥
रावण कुंभकर्णादि वीर । वरप्रदानें मातले फार । कोणासही सुविचार । सुचो न देती ॥१९॥
लेकुरें दु:खी देखोनि भारी । धरित्री होय घाबरी । गोरुपें सत्यकोकां माझारीं । मुनिगणांसह पातली ॥२०॥
करिती बहू स्तुतिस्तोत्रा । विनविती ते चतुरवक्त्रां । झाकोनि बैसला नेत्रा । ऐसी करुणा भाकिती ॥२१॥
सत्क्रिया राहिली । असत क्रिया वळावली । सैराटवृत्ती चालिली । शास्ता नाहीं ॥२२॥
अज्ञान हें पैसावलें । विपरीत ज्ञानें वेडें केलें । पाप अत्यंत वाढलें । तमोबुध्दी ॥२३॥
दुष्कर्मे करिती गहन । सात्विकांचे करिती हनन । आतां होइना सहन । अति दु:ख होतसे ॥२४॥
याचा करावा विचार । भक्तांसि द्यावा आधार । मर्दोनि ते असुर । सुस्थित करावें ॥२५॥
ब्रह्मा विचारी मानसीं । वरप्रसादें रावणासी । वैभव बल अतिशयेसी । चढलें असें ॥२६॥
याचा प्रतिकार करावया । विनवूं अच्युता लवलाह्या । क्षीरसागरीं । पारले ते अवसरीं । प्रेम भरें गर्जती ॥२८॥
जयजय माधवा मधुसूदना । केशवा गोविंदा नारायणा । महाविष्णू मुरमर्दना । कमलनयना रमापते ॥२९॥
श्रीवत्स कौस्तुभधारी । शेषशायीं अघहारी । विश्वव्यापका श्रीहरी । जगन्नाथा जनार्दना ॥३०॥
भक्तकाजेअकल्पद्रुमा । भक्ताधीन आत्मारामा । भक्त ह्र्दयीं पुरुषोत्तमा । वास तुझा ॥३१॥
गरुडवाहना गरुडध्वजा । असुरांतका अधोक्षजा । पंचानन तूं भवगजा । विदारक ॥३२॥
लक्ष्मी तव चरणांची दासी । नारदतुंबर सुस्वरेसी । गायन करिती अति हर्षी । सदोदित ॥३३॥
कंठी शोभे वैजयंती । सहस्त्र रश्मी परी दीप्ती । नीलवर्ण सुंदर कांती । सदा शांती नांदतसे ॥३४॥
पाहोनिया खिन्न वदन । बोलतसें जगज्जीवन । कवण काजा आगमन । सांगावें सविस्तर ॥३५॥
कमलोद्वव बोले वचन । त्रैलोक्या गांजितसे रावण । पराभवोनी देवगण । बंदिमाजी टाकिले ॥३६॥
अभय देत वैकुंठवासी । भविष्य जाणोनि मानसीं । सूर्यवंशी दशरथकुशीं । घेऊं लीला अवतार ॥३७॥
नामाभिधान श्रीराम । सकलां होईल आराम । देव पावतील स्वधाम । चिंता कांही न करावी ॥३८॥
सकल देवें आपुलिया अंशें । भूमंडळीं कपिवेषें । साह्यार्थ मजसरिसें । अवतरावें ॥३९॥
आज्ञा वंदोनी शिरीं । हर्ष भरित होती अंतरी । निघाले देव सत्वरी । स्वस्थाना पातले ॥४०॥
तेव्हां किष्किंधा नगरीत । देव पातले समस्त । महारुद्र हनुमंत । अंजनी उदरी राहिले ॥४१॥
जन्मतांचि भुभु:कार । नादें दुमदुमिलें अंबर । गिळावयासी भास्कर । उडी घेतली ॥४२॥
झुंजतां तिथें राहू सवें । हनुमंत ऐसें नाम पावे । वळें आगळा स्वभावें । बलभीम जो ॥४३॥
पुच्छें घाली ब्रह्मांडा वेढा । पर्वत उचली धडाडा । राक्षसांचा चुराडा । क्षणामाजीं करितसे ॥४४॥
रावण बधार्थ रघुनंदन । अयोध्येहोनि निघोन । मारोनियां खर दूपण । ऋष्य मूकीं पावलें ॥४५॥
तंव तेथें अकस्मात । भेटते झाले वायुसूत । चरणीं लोटांगण घालित । दास्यत्वाची आदरिलें ॥४६॥
रामसेवे वाचूनि कांहीं । आवडा ज्या जगतीं नाहीं । ऐसा मारुती वज्रदेही । रामनामें गर्जतसे ॥४७॥
शतयोजन जलनिधी । उल्लंघोनि राक्षस मांदी । असंख्य वधोनि दुष्टवुध्दी । सीताशुध्दी केलीसे ॥४८॥
रामकार्या अति तत्पर । रामभजनीं अति सादर । भक्तामाजीं अग्रेसर । वैष्णववीर म्हणवीतसे ॥४९॥
समूळ राक्षसां वधोनी । वानवासव्रत सारोनी । राम बैसले नृपासनीं । जयजयकारें ॥ ५०॥
याचकां दिधली दानें । भक्तालागीं वस्त्रें भूषणें । कामायोग्य गजवाहनें । दिधली अनेक ॥५१॥
समस्तांसी बोळविलें । वस्त्रालंकारीं सुखी केलें । सीतामाईनें पाहिले । हनुमंतासी ॥५२॥
विचार करितसे चित्ती । परमभक्त हा मारुती । सेवा करितां देहस्मृती । न ठेवी हा ॥५३॥
ऐसा हा निष्ठावंत । प्रभुचा प्राण सखाभक्त । पारितोषक या न देत । कवणनिमित्तें कळेना ॥५४॥
कंठींचा हार काढिला । कपीचे गळां घातला । वंदन करुनी चढला । वृक्षाग्रभागी ॥५५॥
विचार करित निजमानसीं । रत्नें दिसती तेजोराशी । अंतरीं आहेत कैशी । फोडिनि पाहूं ॥५६॥
वरी सुंदर दिसतें खासें । अंतरी राम जरी नसे । तरी नाशिवंत ऐसें । ज्ञानी हातीं न धरीती ॥५७॥
वरिवरी श्रृंगारिलें । अंतरीं कुबुध्दीनें भरिले । ते जन नव्हेत चांगले । दूरी धरावें ॥५८॥
अंतर्बाह्य परिक्षी । तोचि चतुर अंतरसाक्षी । नातरी उभयपक्षीं । हानीच होय ॥५९॥
हाती धरोनिया रत्न । मुखीं घालोनि केलें चूर्ण । आंत न दिसें ठाण । श्रीरघुपतीचें ॥६०॥
राम न दिसे तो दगडा । फेकून देई भक्त जाड । याची आम्हा नसेचाड । व्यर्थभार कोण वाही ॥६१॥
चूर्ण करोनि फेकित । तंव जननी । दुरोनि देखत । मनीं खेद मानी बहुत । मर्कटा व्यर्थ रत्नें दिली ॥६२॥
दीर्घ स्वरें पाचारिला । वृत्त जाणोनि प्रश्न केला । तुझे देहीं घनसांवळा । न दिसे कीं ॥६३॥
परिसोनियां वचनासी । कपी विदारी ह्रदयासीं । तंव तेथें दृष्टीसी । रघुनंदन दिसतसे ॥६४॥
वामांकीं जनक दुहिता । दक्षिणभागीं लक्ष्मण भ्राता । भरत शत्रुघ्न हनुमंता । ह्र्दयामाजीं देखिलें ॥६५॥
कंठ सद्वदित झाला । प्रेमपूर नयनीं आला । धन्य भक्त भला भला । शिरोमणी ॥६६॥
प्रभूसी कळली मात । पाचारिलें राजसभेंत । धांवोनि मिठी घालीत । सिंहासन सोडोनी ॥६७॥
देव भक्तांचे ऐक्य झालें । देहभान हरपलें । आनंदें डोलों लागलें । सभाजन तटस्थ ॥६८॥
अंजनीमाय धन्य धन्य । वायु पिता परम धन्य । यासम भक्त नसे अन्य । त्रिभुवनीं ॥६९॥
ऐसी बहुतांपरी बहु स्तुती । करूं लागलें यथामती । नाम आनंदें गर्जती । रघुपतीचें ॥७०॥
आनंद कल्होळा परिसोनी । रामरायें मिठी सोडिनी । सभाजनांसी स्थिरावोनी । सिंहासनीं बैसले ॥७१॥
मग बोले सीतापती । यासी द्यावाअ त्रिजगतीं । वस्तू न मिळे कार्यसम ती अनन्य भक्त प्राणसखा ॥७२॥
आवडी असे तुज भारी । रामकथामृत पान करी । जंव कथा पृथ्वीवरी । तंव श्रवण करावी ॥७३॥
कठिण काळीं साह्य व्हावें । सध्दर्मासि प्रतिपाळावें । राम भक्तीसी लावावें । असंख्य जन ॥७४॥
दुष्ट पातकी दुराचारी । भक्ता छ्ळीती-नानापरी । तयासी तूं निवारी । तपोबळें ॥७५॥
प्रभुनें ठेविला हनुमंत । अंशरुपें तो अवतार घेत । आज्ञा मनी वागवित । स्थापितसे रामभक्ती ॥७६॥
द्वापार युगामाझारीं । बैसोनी अर्जुन स्यंदनावरी । धर्म रक्षणा साह्य करी । बहूं प्रकारं ॥७७॥
गरुड गर्व हरणं केला । भीम गर्व परिहारिला । धनंजवासी दाखविला । भक्तिप्रताप ॥७८॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते प्रथमाध्यायांतर्गत द्वितीयसमास: ओवीसंख्या ७८
॥ श्रीगुरुनाथार्पण्मस्तु ॥
॥ श्रीरामसमर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP