दांभिकास शिक्षा - ६०३१ ते ६०४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६०३१॥
घालुनियां मध्यवर्ती । दाटुनि उपदेश देती ॥१॥
ऐसे पोटभरे संत । तया कैचा भगवंत ॥२॥
रांडा गोविती । वर्षासन ते लाविती ॥३॥
जसें बोलती निरोपणी । तैसी न करिती करणी ॥४॥
तुका ह्मणे तया । तमो गुणि त्यांची क्रिया ॥५॥

॥६०३२॥
भाग्यासाठीं गुरु केला । नाहीं आम्हांसी फळला ॥१॥
याचा मंत्र पडतां कानीं । आमच्या पेवांत गेलें पाणी ॥२॥
गुरु केला घरवासी । आमच्या चुकल्या गाई म्हसी ॥३॥
स्वामी आपुली बुटबुट घ्यावी । आमुची प्रताप टाकुन द्यावी ॥४॥
तुका म्हणे नष्ट । त्यांसी दुणे होती कष्ट ॥५॥

॥६०३३॥
विद्या अल्पपरी गर्व शिरोमणि । मजहूनि ज्ञानी कोण आहे ॥१॥
अंगीं भरला ताठा कोणास मानीना । साधूची छळणा स्वयें करी ॥२॥
साधूचे देहाचा मानी जो विटाळ । त्रिलोकीं चांडाळ तोचि एक ॥३॥
संतांचीं जो निंदा करितो या मुखें । खतेला सकळ पापें तोचि एक ॥४॥
तुका ह्मणे ऐसे मावेचे  मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥५॥

॥६०३४॥
भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥१॥
मनुष्याचे परी बोल रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें ॥२॥
तिमयाचा बैल करी सिकविलें । चित्रीचें बाहुलें गोष्टी सांगें ॥३॥
तुका ह्मणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्तीं निसुगातें ॥४॥

॥६०३५॥
अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भक्तां हातीं चोट आहे ॥१॥
देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसीं पापी पापें लिंपताती ॥२॥
एकीबेकीन्यायें होतसे प्रचित । तेणें लोक समस्त भुलताती ॥३॥
तयांचे स्वाधीन दैवतें असती । तरी कां मरती त्यांचीं पोरें ॥४॥
तुका ह्मणे पाणी अंगारा जयाचा । भक्त कान्होबाचा तोहि नव्हे ॥५॥

॥६०३६॥
ऐसे कैसे झाले भोंदु । कर्म करोनि ह्मणती साधु ॥१॥
अंगा लावुनियां राख । डोळे झांकुनि करिती पाप ॥२॥
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥३॥
तुका ह्मणे सांगों किती । जळो तयाची संगती ॥४॥

॥६०३७॥
झालासी पंडित पुराण सांगसी । परि तूं नेणसी मी हें कोण ॥१॥
गाढवभरी पोथ्या उलथिशी पानें । परि गुरुगम्यखुणे नेणशी बापा ॥२॥
तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरिनाथ विसंबेना ॥३॥

॥६०३८॥
कीर्त्तनाचा विकरा मातेचें गमन । भाड खाई धन विटाळ तो ॥१॥
हरिभक्ताची माता हे हरिगुणकीर्त्ति । इजवर पोट भरिती चांडाळ ते ॥२॥
अंत्यज हा ऐसें कल्पांती करीना । भाड हे खाईना जननीची ॥३॥
तुका ह्मणे त्याचें दर्शन ही खोटें । पुर्वजांसि नेटें नरका धाडी ॥४॥

॥६०३९॥
जळोजळो तें गुरुपण । जळोजळो तें चेलेपण ॥१॥
गुरु आला वेशीद्वारीं । शिष्य पळतो खिंडोरीं ॥२॥
काशासाठीं झालें येणें । त्याचें आलें वर्षासन ॥३॥
तुका म्हणे चेला । गुरु दोघे हि नरकाला ॥४॥

॥६०४०॥
शिष्या सांगे उपदेश । गुरुपूजा हे विशेष ॥१॥
दावी आचार सोंवळे । दंड कमंडलु माळे ॥२॥
छाटी भगवी मानसीं । व्यर्थ ह्मणवी संन्यासी ॥३॥
तुका ह्मणे लोभ । न सुटे नाहीं लाभ ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP