श्रीहरिनारायण

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


ज्यांच्या हरिनारायण हे क्षुधितांच्या जसेंचि अन्न मनें ।
बहु मानिले अहर्निश , त्यास शताधिक असोत मन्नमने ॥१॥
श्रीहरिनारायण हे महान सत्पुरुष सुमारे २५० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांची दोन ओवीबध्द चरित्रे, त्यांच्या शिष्यांनी लिहिलेली उपलब्ध असून, त्यांपैकी ’शामराज’ नामक शिष्याने लिहिलेल्या चरित्राची ओवीसंख्या २७३ आहे. दुसर्‍या चरित्राचे पहिले आठच अध्याय सांपडले त्यांत एकंदर ६५० ओव्या आहेत. पुढील अध्याय सापडल्यावांचून ह्या चरित्राचा पूर्ण उपयोग होणे शक्य नाही. ’शामराज’ कृत चरित्रातील माहिती व माझे मित्र रा. अ. बा. रसाळ, या शोधक गृहस्थांनी संगृहीत केलेली माहिती यांच्या आधाराने प्रस्तुत चरित्रलेख लिहीत आहे.
श्रीहरिनारायण हे देवर्षि नारदाचा अवतार. प्रसिध्द संत गोरोबा कुंभार यांचे वास्तव्यस्थल जे सत्यपुरी उर्फ़ तेर नामक गांव तेथे, अश्वलायन शाखीय नारायण देशपांडे यांच्या पत्नीच्या पोटी ’गुरुवारी’, फ़ाल्गुन शुध्द तृतीयेस त्यांचा जन्म झाला. जन्मशक उपलब्ध नाही. ह्यांची मूळ नांवे निराजी व नाभाजी अशी होती, पण त्यांच्या अनंत नामक चुलत्याने त्यांस दत्तक घेतले तेव्हा त्यांचे ’हरि’ असे नाव ठेवण्यात आले. हे लहानपणापासून विरक्त होते. त्यांच्या पत्नीचे नांव अन्नपूर्णाबाई. हरिनारायण ह्यांच्या दया-दातृवादि गुणाच्या अतिरेकाने वडिलोपार्जित द्रव्य खर्च झाल्यामुळे घरात तंटे होऊन ते सपत्निक तीर्थयात्रेस निघाले.
उत्तर हिंदुस्थानातील सर्व तीर्थ करुन स्वामी जोगाईच्या आंब्यास आले. तेथे कुटुंवास ठेवून दक्षिण दिशेकडे तीर्थयात्रेस निघाले. वाटेत नीरानरसिंगपुरी संगमामध्ये त्यांस नारदाचा उपदेश झाला. नंतर कृष्णेच्या कांठची सर्व क्षेत्रे पहात असतां कृष्णा वेणीसंगमी छत्रपति महाराजांस त्यांचे दर्शन झाले. पुढे रामदासपंचायतनांतील सत्पुरुषांच्या त्यांनी भेटी घेतल्या. स्वामीस घरांतून बाहेर पडण्यास जो प्रसंग कारणीभूत झाला त्यांचे ’शामराज’ यांनी येणेप्रमाणे वर्णन केले आहे;- हरिनारायणाचे चुलते अनंत जिवाजी यांस पुत्रसंतान नसल्यामुळे त्यांनी हरिनारायण यांस दत्तक घेतले; परंतु पुढे वृध्दापकाली अनंत जिवाजी यांस पुत्र झाल्यामुळे , हरिनारायणाविषयी त्यांच्या मनांत साहजिकच वैषम्य उत्पन्न झाले. मग
"तो एके दिवशी भोजनासी । बैसले स्वामी सावकाशी ।
माता पिता बोलती त्यांसी । अति कुशब्द निष्ठुरत्वे ॥
म्हणती, पोसणे दिल्हे आम्हांसी । ऊठ वेगी काय जेविसी ।
हाती धरोनि स्वामीसी । पात्रावरुनि उठविले ॥
घालुनि व्दाराबाहेरी । म्हणे जाय दुरीच्या दुरी ॥
तोंड न दाखवी सत्वरी । कठीण हस्ते ताडिले ॥
ते साहोनि तये वेळी । विचारुनियां ह्र्दयकमळी ।
म्हणे परमार्था जाली दिवाळी । अति आनंदे डोलत ॥"
येणेप्रमाणे द्त्तक पित्याने स्वामीची घरांतून उचलबांगडी केल्यावर ते आपल्या जनक पित्याच्या घरी आले; परंतु त्यानेही "म्हणे जाई तू वनासी । निरुपयोगी सर्वस्वे " असे म्हणून त्यांस हांकून लाविले. तेव्हा ’आपली आज्ञा मला शिरसामान्य आहे’ असे म्हणून स्वामींनी पितृचरणावर आपले मस्तक ठेविले;  व आईचा निरोप घेण्यासाठी ते तिच्या भेटीस गेले. मुलाची ह्कीकत ऐकून त्या माऊलीस फ़ार कळवळा आला व तिने मुलाची व आपल्या पतीची समजूत करुन स्वामीस घरीच ठेवून घेतले. शामराज म्हणतात
ओव्या
" ऐकूनि माता व्याकुळ मने । शांतवी पुत्रा प्रबोध करुन  ।
म्हणे हे न मानी अंत:करणी । वडील बोलिले जे काही ॥
तूतें देखोनि उदासता ॥ माते नाठवे देहगेहवार्ता ।
नवसे सायासे जोडिलासि थिता । जातां ऐसे पुससी ॥
प्रपंची विषयसंभ्रम । कोणा नाठवे धर्माधर्म ।
यालागी तुवां धरुनि उपरम । शांती अंगे धरावी ॥
शांती सुखासी कारण । शांति योगाचे निजभूषण ।
शांती साधका समाधान । अवश्य जाण होतसे ॥
ऐकोनि मातेची अमृतगिरी । सुटला वैराग्यसंतवारा ।
ज्ञानांकुरे फ़ुटला खरा । विवेकद्रुम लसलसित ॥
मग कांही दिवसांनी हरिनारायणाचे वडील सहकुंटुंब काशीयात्रेस गेले. इकडे हरिनारायणानी व्रतोद्यापन, ब्राह्मणभोजन, भजन पूजन वगैरे सत्कत्यांत आपला काळ क्रमिला. कांही दिवसांनी आईबाप काशीयात्रेहून परत आले, तेव्हा त्यांस घरी आणण्यासाठी वैष्णवांचा मेळा घेऊन नामघोष करीत स्वामी गांवाबाहेर गेले. पुढे त्यांचे वडील घरी आल्यावर, भजनपूजनांत आणि ब्राह्मणभोजनांत मुलाने घरांतले सगळें द्रव्य खर्चून टाकलें आहे असे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले.
"क्रोधे संतप्त पिता जाण । येऊनि पुत्रा बोले वचन ।
बरेच केले गृहरक्षण । ऊठ वेगे म्हणतसे ॥
तुवां करावा अरण्यवास । न दाखवी आपुले मुखास ।
ग्रामांतरी करितां वास । आण आमुची निर्धारे ॥"
पित्याने अशी शपथ घातल्यावर , ब्रह्मानंदात अगोदरच रंगलेले स्वामी प्रपंचात कसे राहतात? त्यांनी तात्काळ मातापित्यांचा निरोप घेऊन प्रयाण केले. मागून त्यांची पत्नी अन्नपूर्णाबाईही निघाली. या प्रसंगी त्या जोडप्याचे जे भाषण झाले ते वाचण्यासारखे आहे :-
" तो पतिव्रतांमाजी शिरोमणी । अन्नपूर्णा चिच्छक्ति जननी ।
पतीचे प्रयाण ऐकूनी । उठाउठी चालिली ॥
पुढे स्वामी चालताती । पाठी अन्नपूर्णा सती ।
पालव मोकळे सांवरीत । सद्भद कंठ जाल्हासे ॥
येऊनिया पतिजवळी । मस्तक ठेविला चरणकमळी ।
येरे धिक्कारोनी तये वेळी । मजपाठी तुवां न यावे ॥
ऐकूनि पतीचें भाषण । अश्रुधारा श्रवती नयन ।
ह्स्त जोडोन बोले वचन । ऐका माझे स्वामिया ॥
आपण उदास होऊनि जाण । चालिलेति मज टाकोन ।
मी कोणा पाहून कंठू जाण । गृहव्यापार किमर्थ ॥
मत्स्य काढिला जळाबाहेरी । काढोनि टाकिला दुग्धसरोवरी ।
जो जीवन पावे कैशापरी । तैसे जाले स्वामिया ॥
स्वामी म्हणती तियेलागुन । तुझा पिता अतिसंपन्न ।
तयाचे आश्रमी जाऊनि जाण । तुवा रहावे सत्वर ॥
येरी ऐकोनि बोले अचन । म्हणे स्वामी स्वहस्ते जाण ।
करावे माझें प्राणहनन । परी वियोगदु:ख न द्यावे ॥
स्वामी म्हणती आम्ही उदास । तूं सकुमार अति सुरस ।
किमर्थ भोगिसी वनवास । आमुचे संगती अतिदु:ख ॥
यावरी बोले पद्मनयना । सुखदु:खभोग प्रारब्धाधीन ।
जे जे वेळे होणार जाण । ते ते अनायासे होतसे ॥
आपण जातां वनांतरी । मज घालुनि विरहसागरी ।
ऐसे बोलोनि ते अवसरी । मिठी घातली चरणांसी ॥
नेत्रेजळे चरणक्षाळण । अंगुष्ठ घातला मुखी जाण ।
गहिवरें दाटले अंत:करण म। उकसाबुकसी स्फ़ुंदत ॥"
पत्नीची ही एकनिष्ठता पाहिल्यावर, क्षणभर परीक्षणार्थ कठोरता धारण करणार्‍या स्वामींचे अंत:करण उचंबळून आल्याशिवाय कसे राहील?
"कृपादृष्टि पाहे स्वामिया । तो स्वच्छ अंत:करण देखोनियां ।
आपणसन्निध बैसवोनिया । गौरविले स्वहस्ते ॥"
इकडे हरिनारायण ग्रामत्याग करुन गेले, हे वृत्त ग्रामस्थांस कळतांच ते स्वामींच्या दर्शनार्थ त्यांचा शोध करीत निघाले. तो एका वृक्षाखाली हरिनारायण व अन्नपूर्णाबाई ही त्यांच्या दृष्टीस पडली. त्यांस साष्टांग वंदन करुन "महाराज, घरी चलावे." अशी लोकांनी त्यांस विनंती केली. तेव्हा स्वामी म्हणाले" बंधु हो, ’तूं घरांतून चालता हो,’ अशी आज्ञा वडिलांनी मला केली आहे, ती मोडतां येत नाही." मग गावांतील लोक स्वामीपाशी तीन रात्री राहिले व नंतर त्यांचा सप्रेम निरोप घेऊन परत गेले. कांही गरीब ब्राह्मणांनी स्वामीपाशी दक्षिणा मागितली, तेव्हा अन्नपूर्णाबाईने आपल्या अंगावरचे दागिने काढून दिले !
पुढे लेखारंभी सांगितल्याप्रमाणे स्वामी सपत्निक काशी, प्रयाग वगैरे उत्तर यात्रा करुन जोगाईच्या आंब्यास आले व तेथे पत्नीस ठेवून आपण वनांत गेले. तेथे एका पुण्याश्रमात त्यांनी व्दादश वर्षे अनुष्ठान केले. तेव्हा देवीचा साक्षात्कार झाला की, ’तूं नृसिंहपुरास जा म्हणजे तेथे साक्षात्कार होऊन सद्गुरुचा अनुग्रह होईल.’ त्याप्रमाणे स्वामी अन्नपूर्णाबाईसह नीरानरसिंगपूर येथे गेले. तेथे एके दिवशी पहाटेस, स्वामी संगमोदकांत ध्यानस्थ बसले असता अकस्मात नदीस मोठा पूर येऊन , स्वामींच्या डोक्यावरुन पाणी जाऊ लागले. ते पाहून , स्वामींची पत्नी गांवांत हो्ती तिला लोकांनी सांगितले की, "भर्ता तुमचा बुडाला." तेव्हा ती पतिव्रता अत्यंत शोकाकुल होऊन पतिप्राणरक्षणार्थ श्रीनृसिंहाची प्रार्थना करुं लागली. इकडे संगमोदकात -
"नारदस्वरुपे श्रीभगवान । येते जाले आनंदेकरुन ।
तो निराजी समाधिस्थ पूर्ण । सावध केले तयासी ॥
ब्रह्मवीणा देऊनी पाणी । तत्वमसि वाक्य सुचवुनी ।
हरि नारायण हे भजन श्रवणी । सांगितले सद्भावे ॥"
या प्रसंगी स्वामी सात अहोरात्र संगमोदकांत समाधिस्थ होते. पाण्यास आलेला पूर ओसरल्यावर, ग्रामस्थ लोकांनी, स्वामी ज्या ठिकाणी बुडाले होते, तेथे येऊन पाहिले -
उदकी वाहवला ब्राह्मण । ऐसे बोलती सर्वजन ।
तो अकस्मात स्वामीस देखोन । ह्मणती अपूर्व जाहले ॥
हरि नारायण हे भजन । हाती टाळवीणा जाण ।
घवघवीत मूर्ति संपूर्ण । दुरुनि पाहती सर्वही ॥
धावोनि आले तयाजवळी । मस्तक ठेविता चरणकमळी ।
ह्मणे धन्य धन्य ये काली । विजयी जाला नारायण ॥
मग स्वामी तेथून उठले व देवळांत जाऊन त्यांनी नृसिंहाचे दर्शन घेतले. इतक्यात अन्नपूर्णाबाईने येऊन स्वामींचे पाय धरले. नरसिंगपूर येथे स्वामींनी एक वर्ष वास्तव्य केले व तेवढ्या वेळांत पुष्कळ लोक त्यांचे शिष्य झाले. अन्नपूर्णाबाईसही गर्भधारणा होऊन पुत्ररत्न झाले. त्यांचे नांव स्वामींनी प्रर्‍हाद असे ठेविले; परंतु त्याचे आयुष्य फ़क्त तीनच महिने असल्यामुळे प्रर्‍हाद हे नांव त्यास शोभत नाही, असेही त्यांनी अन्नपूर्णाबाईस सांगितले. पुढे धारासीव येथे जाऊन तेथील विवरांत स्वामीनी मुक्काम केला. स्वामींचे स्वरुप वर्णन शामराज यांनी येणेप्रमाणे केले आहे :-
"गळा शोभे तुळसीमाला । दाढी नेत्र विशाळ ।
गौरवर्ण नासिक सरळ । शोभे कौपिन कटीसी ॥
उदर विशाळ दोंदिले । पवित्र यज्ञोपवित घातले ।
सरळ दोर्दंड तेजागळे । पत्र पद्मासन विराजे ॥
मस्तकी शोभे सुरस भगवे । मेखळा अंगी दिसे बरवी ।
हाती टाळ वीणा वाजवी । नाम गातसे सुस्वर ॥
भाळी रेखिला पौड्र तिलक । चिन्मय मूर्ति अलोकीक ।
आतोनी इंद्रनीळ देख । ऐसे स्वरुप स्वामींचे ॥
धाराशीव येथे बरेच दिवस वास्तव्य केल्यावर स्वामी पुन: तीर्थ यात्रेस निघाले. दर आषाढी कार्तिकीस स्वामी पंढरपुरास श्रीपांडुरंग दर्शनास जात असत. एका आषाढी यात्रेच्या वेळी असा प्रकार घडला की, स्वामी भीमेच्या पैलतीरी असता नावाडी नौका घेऊन परतीरास गेला. आज एकादशी असून , पंढरीनाथाचे दर्शन आतां आपणास होत नाही, असे स्वामीस वाटले. मग त्यांनी चंद्रभागेला नमस्कार करुन, पाण्यावर मृगासन ठेवले व त्यावर पद्मासन घालून भजन करीत चालले ! पैलतीरावरील संतमहंतांनी हा देखावा पाहून मोठे आश्चर्य केले. नंतर काय झाले ते शामराज सांगतात -
घेतले पांडुरंगदर्शन । प्रेमे केली प्रदक्षिणा ।
साक्षात पूर्ण परब्रह्म भगवान । येऊनि स्वामीसि बोलती जाण ।
ह्मणे तुमची वारी पावली संपूर्ण । प्रेमालिंगन दीधले ॥
कार्तिकी आषाढी एकादशी । आह्मी येऊ तुह्मापाशी ।
भाक देऊनि स्वामीसी । जाते जाले राऊळा ॥
पुढे स्वामी आषाढी कार्तिकी एकादशीचा उत्सव आपल्या वास्तवस्थानी दरवर्षी नियमाने करीत असत. स्वामींची भीमरथी नामक एक कन्या होती , तिचा पती मृत झाला. तेव्हा तिच्या घरी जाऊन तिला घेऊन स्वामी भीमानीरासंगमावर आले व तेथे त्यांनी तिला उपदेश दिला. तेथून दक्षिणेस शेषाद्रि, सेतुबंध, रामेश्वर व कार्तिकस्वामी ही क्षेत्रे करुन स्वामी पंचगंगातीरी कोल्हापूर क्षेत्री आले. तेथून जोतिबाच्या डोंगरावर जाऊन कृष्णावेणीसंगमी आल्यावर तेथे छत्रपतींची भेट झाली. छत्रपतीनी पुष्कळ द्रव्य आणून स्वामीपुढे ठेविले, ते त्यांनी ब्राह्मणास वाटून दिले. स्वामींची वैराग्यवृत्ती व साधुत्व पाहून छत्रपतींनी त्यांस आपल्या सन्निध राहण्याची विनंती केली, परंतु स्वामींनी ती मान्य केली नाही. आपणा उभयता पतिपत्नीच्या मूर्ति करुन त्यांची स्थापना छत्रपतींकडून त्यांनी करविली. पुढे स्वामी परळीस गेले व तेथे श्रीसमर्थ रामदासस्वामींचे त्यांनी दर्शन घेतले. तेथून निगडीस जाऊन रंगनाथस्वामीस भेटले. पुढे वडगांव व ब्रह्मनाळ तेथे जाऊन जयरामस्वामी व आनंदमूर्ति यांचे दर्शन स्वामींनी घेतले. पुढे नरसोबाची वाडी, कर्‍हाड, आळंदी, देहू, चिंचवड इत्यादी पुण्यस्थले पाहून स्वामी पुन: नरसिंगपुरास गेले. तेथे श्रीनृसिंहाचे दर्शन घेऊन त्यांची पत्नी अन्नपूर्णाबाई व कन्या भीमाबाई ह्या ज्या ठिकाणी होत्या तेथे स्वामी गेले व आपला समाधिकाल सन्निध आल्याचे अन्नपूर्णाबाईस त्यांनी कळविले. तेव्हा बाईंनी स्वामींच्या आज्ञेने ’श्रावण शुध्द पौर्णिमा ’ रोजी स्वर्गगमन केले -
काया वाचा आणि मने । न्याहाळिले स्वामीचरण ।
मुखे करीत नामस्मरण । नारायणरुप जालीसे ॥
अन्नपूर्णाबाई निधन पावताच भीमाबाई फ़ार शोक करुं लागली. तेव्हा-
नश्वर देह पांचभौतिक । जाले मेले यदर्थी शोक ।
करुं नये सर्वथा देख । कन्येप्रति अनुवादे ॥
म्हणे धन्य धन्य ऐशी सती । नाही ऐकिली पाहिली त्रिजगती ।
इच्छामात्रे देह सोडिती । नवल वाटे मानसी ॥
इत्यादि शब्दांनी स्वामीनी तिचे समाधान केले. नंतर आपला प्रयाणकाल अगदी सन्निध आल असे जाणून स्वामी सर्व मंडळी सहवर्तमान ’वैनवटी’ (बेनवडी) क्षेत्री आले. तेथे भागीरथीस्नानाची उत्कट इच्छा स्वामीस झाली. तेव्हा असा चमत्कार घडून आला की
मूर्तिमंत येऊनि गंगावती । चरणाप्रति लागली ॥
धन्य धन्य तो पुण्यकाल । धन्य तयांचे जातिकुळ ।
स्नान करोनि गंगाजळी । बैसले असती ते ठायी ॥
तो सकळ शिष्यसमुदाय । जोडोनि उभे करव्दय ।
म्हणती दयाळा स्वामीराया । कृपादृष्टी अवलोकी ॥
स्वामी म्हणती तयांलागुन । तुम्ही करावे नामस्मरण ।
ज्याची जैसी भावना पूर्ण । तैसे फ़ल तयासी ॥
ऐकोनियां अमृतवाणी । शिष्यी मस्तक ठेविले चरणी ।
स्वामी आह्मांसी टाकुनी । केउते जातां दयाळा ॥
ऐकोनी तयांचे बोलणे ऐका म्हणती सावधान ॥
आह्मासि करणे आहे प्रयाण । निर्धारेसी जाणावे ॥
वियोगदु:ख जाणुनी । सकळिकांचे अश्रु लोचनी ।
स्तुति करिती मुखेकरोन । नामगर्जना करितसे ॥
नारायण हरि नारायण । ऐसे करिता हरिकीर्तन ।
स्वामी डोलती प्रेमेकरुन  । अतिउत्साह मानसी ॥
स्नानसंध्या देवतार्चन । करुनि शुध्द आचमन ।
आसन घातले चैलाजन । मृगासन त्यावरी ॥
वरी घातले कंबलासन । त्यावरी धौतवस्त्र जाण ।
घालुनियां पद्मासन । योगायोग आरंभिला ॥
सुवर्णमय अंगकांती । प्रदेशी प्रभा फ़ांकती ।
तेज प्रकटले अति निगुति । ब्रह्ममूर्ति मूर्तिमंत ॥
ऐसे समाधि लावून । अर्धोन्मिलित नेत्र जाण ।
स्वामी पावले अंतर्धान । शक शालिवाहन विश्वावसूशी ।
फ़ाल्गुन शुध्द चतुर्थी शिशिर ऋतूसी । आश्विनिसी गमन केले ॥
याप्रमाणे , शके सोळाशे सत्तेचाळीसांत स्वामी बेनवडी मुक्कामी समाधिस्थ झाले. वरील माहिती व ओव्या स्वामीच्या ज्या ओवीबध्द चरित्रातून घेतल्या आहेत, त्या चरित्राचे कर्ते शामराज हे हरिनारायणाचे शिष्य होते हे पूर्वी सांगितलेच आहे; व " सोहं मंत्र सद्गुरुराये । हरिनारायण प्रेमभावे । उपदेश करिती सहजान्वये । शामराज सेवका " या ओवीत, स्वत:स हरिनारायणांनी उपदेश दिल्याची गोष्ट शामराज यांनी निर्दिष्ट केली आहे.
स्वामीचे दुसरे एक अपूर्ण ओवीबध्द चरित्र उपलब्ध असल्यांचे पूर्वी सांगितले आहे, त्यांत कर्त्याने "शिव सद्गुरुप्रसादे । दास वदे श्रोतया ॥" या शब्दांनी स्वत:चा उल्लेख केला आहे. सदर चरित्राचे जे आठ अध्याय उपलब्ध झाले आहेत, त्यांच्या ६५० ओव्यात , आरंभी संक्षिप्त पूर्वेतिहास देऊन स्वामींच्या तीर्थाटनाचे वर्णन केले आहे. तेरगांवानजीक उत्तरेश्वर महादेव आहे तेथे स्वामींनी अनुष्ठान केल्याचे सांगून उत्तरेश्वरी स्वामींनी बांधलेली पवळ माळावर अद्याप आहे, पुढे धाराशिव व तेर यांच्या दरम्यान डोंगरांत बुटेदरडीत स्वामीनी तीन महिने अनुष्ठान केले. अंगास वाळवी लागली. तेथे दृष्टांत झाल्यावर काळेश्वरी गोरोबा कुंभारांची समाधी आहे तेथे स्वामी आले. काळेश्वराच्या देवळात स्वामीवर सर्पाने फ़णा धरलेली तेथील गुरविणीने पाहिली. काळेश्वरी असतां जगन्नाथस्वामी उर्फ़ जगजीवन यांची भेट झाली. नंतर तीर्थयात्रा करीत करीत स्वामी नृसिंहपुरास आले. तेथे तपाचरण केल्यावर नारदांनी प्रत्यक्ष उपदेश केला. इतका कथाभाग त्यात वर्णन केला आहे.
वरील माहितीशिवाय रा. रसाळ मास्तर यांनी स्वामीच्या शिष्य सांप्रदायांत ह्मणजे बेनवाडी, ब्रह्मगांव, अष्टें (हरिनारायणाचे) इत्यादी ठिकाणी शोध करुन जी माहिती मिळविली ती येणेप्रमाणे - "स्वामीच्या समाधीविषयी अशी एक कथा प्रचलित आहे की, ब्रह्मगांव येथील निंबाळकर मराठ्यांपैकी तुळसाबाई नावाची एक बाई स्वामीची शिष्यीण होती. निंबाळकरांकडे त्या वेळी ब्रह्मगांव, भाळ्वणी, अष्टें वगैरे गांवची देशमुखी व जहागीर होती. तुळसाबाईला स्वामींनी असे वचन दिले होते की, मी शेवटी तुझ्या गांवी देह ठेवीन. पुढे स्वामी बेनवडीस समाधिस्थ झाल्याचे बाईस समजतांच ती लवाजम्यासह बेनवडीस गेली; आणि स्वामींचे शव पालखीत घालून अष्ट्यास येण्यास निघाली. तो वाटेत सीना नदीच्या कांठी खडकत ह्मणून गांव लागते तेथील लोकांनी स्वामीचे प्रेत जाऊं देण्यास हरकत केली. तेव्हा आपले गांवी स्वामीची समाधी व्हावी हा आपला हेतु आतां शेवटास जात नाही ह्मणून बाईस फ़ार वाईट वाटले. तिचा हेतू जाणून हरिनाराणस्वामी पालखींत उठून बसले, हे पाहून खडकतकरांनी, केलेल्या आगळिकीबददल माफ़ी मागून स्वामीस नैवेद्य वगैरे करुन रवाना केले. नंतर अष्ट्यास आल्यावर स्वामीनी बाईस विचारुन तेथे पुन:देह ठेविला; व पूजा आणि उत्सव करण्याचे काम रानडे उपनामक कोकणस्थ ब्राह्मण शिष्याकडे सोपविले. याच शिष्याच्या वंशजांकडे अष्टें व आणखी एकदोन गांवे जहागीर आहेत. ह्या अष्ट्यास ’हरिनारायण्चे अष्टें ह्मणतात. ते मोगलाईत बीड जिल्ह्यात अष्टी तालुक्यात आहे. हरिनारायण स्वामी पंढरीची वारी करीत असत. त्यांच्या आज्ञेवरुन अष्टे येथे आषाढ वद्य ११ रोजी उत्सव होत असतो. बेनवडी हे लहानसे खेडे, ता. कर्तज, जिल्हा नगर, पैकी राशीन गांवाजवळ आहे. तेथे स्वामीचा मठ आहे. स्थान रमणीय आहे. येथे स्वामींचा अंत शके १६४७ त झाला. तेथेही स्वामींच्या पुण्यतिथीचा उत्सव दरसाल होतो व त्या प्रीत्यर्थ बेनवडी गांव जहागीर आहे. बेनवाडीचे गोसावी जहागीरदार हे हरिनारायणाच्या कन्येच्या वंशजांपैकी आहेत. त्या काळी हरिनारायनास नारदांचा अवतार समजत व बेनवडी, अष्टें व संगम माहूली येथे ज्या हरिनारायणाच्या मोठाल्या दगडी मूर्ति आहेत, त्या हुबेहुब नारदांच्या मूर्तीप्रमाणे ह्मणजे हातांत वीणा, चिपळ्या, शेंडी वगैरे सर्व नारदाप्रमाणे. अशीच एक मोठी मूर्ती खर्डे येथे ओंकारेश्वराचे देवालयात आहे. हरिनारायणाचे शिष्य सुलतानराव अप्पासाहेब निंबाळकर होते त्यांनी खर्डे गांवची वसाहत करुन शके १६६५ त खर्डे येथे भुईकोट किल्ला बांधिला व पूजेकरिता आपल्या गुरुची ही मूर्ती स्थापिली. हरिनारायणाच्या कवितेपैकी नामामृतलहरी नांवाचा लहानसा  ग्रंथ मिळाला आहे. खेरीज अभंग व पदें ब्रह्मगांवकर हरिदास यांच्या संग्रही पुष्कळ आहेत. खेरीज अभंग व पदे ब्रह्मगांवकर हरिदास यांच्या संग्रही पुष्कळ आहेत. बेनवडी येथे यांचे काही ग्रंथ आहेत पण ते तूर्त मिळण्याजोगे नाहीत. त्यांच्या सांप्रदायात "अन्नपूर्णापते हरिनारायण " अशी मंगल गर्जना करण्याची चाल आहे. त्यांच्या सांप्रदायातील हरिदास लोक कीर्तनाच्या प्रारंभी खालील पद्य सुस्वर म्हणतात -
पद
हरिनारायण दुरितनिवारण, परमानंद सदाशिव शंकर ।
भक्तजनप्रिय पंकजलोचन, नारायण तव दासोहम् ।
हरि सांप्रदायात स्वामीच्या वर्णनाचे पुष्कळ श्लोक सापडतात ते त्यांच्या शिष्यानी केलेले असावेत.

श्लोक.
आले स्वामी यात्रेसि आषाढमासी ।
भिमा चालली पूर्ण दोही थडीशी ॥
हातीं टाळ वीणा हरीनाम मूखी ।
उडी टाकिली पाहिली सर्व लोकी ॥१॥
न जाणे मी काही तव गुणकथावर्णनविधी ।
विधीदी जो सर्वो न पवति तुझा पार उदधी ॥
स्वसंवेद्या आद्या सगुण प्रतिपाद्या सुरविभो ।
दिनाच्या दातार नमन हरिनारायणप्रभो ॥२॥
अवतार जाला मुनि नारदाचा ।
ज्याला अनुग्रह असे मुनि नारदाचा ॥
जेणे भजनमार्ग जगि वाढवीला ।
अनुदिनि भजा त्या हरिनारायणाला ॥३॥
या शेवटच्या श्लोकात वृत्तभंग पुष्कळच झालेला दिसतो. ’दासगणू’ या विद्यमान संतचरित्रलेखकांनी आपल्या अर्वाचीन भक्तविजयांत , तिसर्‍या अध्यायांत श्रीहरिनारायणचरित्र संक्षेपाने दिले आहे ते जिज्ञासूंनी अवश्य पहावे.
प्रस्तुत चरित्रनायक हरिनारायणाशिवाय, दुसरे एक हरिनारायण नामक सत्पुरुष महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. महाराष्ट्र-कवि--चरित्राच्या पहिल्या भागांत हरि अंगापूरकर नामक कवींचे चरित्र दिले आहे. त्यात या दुसर्‍या हरिनारायनाचा उल्लेख आहे.
आता स्वामीच्या ’नामामृतलहरी’ ग्रंथातले व फ़ुटकळ कवितांतले कांही वेंचे देऊन हा लेख पुरा करतो. स्वामींची ही सर्व कविता अद्याप अप्रकाशित आहे.
’नामामृतलहरी’ च्या ओव्या ४०२ असून त्यात अध्यात्माचे उत्कृष्ट विवेचन केले आहे. ग्रंथारंभीचे सद्गुरुस्तवन पहा -
ॐ नमो सद्गुरु परिपूर्णा । निरुपम निर्विकार निर्गुणा ।
न खंडता अखंडपणा । होसी देखणा तुजचि तू ॥
तूं आत्मलिंग आराध्य । स्वयंज्योति स्वसंवेद्य ।
तूं नित्यानंद जगदाद्य । स्वयंबोध वोध्य तूं ॥
तूं अनिर्वचनीय परिवाचक । कांही न करितां चाळक ।
तूं आद्यती एक । हेही साशंक म्हणावे ॥
तूं सहजीं सहज परमानंदा । परमपुरुषा अनादि सिध्दा ।
परात्परबोधे अभयवरदा । आत्मसंपदासुखदानी ॥
तूं अव्दयानंद ज्ञानघन  । करिसी शिष्यचातकतृषाहरण ।
भक्तकाजकैवारा पूर्ण म। दाविसी सगुण चरित्रे ॥
तूं अवाप्त पूर्णकाम । सकळ भूतांचा विश्रामधाम ।
जगज्जीवन तू आत्माराम । सोहं आराम विसावया ॥
येकानेकपणेसी । तूंचि नटनाट्य दाविसी ।
प्रकृति पुरुष अभिन्नतेसी । विश्वविलासी विलासिया ॥
शब्दब्रम्हाचा उगम । प्रणवरुप वेदैकनाम ।
तयाचेंही बीज परम । तूं पुरुषोत्तम गुरुराया ॥
जे देशकालवर्तमानावच्छिन्न । अखंडैक्यस्वरुपे विद्यमान  ।
तो तू आपाआपणियामाजी सुखसंपन्न । अससी पूर्ण पूर्णत्वे ॥
त्या तुझी सत्य स्वरुपस्थिति | बोलों जातां वेदश्रुति ।
त्याही परतल्या नेति नेति । तेथ मी किती वर्णाव्या ॥
येथ स्तव्य स्तवकु होनि ऐसे । तुज संतोषवूं स्तवनोद्देशे ।
तवं स्तवावया दुजें न दिसे । मी नि:शेषे हारपे ॥
मी येकु असावा दुसरा । तरी यावे की स्तवनव्दारा ।
यालागी स्तव्यस्तोता स्तवनाधारा । मूळ एकसरां तूं होसी ॥
श्रोत्रा तुझेनि श्रोतव्यपण । त्वचा तुझेनि स्पर्शज्ञ ।
चक्षुसी तुझेनि लक्षुपण । जिव्हा रसज्ञ तुझेनी ॥
घ्राणा तुझेनि आघ्राणता । मना तुझेनि मतव्यता ।
बुध्दिसी तुझेनि बोधव्यता । चित्ता चेतव्यता तुझेनि ॥
ऐसा सर्वेद्रियी समसमान । सर्वप्रकाशक तूं आपण ।
तेथ दुजे करुनि स्तविते कोण । कोईसेनी भजन करावे ॥
यालागी शब्दादि विषय इंद्रियज्ञाने । भजनार्ह नव्हती स्वतंत्र गुणे ।
तेथ उदधीमाजी मी तरंगपणे । क्रिडा संपूर्ण करी तुझे ॥
धरुनी निजरुपाची सोये । नामोच्चारे आळवू पाहे ।
तेथेचि प्रगट आहासि ठाये । अंतर्बाह्य व्यापका ॥
येर्‍हवी नामरुप दोन्ही । जालीं कल्पनेपासूनी ।
नि:शेष पाहतां तुझ्या गुणी । नामरुप दोन्ही नास्तिक ॥
नास्तिकचे नास्तिक । सोडोनि उरले जे आस्तिक ।
ते तूं ब्रम्हनामें एकला एक । ज्ञानटिळक निजात्मा ॥
प्रतिबिंबाचे आभासकपण । ते मुख्य बिंबचि कारण ।
बिंब हेही बाचारंभण । होणेन विण आभासिका ॥
जग लक्षितां लक्षांशे । तवं लक्ष्य लक्षण तूंचि नि:शेषे ।
तेथ लक्ष लक्षणा करुनि ऐसे । दुजें काइसे लक्षावे ॥

"नामामृतलहरी" ग्रंथाच्या उपसंहारात ग्रंथरचनेचे प्रयोजन सांगून, थोडेंसे आत्मवृत्तही स्वामीनी दिले आहे.
" जो जनी जनार्दन चोरिला । तो माग लावून दिजे वहिला ।
ना तरी चोरीचा आळ येईल तुला । म्हणूनी केला प्रबोध ॥
तेवी संत पाठीराखे पाठीसी । माग काढिला स्वरुपेसी ।
त्या ओविया नव्हती प्रतीति ऐसी । ग्रंथाधारेसी बोलिली ॥
येर्‍हवी ग्रंथराज महाकवि । व्यास वाल्मीकादि बोलिले सर्वी ।
तो सिध्दार्थ सांडुनी ठेवाठेवी । कासया करावी जाणीव ॥
आम्हा भाव तोची देव । सद्गुरु संत वैष्णव ।
नाम तोचि सुखानुभव । आत्मत्व ठाव पावला ॥
येथ गुरुपरंपरापध्द्ती । तेही सांगू ग्रंथांती ।
सकलाघ परब्रम्हसंविती । तोचि हंसगति ब्रह्म उपदेष्टा ॥
जो सहस्त्रदळपंकज सरोवरी । हंसरुपे नांदे श्रीहरी ।
तोचि बुध्दि ब्रम्हयाते बोध करी । द्योतकांतरी सर्वज्ञ ॥
तेणे स्वात्मजनित विधीने । नारद तोचि नारायण ।
संबोधला विद्यमान । ब्रम्हपरायण भागवत ॥
चित चेतनात्मक जाण । तेंचि नारादासी गमन ।
पावावया विश्रांतिस्थान । हरिकीर्तन पै एक ॥
तोचि पूर्णाश्रय करुनि एक । कीर्तननिष्ठा नैष्ठिक ।
ब्रम्हचर्य अतिधार्मिक । धर्मस्थापक हिंडतुसे ॥
तेथ सर्वात्कर्षे नामकीर्ति । पुण्यपावन त्रिजगती ।
ते प्रगट करुनि दावाया स्थिति । कर्मभूमिप्रती पै आला ॥
तेथ दैवात् पूर्वार्जिते । कृपा केली सद्गुरुनाथे ।
तेचि सांगो यथोचित । दृष्टांत मतेंकरुनी ॥
कोण्ही एका प्राप्त समयी । निद्रांती जागरोदयी ।
ब्रम्हचारी येऊनी पाही । निज निर्वाही प्रबोधी ॥
तेथ तत्वमसि ब्रम्हैक्य । सुचवूनिया महावाक्य ।
हरिनारायण प्रगटैक । भजनसुख सांगतु ॥
टाळवीणा देऊनी । सावध केले थापटुनी पाणी ।
जागृत होतां तेच क्षणी । टाळ वीणा नयनी देखिला ॥
ब्रम्हचारीदर्शन । स्वप्नी देखत होते मन ।
ते जागृतीमाजी न दिसे ध्यान । अंतर्धान पावले ॥
तेणे विकळ संतोषें । क्षणैक वाटले अपूर्व ऐसे ।
तोचि जगद्गुरु नारद ऐसे । निष्ठा मानसी पै केली ॥
तेचि ब्रह्मरुप निष्ठाबीज । नयनी उगवले तेज:पुंज ।
तेणे स्वप्रकाश धवल सहज । निर्वाळले चोज निजदृष्टि ॥
तो हा स्वयंबोध निराख्य परिपूर्ण । गुरुसंप्रदाय विशुध्द गहन ।
ते पूर्वापर जुनाट ब्रम्हज्ञान । हरिनारायण पावला ॥
हा नारदोक्ति मूळ मंत्र । श्रुतिस्मृतींचा मथितार्थ ।
हरिनारायण ब्रह्मसूत्र । नाम पवित्र तिही लोकी ॥
या ग्रंथी वरदान । सद्गुरुही दिधले पसायदान ।
तेणे कृतकृत्य होऊनि पूर्ण । परम पावन पै जालो ॥
ते हे नामामृतलहरी । सकळ शास्त्रांची खुलवरी ।
ते प्रगट करुनी निजनिर्धारीई । ग्रंथाधारी दाविली ॥
हे सकळ ज्ञानाचे निजज्ञान । सकळ साधनांचे निजसाधन ।
सकळ भावाचा भाव पूर्ण । हरिनारायण तो येकु ॥
सकळ क्रियेचे क्रियाचरण । सकळ पठणाचे पठण ।
सकळ श्रवणाचे श्रवण । हरिनारायण तो येकू ॥
सकळ तीर्थांचे तीर्थाटण । सकळ शास्त्रांचे मथित पूर्ण ।
सकळ निश्चयाचा निश्चय जाण । हरिनारायण तो येकू ॥
सकळ विद्येची विद्या पूर्ण । सकळ गायनाचे निजगान ।
सकळ धर्माचा निजधर्म जाण । हरिनारायण तो येकू ॥
हा नामप्रताप  सांगतां । लाज विराली वाग्देवता ।
हरिनारायण गातां ध्यातां । बोध्यावस्था जालीसे ॥
हरिनारायण नामगान । करितां हरिनारायण जाले मन ।
विसरला पुढील आठवण । ग्रंथनिरुपण राहिले ॥
येथ आपुला जैसा विसर । न होनि असिजे निरंतर ।
तेवी पावूनि साक्षात्कार । भोगिजे साचार निजसुख ॥
पूर्णपणाचे शेवटी । हरिनारायण भजन उठी ।
ते सेवन करुनि सुखसंतुष्टी । हरिनारायण पुष्टी पावला ॥
एवं ब्रम्हज्ञानयोग ब्रह्मार्पण । ते सह्जी सहज नामस्मरण ।
घटीत आले हरिनारायण । अभंग परिपूर्ण पूर्णत्वे ॥

अभंग
देव जोडे कांही । करा उपाय तो देही ॥
नका जाऊ अभिमाने । क्षणभंगुर हे जिणे ॥
माप लागले शरीरा । अंती काळ ग्रासिल खरा ॥
म्हणे हरिनारायण । जोडी जोडा निजधन ॥१॥
२.
देव आहे सर्वा ठायी । परि तो भावयासी (अभावासी ) नाही ॥
तेणे जाले हस्तांतर । जवळी असूनिया दूर ॥
मनबुध्यादि इंद्रीये । त्यांसी कोण चाळित आहे ॥
म्हणे हरि नारायण । अवघे भ्रमासी कारण ॥२॥
३.
नाम सकळांसी तारक । नामें तरती तिन्ही लोक ॥
म्हणूनिया नाम घोका । जाणे नाही यमलोका ॥
नामे स्थावर तारिले । आणि पातकी उध्दरिले ॥
म्हणे हरिनारायण । करा देवाचें चिंतन ॥३॥
४.
देव भक्तांचा कैवारी । आले विघ्न दूर करी ॥
ऐसा पहा अनुभव । शरण रिघुनियां भाव ॥
भक्त प्रर्‍हादाकारणे । स्तंभामाजी प्रकटणे ॥
म्हणे हरिनारायण । पांडवांसी रक्षी कोण ॥४॥
५.
मीपण मी होतों देहबुध्दि जेव्हा ।
भोगियले तेव्हा नाना भोग ॥१॥
आतां तुज ऐसा म्हणवी लोकांते ।
जे कां उचित तेंचि करा ॥२॥
संचिताची दोरी प्रारब्ध भोगणे ।
जे का क्रियामाण पावे पुढा ॥३॥
हरिनारायण म्हणे खा गौरव ।
जाणे तोचि सर्व सुखी जाला ॥४॥
६.
रक्षी रक्षी परमेश्वर । अनाथबंधु दीनकिंकरा ॥
फ़िरवी सुदर्शन चक्र । त्यासी कोण पाहे वक्र ॥
हरिनाराय़ण सहकारी । अनंत विघ्ने तो निवारी ॥
पदे.
१.
गुरु तुझा सर्वस्वी आधार ॥ध्रु.॥
कळि काळासी दृष्टिसि नेणे । तूंची उतरी पार ॥१॥
कल्पना हे घडमोड करिशी । मिथ्या हा व्यवहार ॥२॥
नाना भ्रांति तद्रुप करुनी । वरकड भूमीभार ॥३॥
हरिनारायण निशिदिनी घेई । मुखीं हा उच्चार ॥४॥
२.
आनंद झाला आनंद झाला । सद्गुरुराज ध्यानासि आला ॥ध्रु.॥
नवल आतां मी सांगू काय । मन उन्मन केले पाहे ॥१॥
जगामाजी जगदीश ऐसा । जालासे विश्वास ॥२॥
म्हणे हरिनारायण । ध्यान लागले निशिदिनी ॥३॥

लेखकप्रमादामुळे वरील पद्यें अगदीच अशुध्द झाली आहेत, त्यांस उपाय नाही.हरिनारायण शके १६४७ साली समाधिस्थ झाले त्या वेळी त्यांचे वय ६६ वर्षाचे होते. त्यांची सर्व कविता त्यांच्या शिष्य सांप्रदायी लोकांच्या संग्रही आहे; व ती प्रसिध्द करण्याचे ते मनावर घेतील तर तसे करणे त्यांस अशक्य आहे असेही नाही. कारण स्वामीच्या नावावर त्यांना ज्या जमिनी मिळाल्या आहेत, व ज्यांचा उपभोग ते आज मितीस घेत आहेत, त्यांच्या उत्पन्नांतून हे कार्य सहज होण्यासारखे आहे. परंतु, आपल्या योग्य कर्तव्याची जाणीव या लोकांस नसल्यामुळे त्यांच्याकडून अशी सत्कार्य होत नाहीत ही खेदाची गोष्ट होय. रामदास, तुकाराम, मोरया गोसावी, एकनाथ, जयराम, शिवदिन केसरी, मुक्तेश्वर वगैरे बर्‍याच संतकवीच्या वंशजांस मोठमोठी उत्पन्ने सुटली आहेत, परंतु त्यापैकी एक कपर्दिकाही आजपर्यंत त्या कवींच्या ग्रंथप्रकाशनाकडे या वंशजांनी कधी खर्च केलेली नाही.

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP