पौष वद्य १४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


सुभाष ‘चंद्रा’ स ग्रहण ?

शके १८६२ च्या पौष व. १४ रोजीं वंगभूमीचे सुपुत्र सुभाषचंद्र हे आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचा पुकारा सर्व देशभर झाला. १६ जानेवारीपासून मौन धारण करुन ते आपल्या खोलींत चिंतनांत मग्न झालेले होते. व्याघ्राजिनावर बसून ‘गीता’, ‘चंडी’ व इतर धर्मग्रंथांचें पारायण करीत ते संन्यस्त वृत्तीनें वागत होते. दि. २६ ला सकाळी त्यांच्या खोलीशीं गेलेल्या लोकांना आढळून आलें कीं, आदल्या दिवशी ठेवलेलीं फळें, दूध, पाणी हीं जशीच्या तशींच आहेत. कांहींच हालचाल दिसेना, म्हणून लोक आंत गेले.  तों काय ? सुभाषचंद्र बिछान्यावर नाहींत ! सर्व नातेवाईक घाबरुन गेले. बेलूर, दक्षिणेश्वर, पांदेचरी येथें तारा करण्यांत आल्या, पण सुभाषबाबूंचा शोध लागला नाहीं. दुसर्‍या दिवशीं त्यांच्यावर खटला सुरु होणार होता. सरकारनें तीन तास घराची झडती घेतली, अटक करण्याचें वॉरंट काढलें, पण कोणालाही यश आलें नाहीं. सारी भारतीय जनता चिंतामग्न झाली, सुभाषचंद्र कोठें गेले ? ध्येयवादित्वाचा, त्यागाचा, कर्तृत्वाचा, संघटनेचा, चतुरतेचा, नेतृत्वाचा आदर्श कोठें हरपला ? सदैव आपल्या प्रकाशानें तळपत असणार्‍या या चंद्राला ग्रहण कां लागलें ? त्यांच्याविषयीं सर्वांना फार प्रेम वाटे, त्यामुळें जनतेच्या मनांत अनेक शंका-आशंकांची वादळें निर्माण झालीं. विद्याभ्यास चालू असतांना सुभाष असेच अदृश्य झाले होते. गंगा-यमुनाकांठचीं पवित्र क्षेत्रें व हिमालयाचीं गिरिकंदरें गुरुच्या शोधार्थ हिंडूनहि मन:शांति लाभली नाहीं म्हणून हे परत आले होते. त्यांची वृत्ति मूलत:च तात्त्विक स्वरुपाची, गूढचिंतनात्मक आणि रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्या शिकवणींत मुरलेली असल्यामुळें ते पुन: एकदां अदृश्य होऊन अध्यात्मसाधनांत गुंग झाले कीं काय असा तर्क करण्यांत आला. सुभाषबाबूंनीं या वेळी केलेलें धाडस जगप्रसिद्ध आहे. मुक्या व बहिर्‍या अशा झियाउद्दिन पठाणाच्या वेषानें काबूलला जाणें, बर्लिनला राजकारण करणें, सिंगापूरला आझाद हिंद सेना स्थापन करणें या घटना जगाला थक्क करुन सोडणार्‍या होत्या.

- २६ जानेवारी १९४१

N/A

References : N/A
Last Updated : October 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP