मराठी मुख्य सूची|दिन विशेष|ऐतिहासीक दिन विशेष|मार्गशीर्ष मास|
मार्गशीर्ष वद्य १३

मार्गशीर्ष वद्य १३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


धनुर्वीर कर्ण याचा वध !

शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. १३ रोजीं पृथ्वीवरील अलौकिक धनुर्वीर कर्ण याचा वध झाला. कर्ण आणि अर्जुन यांचे युद्ध निकराचें झालें. अर्जुनानें अस्त्र सोडावें व कर्णानें दुसरें उलट अस्त्र सोडून तें निष्फळ करावें, असें होऊं लागलें. प्रत्यक्ष श्रीकृष्णाचें कवच कर्णानें जेव्हां फोडून टाकलें, तेव्हां अर्जुनानें एका अमोघ बाणानें कर्णास मूर्च्छित केलें. थोड्या वेळांत सावध झाल्यावर खांडव वनांत अर्जुनाच्या तडाख्यांतून वांचलेल्या अश्वसेन नागबाणाचा उपयोग करावा असें कर्णानें ठरविलें; व फार दिवस जपून ठेवलेला हा बाण त्यानें हातीं घेतला, आणि ‘हतोऽसि वै फाल्गुन !’ (अर्जुना, हा ठार झालास पहा) म्हणून तो सोडला. परंतु अर्जुनाचे सारथी भगवान्‍ श्रीकृष्ण होते ! त्यांनीं रथ एक वीत खालीं करुन घोड्यांनाहि गुढघे टेंकावयास लावलें. त्यामुळें अर्जुनाचें शिर न उडतां त्याचा दैदीप्यमान किरीट मात्र नष्ट झाला. पुढें निकराच्या युद्धांतच कर्णाच्या रथाचें डावें चाक भूमीमध्यें रुतून बसलें. तें वर काढण्यासाठी कर्ण खालीं उतरला. आणि अर्जुनाला म्हणाला, "मी येथें नि:शस्त्र स्थितींत उभा आहे. तूं बाण टाकूं नकोस. तुला क्षात्रधर्म माहीत आहे." त्यावर श्रीकृष्णांनीं आवेशानें उत्तर केलें, "भीमाला विष घालून त्याचे अंगास तुम्ही सांप डसविले, पांडव वारणावत नगरांत असतां तुम्ही घराला आग लावलीत, धूतांत विशेष प्रवीण नसलेल्या धर्माला कपट करुन जिंकलेंत, द्रौपदी एक वस्त्र नेसलेली व रजस्वला असतां तिला भर सभेंत आणून तिची विटंबना केलीत, तेव्हां गेला होता कोठें राधासुता तुझा धर्म ?" श्रीकृष्णाचें भाषण ऐकून लज्जा, दु:ख व संताप यांनी भरुन गेलेला कर्ण पुन: रथावर चढला; आणि एक अमोघ बाण सोडून त्यानें अर्जुनास मूर्च्छित केलें; कर्ण रथचक्राशीं धडपड करीत असतांच अर्जुनानें सावध होऊन एक सणसणीत बाण काढला, आणि आपलें सारें सामर्थ्य एकवटून कर्णावर सोडला. सूं सूं करीत निघालेल्या त्या बाणानें क्षणार्धांत कर्णाचें मस्तक उडविलें !

- ३ नोव्हेंबर इ.स.पू. १९३१

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP