आश्विन वद्य १०

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


‘यवनांस थोर भय जाहलें आहे !’

शके १६८२ च्या आश्विन व. १० रोजीं मराठ्यांच्या सैन्यानें पानिपतच्या भूमीवर तळ देऊन अब्दालीचा एक पराजय केला. दिली आणि कुंजपुरा हीं दोन स्थानें मराठ्यांच्या हातीं आल्यामुळें एक नवाच हुरुप त्यांना आलेला होता. कुंजपुर्‍यावर साजरी झालेली विजयादशमी म्हणजे सदाशिवराव भाऊंच्या भाग्याचा दिवस होता. आतां त्यांची चाल पानिपतच्या रोखानें होती. अब्दालीसुद्धां बागपतावरुन यमुना उतरत होता. नदींत छातीइतकें पाणी असतांहि त्यानें पर्वा केली नाहीं. चांदीच्या पत्र्यावर कुराणांतील कांही वाक्यें लिहून तें पत्र त्यानें यमुनेंत सोडलें, आणि नदींत हत्ती उभे करुन त्यांजवरुन जड सामान व तोफा पलीकडे नेण्याचा त्यानें हुकूम केला. अशा या धाडसाच्या उपक्रमानें तीनचार दिवसांत फौज नदीपार झाली. एक लाखपर्यंत फौज जमलेली पाहून अब्दालीस धन्यता वाटली. मराठ्यांना ही बातमी होतीच. सदाशिवरावभाऊ लिहितात, "अब्दाली यमुना बागपताजवळ उतरला व गणोरास होते. तेथून संभाळकियास (मागें) आले, तेथून दोनअडीच आजी आले. फार अवळून चालतात ...... दाणा दोनअडीच शेर गिलच्यांचे लष्करांत आहे. ..... त्यांस लढाई लवकरच होऊन येईल. तुम्ही जलदी यमुनेपलीकडे येऊन बागपतपर्यंत धुमामा चालवून, त्यास रसद न पोंचे, फौजेस शह पडे तें करावें. " अब्दाली पानपतावर उतरत असतांना सदाशिवराव गणोरापर्यंत त्याचे अंगावर चालून गेला, परंतु, अब्दालीचें सामर्थ्य हें केवढें आहे याची जाणीव भाऊला या वेळीं झाली. पानपतावरुन दक्षिणेंअ वर्तमान आलें, "अब्दाली बागपतापाशीं यमुना पायाब उतरुन सोनपतास आला. हें वर्तमान श्रीमंती ऐकतांच माघारें फिरोन यवनाचे सन्मुख फणिपथास आले. नित्य थोडें थोडें युद्ध होत आहे. श्रीमंतांहीं चोहोंकडे तोफखाना पसरला आहे. यवनांस थोर भय जाहलें आहे. पुढे येववत नाहीं; आमचे सैनिक यवनाचे समक्ष उभे राहून, नित्य शेंपन्नास यवन मारुन, उंट, घोडीं आणितात, यवनाच्या सैन्यांत रसद बंद झाली आहे ....आणखी दोनेचार दिवसांत यवन चालोन तोफावरी येईल तर क्षणमात्र बुडेल. --"

- २ नोव्हेंबर १७६०

N/A

References : N/A
Last Updated : September 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP