अध्याय ७१ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एवं सुहृद्भिः पर्यस्तः पुण्यश्लोकशिखामणिः । संस्तूयमानो भगवान्विवेशालंकृतं पुरम् ॥३१॥

ऐसिया प्रकारें सूहृदस्वजनीं । परिवेष्टित चक्रपाणी । पुण्द्यश्लोकांचा मुकुटमणी । नानास्तवनीं स्तविताती ॥६९॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो परमात्मा जनार्दन । सालंकृत धर्मपत्तन । प्रवेशला सैन्येंसीं ॥२७०॥
सालंकृत म्हणाल कसें । शुकें वर्णिलें समासें । भाषाव्याख्यानही तैसें । श्रोतीं अल्पसे परिसावें ॥७१॥

संसिक्तवर्त्म करिणां मदगंधतोयैश्चित्रध्वजैः कनकतोरणपूर्णकुंभैः ।
मृष्टात्मभिर्नवदुकूलव्भूषणस्रग्गंधैर्नृभिर्युवतिभिश्च विराजमानम् ॥३२॥

दों श्लोकीं तें पुर शोभन । सालंकृत कीजे श्रवण । जेथ प्रवेशतां भगवान । पाहे संपूर्ण पुरलक्ष्मी ॥७२॥
मत्त गजांचें दानोदक । गंधाथिले उन्मादक । केशर कस्तूरी चंदनपंक । तिहीं सम्यक पथ सिक्त ॥७३॥
विचित्रवसनध्वजांच्या श्रेणी । उच्च उज्ज्वल शोभती गगनीं । समुक्त तोरणें कनकपर्णीं । द्वारीं गोपुरीं सर्वत्र ॥७४॥
कनककुंभाम्भपूर्ण द्वारीं । उभय भागीं वृद्धाचारीं । तिहीं करूनि कुरुनृपनगरी । अमरपुरश्री लाजवी ॥२७५॥
उद्वर्तनाभ्यक्त स्नात । दिव्य वसनें परिवेष्टित । विचित्र ललामपुरटघटित । सालंकृत नरनारी ॥७६॥
सहज विचरतां कुरुवरपुरीं । गमती निर्ज्जर सह अप्सरी । गंधकुंकुमीं प्रसूनहारी । दिसे साजिरी पुरशोभा ॥७७॥

उद्दीप्तदीपबलिभिः प्रतिस्द्मजालनिर्यातधूपरुचिरं विलसत्पाताकम् ।
मूर्द्धन्यहैमकलशै रजतोरुशृंगैर्जुष्टं ददर्श भवनैः कुरुराजधाम ॥३३॥
 
राजमार्गाच्या उभयप्रांतीं । सदनराजी विराजती । पूर्णकनककलशपंक्ती । वरी दीप शोभती प्रज्वलित ॥७८॥
पुष्पें फळें पल्लव दधी । साक्षतसदीप मंगळव्धी । वृद्धाचार कल्याणवृद्धी । कुरुपुरऋद्धिं हरि पाहे ॥७९॥
प्रासादगर्भीं दामोदरीं । गवाक्षमार्गीं जालरंध्रीं । दशांग जळतां धूम्रपिंजरीं । निघे वाहेरी मघमघित ॥२८०॥
धूम्रपिंजरी गगनगामी । चैलपताका झळकती व्योमीं । तेणें कुरुवरपुरींची लक्ष्मी । अमरसद्मीं असाभ्य ॥८१॥
रजतश्रृंगें प्रसादशिखरीं । हेमकलशांच्या त्यांवरी हारी । वैदूर्यमणी भास्करापरी । कलशमूर्ध्निस्थ प्रकाशती ॥८२॥
इत्यादि अनेकशोभाजुष्टें । भुवनें विराजती घनदाटें । पद्मासनें रविकरस्पृष्टें । श्रीवैकुंठें विलोकिलीं ॥८३॥
तैसी अनेक श्रीमद्भवनीं । मंडित कुरुवरराजधानी । पहाता झाला चक्रपाणी । सहज कुमुदिनी सरेंदुवत् ॥८४॥
असो ऐशी पुरप्रवेशीं । धर्मभवनींची हृषीकेशी । साकल्य शोभा ससैन्येंसीं । पाहोनि मानसीं आह्लादें ॥२८५॥
पुरीं प्रवेशला श्रीपती । ऐकोनि पुरवनितांच्या चित्तीं । निसर्गोंत्साह चापल्य प्रीती । ते व्युत्पत्ति अवधारा ॥८६॥

प्राप्तं निशम्य नरलोचनपानपात्रमौत्सुक्यविश्लथितकेशदुकूलबंधाः ।
सद्यो विसृज्य गृहकर्मपतींश्च तल्पे द्रष्टुं ययुर्युवतयः स्म नरेंद्र मार्गे ॥३४॥

सर्वां योनींमाजि सार । नरदेह जो कां पुण्यप्रचुर । त्याहीमाजि सभ्याग्यनर । सुकृती सुंदरतर पाहती ॥८७॥
श्रवणेंद्रियासी श्राव्यामृत । हरिगुणकीर्तन विबुधप्रणीत । तेंवि नेत्रेन्द्रियासी रुचिरामृत । उत्कट मन्मथसौंदर्य ॥८८॥
ऐशा अनेक मन्मथकोटी । लोपती ज्याचिये कटाक्षदृष्टी । लावण्यरससिंधु ये सृष्टी । तो जगजेठी श्रीकृष्ण ॥८९॥
केवळ कृष्णमूर्ति तें भाजन । लावण्यरसें भरलें पूर्ण । अगाध सुकृती जे जे जन । नयनीं पान ते करिती ॥२९०॥
ऐसें कृष्णाचें लावण्य । दुर्लभ म्हणोनि होतें श्रवण । नगरीं आला हें ऐकोन । उत्सुक संपूर्ण नरनारी ॥९१॥
जो नरलोचना पानपात्र । लावण्यरसपानें नरनेत्र । न धाती तेथ नारीगात्र । विह्वळतर किती म्हणिजे ॥९२॥
सादर पहावया श्रीरंग । प्रेमविह्वळ वनितावर्ग । विस्मृत देहगेहप्रवृत्तिमार्ग । निघती सवेग विवशत्वें ॥९३॥
विसरीं विसर्जिलीं गृहकृत्यें । त्यजिलीं स्तनपानीं अपत्यें । विस्मृत भूषणें अस्ताव्यस्तें । हरी स्मृतीतें हरिस्मरणें ॥९४॥
सद्य म्हणिजे तेच क्षणीं । कृष्ण पहावया निज ईक्षणीं । मंचकीं स्वपती सांडूनि शयनीं । सवेग कामिनी धांविनल्या ॥२९५॥
धांवतां सुटले केशपाश । श्लथित नीवी विगलित वास । स्वजनत्रपेचा झाला ह्रास । राजमार्गास वधू आल्या ॥९६॥
ज्यांचें पदनख जनांचे नयनीं । न दिसे ऐशा निगूढ सदनीं । त्या धांवती श्लथितां वसनीं । कृष्णागमनीं पुरवनिता ॥९७॥
भो परीक्षिती कुरुनरेन्द्रा । येतां लावण्यरससमुद्रा । प्राशावया तन्मुखचंद्रा । नयनचकोरां उल्लास ॥९८॥
ऐशा धांवती विगतस्मृति । तमिस्रा भीकर हें न म्हणती । पुढें जाऊनि काय करिती । तें कुरुनृपती अवधारीं ॥९९॥

तस्मिन्सुसंकुल इभाश्वरथद्विपद्भिः कृष्णं सभार्यमुपलभ्य गृहाधिरूढाः ।
नार्यो विकीर्य कुसुमैर्मनसोपगुह्य सुस्वागतं विदधुरुत्स्मयवीक्षितेन ॥३५॥

सुतराम् म्हणिजे बरवेपरी । तया मार्गाचे ठायीं हरी । संकूल इभाश्वनररहंवरीं । नलभती नारी रीघ तेथें ॥३००॥
मग वेधल्या दामोदरीं । पथोपभागीं दोहीं हारी । वळघल्या मादिया गोपुरीं । पाहती सुंदरी कृष्णातें ॥१॥
मागें पुढें जनपदभार । रथाश्वपदातिं कुंजर । भार्यापुत्रेंसीं यदुवीर । प्राशिती सादर तृषिताक्षी ॥२॥
नारीनयनकुमुदें ऊर्ध्व । हरिमुखचंद्रमा देखती अध । विपरीत अळंकारोक्तिबोध । अळंकारकोविद अनुभविती ॥३॥
ललना हरिमुख पाहोनि दृष्टी । सप्रेम करिती प्रसूनवृष्टि । मनोबाहीं लावण्यमुकुटीं । तो जगजेठी आलिंगिती ॥४॥
पथश्रमांचिये परिहारीं । स्वागतप्रश्न कीजे चतुरीं । तो तेथ करूं न शकती नारी । वदनीं स्मेरीं त्या करिती ॥३०५॥
मंदस्मेराननीं नयनीं । सप्रेम अपांगईक्षणीं । सभार्य लक्षूनि चक्रपाणी । स्वागतप्रश्नीं अवगमिती ॥६॥
ऐसा लक्षूनि चक्रपाणी । पुरजनवनिता अंतःकरणीं । अनुमानिती तें तूं श्रवणीं । कुरुकुळतरणी अवधारीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP