TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्लोक २१ ते २५
तत्राहुर्ब्राह्मणाः केचिदासीना ब्रह्मवादिनः । पूर्वेषां पुण्ययशसां राज्ञां चाकथयन्कथाः ॥२१॥

तिये सुधर्मासभेआंत । वेदवेदांगपारंगत । तपस्वी श्रौतस्मार्तनिरत । आनंदभरित बैसले ॥४४॥
नहुष ययाति पुरूरवा । खट्वांग मान्धाता अज राघवा । दुष्यंत भरत मधुयादवां । सहित पूर्वां पुण्य नृपां ॥१४५॥
मुचुकुन्द रुक्मांगद अंबरीष । शिवि शर्याति महाभिष । इत्यादि पूर्वनृपांचें पुण्य यश । शंसिती अशेष द्विज कोण्ही ॥४६॥
पूर्वापर जे पुण्यश्लोक । त्रिजगीं ज्यांचा कीर्तिघोष । त्यांच्या पुण्यकथा अशेष । वदती निर्दोष ब्रह्मविद्या ॥४७॥
ऐसिये सुधर्मासभास्थानीं । उपविष्ट यदुचक्रचूडामणि । सादर गुणकीर्तिसत्कथाश्रवणीं । तंव पुरुष कोण्ही तेथ आला ॥४८॥

तत्रैकः पुरुषो राजन्नागतोऽपूर्वदर्शनः । विज्ञापितो भगवते प्रतिहारैः प्रवेशितः ॥२२॥

पूर्वीं देखिला नाहीं कोण्हीं । यालागीं तो अपूर्वदर्शनी । पुरद्वारींच्या द्वारस्थां श्रवणीं । वृत्तान्त कथूनि ठाकला ॥४९॥
द्वारस्थीं घेऊनि प्रभूची आज्ञा । पुरीं प्रवेशविला तो जाणा । सभाद्वारींच्या द्वास्थीं पुन्हा । प्रभूते सूचना जाणविली ॥१५०॥
प्रभुसंकेतें त्या प्रतिहारीं । प्रवेशविला सभागारीं । ससभ्य नृपा तो जुहारी । जोडिल्या करीं नम्रशिरें ॥५१॥

स नमस्कृत्य कृष्णाय परेशाय कृतांजलिः । राज्ञामावेदयद्दुःखं जरासंधनिरोधजम् ॥२३॥

जो कां परेश परात्पर । त्या कृष्णाकारणें नमस्कार । करूनि ठाकला समोर । बद्धाञ्जलि पदलक्ष्यें ॥५२॥
राजयांचें परम दुःख । मागधकृतनिरोधात्मक । स्वमुखें निवेदी तें सम्यक । सखेदमुख होत्साता ॥५३॥
कोण राजे कैसें दुःख । ऐसा पुससी जरी विवेक । तरी तूं कुरुवर्या आइक । म्हणे श्रीशुक तें ऐका ॥५४॥

ये च दिग्विजये तस्य सनतिं न ययुर्नृपाः । प्रसह्य रुद्धास्तेनासन्नयुते द्वे गिरिव्रजे ॥२४॥

मागधें करितां दिग्वैजयातें । तयास नम्र जे झाले नव्हते । क्षात्रधर्में समरंगातें । दळें बळेंसीं प्रवर्तले ॥१५५॥
ऐसें राजे अयुतें दोनी । बळात्कारें समरांगणीं । मागधें निरोधिलें जिंकूनी । नेले बांधोनि निजनगरा ॥५६॥
गिरिव्रजनामें मागधदुर्ग । त्यामाजि जिंकूनि भूभुजवर्ग । वीस सहस्र राजे सुभग । ओपोनि अभाग्य निग्रहिले ॥५७॥
तिंहीं पाठविलों मी दूत । सेवेसि निरूपिला वृत्तान्त । तो परिसावा इत्थंभूत । कथितों नृपोक्त जगदीशा ॥५८॥

कृष्ण कृष्णाप्रमेयात्मन्प्रपन्नभयभंजन । वयं त्वां शरणं यामो भवभीताः पृथग्धियः ॥२५॥

कृष्ण कृष्ण आम्रेडितीं । दूतें संवोधिला श्रीपति । परि ते म्हणावी दूतोक्ति । नृपांची विज्ञप्ति जाणावी ॥५९॥
आणिक संबोधनें दोनी । तींही परिसावीं व्याख्यानीं । प्रपन्नभयभंजन म्हणोनी । अप्रमेयात्मन् हें दुसरें ॥१६०॥
कृष हा भूवाचक शब्द । णकार केवळ जो आनंद । एवं श्रीकृष्ण सच्चिद्बोध । तो तूं विषद परमात्मा ॥६१॥
द्वितीय कृष्णसंबोधन । युगपरत्वें पृथक वर्ण । क्रमें कळिकाळीं तूं कृष्ण । भूभारहरण अवतार ॥६२॥
पूर्वी दैत्य मर्दिले बळी । ते अवतरले भूमंडळीं । विविध राजयांच्या कुळीं । प्रतापशाळी धर्मघ्न ॥६३॥
ते हे आदिपर्वीं असुरसुर । कथिले भूभार नृपवर । त्यांमाजि विप्रचित्ति असुर । तो मागधवीर जरासंध ॥६४॥
हिरण्यकशिपु तो शिशुपाळ । सह्लादनामा बोलिजे शल्य । अनुहलाद धृष्टकेतु प्रबळ । शिबि विशाळदुमरावो ॥१६५॥
अश्वशिरादि दैत्यपंचक । ते कैकेयवंशीचे नृपनायक । केतुमान्नामा दैत्यमुख्य । तो हा नरेन्द्र अमितौजा ॥६६॥
वृषपर्व्याचा कनिष्ठ बंधु । तो हा शाल्व प्रतापसिन्धु । वृषपर्वा जो महादुर्भदु । दीर्घप्रख्य नृप जाना ॥६७॥
दिर्घजिह्वा दैत्यपति । तो हा काशिराजनृपति । राहोदैत्य जो दुर्मति । तो क्रथनामा भूपाळ ॥६८॥
दैत्यकुळीं बोलिजे वृत्र । मणिमान्नामा तो नरेंद्र । क्रोधवर्धन महासुर । तो दंडधर भूपाळ ॥६९॥
कालेयनाभा दैत्यश्रेष्ठ । तयाचे प्रतापी पुत्र अष्ट । खळदुरात्मे महादुष्ट । जन्मले स्पष्ट भूलोकीं ॥१७०॥
जयत्सेन राजा पाहीं । जन्मला मगध देशाच्याठायीं । अपराजित या नामें महीं । मनुष्यदेही नृप झाला ॥७१॥
त्रितीय झाला निषादपति । चौथा श्रेणिमान् राजा क्षिती । पांचवा महौजा भूपती । षष्ठ नरपति अभित जो ॥७२॥
सातवा राजा समुद्रसेन । आठवा ब्रहद्भुपाळ जाण । आठही कालेयदैत्यनंदन । भूमंडळीं अवतरले ॥७३॥
कुक्षिनामा जो दानव । तो हा पार्वतीयनामक राव । क्रथनदैत्याचा आविर्भव । सूर्याक्ष राव भूलोकीं ॥७४॥
सूर्यनामा असुरश्रेष्ट । तो हा बाल्हिकनामा वरिष्ठ । बाल्हिकांमाजि अपर कनिष्ठ । ते अवशिष्ट अवधारा ॥१७५॥
गण क्रोधवश आणि बस्त । मद्रकर्णवेष्ट सिद्धार्थ । कीटक सुवीर सुवाहु सुरथ । बाल्हिकदेशीं नृप झाले ॥७६॥
क्रथ विचित्र श्रीमान्नीळ । चिरवासा भूमिपाळ । वक्रदंत महाखळ । दुर्जयनामा भूपति ॥७७॥
रुक्मी नृपांमाजि मृगेंद्र । तैसाचि जनमेजय नरेन्द्र । वायुवेग आषाढ क्रूर । भूरितेजा तैसाचि ॥७८॥
सुमित्र आणि एकलव्य । वाटधान गोमुखराय । कारोषदेशीं नरवर सर्व । झाले दानव भूलोकीं ॥७९॥
क्षेमधूर्ती आनि श्रुतायु । उद्वह बृहत्सेन शतायु । क्षेमक उग्रतीर्थ कुहरबाहु । कलिंगदेशीं नृप झाले ॥१८०॥
एवं अवघे हे दानव । भूमंडळीं झाले राव । परंतु दैत्याचा स्वभाव । भंगिती गौरव धर्माचें ॥८१॥
गंधरवराव तो देवक । सुराचार्य द्रोण मुख्य । प्रकट भारद्वाजनामक । अतिसुटंक धनुर्धारी ॥८२॥
महादेव आणि अंतक । कामक्रोध चार्‍ही एक । या चहूंचा अवतार मुख्य । अश्वत्थामा जाणावा ॥८३॥
अष्ट वसु शंतनुजठरीं । जन्मले त्यामाजि क्षितीवरी । कनिष्ठ राहिला महाक्षत्री । भीष्मनामक कुरुवंशीं ॥८४॥
भार्गवरामाचा जो शिष्य । धनुर्विद्येचा महेश । जेणें उद्धरिला कुरुवंश । अपर दिनेश नृपवर्गीं ॥१८५॥
अकरा रुद्रांचा जो गण । त्यांचें तेज एकवटून । कृपाचार्यनामा ब्राह्मण । अस्त्रप्रवीण अवतरला ॥८६॥
द्वापरयुगाचा अवतार । तो हा शकुनि सौबळवीर । मरुद्गणांमाजि क्रूर । तो सात्यकि शूर वृष्णिकुळीं ॥८७॥
द्रुपद कृतवर्मा विराट । इत्यादि मरुद्गणांश स्पष्ट । हंसनामा गंधर्वश्रेष्ठ । धृतराष्ट्रनामा कुरुवंशीं ॥८८॥
कृष्णद्वैपायनात्मज । दीर्घबाहु तेजःपुंज । प्रज्ञाचक्षु कौरवराज । जो जात्यंध कुरुवर्य ॥८९॥
त्याचा कनिष्ठ बंधु पाण्डु । यमांश विदुर ज्ञाता प्रचंड । कळीचा अंश जो प्रचंड । तो दुर्योधन दुष्टात्मा ॥१९०॥
जे कां पौलस्त्य राक्षस । दुर्योधनावरज अशेष । शतावधि पापपुरुष । दुःशासनप्रमुख जे ॥९१॥
एवं भूभार सर्व राजे । सुरासुरावतार सहजें । तन्निर्दलना गरुडध्वजें । केला अवतार कळिवणें ॥९२॥
कृष्ण कृष्ण संबोधनें । द्विधा वाखाणिलीं भिन्नें । अग्राह्या तूं करणज्ञानें । अप्रमेयात्मन् अगोचर ॥९३॥
प्रमाता प्रमाण प्रमेय । तो हा भवभ्रम त्रिपुटीमय । तूं परमात्मा अप्रमेय । अज अव्यय अविनाश ॥९४॥
उतरावया धराभार । स्वधर्माचा जीर्णोद्धार । रक्षावया मुनि निर्ज्जर । तव अवतार नरलोकीं ॥१९५॥
अप्रमेयात्मा सर्वगत । तरी कां मजला त्रिविध कृत्य । प्रपन्नभवभंजनें हें सत्य । बिरुदाकारणें युगीं युगीं ॥९६॥
देहाभिमानी पृथक बुद्धि । मागधें निग्रहिलों धरूनि युद्धीं । शरण आलों कृपानिधि । रक्षीं त्रिशुद्धी निजदासां ॥९७॥
आपुले बिरुदरक्षणासाठीं । अभयपाणि आमुचे मुकुटीं । ठेवूनि रक्षावें जगजेठीं । ऐसें वाक्पुटीं नृप वदले ॥९८॥
षट्श्लोकात्मक नृपांची विनति । त्यामाजि प्रथम हे विज्ञप्ति । हरिचरणाश्रय शरणागतीं । विनीतभक्तीं आश्रयिला ॥९९॥
श्लोकत्रयें भयाचें कथन । पुढें दोश्लोकीं प्रार्थन । षट्श्लोकात्मक विज्ञापन । ऐक वाख्यान तयाचें ॥२००॥
वाखाणिला प्रथम श्लोक । यावरी भयाचा विवेक । मत्स्यजामाता वदला शुक । तोही सम्यक अवधारा ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-05-29T20:54:48.8500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

disk tiller

  • डिस्क टिलर 
  • तवा कुळव 
RANDOM WORD

Did you know?

आत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.