अध्याय ६० वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


पयःफेननिभे शुभ्रे पर्यंके कशिपूत्तमे । उपतस्थे सुखासीनं जगतामीश्वरं पतिम् ॥६॥

क्षीरसागरसंभव फेन । पर्यंक तैसा देदीप्यमान । किंवा अपर अनंत शयन । मृदुलास्तरण तदुपरिही ॥४५॥
हंसतूळिका उत्तमोत्तम । वरी पासोडा उज्वळ परम । उपबर्हण कुसुमाराम । मेघश्याम उपविष्ट ॥४६॥
ऐशिये मंचकी सुखासीन । जो जगदीश्वर पूर्णचैतन्य । तया स्वपतीतें वालव्यजन । स्वकरीं घेऊन वीजितसे ॥४७॥

वालव्यजनमादाय रत्नदंडं सखीकरात् । तेन वीजयती देवी उपासांचक्र ईश्वरम् ॥७॥

व्यजनसेवेच्या अधिकारिणी । सखिया लावण्यचातुर्यखाणी । तयां सर्वांची जे मुखरणी । तयेपासोनि धृतव्यजन ॥४८॥
सखीहस्तींचा घेऊनि व्यजन । रत्नदंडीं देदीप्यमान । मंद जाणवी तेणें पवन । करी उपासन नम्रपणें ॥४९॥
पादपंकजीं सलज्ज दृष्टि । वासनाभरणीं मंडितयष्टि । स्वामी समीप दक्षिणमुष्टी । व्यजन धरूनि वीजितसे ॥५०॥
समासें रुक्मिणीरूपलावण्य । ठाणठकार वसनाभरण । नृषा निरूपी शुकभगवान । तें निरूपण अवधारा ॥५१॥

सोपाच्युतं क्वणयती मणिनूपुराभ्यं रेजेंऽगुलीयवलयव्यजनाग्रहस्ता ।
वस्त्रांतगूढकुचकुंकुमशोणहारभासा नितंबधृतया च परार्ध्यकांच्या ॥८॥

जें कां निर्गुण परमामृत । सच्चित्सुखमय श्रुत्यनुभूत । तेंचि त्रिपदें सगुण । मूर्त । व्यक्ताव्यक्त स्फुट होती ॥५२॥
सत्पद तेचि भगवन्मूर्ति । चित्पद लावण्यचिद्व्यक्ति । ते जगदंबा जगज्ज्योति । रुक्मिणी सती सन्निष्ठा ॥५३॥
सच्चित्प्रद अभेद वस्तु । म्हणोनि अनन्य सप्रेम तंतु । अगाध ऐक्याचा एकान्तु । न वसे जेथें भवगरिमा ॥५४॥
सत्पदचित्पादांचें अभेद प्रेम । तेंचि अद्वय आनंद धाम । व्यक्ताव्यक्त परब्रह्म । अनुभवगम्य अनेतरा ॥५५॥
गौण सृष्टि जे त्रिगुणात्मक । विपरीतबोधें प्रतिभासक । भ्रमभासुर दृश्यावलोक । त्रिविध सम्यक जीवकोटि ॥५६॥
तयां अगम्य हा अनुभव । म्हणोनि कामिती अवास्तव । यालागीं इतर त्यांचें नांव । विवर्तमात्र ज्यां नुमजे ॥५७॥
असो रुक्मिणी सोपाच्युत । समीपवर्ती भेदरहित । गुणलावण्यें चित्पद मूर्त । प्रतिभा बिम्बित त्रिजगीं जे ॥५८॥
तयेच्या गुणरूपलावण्या । अथवा दिव्या वसनाभरणा । वर्णूं शके ऐसी धिषणा । त्रिजगीं कोणा कविवर्या ॥५९॥
तथापि योगसिद्धीच्या बळें । अपरोक्षस्वानुभवें प्राञ्जळें । व्यासें कथिलें तें ताद्बळें । योगानुभवें वर्णिलें ॥६०॥
तें परिसावया परीक्षिति । श्रवणीं पूर्णानुभवसंपत्ति । गर्भीं रक्षी ज्या श्रीपति । अधिकारप्राप्ति तद्योगें ॥६१॥
तैसेचि श्रोते गुरुपदनिरत । साधनसंपन्न भवविरक्त । ते अधिकारी येर प्राकृत । श्रवणें कलिमल क्षाळिती ॥६२॥
कलिमलभंगें अधिकार होय । अनादिभवभ्रम फिटोनि जाय । ऐसा लक्षूनि तरणोपाय । श्रवणीं सोय हरि लावी ॥६३॥
प्राकृतापरी विषयाचरण । क्रीडोनि करवी गुणकीर्तन । श्रवणमननें विषयी जन । भवानिस्तरणीं अनुकंपा ॥६४॥
असो अच्युतासमीपवर्ती । रुक्मिणी अच्युतैश्वर्यभक्ति । मणिमयभूषणविराजिती । सबाह्य व्यक्ति सप्रेम ॥६५॥
सबाह्य प्रेमाची ठेव । तेंचि तारुण्य नवगौरव । तेणें लावण्यें अवयव । मन्मथमोदें टवटविती ॥६६॥
सकळ भूषणां भूषण । सुरेख यौवन सुंदरपण । त्यावरी मिरवी मणिभूषण । कान्तसेवनप्रमुदितभा ॥६७॥
मणिमय नूपुरें उभय चरणीं । पदविन्यासीं उमटती ध्वनि । करमुद्रिका करकंकणीं । विलोल व्यजनें रुणझुणिती ॥६८॥
व्यजनदंड धृत हस्ताग्रीं । सुमंद वीजितां चंचळ करी । वलयमुद्रिका साङ्गद गजरीं । लावण्यलहरी प्रस्फुरित ॥६९॥
नवयौवनोत्थित कुच सघन । तदुपरि कुंकुमविलेपन । तल्लेपनें शोणायमान । हार कंठींचे विराजती ॥७०॥
अमूल्य श्वेत सूक्ष्म सपुर । परिधान केलें दिव्याम्बर । तया ओधूनि हार कुचाग्र । तेणें भासुर राजतसे ॥७१॥
अमूल्यरत्नमय मेखळा । कटिप्रदेशीं भीमकबाळा । तेणें निबद्ध दिव्य दुकूळा । सांवरूनियां विराजते ॥७२॥
ठाणठकार वसनाभरणें । नवयौवनें रूपलावण्यें । श्रृंगाररसाचें पारणें । नयनें देखणें हरि मानी ॥७३॥
तयेतें लक्षूनि नेत्रकंजे । हरि सर्वज्ञ हृत्पंकजीं । विनोदवैरस्य उपहास वाजी । प्रेमसंभ्रम अवलंबी ॥७४॥

तां रूपिणीं श्रियमननगतिं निरीक्ष्य या लीलया धृततनोरनुरूपरूपा ।
प्रीतः स्मयन्नलककुण्डलनिष्ककंठवस्त्रोल्लसत्स्मितसुधां हरिराबभाषे ॥९॥

तियेतें लक्षिलें कवणेपरी । सर्वज्ञत्वें अभ्यंतरीं । जाणोनि श्रृंगाररसमाधुरी । कलहकारी उपहासी ॥७५॥
सर्वज्ञ जो कां सर्वसाक्षी । लक्षी अनुरूपा कंजाक्षी । लीलावतारचरित्रपक्षीं । निजरूपेंसीं अनुरूपा ॥७६॥
निर्गुणस्वरूपीं निर्गुणा । पूर्णब्रह्मीं श्री परिपूर्ण । सगुणविग्रहीं व्यक्ति नाना । लीलावतारीं अनुरूप ॥७७॥
शक्रीं शक्रश्री पौलोमी । द्रुहिणीं क्रिया स्वरा ब्राह्मी । केशवीं क्षीरार्नवजा लक्ष्मी । संहाररुद्रीं हैमवती ॥७८॥
सूर्यीं तपना चंद्रीं ज्योत्स्ना । यमीं याम्या वरुणीं रसना । स्वाहा स्वधा जे कृशाना । दहना पचना अनुरूपा ॥७९॥
नैरृति जे कां नैशाचरी । पवनीं पावनी गति खेचरी । असुरीं संपदा जे आसुरी । दैवी अमरीं अनुरूपा ॥८०॥
मत्स्यीं मत्स्यी जे चपळता । कूर्मीं अमृतापाङ्ग ईक्षिता । दृढ धारिष्टें धारिण्यता । द्रढिष्ठ धृष्टता वाराहीं ॥८१॥
क्रूर उग्रता नारसिंहीं । प्रचंड वीरश्री भार्गवीं । त्रिजगद्वत्सलता राघवीं । भूजारूपें अनुकरे ॥८२॥
असो ऐसिया अनेक तनु । तिर्यक् दैवी मानवी भिन्नु । तत्तद्रूपीं अनुकरून । वर्ते अभिन्न जे मजसी ॥८३॥
अनन्यरूपा अंतरंगा । प्रियतमा भीमकी श्रीरंगा । यास्तव सप्रेम प्रसंगा । माजी विरागा प्रकटवी ॥८४॥
सत्यभामेचें वाड्माधुर्य । ऐकोनि इच्छी वृष्णिधुर्य । रुक्मिणीचें वाक्चातुर्य । प्रेमसंभ्रमें परिसावया ॥८५॥
व्यजनहस्ता पार्श्वभागीं । कनकाभरणीं उत्तमाङ्गी । मुक्ताफळांची झगमगी । चंद्रकिरणां लाजवी ॥८६॥
ग्रथितालकीं सलंब वेणी । सुमनीं संमिश्र जडित लेणीं । चंचळ नासिकींचें सुपाणी । श्रवणाभरणीं विराजित ॥८७॥
कुण्डलमण्डित गंड रुचिर । दशनदीप्ति विदुमाधर । ऊर्ध्व कुंकुम साञ्जित नेत्र । सुंदर वक्त्र स्मितयुक्त ॥८८॥
जडितरत्नाचें पदक कंठीं । कनकाभरणें बाहुवटीं । हास्यप्रभा फांके सृष्टी । पाहे दृष्टी जगदात्मा ॥८९॥
ऐसिये अनन्य वैदर्भीतें । कृष्णें लक्षूनि प्रसन्नचित्तें । बोधिता झाला तें नृपातें । भगवद्वाक्यें शुक बोधी ॥९०॥

श्रीभगवानुवाच - राजपुत्रीप्सिता भूपैर्लोकपालविभूतिभिः । महानुभावैः श्रीमद्भी रूपौदार्यबलोर्जितैः ॥१०॥

लावण्ययुक्त समर्याद । सस्मित लक्षूनि मुखारविंद । भीमकीवदनें रुचिर शब्द । करी विनोद परिसावया ॥९१॥
वसनाभरणीं विराजमान । गुणलावण्यें विनीत पूर्ण । तथापि होसी बुद्धिहीन । वदे भगवान या आशयें ॥९२॥
बुद्धिमंदता म्हणसी कैसी । अकरा श्लोकीं तें प्रकाशी । लाघव दावूनि आपणासी । नृपा प्रशंसी तद्व्याजे ॥९३॥
अवो वैदर्भी राजपुत्री । जितलोकत्रयलावण्यगात्री । कोटि कंदर्प असाम्य वक्त्रीं । राकारात्रिप्रिय असतु ॥९४॥
राजपुत्रि या संबोधनें । विनय लावण्य नृपजाचिह्नें । परंतु न्यूनता चातुर्यगुणें । आम्हांकारणें वाटतसे ॥९५॥
बुद्धिमंदता माझे ठायीं । म्हणसी देखिली कोणे विषयीं । तरी ते कथितों श्रवणीं घेईं । विषाद हृदयीं न धरूनी ॥९६॥
इंद्र वरुण यम कुबेर । इत्यादि लोकपाळ विभवें थोर । अपर तयांचेचि अवतार । ऐश्वर्यधर नृपति जे ॥९७॥
रूपें जिणती अश्विनीकुमरां । द्रविणें न गणिती जे कुबेरा । बळपतापें प्रळयरुद्रा । तुळिती जळधरा औदार्यें ॥९८॥
महाप्रभावें महानुभाव । विष्णुर्जिगीषे धरिती हाव । तुच्छ करूनि मानव सर्वा । वाहती गर्व आध्यत्वें ॥९९॥
ऐसे ऊर्जित सर्व गुणीं । भूभुज पूर्वींच तुजलागूनी । इच्छित असतां त्यां लागूनी । आम्हांलागूनि त्वां वरिलें ॥१००॥
म्हणसी पूर्वीं जरी नृपांहीं । मनोरथ इच्छा आपुले ठायीं । केली तथापि वाड्निश्चयीं । न देतां कहीं ते लाहती ॥१॥
तरी तें सर्वही अनुकूल होतें । तेंचि वदतों ऐकें चित्तें । उपेक्षूनि ऐशियातें । वरिलें आम्हांतें अनुचित हें ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP