अध्याय २९ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


न चैवं विस्मयः कार्यो भवतां भगवत्यजे । योगेश्वरेश्वरे कृष्णे यत एतद्विमुच्यते ॥१६॥

यदर्थी विस्मय न कीजे तुवां । कृष्णा परेशा देवाधिदेवा ॥१९॥
ऐक्यभावें भजतां जीवां । मोक्ष न मनावा अघटित ॥२२०॥
कीं अचिंत्यैस्वर्यपरिपूर्ण । योगेश्वरांचा ईश्वर पूर्ण । याच्या सन्निधिमात्रें जन । तृणपाषाणही उद्धरती ॥२१॥
गोपिकांचा विस्मय किती । कृष्णसान्निध्यें सर्वजाति । स्थावरजंगमां पावल्या मुक्ति । पुढें उद्धरती तत्स्मरणें ॥२२॥
येरिं घडे न घडे ऐसा । विस्मय उचित कौरवेशा । तो येथ श्रीकृष्णीं सहसा । विस्मयावेशा असंभव ॥२३॥
ऐसी कृष्णाची अगाधशक्ति । शुकें बोधिली रायाप्रति । करूनि आशंकानिवृत्ति । निरूपी पुढती हरिलीला ॥२४॥

ता दृष्ट्वांऽतिकमायाता भगवान्व्व्रजयोषितः । अवद्द्वदतां श्रेष्ठो वाचःपेशैर्विमोहयन् ॥१७॥

भूतभविष्यद्वर्तमान । सर्व हृद्गत अभीष्टाभिज्ञ । निकट गोपी येतां देखोन । बोले वचन विमोहक ॥२२५॥
सर्व बोलकियांमाजि श्रेष्ठ । सत्यलोकपति वरिष्ठ । तो ज्यापुढें नुमली वोष्ठ । बोलोनि वाणी । गोपरमणी विमोही ॥२७॥
त्या भगवदुक्तीचें निरूपण । दहा श्लोकीं शुकभगवान । वाखाणील तें भाषा कथन । श्रोते सुज्ञ परिसोत ॥२८॥

श्रीभगवानुवाच :- स्वागतं वो महाभागाः प्रियं किं करवाणि वः ।
व्रजस्यानामयं कच्चिद्ब्रूताऽगमनकारणम् ॥१८॥

अकस्मात निकटवर्ती । वनीं देखोनि गोपयुवति । परमाश्चर्यें तयां प्रति । बोले श्रीपति सस्मित ॥२९॥
अहो तुम्ही सभाग्य रमणी । सुखरूप आला कीं पथ क्रमूनी । सफळ यात्रा मद्दर्शनीं । अंतःकरणीं काय इच्छा ॥२३०॥
अकस्मात गोपी सकळा । नधरत येथें धावोनि आलां । तरी कुशल आहे कीं गोकुळा । सहित सकळां गोगोपां ॥३१॥
अस्ताव्यस्त विस्मृततनु । धाविलां कोण्या भयेंकरून । तुम्हांसि देखोनि माझें मन । भयें उद्विग्न बहु झालें ॥३२॥
धांवतां धापां दाटलीं पोटें । श्वास न लोटें नासापुटें । नकळे पाऊल पडिलें कोठें । अतिजविष्ठें उद्योगें ॥३३॥
आगमनाचें कारण बोला । परमप्रियकर काय तुम्हांला । तुमची अभीष्टवांछा मजला । सांगा काय करूं तें ॥३४॥
यावरि मंदस्मितानना । सलज्जापांगी मृगलोचना । देखोनि त्यांच्या मनमोहना । त्रैलोक्यराणा बोलतसे ॥२३५॥

रजन्येषा घोररूपा घोरसत्त्वनिषेविता । प्रतियात व्रजं नेह स्थेयं स्त्रीभिः सुमध्यमाः ॥१९॥

अहो तुम्ही वामदृशा । भ्रमरकांतिसदृशकेशा । परम घोर विपिनीं निशा । ईमाजी कैशा पातलां ॥३६॥
रीस व्याघ्र वृक सूकर । सर्प वृश्चिक प्राणी क्रूर । घोर रजनी भयंकर । वनसंचार कां केला ॥३७॥
भीरु ऐसें स्त्रियांचें नाम । आणि येसणें वन दुर्गम । विशेष रजनी घोरतम । किमर्थ उद्यम हा येथें ॥३८॥
तथापि आलां केलें बरवें । आतां मद्वाक्य मानावें । व्रजाप्रति परतोनि जावें । वनीं न वसावें वनितांहीं ॥३९॥
तुम्ही नधरत पातलां वना । तेणें हृद्रोग जाकळी स्वजनां । ते हुडकिती स्थानें नाना । म्हणोनि स्वस्थाना जा वेगीं ॥२४०॥

मातरः पितरः पुत्राः भ्रातरः पतयश्च वः । विचिन्वंती ह्यपश्यंतो मा कृध्वं बंधुसाध्वसम् ॥२०॥

तुमचे माता पितर पुत्र । बंधु भर्तार इष्टमित्र । सक्लेश धुंडिती सर्वत्र । श्रमाचें पात्र त्यां न कीचे ॥४१॥
वनीं उपवनीं यमुनापुलिनीं । गुहागह्वरीं दुर्गमस्थानीं । धुंडितां श्रमित होइजे स्वजनीं । तुम्हां लागूनि अनुचित हें ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP