यापैकीं पहिल्या (म्हणजे शुद्ध) संदेहाचें उदाहरण असें :---
“पाचूंनीं ( या नांवाच्या विशिष्ट रत्नांनीं) भरलेला हा पर्वत आहे का अगदीं नवा असा हा तमालवृक्ष आहे ? असा संशय, रामचंद्राला दुरून पाहून, ऋषींना वाटला”
दुसर्‍या (निश्चयगर्भ) संदेहाचें उदाहरणे हें :---
“ही यमुना असेल का ? पण नाहीं; कारण, ती पाण्यानें भरलेली असते. पाचूंची ही प्रभा असेल का ? (पण) नाहीं, कारण, ती प्रभा इतकी सुंदर कुठून असणार ? अशा रीतीनें, रामचंद्राच्या देहकांतीकडे पाहून, कौतुक करणार्‍या अरण्यांतील लोकांनीं, प्रथम, काय काय संशय केले नसतील ?”
तिसर्‍या निश्चयान्त  संदेहाचें हे उदाहरण :---
“मेघांतून खालीं पडलेलीं ही वीज असेल, का महान् वृक्षावरून खालीं आलेली ही लता असेल ? अशा संशयामध्यें निमग्न झालेल्या त्या शहाण्या हनुमानानें, तिच्या (सीतेच्या) दीर्घ उसाशावरून, ही वियोगिनी (सीता) आहे असा निर्णय केला.”
वर दिलेल्या ससंदेहाच्या उदाहरणांना अलंकार हें जें नांव दिलें आहे, तें, पेटींत ठेवलेल्या कडें वगैरे अलंकारांना जसें आपण अलंकार हें नांव देतों त्यासारखेंच समजावें. याचप्रमाणें, “अद्भुत धैर्य, वीर्य आणि गांभीर्य या गुणांनीं युक्त असलेल्या, क्षणभर सुद्धां ज्यानें आपल्या पत्नीला जवळून दूर केलें नाही अशा, त्या रामाला प्रथम पाहून, नंतर पत्नींवियोगाच्या व्यथेनें व्याकुळ झालेल्या व दीन अशा त्यालाच पाहून ‘हा रामच का, का दुसरा कोणी ? असा लोकांना संशय वाटला.”
ह्या ठिकाणीं, चमत्कार असूनसुद्धां, तो चमत्कार साद्दश्यमूलक नसल्यांमुळें, ह्यांत संशय अलंकार नाहीं.
आतांपर्यंत आलेल्या उदाहरणांतील संदेहालंकार आरोपमूलक आहे, पण हा अध्यवसानमूलकही असल्याचें दिसतें.
उदाहरण :--- “हे पृथ्वीमंडल शेंदरानें भरून टाकलें आहे, कां लाखेच्या रसानें धुऊन काढलें आहे, का केशराच्या भरपूर पाण्याचा हिच्यावर लेप केला गेला आहे ? अशा रीतीचा संदेह लोकांच्या मनांत उत्पन्न करणारा, व त्रैलोक्याचें रक्षण करणारा असा सूर्यकिरणांचा समूह, प्रात:काळीं तुमचें, अनेक प्रकारचें कल्याण करो.”
वरील (श्लोकांतील) संदेह हा, (श्लोक करणार्‍या) कवीच्या मनांतील सूर्याविषयींच्या भक्तीचा परिपोष करीत असल्याकारणानें, सुंदर स्त्रीच्या हातांत घातलेल्या कंकणाप्रमाणें, याला ठसठसीतपणें अलंकार हें नांव देण्यांत येतें.
ह्या श्लोकांत, सूर्यकिरणांच्या समूहाविषयींचें विवेचन कवीला इष्ट आहे, आणि तें अनेककोटिक करीत असतां, ‘शेंदूर, लाखं वगैरे संशयांत त्याचें पर्यवसान झाललें आहे. पण ह्या ठिकाणच्या संदेहांत विषयावर विषयीचा आरोप आहे, असें म्हणतां येणार नाहीं. कारण, आरोप करण्याला अनुकूल अशी, विषय व विषयी यांची समान विभक्ति ह्या ठिकाणीं नाहीं; म्हणून ह्या ठिकाणीं संशयाचा विषय जो किरणसमूह त्याचें, ‘शेंदूर, लाख’ वगैरेंच्या योगानें, अध्यवसान (म्हणजे निगरण) केलें गेलें आहे.
ह्या ठिकाणीं असा विचार मनांत येतो कीं,  “सिन्दूरै: परिपूरितं किमथवा’’ इत्यादि वरील श्लोकांत, ‘सिंदूर’ वगैरेंच्या योगानें भरून टाकणें इत्यादि अनेककोटि ज्याच्यांत आहेत, व पृथ्वीमंडळ हा ज्यांतील धर्मी अथवा विषय आहे असा संशय, श्लोकांतील शब्दांतून प्रतीत होतो. आतां, या संशयाला अनुकूल असा दुसराही या श्लोकांत संशय आहे. तो असा :--- “ही शेंदराची पूड आहे, का लाखेचा रस आहे, का केशराचें पाणी आहे ?” ह्या दुसर्‍या संसयात, सूर्यकिरणें हा विषय आहे व शेंदराची पूड इत्यादि अनेक विषयी आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP