मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीकृष्णमाहात्म्य|

बालक्रीडा - अभंग १०६ ते ११०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१०६.
पडे प्रायश्चित्त बोलों नका कोणी । ऐकूं नये कानीं शब्द यांचा ॥१॥
स्वर्गसुखासाठीं करिताति यज्ञ । टाकिती अवदान अग्निमुखीं ॥२॥
भोक्ता वनीं आला न कळेचि त्याला । पूर्ण ब्रह्म कृष्णाला न जाणती ॥३॥
कृपाळु बहुत परीक्षिती राया । उद्धार कराया पाठविलें ॥४॥
इच्छामात्रें पाडी अन्नाचे पर्वत । काकुलती येत अन्नासाठीं ॥५॥
गडियांसी कळे तेथील आकार । निघती सत्वर तेथुनिथां ॥६॥
येवोनियां कृष्णा सांगितलें त्यांनीं । हांसे चक्रपाणी नामा म्हणे ॥७॥

१०७.
कृष्णा पांच खासा उथळ दिसती । लाहानाल्या भिंती त्याजवरी ॥१॥
विस्तू घालिताती गवत आंथरती । बडबड करीती अवघेजण ॥२॥
घालुनियां तूप हातीं घेती चाटू । करीती ॐ फटू अस्कवळ ॥३॥
लांकडाचें पाळें घेउनी बैसला । मिळालासे मेळा त्याजपुढें ॥४॥
एवढेंसें भांडें तांदूळ शिजविती । तुजला काय देती त्यांतूनियां ॥५॥
घडिघडी उठती घडिघडी बैसती । तें बाय श्रीपति आह्मां सांग ॥६॥
काय चतुराई असे त्या गोवळा । भावासी भुलला नामा म्हणे ॥७॥

१०८.
गडियांसी तेव्हां सांगितलें देवें । स्त्रियांसी सांगावें जाऊनियां ॥१॥
नको कृष्णा द्वीज आम्हांसी मारिती । अभय श्रीपती त्यांसी देत ॥२॥
त्वरें करोनियां गेले स्त्रियांपाशीं । सांगितलें त्यांसी वर्तमान ॥३॥
ऐकोनियां ऐसेम उठिल्या सत्वर । वर्जिती भ्रतार तेव्हां त्यांचे ॥४॥
एका ब्राह्मणानें स्त्रियेसी बांधिलें । प्राणासी सोडिलें परीक्षिती ॥५॥
सकुमार सांवळा राजीवलोचन । पहा-ताती कृष्णमुख तेव्हाम ॥६॥
आनंदानें नेत्रीं वाहातें जीवन । पुसे वर्तमान नामा ह्मणे ॥७॥

१०९.
घरा जावें ऐसें सांगे पुरुषोत्तम । ऐकोनियां श्रम फार होय ॥१॥
दयानिधि ऐके अगा मेघश्यामा । धाडूं नको आह्मां येथूनियां ॥२॥
तुजसाठीं आह्मी सोडिलें भ्रतारां । चरणी देईं थारा देवराया ॥३॥
देव ना संसार आम्हां झालें कृष्णा । सांगावें हें कोणा दु:ख आतां ॥४॥
तुमचे भ्रतार वदिती आम्हांसी । सांग हषीकेशी भिऊं नका ॥५॥
सांगतांची ऐसें चालियेल्या सर्व । पाहाती केशव वेळोवेळां ॥६॥
द्विजाचे मानसीं होय अनुताप । द्विजाचे मानसीं होय अनुताप । भिंदिती आप आपणातें ॥७॥
भोजन करूनी गडी रामकृष्ण । निघती तेथून नामा म्हणे ॥८॥

११०.
इंद्राचा विभाग भक्षी चक्रपाणी । रूप गोवर्धना धरू-नियां ॥१॥
क्रोधावला इंद्र गौळिया निंदीत । दावीन सामर्थ्य तुम्हां आतां ॥२॥
पोरांच्या बुद्धीनें वर्तताती सर्व । धरूनियां गर्व तेची करी ॥३॥
प्रलय मेघाच्या काढिल्या श्रृंखला । वर्षावें गोकुळा जा-ऊनियां ॥४॥
आज्ञा म्हणोनियां वंदियेला इंद्र । कोपे जैसा रुद्र प्रलयींचा ॥५॥
मुसळाच्या धारा मेघ वर्षताती । गारा पडताती शिळा ऐशा ॥६॥
मरताती पक्षी श्वापदें अपार । हिंवें नारीनर कांपताती ॥७॥
नामा म्हणे गायी हंबरडा ह्मणीती । येऊनी पडती कृष्णापुढें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP