श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ४ ते १०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४.
ज्ञानियांचें ज्ञेय ध्यानियांचे ध्येय । पुंडलिकाचें प्रिय सुख वस्तु ॥१॥
तें हें समचरण उभें विटेवरी । पहा भीमातीरीं विठ्ठल रूप ॥२॥
जें तपस्वियांचें तप जें जपकांचें जाप्य । योगि-यांचें गौप्य परम धाम ॥३॥
जें तेजकांचें तेज जें गुरु मंत्राचें गुज । जें पुजकांचें पूज्य कुळदैवत ॥४॥
जें जीवनांतें जीववितें पवनातें निववीतें । जें भक्तांचें उगवितें माया जाळ ॥५॥
नामा ह्मणे तें सुखची आयतें । जोडलें पुंडलि भाग्य योगें ॥६॥

५.
वेदांसी अगोचर परब्रह्म कारण । योगिया ह्लदयींचें ममत्व निर्वाण । आकळूं न कळेचि शेखीं धरियेलें मौन । तें रूप पंढरीये विटे समचरण ॥१॥
कानडा विठ्ठलवो । उभा भिवरेतीरीं । भक्तांचें आर्तवो जीवा लागलें भारी ॥धृ०॥
भूवैकुंठ पंढरी हे देवें रचियली पैं गा । शिवें ती वंदियेली विठो सम चरणांची गंगा । सदाचा नामघोषु कलिमल जाय भंगा । काय वानूं सुख तेथिंर्चे । भेटिलिया पांडुरंगा ॥२॥
विठठल नाम वाचे जना हाचि उपचारू । ह्मणवूनि दावि तुझे कटीं ठेवूनियां करू । येरासी मायानदी काम क्रोध मगरू । ठेवा हा नामयाचा स्वामि विठ्ठल वीरू ॥३॥

६.
वेडावली वाचा वेदाची बोलतां । देवा पाहूं जातां अनिर्वाच्य ॥१॥
अनिर्वाच्य वाचा बोलावया गेली । जिव्हा हे चि-रली भूधराची ॥२॥
भूधराची जिव्हा झालिसे कुंठित । नामा ह्मणे अंत नलगे त्याचा ॥३॥

७.
हवा हवा ह्मणताती श्रुति । परि त्या नेणती भुललीया ॥१॥
तुझिया रूपा नेणती अगा कमळापती । बाळक म्हणती गौळियाचें ॥२॥
विष्णुदास नामयानें दावियेल्या खुणा । पंढरीचा राणी श्रीविठ्ठल ॥३॥

८.
 जेथें नाहीं कांहीं नाम रूप गुण । बोलती निर्गुण तया-लागीं ॥१॥
तोचि गोकुळांत होऊनि गोंवळ । झणवितो बाळ यशो-देचा ॥२॥
चिन्मय चिद्रूप अक्षय अपार । अपार परेहूनि पर ह्मणती ज्यातें ॥३॥
सर्वां भूतांचे फुटकाये खोळें ।  भरलें न गळे आत्मपणें ॥४॥
आनंदी आनंद मातला अपार । वेदालाही पार नाही ज्याचा ॥५॥
नामा ह्मणे सर्व रूपें जें रूपस । गोकुळीं विलास मांडियेला ॥६॥

९.
पुष्पासी परिमळु दूध घृत मेळु । ऊंस तो रसाळु बीज नाहीं ॥१॥
तैसें परब्रह्म आहे तें निर्वाण । वर्णितां पुराण नपडे ठायी ॥२॥
दीपाचीही दीप्ति दर्पणची कांति । तैसी ब्रह्ममति कवण जाणे ॥३॥
नामा ह्मणे जैसें सर्वांघटीं आकाश । केशव परमहंस तैसा जाणे ॥४॥

१०.
निर्गुण सगुण नाहीं ज्या आकार । होऊनि साकार तोचि ठेला ॥१॥
जळीं जळगार दिसे जैशा परी । तैसा निराकारी साकार हा ॥२॥
सुवर्ण कीं धन धन कीं सुवर्ण । निर्गुणीं सगुण ययापरी ॥३॥
ऐसा पूर्णपणें सहजीं सहज । सखा केशिराज प्रगटला ॥४॥
पांडुरंगीं अंगें सर्व झालें जग । निववी सर्वांग नामा ह्मणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP