अंक दुसरा - प्रवेश तिसरा

डॉ . पद्माकर विष्णु वर्तक यांनी प्रस्तुत संगीत नाटकात नल दमयंतीची उत्कट प्रेमकथा अतिशय छान फुलवली आहे


( पुष्करचा महाल . नल व पुष्कर फांसे खेळत बसलेले आहेत . द्वापर आणि चार्वाक पुष्करच्या बाजूला तर कलि नलाच्या उजव्या बाजूस बसलेला आहे . इतरहि काही जण आजुबाजूला आहेत . )

पुष्कर - दैवानं कृपा केली खरी ! आतापर्यन्तचे सगळे पण मीच जिंकले . धनराशि आणि राज्यकोष मी जिंकला . आता राज्यसुद्धा माझंच होणार . नला शुद्धीवर आहेस कां ? मला वाटतं तुझं खेळाकडे अजिबात लक्ष्य नाही .

नल - ( स्वगत ) मला मोठं नवल वाटतं की प्रत्येक वेळी पुष्करसारखं कसं दान पडतं ? काही कपट तर नाही ना ?

कलि - नाही नलराज , कपटबिपट काही नाही . मन शान्त ठेवून खेळा . अंतिम यश आपलंच आहे . हा पण नक्की आपणंच जिंकणार !

पुष्कर - पण जिंकायला अश्वविद्या नव्हे , तर अक्षविद्या यावी लागते ; ते येर्‍या गबाळयाचं काम नाही .

चार्वाक - अक्षक्रीडेचं कौशल्य काही वेगळंच असतं खरं .

पुष्कर - पाहिलंस ना नला , तुझा देव कां परमेश्वर येत नाही तुझ्या मदतीला धावून , तूं पुण्यश्लोक असूनसुद्धा ! पण दैव मात्र मजसारख्या पापी नास्तिकाच्या मदतीला येतं .

नल - तूं काहीहि म्हटलंस तरी मी माझा धर्म सोडणार नाही .

पुष्कर - नको सोडूस धर्म बापडा , राज्य सोड म्हणजे झालं . मग तुझ्याशी मला काहीच कर्तव्य नाही .

द्वापर - नलराज , राज्य हरलात तरी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही . द्यूत हा खेळच असा आहे की त्यात कुणी तरी एक जिंकणार , दुसरा हरणार !

चार्वाक - हो ना ! त्यात हार तुमच्या वांटयाला आणि जीत पुष्करराजांकडे आली तर येवढं बिचकण्याचं कारण नाही .

कलि - आणि त्यातूनहि पुष्कर तर तुमचा भाऊ ! राज्य त्याचेकडे गेलं तर काहीच बिघडलं नाही मोठसं .

द्वापर - मला फार वाईट वाटतंय . या द्यूतापायी नलराजांचा पार नायनाट होण्याची वेळ आली आहे .

कलि : योग्यच आहे ते . दोन मत्त गजांच्या झुंजीत एकाला ठार मरावं लागतं .

पुष्कर - नला , यांच्या बडबडीकडे लक्ष्य देऊ नकोस . तूं आपला देवाचं नांव घेऊन दान टाकत रहा , म्हणजे बरं होईल .

( थोडा वेळ शान्ततेत जातो )

पुष्कर - वा वा , आता एकच सोंगटी राहिली नलाची . एका दानात जिंकतो राज्य . दमनका आपल्याला किती पाहिजेत सांग लवकर .

चार्वाक - ( मोजून ) एकोणीस पाहीजेत , महाराज . दोनदा दान टाकावं लागणार .

पुष्कर - दोनदा कां ? एकदाच . ( एकोणीस असे ओरडत फांसे टाकतो . त्यात एक फांसा उभा रहातो . ते पाहून ) जितं मया ! मी जिंकलो !

नल - कसं शक्य आहे हे ? एकोणीस दान पडेलच कसं ? फांश्यांत अठराचे वर दान पडणेच शक्य नाही .

पुष्कर - नाही कसं ? सहा न् सहा बारा न् सहा अठरा , आणि हा फांसा उभा असल्यामुळे एक मिळून एकोणीस - ही तुझी सोंगटी गेली आणि राज्य माझ्या पदरात पडलं .

कलि - वाहवा , धन्य आहे पुष्करा तुझ्या अक्षकौशल्याची !

दमयंती - ( प्रवेशून ) थांबवा तो खेळ एकदम . तुम्ही कपटी आहात . अठराच्या वर दान पडतच नाही द्यूतात .

पुष्कर - पडत नाही , पण आत्ता पडलं आहे , त्याचं काय ?

दमयंती - तुम्ही कपटानं खेळला आहात .

पुष्कर - ( विकट हंसून ) नल पूर्ण शुद्धीवर राहूनच खेळत होता , वहिनी !

दमयंती - तरी मी म्हणणार , तुम्ही कपट केलंत . भाऊजी , तुम्हाला मी बजावते , कपट करुन द्यूतामध्ये राज्य जिंकणं हे सत्याला धरुन नाही . द्यूत खेळून तुम्ही निषधाचे अधिपति होऊच शकणार नाही .

पुष्कर - तूं गप बस . बायकांना यात काय कळतं ? सत्य - असत्य हा पुष्कर पहात नसतो .

चार्वाक - बरोबर आहे . सत्यासत्याचा विचार धर्मवेडयांनी करावा , आमच्यासारख्यांनी नव्हे .

पुष्कर - कर सुरु पुन्हा द्यूत .

द्वापर - पण त्याचेकडे आहे काय पण लावायला ?

पुष्कर - नला , एक सुंदरसा पण होऊन जाऊ दे - दमयंतीचा .

( नलदमयंती चमकून बघतात . मग भयंकर संतापतात )

नल - ( संतापाने थरथर कांपत ) मूर्खा , माझ्यापाशी अजून दुसरं धन आहे पण लावायला . हे घे . ( आपल्या अंगावरील अलंकार व अंतरीय वगळून इतर वस्त्रे पुष्करकडे फेकतो . नलाचे पाहून दमयंतीहि आपले अलंकार काढून फेकते . दोघांजवळ एकेक वस्त्रच उरते . अशा स्थितीत पुढे नल , मागे दमयंती बाहेर जाऊ लागतात . )

पुष्कर - ( ओरडून ) थांब ते मंगळसूत्र राहिलं ना गळयात ! ते ठेव काढून . काळ्या पोतीला मूल्य नसलं तरी सोन्यात गुंफलेलं आहे ते . शिवाय सुवर्णाचे चार मणि आणि -

दमयंती - ( संतापाने बेभान होऊन थरथर कांपत ) पुष्करा , ज्या अर्थी एका पतिव्रतेचा तूं द्यूतापायी असा घोर अपमान केला आहेस त्या अर्थी तुझाहि असाच द्यूतामध्ये पराभव होईल . आणि तोहि याच मंगळसूत्राच्या धन्याकडून .

( दमयंती नलाच्या पाठोपाटह निघून जाते . पुष्कर खदखदा हंसतो )

( पडदा . )

( अंक दुसरा समाप्त )

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP