वेगळं व्हायचंय‌ मला - अंक दुसरा

जुन्या जमान्यातील एक अतिशय गाजलेले नाटक .


[ माधव बाहेर जाण्यासाठीं कपडे करीत आहे , सुलभा आंतून चहा आणून देते , वेळ नसल्यानें तो चहा स्वीकारीत नाहीं , याच वेळीं पलीकडे अण्णांनीं दिलेला सदरा मंदा दुरुस्त करीत आहे , घरांतून काका बाहेर येतात आणि दोन्ही खोल्यांतील द्दश्यें पाहात माधवच्या घरांत निघून जातात , माधवहि बाहेर निघून जातो . झालेला अपमान गिळून सुलभा दारांत उभी राहून माधवच्या दिशेनें पाहात आहे . ]

अण्णा : ( आंतून बाहेर येतात . ) मंदा , माधव कुठं बाहेर गेलाय ‌ का ग ?

मंदा : होय वाटतं , त्याच्या पिक्चरचं ओपनिंग आहे आज ,

अण्णा : सूनबाई आहे का बघ पलीकाडं ! मी एक वेळ जेवत नाही , म्हणून त्या पोरीनंहि एक वेळचं जेवण सोडलंय ‌ म्हणे ! तिला जपायचे दिवस आहेत हे . ( वहिनी डोळे पुसून घरांत जाते . ) जा . तिला सांग , म्हणावं माझे हाल होताहेत ते होऊं देत , तुला आतां जपायला हवं , तूं कशाला आपल्या सुखावा पाणी सोडतेस ? त्या पोराच्या देखत विचारायचीसुद्धां सोप नाहीं , उगीच डोक्यांत राख घालून घ्यायचा , माधवनं तूं कशाला आपल्या सुखावर पाणी सोडतेस ? त्या पोराच्या देखत विचारायचिसुद्धां सोय नाहीं , उगीच डोक्यांत राख घालून घ्यायचा . माधवनं चौकशी तरी केलीन ‌ का ग तिची ? आपली बायको उपाशी आहे , का जेवलीय ‌ , हेसुद्धां विचारलं नसेला त्यानं , तिचे आईबापहि नाहींत जवळ तिची चौकशी करायला . मी जवळ असून लांब ! वेगळा झालाय ‌ ना तो !

मंदा : त्याला कामं असतात ना . बोलतसुद्धां नाहीं वहिनीशी धड . वेळ नसतो त्याला .

अण्णा : नसायला काय झाला वेळ ? जिव्हाळा जोडून घ्यावा लागतो , ही जाणीवच नाहीं त्याला . स्वतःपुरतं पाहायची संवय झालीय ‌, काय होणार आहे त्या पोरीचं कुणास ठाऊक ! सगळ्या जबाबदार्‍या झुगारून देण्यांत भूषण समजतो तो , मंदा , यंदाची एवढी परीक्षा उतरून जा , म्हणजे , सुटलीस . एकदांचं तुझं लग्न झालं म्हणजे माझी जबाबदारी संपली .

मंदा : पण अण्णा , घरीं सगळे अभ्यास होत नाहींत . कॉलेजांतलं वेगळं .

अण्णा : सगळं कळतंत ‌ मला . परिस्थितीनं पांगळं करून ठेवलंय ‌ मला . ज्याच्या आशोवर आत्तांपर्यंत दिवस काढले , तोच मुलगा वेगळा झालाय ‌, तो पांगुळगाडा असतो ना ? चालायला येईपर्यंत लहान मुलं त्याचा आधार घेतात : एकदां त्यांना पाय फुटले , म्हणजे तो पांगुळगाडा पडतो एखाद्या अडगळींत , लक्षसुद्धां देत नाहीं त्याच्याकडे कोणी . तशी झालीय ‌ माझी स्थिति . कॉले जशिवाय तुझा अभ्यास होणार नाहीं , हें मलासुद्धां कळतं ; पण काय करूं मंदा , कॉलेजांत शिक्षण घ्यायला पैसे कुठले आणूं ? हल्लीं विद्या विकत घ्यावी लागते [ काका प्रवेश करून --]

काका : मग शिकवूं नकोस मुलील .

अण्णा : रघुनाथ , शिक्षण नसलं तर मुलीचं लग्न होणं मुष्किल पडतं संध्या ,

काका : कां ? तिचा भाऊ तयार होता ना तिचं लग्न करून द्यायला ?

अण्णा : तो विकायला निघाला होता तिला .

काका : ए पोरी , इथं काय बसलीस ? मोठीं माणसं बोलतायत ना ? जा , कांहीं तरी खायला करून आण . [ ती जाते . ] तो विकायला निघाला होता म्हणतोस , पण तूं फुकटहि गळ्यांत बांधूं शकत नाहींत तिला कुणाच्या . बरोबर तो वेगळा झालाय ‌. शिवाय तरून आहे ; तेव्हां त्यानं त्यानं ठरविलेली प्रत्येक गोष्ट तुम्हांला म्हातार्‍यांना चूकच वाटायची ,

अण्णा : तसं नव्हे ; घर म्हणून कांहीं संस्कार असतात , रघुनाथ , कुटुंबाचा मुख्य घटक म्हणून माझ्याबरहि कांहीं जबाबदारी आहे , मुलांच्या कल्याणाचीं .

काका : काळ फार पुढं गेलाय ‌ अण्ण , तुम्ही मात्र अजून आहांत तिथं आहांत , खरं सांगूं ? जबाबदारी वगैरे कांहीं नाहीं ; तुम्हां लोकांना हातांतला अधिकार सोडवत नाहीं , स्वतःच्या घरावर स्वतःचीच सत्ता चालायला हवी हा तुमचा ताठा या वांकलेल्या क्यांतहि कमी ओत नाहीं , वागूं द्या ना पोरांना आपल्या मनाप्रमाणं . त्यांचा त्यांना उद्धार करून घेऊं दे . तुम्ही कां खचवतां त्यांना ? ज्याच्या त्याच्या हिताला जो तो जबाबदार असतो . तुम्ही कां ही जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतां ? त्यांचं उमेदीचं वय असतं हें ; कां हातपाय बांधून ठेवतां त्यांचे ?

अण्णा : मग काय त्यांना स्वच्छंद वागूं द्यायचं ?

काका : तुमचे उपकार म्हणून नव्हे , त्या बेटयांचा हक्क म्हणून ,

अण्णा : तूंच बोलतोस का रे रघूनाथ हें ? पूर्वी घरांत दोन चुली मांडल्या जाऊं नयेत म्हणून घर सोडून जाऊं नको अशी माझी विनवणी करणारा तो तूंच होतास ना ? आपल्या घरीं एकत्र कुटुंब नांदावं म्हणून त्या वेळीं मी वेगळा झालों , पण वेगळा झालों म्हणूनच मी या एकत्र कुटुंबपद्धतीचा पुरस्कर्ता म्हणून आज उभा आहे .

काका : आज तीन महिने बघतोंय ‌. एकत्र कुटुंबाचं बुजगावणं उभं करून आपल्या सत्तेच्या पंजांत मुरगळून टाकली आहेस तूं त्या पोरांची उमेद . आपला एक मुलगा स्वतःच्या कर्तबगारीवर उभा झाला , म्हणून त्याचं कौतुक करायचं , तो दुस्वास करतोस तूं त्याचा .

अण्णा : तो मुलगा आहे माझा , रघुनाथ ! वेगळं होण्यानं त्याला पुढं सुख होणार नाहीं हें मला जाणवतं , माझ्या पूर्वीच्या अनुभवावरून ! त्याच्यावर येणार्‍या पुढच्या संकटाचं त्याला ज्ञान नाहीं , पण मला या गोष्टीचा अनुभव आहे . स्वातंत्र्यांत सुख आहे , पण तें स्वांतत्र दुबळं नसेल तर .

काका : अरे , असेल दुबळं , तर खातील ठेंचा ज्यांच्या ते , तुझ्यासारख्या ! त्यांचा त्यांना पश्चात्ताप होऊं दे , तुम्ही कशाला त्यांचा रस्त्यांतले दगडा गोळा करत बसतां ?

अण्णा : बाप म्हणून .

काका : नाहीं ; स्वतःला कुटुंबप्रमुख म्हणून मिरवायका मिळावं म्हणून !

अण्णा : नाहीं रे , नाहीं रघुनाथ ! एका घरांत राहून तयार झालेले हे नात्याचे धागे तोडणं सोपं नाहीं . त्याच्यापेक्षां मला काळजी वाटते त्याच्या बायकोची , सोन्यासारखी पोरगी ! परक्याची पोरगी घरांत आणलीय ‌. तिचे हाल होतील याच्या अविचारी स्वभावामुळं , त्यासाठीं काळीज तुटतंय ‌ माझं . स्वतंत्र संसार चालविण्याची जबाबदारी स्वीकारायला सामर्थ्य लगातं .

काका : तुझ्या अंगांत आहे का तें ?

अण्णा : खात्रीनं .

काका : मग कां रे मुलीचं कॉलेज बंद करून तिचं घरीं शिक्षण सुरू केलंस ?

अण्णा : संसारांत जबाबदारीचा मेळ परिस्थितीशीं बसवावाच लागतो , रघुनाथ .

काका : असं सांग . म्हणजे घर -- संसार चालवायला सामर्थ्य लागत नाहीं , परिस्थिति अनुकूल असावी लागते . मग आज तुज्यापेक्षां माधवची परिस्थिति जास्त चांगली आहे .

अण्णा : चांगली आहे , रघुनाथ , समुद्राला दिवसांतून दोनदां भरती येते रघुनाथ , पण भरती म्हणजे समुद्राची कायम स्थिति नव्हे . त्यालाहि ओहोटी आहेच . परिस्थितीच्या भरतीला संयमाचा बांध असावा लागतो .

अण्णा : खुळा आहेस ! अरे , स्वातंत्र्याचा संयमाशीं काय संबंध ! स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य ! मनःपूतं समाचरेत ! त्या स्वातंत्र्याला अनुभवानं संयमाचे बाध पडायचे असतील तेव्हां पडतील .

अण्णा : आणि समजा , पुढं -- मागं त्याची परिस्थिति बदलली , हाल झाले त्याचे . विशेषत : त्याच्या बायकोचे , तर .

काका : बघायचे . उघडया डोळ्यानं आणि दगडाच्या काळजानं बघायचे . हाल झाले तर त्याचे होतील . घात झाला तर त्याचा होईल .

अण्णा : सांगतोस काय मला तूं हें ?

काका : योग्य वेळीं कळेल . माझ्या वर्तनाचे खूलासे भविष्यकाळ देईल . त्या वेळीं तूंच म्हणशील . रघुनाथ म्हणत होता तें बरोबर होतं . जाऊं दे कांहीं तोंडांतल्या शब्दानं विझत नाहीं , तुझ्या मुलीला खायला करून आणायला सांगितलं मीं पण तिचं कांहीं लक्षण दिसत नाहीं . मला माझं हित पाहिलं पाहिजे , आणि त्यासाठी तरी निदान , तुझ्या मुलाचं हित पाहिलं पाहिजे . संध्या बरी आहे परिस्थिति त्याची , ( असं म्हणत काका पलीकडे जातो . )

अण्णा : व्याकरणांत तो ‘ विभक्तीचा प्रत्यय ’ असतो ना ? तसा झालायस तूं , ज्या शब्दाला जोडला जाशील त्याच्याशीं एकरूप होऊन जातोस ,

काका : ( परत पडद्यापाशीं येऊन ) पण तो ‘ विभक्तीचा प्रत्यम ’ त्या शब्दाचं रूप बदलतो एबढं विसरूं नकोस . माधवाचा बोलपट बाहेर पडायचाय ‌ आज . तुला बोलावलंसुद्धां नसेल . मला खास निमंत्रण आहे ; जायला नको ? कांहीं तरी खाय्ला करून आणून दे ग मला सूनबाई ! [ असे म्हणत आंत जातात . अण्णा घरांत जायला लागणार तों आंतून मंदा येते . ]

मंदा : हे काका परत कधीं जाणार आहेत हो अण्णा ?

अण्णा : खरंच ! मीं त्याला बोलावलं कशासाठीं आणि तो हें करतोय ‌ काय ?

मंदा : हो ना ! आपल्या घरांत असतांना तुम्हीसुद्धां कधीं बोलत नव्हता वहिनीला . पण कशावरून तरी परवां ताड ताड बोलत होते ते तिला . रडकुंडीला आलीय विचारी .

अण्णा : बोलूं देत ! तिनं आपल्या नवर्‍याला सांगावं . कर्ता पुरुष तो त्या घरांतला .

मंदा : दादा ना ? झालं ! काका बोलत होते तर त्यांच्या क्रियापदाला हा कर्ता पुरुष विशेषणं पुरवत होता ; त्याला काय म्हणायचं ?

अण्णा : कर्म म्हणायचं त्या पोरीचं !

मंदा : तुम्ही कां नाहीं सांगत त्यांना कांहीं ?

अण्णा : स्वतःच्या मुलाला जो कांहीं बोलूं शकत नाहीं तो त्याला काय बोलणार ?

मंदा : कुठल्या मुहूर्तावर या घरांत आलेत कुणास ठाऊक ! ते घरांत आले आणि त्यांनीं घरं वेगळीं केलीं .

अण्णा : मोठया माणसांविषयीं असं बोलूं नये पोरी , आणि का ग , खायला मागत होता ना तो मघाशी ? कां नाहीं आणलंस ?

मंदा : काय आणूं ? बशीभर सांजा करून ठेवलाय ‌ मी सुरेशसाठी . तो आल्यावर मला खायला उठेल !

अण्णा : मग पोहे करायचे !

मंदा : आहेत कुठं घरांत ? चहा करायचा तों दूधहि कमी केलंय ‌ आपण हल्लीं .

अण्णा : अरे हो ! आपण हल्ली गरीब झालों आहोंत नाहीं का ? माझ्या ध्यानांतच राहात नाहीं . वाटत असतं , आहे मुलगा घरांत , मिळवतोय ‌ पैसे , चाललाय् ‌ खर्च .

मंदा : अण्णा , चहा बंद करूं या का आपण उद्यांपासून ? उगीच खर्च होतो .

अण्णा : समजूतदार आहेस पोरी , तूं इच्छा मारायला शिकलीस , पण सुरेशचं कसं समधान करायचं ? तो लहान आहे , त्याचं तर भागत नाहीं चहाशिवाय .

मंदा : न भागायला काय झालं ?

अण्णा : नाहीं भागत हें खरं , अलीकडं मी ऐकलंय ‌ त्या पोराला हॉटेलची संवय लागलीय ‌, त्याला लागेल तें घरीं देत जा , आपलं पोट मारावं लागलं तरी चालेल . पण सुरेशला बिघडूं देतां उपयोगी नाहीं , राहतां राहिला तोच एक आधार . नाहीं तर मोठेपणी तोहि म्हणायचा , तुम्हीं काय केलंत माझ्याकरतां ? अजून आलाय ‌ का नाहीं ग तो कॉलेजातून परत ?

मंदा : अभ्यासाला गेला असेल मित्राकडे . परीक्षा जवळ आलीय ‌ ना ?

अण्णा : फॉर्म मिळाला का ग त्याला ?

मंदा : बाकी सगळ्यांचे मिळाले . माझ्या मैत्रिणीच सांगत होत्या ; मलाहि विचारत होत्या , तुं यंदां परीक्षेला नाहीं का बसत म्हनून ,

अण्णा : बसणार आहें बसलं यंदा तर ?

अण्णा : तसं नको , मी करतों काहीं तरी व्यवस्था . पण सुरेशला कसा फॉर्म मिळाला नाही अजून ? विचारलं पाहिजे त्याला आल्यावर , बरं हें बघ . मी बाहेरून जाऊन येतो जरा , त्याच्या प्रिन्सिपॉलना भेटून येतो .

मंदा : दादाच्या पिक्चरला जात नाहीं ?

अण्णा : मला निमंत्रण आलेलं नाहीं . मंदा

मंदा : काकांनासुद्धां बोलावलंय ‌. आणि तुम्हांला नाही ?

अण्णा : अग , मी शत्रु आहे ना त्याचा . ( खिशांत हात घालून पैसे बघतात ) आणी हें काय ग मंदा ?

मंदा : काय झालं अण्णा ?

अण्णा : एक रुपया चौदा आणे ठेवले होते मी खिशांत ; एकच रुपया कसा शिल्लक ? भाजीबिजी आणलीस का तूं ?

मंदा : नाहीं , अण्णा ,

अण्णा : मग काय झाले पैसे ? परवांपासून आठ -- दहा वेळां प्रकार झाला हा , मुद्दाम बोललों नाहीं मी घरांत , तूंहि बोलूं नकोस कुठं ; छडा लावायला पाहिजे या गोष्टीचा . ( असें म्हणून , रुपया फळीवर ठेवतात . ) परवांपासून पाहतोंय ‌ चार आणे द्यावेत याला भाजीला , हा आठ आण्यांची आणतो . स्वतांत मिळाली म्हणून सांगतो , मिळते कशी ? आणतो कुठून ? रोज रोज पैसे जातात कुठं ? ( ‘ सुरेश आगरकर ’ अशा नांवाचा पुकार होऊन एक पाकीट आंत पडतें , अण्णा तें उचलतात .)

मंदा : सूरेशला कुणाचं पत्र आलंय ‌ अण्णा ? ( अण्णा पत्र फोडून बघतात . वाचून झाल्यावर कपाळाला हात लावून बसतात . ) काय झालं अण्णा ?

अण्णा : वेड लावायची पाळी आणलीय ‌ या पोरानं , थोरल्या भावाची शिकवण आहे . वागतोय ‌ बेछूटपणानं . बाहेर जाऊं देऊं नकोस त्याला कुठं मी आल्याशिवाय , संध्याकाळीं जेवायला घालूं नकोस , थोरल्या मुलानं तोंड उजळयंय ‌ माझं ; हें कार्टं काळं फांसायला निघालंय ‌ ! राम राम राम ! विसकटून गेल्यासारखं वाटतंय ‌ घरांतलं सगळं समाधान , ( तिकडून काका तोंड पुसत प्रवेश करतात . )

काका : आणखी काय नवीन झालं रे अण्णा ? तुझ्या घरांत हल्लीं रोज नवीन बातम्या ऐकायला मिळतायत ! काय झालं आणखी ?

अण्णा : अरे , या सुरेशनं कॉलेजमध्यें भरण्याकरितां दिलेले पैसे दिलेच नाहीत म्हणे अजून !

काका : आणखी लाड करा पोरांचे , नाचवा डोक्यावर घेऊन !

अण्णा : कोणी कोणाला डोक्यावर घेऊन नाचवत नाहीं . एकाशीं लहानपणापासून तसा वागलों , म्हनून तो सूड घेतोय , दुसर्‍याचे फाजील लाड केले म्हणून तो डोक्यावर मिरे वाटतोय ‌ ।

( दरवाजां एक गृहस्थ कोटिबुद्धे येऊन उभा राहतो . )

कोटिबुद्धे : अण्णासाहेब आगरकर इथंच राहतात काय ?

अण्णा : हो . आपण कोण ?

कोटिबुद्धे : मी सहस्त्रबुद्धे आणि मंडळी , किराणा भुसार मालाचे व्यापारी यांच्या दुकानीं असतों ,-- वसुली कारकून म्हणून .-- कोटिबुद्धे माझं नांव .

काका : काय काम आहे ?

कोटिबुद्धे : बिल पाठवलंय ‌ मालकांनीं , तीन महिने वाट पाहिली , आतां सवड नाहीं थांबायला . ( मंदा आंत जाते तिच्याकडे बघून -- )

अण्णा : घरांतल्या मुलांबाळांच्या देखत असले निरोप कसले हो सांगतां ?

काका : देणं आहे ना झालेलं ? मग निरोप आला तर कां वाईट वाटतं ?

अण्णा : मुलाबाळांच्या कानांवर असल्या गोष्टी जाणं बरं नाहीं वाटत मनाला . येऊन भेटतों म्हणून सांगा सहस्त्रबुद्धयांना ,

कोटिबुद्धे : बिलाची रक्कम घेऊनच या , असा निरोप आहे त्यांचा .

[ तो जातो ]

अण्णा : रघुनाथ , उभ्या आयुष्यांत नव्हता रे अनुभवला असला प्रसंग !

काका : आतां कळलं मला तुम्हांला एकत्र कुटुंब का हवं असतं ते . कर्तबगार तरुणांच्या जिवावर . म्हातारपणीं चरितार्थ चालावा म्हणून , का रे बाबा ही अपेक्षा करतां त्यांच्यापासून ?

अण्णा : हीं मुलं कर्तबगार व्हावींत , यासाठीं आम्हीं आपलं तारूण्य बायां घालवलेलं असतं म्हणून .

काका : अरे , वायां गेलं तें . शिल्लक राहिलंय ‌ तें फक्त तुझं म्हातारपण : एकटं , एकाकी , निराधार ! सांभाळ स्वतःला , कांहीं किंमत : नाहीं आतां तुझी जगांत , समजलास ! कांहीं किंमत नाहीं ! वयानं : वांकवलंय ‌ तुला . हातांतली काठी सोडूं नकोस , वाग त्या पोराच्या मनाप्रमाणं . म्हणतोय ‌ ना तो मग करून दे मंदाचं लग्न त्या विनायक विघ्नेशीं . मुलगाहि वेगळा होणार नाहीं , चरितार्थाला पैसाहि कमी पडणार नाहीं .

अण्णा : पोटाच्या भरतीसाठीं मुलीची विक्री करूं ? परिस्थितीनं मी लाचार असलों तरी प्रकृतीनं मी पुरुष आहें , रघुनाथ ! उपाशी राहीन , इभ्रत नाहीं विकणार .

काका : सहस्त्रबुद्धे खरेदीखत लिहून बसलेत तुझ्या इभ्रतीचं . जा जाऊन त्याच्यावर सही कर . ( पलीकडून सुलभा हातांतले बिलवर काढून मामंजींना देत -- )

सुलभा : मामंजी , हे द्यावेत नेऊन दुकानदाराला .

काका : द्यायचे नाहींत . तुझ्या नवर्‍याच्या कमाईंतले आहेत ना ते ? बापाशीं काय संबंध त्याचा ! त्याला विचारलंस का ?

सुलभा : ते इथं असते तर अशा वेळीं त्यांनींहि पैसे दिले असते .

काका : थांब , विचारतों त्याला , आणि सांगतों तुला .

अण्णा : नको , नको रघुनाथ , सूनबाई , घरांत नेऊन ठेव ते . हा जाऊन माधवला सांगेल आणि बोलणीं खावीं लागतील तुला .

सुलभा : मला घरांतल्या घरांतच बोलणीं खावीं लागतील . पण आपण पैसे दिले नाहींत , तर दुकानंत आपली शोभा होईल .

काका : अरे , घे घे ! नवरा श्रीमंत आहे तिचा , म्हणून ती भीक घालतेय ‌ तुला . प्रकृतीनं पुरुष आहेस ना तूं ? घे , घे . सून दया करतेय ‌ तुझ्यावर ! पदर पसर तिच्यापुढं ! नाहीं तर दुसरं काय करणार आहेस तूं म्हातारपणी ?

सुलभा : आपण कां निष्कारण उपहास करताय ‌ त्यांचा ?

काका : कोण कुणाचा कुणाचा उपहास करतंय ‌ ? तूं का मी ? आणि मला उलट विचारतेस ? माझ्याशीं बोलतांना जरा जपून बोलत जा , कारण धाकटा असलों तरी सासरा आहें तुझा .

सुलभा : मामंजी --

अण्णा : मी काय करूं सूनबाई ? माझ्या घरावर माझा ताबा उरलेला नाहीं , या घरांत आतां कुणाचा पायपोस कुणाच्या पायांत उरलेला नाहीं . ज्याला जें वाटेल तें त्यानं करावं . माझ्यापायीं तूं कशाला त्रास सहन करतेस ? नको बोलणीं खाऊंस उगीच . ठेवून दे ते पैसे . ( हांक मारून ) मंदा , मी येतों ग जरा बाहेर जाऊन .

काका : कुठं निघालास तूं अण्णा ?

अण्णा : कुठं तरी ! चरितार्थाची सोय बघण्यासाठीं ! म्हणजे म्हातारपणीं मुलावर अवलंबून राहायला नको . [ अण्णा बाहेर जातात . मंदा येते . ]

मंदा : कुठं गेले अण्णा ?

काका : जन्म दिलायना तुम्हांला ! तुमच्यासाठीं नोकरीची भीक मागायला गेलाय ‌ , तुमचीं पोटं भरायला हवीं ना . चांगले पांग फेडतां आहांत वापाचे !

सुलभा : पण त्यांनीं काय केलंय ‌ ?

काका : पलीकडं जाऊन बोल . या घरांत कां आलीस ? तुझ्यापायीं तो मुलगा वेगळा झालाय ‌ बापापासून . तूंच बिघडवलंस त्याला , म्हणून म्हातारपणीं हाल चाललेत असे . तुम्ही बायका घरांत आलांत कीं भांडणं सुरू व्हायचींच .

मंदा : तुम्ही इथं येऊन घर वेगळं केलंय ‌. वाहिनीला कां बोलतां उगीच ?

काका : हिची बाजू घेऊन तूं कशाला भांडतेस माझ्याशीं ? सासर्‍याचं वर्चस्व नको म्हणून हिनंच वेगळं व्हायचा उपदेश केला असेल माधवला . मोकाट आयुष्य काढायला हवं ; वडील माणसांचा सासुरवास नको .

सुलभा : मामंजींचा कधींच सासुरवास होत नव्हता मला .

काका : माझा होतोय ; असंच ना ? तो होणारच . ध्यानांत सासर्‍याला पैसे देऊन सारवण घालायला आलीस होय ? हो पलीकडं !

सुलभा : ( पलीकडच्या दालनांत जातां जातां ) कां पण हें नाहीं नाहीं तें बोलतां आहांत ? वडिलांच्या ठिकाणीं मानतें मी त्यांना . दोन घरं निरनिराळी व्हावींत ; यांनीं वेगळं राहावं वडिलांपासून असं कधींच वाटलं नव्हतं मला . आमच्या माहेरी एकत्र कुटुंबच आहे .

काका : माहेराचं कौतुक माझ्यासमोर करूं नकोस ! तुम्ही बायका अशाच ! सासरी आलांत कीं माहेराचं कौतुक आणि माहेरी गेलांत कीं , सासरचं कौतुक . खबरदार पुन्हां या घरांत पाऊल टाकलंस तर !

मंदा : येत जा गं वहिनी . तुझंच घर आहे .

काका : सूनबाई , हीं घरं फोडण्याची वृत्ति चांगली नाहीं . तूं नाहीं म्हणू , पण माझी खात्री आहे . माझी काय सगळ्या पुरुषांची खात्री आहे , बायकांच्याशिवाय कलह नाहीं , रामायण -- महाभारतापासूनचे दाखले आहेत . तूं नाहीं म्हण , पण माझी खात्री आहे .

मंदा : असणारच . रामावण आणि महाभारत लिहिणारा एक पुरुषच होता ना ! तुमच्यासारखा !

काका : ( माधार घेत ) मी माधवचा सिनेमा बघून येतों . [ जातो . ]

मंदा : काय चाललंय ‌ हें वहिनी , घरांत सगळं ? अण्णांची परिस्थिति केविलवाणी झाली . सुरेशला नको त्या संवयी लागल्यात . हे काका पाहुणे म्हणून आले घरांत , तर अण्णांची बाजू घ्यायच्याऐवजीं सगळ्यांनाच धारेवर धरताहेत ! काय चाललंय ‍ हें वहिनी ?

सुलभा : कुटुंबं वेगळीं झालीं म्हणजे असं व्हायचंच . एका -- घराची कल्पना जुन्या लोकांनीं काढली ते कांहीं खुळे नव्हते .

मंदा : पण , अण्णा एकटेच कसं संभाळणार सगळं ? वहिनी , मघाशीं तो दुकानदाराचा मासूस अण्णांकडं येऊन गेला . अशीं माणसं घरांत येणं बरं नसतं ना वहिनी ?

सुलभा : तो विचार तुमच्या बंधूंनीं करायचा .

मंदा : विचार ? केलाय ‌ त्यानं कधीं आयुष्यांत ? तो तर वेळ सांपडेल तेव्हा संधि शोधत असतो अण्णांना बोलण्याची .

सुलभा : तात्पुरत्या प्रसिद्धीचा कैफ आहे हा ! तो उतरला म्हणजे डोळे उघडतील त्यांचे . किती उंच गेली तरी समुद्राची लाट सपाटीला आल्याशिवाय राहात नाहीं वन्सं . तुम्ही काळजी करूं नका , मीं ठरवलंय ‌ घरांत कसं वागायचं तें . त्यांना घर सांभाळता येत नसलं तर म्ला तें सांभाळलं पाहिजे ,

मदा : म्हणजे काय करणार आहेस तूं वहिनी ?

सुलभा : घर या संस्थेची जबाबदारी त्यांनी कळत नसली तर मी त्यांना ती पटवून देणार आहें , नको तीं माणसं घरांत घेत असतात . नाहीं यायचीं यापुढं , नाहीं त्या गोष्टी घरांत होत असतात . नाहीं व्हायच्या यापुढं ! तुम्ही एक काम करतां ? त्या रमेशना बोलावतां परत ?

मंदा : कशाला वहिनी , नको त्या आठवणी काढतेस ?

सुलभा : का हो , प्रेम आटलं वाटतं तुमचं ?

मंदा : तें ठीक आहे वहिनी , पण आज त्यांना हुंडा म्हणून दोन हजार रुपये द्यायला हवेत , ते कुठून द्यायचे ?

( दरवाजांत रमेश येऊन उभा राहतो . हातानें टक ‌ टक् ‌ करतों , )

मंदा : कोण आहे ?

रमेश : मी आहें -- रमेश भांडारकर ,

सुलभा : अगबाई , शंभर वर्षोंचं आयुष्य घेऊन आलेत ! वन्न्सं , मी त्यांच्याकरिता दूध घेऊन येतें हं , [ आंत जाते , मंदा अलीकडे येते . ]

रमेश : मंदा .

मंदा : तुम्ही ? तुम्ही या घरांत ?

रमेश : सुद्दाम भेटायला आलों . कॉलेजमध्यें येणं बंद कां केलंस तूं हाल्ली ?

मंदा : कांहीं नाहीं -- कुणाकडं आलांत तुम्ही ?

रमेश : अण्णासाहेबांच्याकडे .

मंदा : ते घरांत नाहींत .

रमेश : किती वेळ लागेल त्यांना परत यायला ?

मंदा : सांगून गेले नाहींत .

रमेश : मग जाऊं मी परत ?

मंदा : तें तुमच्या मर्जीवर आहे !

रमेश : माझं जरा ऐकशील का मंदा ?

मंदा : पुष्कळ ऐकलंय्‌ पूर्वी !

रमेश : तूं पूर्वीं न ऐकलेलं आज मी बोलणार आहे !

मंदा : म्हणजे वडिलांची संमति मिळाली ?

रमेश : नाहीं . तुझ्या बंधूंचंच म्हणणं अनुभवानं पटलं मला ! प्रेमाच्या नात्यापेक्षां वडिलांचं प्रेम मला जवळचं नाहीं वाटत ! हुंडा देण्याची गरज नाहीं म्हणून सांग अण्णांना ! आणि सांग तुझ्या दादाला . मी वेगळा राहणारा आहें वडिलांपासून !

मंदा : नाहीं , वडिलांच्यापासून वेगळा राहणारा मुलगा मेहुणा म्हणून दादाला चालत असला तरी जांवई म्हणून अण्णा स्वीकारणार नाहींत ! आणि त्यांना दुखवून तुमच्याशीं लग्न करण्याची माझी इच्छा नाहीं . सुनेच्या पावलानं घर वेगळं झालं हा कलंक माझ्या माथीं यायला नकोय ‌ !

रमेश : मंदा !

मंदा : मी हें आनंदानं बोलत नाहीं , रमेश ! पण जें दुःख प्रत्यक्ष मी माझ्या घरांत पाहतें आहें हें तुमच्या घरांत यावं असं मला वाटत नाहीं . तुम्ही जाऊं शकतां . आमची परिस्थिति बदलून हुंडा भरण्याची ऐपत माझ्या वडिलांना आली तर तुमचा हात धरण्यापरतं मला दुसरं सौभाग्य नाहीं ! पण कृपा करून तुम्ही --

रमेश : या घरांत येऊं नको ?

मंदा : खरंच नको रमेश ! आणि यायचंच असेल तर तुमच्या वडिलांची संमति मिळाल्याशिवाय नको . अशा तर्‍हेनं तुम्ही घरांत आलेलं अण्णांना आवडणार नाहीं .

रमेश : ठीक आहे मंदा ; पुन्हा मी या घरांत येणार नाही ! निदान माझ्या वडिलांची संमति मिळेपर्यंत !

( रमेश जातो . सुरेश प्रवेश करतो व माधवच्या खोलींतून सुलभाहि येते . )

सुलभा : काय केलंत हें वन्सं ? का वागलांत अशा ?

मंदा : ते तसे वागले होते म्हणून . त्यांना कळलं असेल मी अशी कां वागलें तें , नाहीं तरी आयुष्य हें गणितच आहे . त्यांनींच सांगितलं होतं मला . नाहीं जमला एक गुणाकर असं समजावं त्यांनीं .

सुलभा : मला बरं वाटलं नाहीं तुमचं असं तोडून वागणं ! मामंजींना कळलं तर त्यांनाहि नाहीं बरं वाटणार .

मंदा : ( एका बाजूला बसलेल्या सुरेशकडं बघत . ) त्याना बरं वाटणार नाहीं अशा पुष्कळ गोष्टी होतात हल्ली या घरांत . जो तो आपल्या मर्जीप्रमाणें वागतोय ‌, त्यांना काय वाटेल त्याची काळजी केलींय ‌ का कोणीं ?

सुलभा : भाऊजी , तुमच्या फॉर्मचं काय झालं ?

सुरेश : तुम्हांला काय करायचंय ‌ ? आम्ही नापास झालों म्हणून दादा मा पैसे देणार आहे ?

मंदा : ऐकून ठेव वहिनी , पूर्वी कॉलेजांतून आल्याबरोबर दमून भागून आलों , म्हनून तूं कौतुकानं खायला देत होतीस , असशील . म्हणून काय झालं ? आई गेल्यानंतर म्हणे आईच्या मायेनं सकाळ -- संध्याकाळ आम्हांला जेवायला घालणारं दुसरं कोणी नव्हतं , तूं आलीस : असशील . पण आतां आम्ही वेगळे झालोंत , आमच्या घरांत आम्ही वाटेला तें करूं , चोर्‍या करूं , टर्मची फी बुडवूं , अभ्यासाचीं पुस्तकं विकून येऊं दुकानांत , तुला काय करायचंय ‌ ? आम्ही आतां वेगळे झालों आहोंत .

सुरेश : पण मी असं कुठं म्हटलं होतं ?

मंदा : कांहीं बोलूं नकोस .

[ मंदा आंत निघून जाते . ]

सुरेश : हं , जा गेलीस तर -- पण मला भूक लागली आहे . मी तशा अर्थानं नव्हतं म्हटलं . बरं का वहिनी , [ ती पलीकडच्या दालनांत जाते . ] ए , ए वहिनी . रागावलीस ? पण बोलायला काय होतंय ‌ ? हं , बरोबर . आम्ही लेखक नाहीं ना ? दादा आहे . आमचे अण्णासुद्धां होते पूर्वी . मीसुद्धां होईन पुढं . मी कविता करतों . हो वहिनी , मग मी सुद्धां गोष्टी लिहीन सिनेमाच्या . श्रीमंत होईन दादासारखा . पण वेगळा नाहीं होणार . अण्णांना दुःख नाहीं का होत ? मग वेगळं कशाला व्हायचं ? मग सहस्त्रबुद्धयाचं बिल कुणीं द्यायचं ? म्हणून मी बोललों रागानं , अण्णा हल्लीं जेवतसुद्धां नाहींत नीट . मल माहीत आहे त्यांना फ्लॉवरची भाजी खूप आवडते . पूर्वीं रोज आणायचे . ( फळीवर चढून तिथला रुपया खिशांत टाकतो . ) आमच्यासाठीं आपली इच्छा मारतात ते . चार आणे देतात भाजीला ; तेवढयांत कशी येणार भाजी चांगली ? पूर्वीं संध्याकाळीं ते पाव खायचे दुधाबरोबर , हल्लीं नाहीं खात . त्रास होतो म्हणतात ; त्रास पोटाचा नाहीं , दादाचा आहे , कुणीच नाहीं आमचं मग तूं तरी कशाला बोलशील ? रागवा , रागवा ! ( ओरडतो ) पण मला भूक लागलीय ‌. हँ हँ हँ ! कुणी उत्तरसुद्धां देत नाहींत . कुणीच नाहीं आपलं . नाहीं कुणी आपलं . नाहीं कुणी आपुलें . आपुले जग वैरी झालें . जग म्हणजे घर . सगे सोयरे हितचिंतकहि . सर्व पारखे झाले . वहिनी , बघ मीसुद्धां कविता करतों आग भुकेची -- पोटी -- पोटी नाही डोळ्यांत ,-- आग भुकेची डोळी . नाहीं . नयनीं आली . आग भुकेची नयनीं आली . आई . ! अँ : . ! पण आई आहे कुठं ? नसूं दे . पण कवितेंत आई चांगली असते . आग भुकेची नयनीं आली तेज करपुनी गेलें . तेज डोळ्यांतलं . हँ हँ ! डोळ्यांतलं तेज करपून गेलंय ‌, काय आयडिया आहे !-- तहानेलेल्या ह्रदयाचेंहि पाणी पाणी झाले . तहानेचंच पाणी झालं . आई असती तर द्दष्ट काढली असती माझी . आतां कोण आहे ? ( बहिनी डोळे पुसते . ) निदान कविता ऐकून स्वायला तरी दिलं असतं . ( ओरडतो ) मला भूक लागलीय ‌-- पंचप्राण पोटांत कोंडले . कुठं असतात कोणाला ठाऊक ? आमच्या पोटांतच आहेत . अं .-- भुकेनं जीवित धगधगलें .-- पुढं -- पुढं काय ?. हँ . ! नाहीं सुचत . पण कवितेनं पोट कुठं भरतंय ‌ ? अग आक्का , मला भूक लागलीय ‌. ( आंतून मंदा येते व त्याच्यापुढें बशी आपटते . ) हळू ; केवडयानं बशी आपटलीस ? नवीन आणायला आतां काय दादा आहे काय घरांत ? अन ‌ चहा कुठंय ‌ ? केला नाहीं का अजून ? अरेच्चा ! मी एकटाच बडबडतोंय ‌. तुम्हांला बोलायला काय होतंय ‌ ? असा काय गुन्हा केलाय ‌ मीं ? चहा दे ना !

मंदा : वहिनी , साखर का थोडी उसनी ?

सुलभा : कां ? ( पडद्या पलीकडून बोलते आहे . )

मंदा : साहेबांना चहा हवाय ‌.

सुलभा : आमच्या घरांतली चालेल ?

मंदा : अण्णांनीं नाहींच घेतला चहा . पण बाकीच्यांना लागतं ना गिळायला .

सुरेश : बोल वाटेल तसलं . उपहासानं .

सुलभा : मामंजींनीं आणली नाहीं आज साखर ?

मंदा : आणणार होते . पण त्यांच्या खिशाला भोंक पदलंय ‌.

सुलभा : म्हणजे ?

मंदा : सकाळीं एक रुपया चौदा आणे त्यांच्या खिशांत होते . चौदा आणे पडले . ( सुरेशच्या हातातून चमचा पडतो . )

सुलभा : कसला आवाज झाला हो ?

मंदा : हल्लीं रोज पडतात त्यांच्या खिशांतले पैसे . मिळकत भरपूर आहे ना त्यांना ; म्हणून आम्ही हॉटेलांत जाऊन खर्च करतों . तरी आम्हांला घरांत चहा लागतोच .

सुलभा : मग घरांत खावं कीं हवं तें . हॉटेलांत कशाला जावं लागतं ?

मंदा : कॉलेजमध्यें गेल्यावर फँशन म्हणून जावं लागतं , शिवाय अण्णांनासुद्धां समाधान वाटतं , आम्हीं असं केलं म्हणजे .

सुरेश : तसं नाहींय ‌.

सुलभा : आणि फँर्म मिळाला का तुमचा परीक्षेचा ?

मंदा : नाहीं . टर्मंची फीच भरली नाहीं आम्हीं . उधळले ते पैसे .

सुरेश : तसं नाहींय ‌. आपल्याला ठाऊक नाहीं त्या बाबतींत शिष्टपणानं बोलूं नये .

मंदा : मी तुझ्याशीं बोललें नाहीं . तुझं खाणं संपलं का ? भरलं का पोट ? का आणखी घालूं करून ?

सुरेश : हेंसुद्धां नकोय ‌ . जा घेऊन . तुमच्या बोलण्यानं भरलंय ‌, थांब आतां , अण्णांना येऊं देत .

मंदा : ऐकतील ना सगळं तूं सांगितलेलं . तुमच्यासाठींच खस्ता खातायत .

सुलभा : कुठं गेलेत मामंजी ?

मंदा : नोकरी शोधायला गेलेत . पैसे नकोत मिळवायला ? आमच्या कॉलेजचा खर्च चालवायल ; आमच्या हॉटेलची बिलं भागवायला ?

सुरेश : त्या काकानं केली असेल चहाडी . वाटेल तें सांगतात . मी हॉटेलांत जात नाहीं .

मंदा : थापा मारूं नकोस .

सुरेश : थापा नाहींत .

मंदा : मग कुठं जातात अण्णांच्या खिशांतले पैसे ? आज सकाळीं चौदा आणे गेले त्यांच्या खिशांतले . कुणीं नाहीं घेतले तुझ्याशिवाय .

( सुलभा दुधाचा कप घेऊन इकडे येते . )

सुलभा : असं करूं नाहीं भाऊजी . काय हवं तें घरांत मागून घ्यांव . हॉटेलांत कशाला जायचं ? मामंजीना वाईट नाहीं का वाटत ? ( कप त्याच्या पुढें करते . ) हं घ्या .

सुरेश : मला नकोय ‌ चहा .

सुलभा : चहा काय ? खिशांत पैसे असतील , बाहेर दुकानं आहेत .

सुरेश : ( काकुळतीला येऊन आणि चिडून ) मी हॉटेलांत जात नाहीं . अण्णांची शपथ !

मंदा : मग काय केलंस त्या पैशाचं ? ( एक पिशवी आणून तिच्यापुढं आपटतो . ) हें काय ?

सुरेश : फ्लॉवरची भाजी आणि पाच आणलेत .

मंदा : कशाला ?

सुरेश : अण्णांसाठीं .

सुलभा : तुम्हांला कुणीं सांगितलं होतं आणायला ?

सुरेश : मींच आणले . आम्हांला जें जें हवं , तें तें अण्णा करतात . त्यांना काय हवं तें कुणीच करीत नाहीं . आपण करावं म्हणून मीं आणले . काल आम्ही पत्ते खेळत होतों -- काका , अण्णा , आक्का आणि मी . लाडीस . आक्काला विचारा . ती रागावलीसुद्धां माझ्यावर . अण्णांच्याकडं बदामाला मारती आहे हें ठाऊक असूनसुद्धा एक्का टाकला मीं . त्यांना हुकुमानं हात घेता यावा म्हणून . त्यांना हात मिळाला तेव्हां माझ्या डोळ्यांत पाणी आलं . हिनं विचारलं . रडतोस कशाला ? पण तें आनंदाचं पाणी होतं , त्यासाठीच आणली ही मीं ह्फॉवरची भाजी आणि पाव ; त्यांना खातांना बघून आनंदानं रडतां यावं म्हणून .

मंदा : चोरीच्या पैशानं .

सुरेश : पण मी हॉटेलांत गेलों नव्हतों .

सुलभा : आणि कुठले पैसे मिळाले असं मामंजींनी विचारलं तर ?

सुरेश : मी सांगणार होतों त्यांना .-- सांपडले म्हणून .

मंदा : थापा .

सुरेश : शपथ नाही .

मंदा : आणि टर्मची फी ? त्याचं काय झालं ?

सुरेश : ठाऊक नाहीं मला . कांहीं सांगत नाहीं मी . जा , हें घेऊन जा ! जा घेऊन ! तूंच खा , जा ! जा घेऊन बशी ! कांहीं बोलायचं नाहीं मला . जा ! जा !!

मंदा : नको तर नको खाऊस . ( असें म्हणून बशी घेऊन जाते . )

सुरेश : आमच्यावर विश्वास नाहीं कुणाचा .

सुलभा : माझा आहे विश्वास तुमच्यावर . तुम्ही हें दूध घ्या बघूं

सूरेश : मला नको .

सुलभा : दुधाला नाहीं म्हणूं नाहीं .

सुरेश : तूं कां आलीस आमच्या घरांत ? ( कप तोंडाला लावतो . )

काका : ( त्या बाजूनें येऊन ) सुनबाई . कुठं आहेस गं ?

[ सुलभा तिकडे जाते . ]

काका : तिकडे काय करत होतीस ? तुझा नवरा तिकडे दिवे लावतोय ‌. घरांत असा अंधार ! तो आल म्हणजे मला शिव्या देईल . ( सुरेश खिशांतला रुपया काढून परत फळीवर ठेवत असतांना काका इकडे येतात . ) का हो चिरंजीव ! आपलं काय चाललंय ‌ ? ( त्यांच्या शब्दानें दचकून रुपया पडतो , तो उचलून -- ) रुपाय ? अस्सं ! म्हणजे वडिलांनीं ठेवला होता तो आपण चोरत होतां ?

सुरेश : नाहीं ;

काका : हो . शब्द चुकला असेल . लेखकांचे बंधु आपण , शब्दांची दुरुस्ती करीत बसाल . वर्तनाची न होईना ! चोरत नव्हतां , मग तुम्हांला कुठं तरी सांपडला असेल तो ठेवत होतात ?

सुरेश : ठेवत होतों . मीं घेतलेला होता उचलून .

काका : तो परत ठेवत होता ? पश्चात्तापानं का काय ? अरेरे ! असं नका करत जाऊं . पश्चात्ताप म्हणजे मूर्खपणा ? तुमच्या वडिलांनीं केला पाहिजे . तुम्हांला करून कसं भागेल ? गुन्हेगार ते आहेत ; तुम्हांल जन्म दिला ना ? असं नका करत जाऊं कांहीं तरी खुळ्यासारखं . चला . चला ; आपण जाऊं बाहेर . चैन करूं या . कुठं मिळतात बटाटेवडे चांगले ? प्रभा विश्रांतिगृह ? का कँफे हौस ? का पूजम ?

सुरेश : मला ठाऊक नाहीं ,

काका : वा , वा , ! हें कांहीं तरीच . तुम्हांला नाहीं तर कुणाला माहीत असणार ?

सुरेश : त्या हॉटेलच्या मालकांना विचारा !

काका : अहो , तुमच्या जिवावर तर त्यांचा धंदा . श्रम करायला नकोत ; तरी मिळकत चालूं . वडिलांना काय कष्ठ पडतात थोडेच संसार चालवायला ? तुम्हीं नाहीं उधळायचे तर काय उपयोग त्यांनीं ठेवलेल्या पैशाचा ?

सुरेश : जो उठतो तो आम्हांलाच बोलतो .

काका : अहो , स्तुति करतोंय ‌ तुमची . बोलून कसं भागेल ! पाठ थोपटायला हवी तुमची ! आदर्य मुलगा म्हणून गौरव करायला हवा तुमचा ! आदशीचे धडे बंधुराज देतात तुमचे प्रेक्षकांना चित्रपटात ; तुम्ही घरांत आपल्या वडिलांना धडे द्या .

सुलभा : पाहून आलांत तुम्ही चित्रपट ?

काका : हो . बघून धन्य पावलों ?

सुलभा : कसा आहे ? तुम्हांला आवडला ?

काका : उत्कृष्ट ! प्रश्न आहे काय ? यांचेच बंधु ते . त्यांचेच बंधु हे . आदर्श आहे !

सुलभा : इतक्यांत संपला ?

काका : मीं मधूनच आलों उठून . ‘ घरांतल्या मुलाबाळांना आणि सुना -- मुलींना घेऊन अवश्य पाहावा कोणाहि सभ्य गृहस्थांनीं ’ अशी जाहिरात केली आहे त्याची .

सुलभा : अस्सं ?

काका : एकमेकांच्या चेहर्‍याकडं बघतील ? बिशाद काय ! पडद्यावरून जी नजर उचलली त्यांनीं . ती स्वतःच्या पायाशीं आणली एकदम ; आपल्या पायांखालीं यांतलंच कांहीं जळतंत ‌ का तें बघायला . उत्कृष्ट ! आदर्श बोलपट ! वडिलांचं नांव गाजवणार ! ते लेखक होते म्हणे , सूर्ख . कांहीं तरी लिहीत होते . चुकलंच . याच्या पोटीं त्यानं जन्म द्यायला हवा होता . चित्रपट संपेपर्यंत लोकांनीं जयघोष चालवल होता ,-- माधवचा . आणि पर्यायानं त्याच्या बापाचा ! सुलगा बापाचं नांव काढतो असं म्हणतात तें असंच असावं बहुतेक .

सुरेश : हं . दादा कितीहि वाईट असला तरी असलं घाणेरडं कधींच लिहिणार नाहीं . ह्यांना आपली जेव्हां तेव्हां ज्यांना त्यांना नांवंच ठेवायल हवींत . [ जातो . ]

सुलभा : ते काय करणार ? पैसे देणार्‍या माणसाला हवं तसं लिहिलं त्यांनीं . ( पलीकडे सुलभेच्या मागे दरबाजांत विनायक उभा आहे . )

काका : जितपत भांडवल तितपत बुद्धि .

विनायक : लिहिणाराला अक्कल नको ? तो कांहीं धंदा नव्हे माझा , मी फक्त पैसे दिलेत त्याला , आणि तेहि कर्जाऊ .

सुलभा : कां आलांत तुम्ही या घरांत न विचारतां ?

विनायक : माधवला भेटायल आलोंय ‌.

काका : ते घरीं नाहींत हें माहिती नव्हतं . ?

विनायक : आपण आहांत वाटतं ?

काका : मग आमच्या नांवामागं आपण कुठं ‘ कै .’ वगैरे वाचलं काय ?

विनायक : कसा काय वाटला चित्रपट आपल्याला ?

काका : होपलेस !

विनायक : थँक् ‌ यू ! म्हणजे उद्यां पैसे मागायच्या वेळी तुमची साक्ष उपयोगी पडेल .

काका : ते त्या वेळीं पाहूं . ( काका घरांत जातात . )

विनायक : पण आमचा वायदा पिक्चर लागेल त्या दिवशी पैसे मिळण्याचा ठरला होता .

सुलभा : ते आल्यावर या .

विनायक : मी सावकार आहे त्यांचा .

सुलभा : जें काय सांगायचं असेल तें त्यांना सांगा आल्यावर . पण यापुढे ते नसतांना या घरांत तुम्ही पाऊल ठेवलेलं मला चालणार नाही .

विनायक : तेंच मी तुम्हांला सांगतों , तुम्ही त्याला सांगा . मी कर्जाऊ पैसे दिले होते त्याला . त्यांतूनसुद्धा ते जर फेडण्याची त्याच्यांत शक्ति नसेल तर दुसरा उपाय -- मी मंदाशी लग्न करायला तयार आहे .

सुलभा : गेट आऊट आय से ! तुमची योग्यता तुम्हांला ठाऊक नसली तर मी सांगते . प्लीज गेट आऊट ! मंदाच्या जोडयाजवळसुद्धां उभं राहण्याची तुमची लायकी नाही , तिच्याशीं लग्न लावायल निघालांत तुम्ही ?

विनायक : त्यासाठीं पैसे मोजलेत मीं .

सुलभा : बाहेर व्हा !

विनायक : होतों . परिणाम चांगल नाहीं होणार याचा . आतां मी जातो ; पण पुन्हां येणारच . आणि पुन्हां येणार ते एक मंदाला मागणी घालण्यासाठीं किंवा घरावर जप्ती घेऊन तरी ! सुज्ञांस अधिक सांगणें नलगे .

( असें म्हणत तो जातो आणि काका इकडे येतात . )

काका : तूं हांकलून दिलंस वाटतं त्याल ? हरकत नाहीं . तुझ्या नवर्‍याल पटेल का हें पण ?

सुलभा : विचारणार नाहीं , सांगणार आहें . यापुढं मी त्यांना ,

काका : काय तें ? [ अण्णा पलीकडे येतात . ]

सुलभा : यापुढंहि वडिलांचा हात सोडून वेगळं राहायचं असं त्यांनीं ठरवलं असलं , आणि असलींच माणसं घरी येणार असलीं तर मी घर सोडून माहेरीं जाईन असं .

काका : जा तूं ! बाप घरांत घेईल का तुझा ?

अण्णा : त्यानं नाहीं घेतलं तर मी घेईन . सून म्हणून ती घरांत आली असली तरी मानतों मी मुलगी तिला .

काका : आलांत ? आणि देणं देऊन आलांत का सहस्त्रबुद्धयांचं ?

अण्णा : नाहीं . सुरेश कुठं गेलाय् ‌ ग मंदा ?

मंदा : बसलाय ‌ सांग जाऊन बागेंत . कविता करतोय ‌.

काका : का रे ! आणखी काय उपद‌व्याप केलान् ‌ त्यानं ?

अण्णा : टर्म भरण्यासाठीं दिलेले पैसे देऊन सुरेशनं बिल भागवलं सहस्त्रबुद्धयांचं . तें सांगाण्यासाठीं बोलावलं होतं मला त्यांनीं . त्या कारकुनानं उगाच वेडावांकडा निरोप सांगितलान ‌.

काका : छान ! त्या पोराला कींव आली म्हण की तुझी . बरं झालं . अनायासे त्याचंहि शिक्षण बंद झालं . थोरल्या मुलाकडून मिळणारी प्राप्ति बंद झालीय् ‌; सोय केली धाकटयानं तुझी . मंदाचं शिक्षण थांबलंच आहे ; हा दुसरा खर्च वांचला . वा . कल्याणकर्ता आहेस मुलांचा !

अण्णा : सगळींच माणसं माझ्याइतकीं वाईट नाहींत जगांतलीं . दुकानांतून पैसे घेऊन त्याचा फॉर्म आणायल गेलों मी . पण परत येतांना ते पैसे त्यांचे त्यांना देऊन परत आलो .

काका : कां ? मिळाला नाही फॉर्म ?

अण्णा : मिळाला . त्याचाहि आणि मंदाचाहि .

मंदा : तो कसा , अण्णा ?

अण्णा : सुरेशनं माझ्या सहीनं पत्र लिहिलं होतं प्रिन्सिपॉलना .

काका : तुझ्या सहीनं ? वा . ? गुणी आहेत हां तुझीं पोरं एकेक !

अण्णा : खरंच गुणी आहेत . माझी सही करणं हा गुन्हा लहान वाटेल इतकं ह्रदय पिळवटणारं होतं तें , आमच्या विभक्त कुटुंबाच्या परिस्थितविर विदारक प्रकाश टाकला आहे , त्या टीचभर पोरानं त्या वीतभर पत्रांत . असला हुशार मुलगा शिक्षणापासून दुरावूं नये म्हणून प्रिन्सिपालँनं दोन्ही फॉर्म देण्याची परस्त्पर व्यवस्था केली होती . आणि तूहि बघ ; ते पैसे वगैरे गेल्याचं नको बोलूंस त्याला . अभ्यास करूं दे . आणि तूंहि आतां जोरांत तयारीला लाग परीक्षेच्या .

काका : बघ , बघ , वाटेल तशी बोलत असतीस ना त्याला ? बघ किती उपयोगी पडला तुझ्या तो तें !

मंदा : तुमचं बरोबर आहे . ज्या बाजूला सरशी , त्या बाजूला .

काका : त्या बाजूला सरशीच असते नेहमी . फक्त एकदां सुरुवात व्हावी लगते सरशीची . ( सुरेश दरवाजांत येऊन उभा राहतो . )

सुरेश : ‘ तहानेलेल्या ह्रदयाचंहि पाणी पाणी झालं ! ’ अण्णा ! मीं कविता केलीय् ‌ .

अण्णा : ह्या कविता करण्यापेक्षां आतां जरा अभ्यास कर आणि पास हो .

सुरेश : पण मी यंदा परीक्षेला --

अण्णा : बसणार आहेस . कळलंय ‌ मला सगळं . मी सहखबुद्धयांना भेटलों आणि कॉलेजच्या प्रिन्सिपॉलनाहि .

सुरेश : अण्णा ! माझी चूक झाली . मीं चौदा आणे घेतले होते तुमच्या खिशांतले .

काका : हं . माफ करून टाक त्याला . थांबलास कशाला ? चांगला बाप आहेस तूं .

अण्णा : होय , ऐक रे रघुनाथ , हा चांगला बाप बोलतोय ‍ . माफ केलंय ‌ मी तुला सुरेश . ( तो पाय धरतो . ) ऊठ , ऊठ ! आनंद यायचा म्हणजे असा चहूंबाजूनं येत असतो . ( बाहेर पोस्टमन अण्णासाहेब आगरकर नांवाचा पुकारा करतो . सुरेश लखोटा घेऊन आंत येतो . अण्णांचे डोळे लखोटा वाचून भरून येतात . )

काका : का रे ? तुझ्या डोळ्यांत पाणी कां ?

अण्णा : तें पाणी आनंदाचं आहे . तुला म्हटलं होतं ना मी ?’ आनंद यायचा झाला म्हणजे असा चहूंबाजूंनीं येतो . ’ दिल्लीला राष्ट्रपतींकडून लौकरच माझा सत्कार होणार आहे . ( काका सँलूट करतात . )

काका : कांहीं झालं तरी माझा भाऊ आहे .

अण्णा : रघुनाथ , मी जाणार आहें दिल्लीला ; तेव्हां सूनबाईकडे जरा लक्ष ठेव . कारण दिवस गेले आहेत तिला . साहित्य -- शारदेच्या मंदिरांत मी आजवर केलेली " अल्प स्वल्प सेवा माझी आज फळां आली " " याचसाठीं केला होता अट्टाहास , शेवटचा दीस गोड व्हावा --"

[ काका अण्णांच्या पायां पडतात व पडदा पडतो ]

दुसरा अंक समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP