हंसदासाचरण - संप्रदाय चालविण्याची रीत

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


हंसप्रसादें हंसदास । हंसचि जाहले अखंडैकरस । तेचि योग्य जाले उपदेशास । द्यावया कवणा ॥१॥

दीक्षित अथवा अदीक्षित । या उभयांसीहि ज्ञाता गुरु विख्यात । तस्मात अधिकारियाच्या पायीं रत । जालें पाहिजे ॥२॥

जरी मंत्रोपदेश असे अन्याचा । तया अधिकार असे तरी साचा । तरी उपदेश ज्ञानविचाराचा । ज्ञात्यापासून घ्यावा ॥३॥

ज्ञानेविण जरी गुरुत्व केलें । तरी शिष्य तरतीना मुमुक्षु भले । तरी त्या गुरुनेंही सांगावें वहिलें । बापा तूं जाय ज्ञात्याकडे ॥४॥

आपणही महंतपणा धरुनी । बैसों नये मोठेपणा घेउनी । ज्ञाताच्या चरणीं अनन्य होउनी । कार्यसिध्दि करावी ॥५॥

असो सर्वांसी गुरु तो ज्ञाता । येरासी गुरुत्व न ये सर्वथा । परी साबडियासी मंत्र उपदेशितां । बाधही नाहीं ॥६॥

परी हंसदास प्रापंचिक नर । दीक्षाहीन आणि ज्ञान नसे साचोकार । तयासी नसेचि कांहीं अधिकार । कोणा उपदेश द्यावया ॥७॥

दीक्षित मठपति अथवा साचारी । तोचि मंत्र द्यावया अधिकारी । साबडे भाविक भजनानुकारी । तयां पंथासी लावावें ॥८॥

आपण भजून भजन करवावें । स्वयें जप करुन जपासि लावावें । ध्यानस्थ होऊन ध्यान उपदेशावें । मानसपूजादि ॥९॥

श्रवण स्मरण कीर्तन पादसेवन । अर्चन वंदनादि नवविधा लक्षण । स्वयें आपण करुन । भाविका करवावें ॥१०॥

सद्रुण करुन करवावे । दुर्गुण त्यागून त्यागवावे । आपण त्यागून त्या हातीं त्यागवावे । विषयसुखासी ॥११॥

परी यारे घ्यारे माझा उपदेश । ऐसें म्हणों नयेचि कवणास । अथवा घालूं नये मध्यवर्तीस । सहज येतां स्वीकारावें ॥१२॥

परी तयाचा अधिकार पहावा । मुमुक्षु तरी ज्ञात्याकडे लावावा । साबडा असतां मंत्र त्या द्यावा । जेणें होय ह्रदयशुध्दि ॥१३॥

निस्पृहत्व जरी तया आवडे । तरी दीक्षा तया द्यावी कोडें । जरी असतां प्रपंची पवाडें । तया मंत्र जप सांगावा ॥१४॥

उपासना ध्यान मानसपूजा । भजन अर्चनादि सांगावे वोजा । दीक्षिताचरण जें बोलिलें वोजा । त्या रीती तया सांगावें ॥१५॥

परी शिष्य करुन काळ क्षेम । आपुला चालवूं नये आश्रम । आपणां संकट जरी आलें परम । तरी शिष्यवर्गा मागूं नये ॥१६॥

आपुलें प्रारब्ध आपण भोगावें । भिक्षेंत मिळेल तितुक्यांत सांग चालवावें । कवणें देतांही न घ्यावें । लालुची बुध्दीनें ॥१७॥

तेणें पूजासमयीं पुढें ठेविलें । तरी प्रसाद म्हणोनि पाहिजे दिधलें । लालुचीनें एकदां जरी घेतलें । तरी पुन्हां न मिळे ॥१८॥

शिष्याचें मनांत कीं कांहीं घडावें । तरी तें ओळखून त्या आज्ञापावें । कीं देउळें पडशाळा बांधावें । अथवा घालावी सत्रें ॥१९॥

गुरुसीच कांहीं द्यावें त्यास वाटे । तरी द्रव्य तें घेऊं नये हटें । वस्त्रपात्र घ्यावें गोमटे । तेंही एकदा ॥२०॥

जरी तो कृपणचि असला । अपेक्षा तरी नसे आपणाला । परी शिक्षा करुन लावावें धर्माला । दशांशेंकडोनी ॥२१॥

आपणाकरितां की अन्यायाकरितां । मागवावें न मागावें स्वतां । परी तयाचा दशमांश तत्वतां । धर्माकडे योजावा ॥२२॥

कोणी पाहिला उपदेश घेउनी । नंतर विकल्प येऊनि त्याचें मनीं । जाऊं लागे अन्यत्र स्थानीं । तरी नको न म्हणावें ॥२३॥

अनन्यचित्तें खरे जाले । तयां न पाहिजे उपेक्षिले । पुत्रावरी जेवि प्रेम असिलें । त्यापरी शिष्यावरी ॥२४॥

कोणी गुरुगृहींच जरी राहिला । स्वबुध्दीनें तत्पर सेवेला । तरी त्यावरी सत्ता करुं न द्यावी कवणाला । शरीरसंबधियासी ॥२५॥

स्वतांहि आज्ञा कठिण । करुंच नये सत्यप्रमाण । हा किंकरभाव न यावा पूर्ण । मग सत्ता तरी कैची ॥२६॥

अंतरिचा भाव तरी ऐसा । परी कळूं न द्यावा तया सहसा । भीति असावी त्याच्या मानसा । कीं चुकतां शिक्षा करितील ॥२७॥

भजनपूजनसाधनासी । ध्यानधारणादिअभ्यासीं । अणुमात्र चुके तरी तयासी । वैरिया ऐसी शिक्षा करावी ॥२८॥

सांगतां नायके जो स्वभावा । तो द्रव्यवान तरी दवडून घालावा । आज्ञा वंदी तो पोटीसी धरावा । निर्द्रव्य जरी ॥२९॥

मुख्य प्रतिज्ञा ऐसी करावी । कीं मागण्याची इच्छाचि न व्हावी । गुरुदक्षिणा मागोनि लावावी । मंडळी भजनाकडे ॥३०॥

सांप्रदायिका भजन घडलें । तरी जाणावें आपणां सर्व पावलें । येणें रीती पाहिजे चालविलें । भक्तिमार्गासी ॥३१॥

कवणासी कांहींच मागावेना । तरी येथें करील कोणी कल्पना । कीं न मागतां उत्साह होती नाना । कवणे परी ॥३२॥

तरी ऐका एकाग्र भाव । मनउत्साह तोचि उत्साव । येर खटाटोप तो व्यर्थचि नांव । संकट मनासी ॥३३॥

तथापि सांप्रदायिकासि सर्व सांगावें । मनउत्साहें जरी वाटे करावें । तरी उत्साहासी सादर व्हावें । चित्तें वित्तें शरीरें ॥३४॥

शिष्येंही गुरुआज्ञा न इच्छावी । शक्ति ऐसी कारणीं लावावी । येणें रीती नैमित्तिकें चालवावी । संतोषचित्तें ॥३५॥

गुरुनें अथवा शिष्यानें । होईल तितकें अगत्य करणें । परी न घडतां शोकी न होणें । विवेक उमजावा ॥३६॥

या रीती जरी संप्रदाये । चालविणें असे यथान्वये । हंसदासें चालवावें निश्चयें । आज्ञा असे समर्थाची ॥३७॥

तेचि गुरुआज्ञा चिमणें बाळ । मुखीं अल्पसें बोलिलें बरळ । अन्यथा होतां सद्रुरु दयाळ । कृपा न करिती ॥३८॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । हंसदासाचरण निगुती । सप्तम प्रकरणीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP