नारायणहंसाख्यान - परांड्यांत आगमन

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


जय जय सदगुरु परात्परा । निजसदनासी करुणाकरा । कैवल्यदानीं अति उदारा । निर्विकाररुपा ॥१॥

ऐका श्रोतीं सावधानमानस । सखारामबावा नारायणहंस । या उभयांचा एकत्र रहिवास । जगदुद्वारास्तव ॥२॥

काशीक्षेत्रावरी भागीरथी । कित्येक जन नाहाती तया तीर्थी । तैसे कितेक जन स्वसुखपरमार्थी । सुखी जाले ॥३॥

रमारमण उमारमण । एकत्र मिळाले दोघेजण । तेणें जग होत असे पावन । ऐक्यभक्तियोगें ॥४॥

असो डोमगांवासी आलिया । दिव्य बांधिल्या वोवरिया । आणि चौघडाही तेथें ठेवुनिया । स्वसुखें राहिले ॥५॥

परी सखाराम बावा उपाधिकरितां । बाहेर संचारा जाती तत्त्वतां । नारायणहंस निवांत चित्ता । डोमगांवींच राहती ॥६॥

कित्येक काळ उभयतांही राहती । परी सदा संवादसुखाची उन्नति । कित्येक जन दर्शनासी येती । कित्येक राहती सेवोनी ॥७॥

उभयतां एकत्र असता क्षणीं । बोलती एकमेकां आनंदोनीं । तेव्हां ऐकती जे सावधपणीं । ते लाहती सुखासी ॥८॥

सखारामबावा जरी नसतां । नारायणहंसांसी पुसों जातां । कांहीं न सांगोनी जा ह्मणती आतां । पुसें गुरुसी आह्मां न कळे ॥९॥

अथवा जरी कृपेनें सांगती । परी दृढ करवावी सद्रुरुभक्ति । गुरुभक्तियोगें ज्ञानप्राप्ति । अनायासें साधका ॥१०॥

अल्पचि वचन बोलावें । परी साधकातें तें बिंबऊनि द्यावें । अनधिकारियासी स्वयें दाखवावें । अपुलें वेडेपण ॥११॥

केव्हां वस्त्र केव्हां दिगंबर । केव्हां ग्राम केव्हां कांतार । केव्हां शय्या केव्हां भोंवतीं केर । तेथें जावोनि लोळावें ॥१२॥

केव्हां चौरंगीं बैसउनि पूजिती । तेव्हांही बैसावें सहजगती । केव्हां स्वेच्छा मातींत लोळती । आनंदेंकडोनी ॥१३॥

केव्हां कोठडीत एकट बैसावें । तेथें कोणी येतां भेडसावें । कोणी बोलतां तया बोलावें । एकाचे एक ॥१४॥

केव्हां एखादे स्थळीं पडोन रहावें । चिरकाळ तेथोनि न उठावें । सखारामबावानें धुंडीत यावें । न्यावें उचलोनी ॥१५॥

बळें घालितां करावें स्नान । तैसेंचि करावें पानभोजन । वस्त्रही करावें परिधान । सुखें शयनीं निजवावें ॥१६॥

केव्हां पंक्तीसी करावें भोजन । परी पूजा -मंडळाची नसे अडचण । केव्हां अंथरुणींच बैसोन । करावें भोजन ॥१७॥

केव्हां करतळभिक्षाच करावी । केव्हां मधुकरीच आणवावी । केव्हां वृत्ति अति संकोचावी । सखारामबावाची ॥१८॥

तयाचेंहि मन संतोषवावें । जैसें आवडेल तैसेंच व्हावें । ऐसें किती सांगावें । वर्तणुकीचे प्रकार ॥१९॥

केव्हां खेळणें बुध्दिबळाचें । केव्हां प्रसंगें गंजिफाचें । केधवां पाहणें पुस्तकांचें । केधवां गोष्टी काहण्या ॥२०॥

कवणासी यथास्थित बोलावें । कवणासी मौनचि उगें धरावें । कित्येका उत्तम मार्ग शिकवावें । ज्याचे तयावरी ॥२१॥

असो सखारामबावा फिरो जाती । समागमें न्यावया पाहती । परी कदा काळीं संगें न जाती । बहुत उपाधीमुळें ॥२२॥

सखारामबावा बाहेर गेलिया । निवांत बैसावें माजीं खोलिया । केव्हां उगेच जावें फिरावया । नदीतीरीं कीं ग्रामीं वनीं ॥२३॥

अथवा कविताचि करावी । परी परदारिकांची नलगे उठाठेवी । तेथें नाम पाहिजे म्हणोनिया गावी । नामा भावीं वेवादन ॥२४॥

म्हणोनि ग्रंथ कांहीं करावे । तेचि कोणकोण ऐकावें । जयाचें सहज बोलणें स्वभावें । वेदांत संमत ॥२५॥

श्रीशंकराचार्याची शैली । प्राकृत भाषेंत प्रगटविली । येरे सांख्ययोगादि अव्हेरिली । या इतर शास्त्रा कोण पुसे ॥२६॥

प्रथम दासबोधाचा संकेत । काढिला भावार्थ वेदांतसंमत । रामदासाच्या हातीं विराजत । यास्तव नाम संकेत -कुबडी ॥२७॥

पुढें आगमसार असे केला । तो संपूर्ण वेदांतविषयें भरला । अनुभव पाहतां ज्ञातयाला । समाधानासी तृप्त करी ॥२८॥

त्यापुढें काशिनाथबावाकरितां । सदाचार आचार्यकृत तत्त्वतां । त्याची टीका केले समस्ता । बाळांसी बाळबोध ॥२९॥

ऐसे तीन ग्रंथ डोमगांवा आंत । जाले असती परम विख्यात । आणि पूर्वारंभ जो समर्थकृत । त्यावरी गाथा विस्तारिला ॥३०॥

असो संस्थानीं असता क्षणीं । कित्येक नेऊं पाहती स्वग्रामालागुनी । परी न जाती कोणतेही स्थानीं उपाधि वाढेल याकरितां ॥३१॥

केव्हां परंडियासी स्वच्छंदेंकरुन । उगेंचि राहते असती जाऊन । एकदां मनोहरबाबानें प्रीतीकडून । लउळासी नेलें ॥३२॥

तैसेंच रामबावा पांगरीस नेत । तेथेंचि राहिले स्वस्थचित्त । परी सखारामबावानें जावोनि त्वरित । डोमगांवासी आणिलें ॥३३॥

पुढें पुढें संस्थानीं रहावयासी । त्रास उपजता जाला मानसीं । याचें प्रयोजन ऐका निश्चियेसी । अल्पसें बोलूं ॥३४॥

बाळपणापासोनि नारायणहंसा । त्यागबुध्दि जे असे मानसा । तें पूर्ण ज्ञान जालियाहि सहसा । विरक्तींत उणें नव्हे ॥३५॥

प्रपंच जरी सांडिला बुध्दी । तरी जडेल परमार्थाची उपाधि । यास्तव त्या मार्गी न पडती कधीं । लौकिक रीतीच्या ॥३६॥

इनामजहागिर मेळवुन । लौकिकीं विख्यात व्हावा मान । सर्व लोक यावे आपणां वोळून । यास्तव भजन उत्सव करिती ॥३७॥

एकगुणें प्रपंच त्यागिला । तो अभिमानें शतगुणें वाढविला । तूं थोर मी असे कीं धाकुला । अथवा तूं सान मी थोर ॥३८॥

मी वडील तूं धाकुटा । तूं समर्थ मी करंटा । हा व्यर्थचि अभिमान घेवोनि वांटा । बंधाचा घेती ॥३९॥

तस्मात ऐसे जे अभिमानें मातले । ज्ञानेविण उगेंचि फुगले । एकमेकांसी मारिते जाले । कलहमिषें ॥४०॥

ऐसें पाहोनिया निर्धारे । निश्चय केला कीं वनीं राहणें बरें । हा प्रपंचानल साचोकारे । आणि त्याचा संग नको ॥४१॥

पांगरीचें अरण्य सुंदर । तेथेंचि निवांत व्हावें स्थिर । ऐसा उठिला अंतरीं उदगार । उदासीनत्त्वें ॥४२॥

बाळोबाही कुटुंबासहित । येउनि राहिला परंडियांत । तेथें काषायवस्त्रें घेऊन मागत । भिक्षा उपजीविकेसी ॥४३॥

तो आठा दिवसा गुरुवारीं । श्रीगुरुचा जाला वारकरी । तेणें चुकविली जन्माची फेरी । गुरुभक्तियोगें ज्ञानद्वारा ॥४४॥

तया घेवोनि पांगरीस जावें । निवांत अरण्यामाजी रहावें । जाऊं न देतां जरी स्वभावें । तरी जावें न पुसतां ॥४५॥

येणे रीती त्रास उद्ववला । मनीं त्यागचि उद्रवता जाला । त्याहीवरी वृत्तांत ऐकिला । संन्यासकर्माचा ॥४६॥

वैराग्य नसता संन्यास घेती । दंड काषाय मात्र वागविती । श्रवण मननींच नव्हे प्रीति । मा ज्ञान वरी कैचें ॥४७॥

सदा कलह एकमेकां । वाउगाचि करिताती फुका । नित्य नैमित्तिक पुसणें कितेका । कोणी व्यवहार करिती ॥४८॥

कोणी तस्करविद्या करिती । कीं तें भोंदू होऊनि जनां बुडविती । ऐसें वर्तमान ऐकतां चित्तीं । त्रासचि उठे ॥४९॥

नको काषायबंड अघवें । नको जप कीर्तन ढोंग नव्हे बरवें । नको निरुपण संप्रदाय स्वभावें । जेथें अभिमान वाढे विशेष ॥५०॥

दंडादि तो पहिलेच न होती । काषायवस्त्रें मात्र असती । तेही फेंकोनिया समस्ती । दिगंबर जाहले ॥५१॥

जगामाजी ढोंग दाखवावें । हें तो पहिलेंच न होतें स्वभावें । संन्यासधर्मही माथां न घ्यावें । मा इतर स्पर्शत कैचे ॥५२॥

किंचितही वस्त्र न घेतां । कवणासीहि न पुसतां स्वेच्छा चालिले असती तत्त्वतां । न पाहतां माघारी ॥५३॥

सखारामबावासी कळलें । कवणें सांगतां कीं स्वामी गेले । तत्क्षणीं चित्त ते खडबडिलें । धाउं लागले पाठीसी ॥५४॥

अहो अहो जी स्वामिराया । म्हणोनि लोळणी घातली पायां । आपणांसी जाणें जेथें तेथें लवलाह्या । मी नेऊन घालीन ॥५५॥

परंतु प्रस्तुत आतां चलावें माघारी । ताप निववावा जो उठिला अंतरीं । ऐसें बोलोनि अनेक प्रकारीं । उचलोनि घेतले खांदा ॥५६॥

गांवामाजीं तैसेंचि नेलें । आसनवरी स्वतां बैसविलें । मागुती अनेक प्रकारें विनविलें । कीं श्वेतवस्त्र तरी स्वीकारावें ॥५७॥

मग सर्वही श्वेतवस्त्र आणोनी । परिधान करविलें तये क्षणीं । अल्पचि काळ राहिले तये स्थानीं । पुढें काय जालें ॥५८॥

तयारी सखारामबावाची । जाहली शहरासी जावयाची । ते समयीं निघोनि उभय तांचि । परंडिया पातले ॥५९॥

स्वामी म्हणती सखारामबावासी । तुम्ही जावें स्वस्थमानसीं । चातुर्मास लोटतां पांगरीसी । आम्ही जाऊनि राहूं ॥६०॥

तथास्तु म्हणोनि सखारामबावा । जाते जाले निवांतस्वभावा । परंड्यामाजीं बाळाबावा । सेवा करी हंसांची ॥६१॥

केशवराजाचें देउळीं राहिले । श्रोतीं सावधान पाहिजे ऐकिलें । आम्हा मुमुक्षूंचें भाग्य उदेलें । आपणचि एकसरा ॥६२॥

सखारामबावा हा भगीरथ । तेणें प्रयत्न करोनी भागीरथी -समर्थ । आणिली सर्वा करावया सनाथ । परांडे -काशीवरी ॥६३॥

काय आमुचें भाग्य उंचावलें । अप्रार्थित निधान घरा आलें । हें असो उपकारा उत्तीर्ण जाले । न वचे सखारामबावाचे ॥६४॥

मग मी आणि चतुर गुजर । भैरव नामें भिक्षुक विप्र । सद्रावें जाउन पसरिलें पदर । जी जी सेवा स्वीकारावी ॥६५॥

स्वामी म्हणती अनादि सेवा । होतचि असे स्वयमेवा । गुरुशिष्यपणाचा न पडतां गोवा । प्रतिदिनीं बोध तरी करिती ॥६६॥

रजपुताची मनबाई । ते सखारामबावाची सांप्रदायी । स्वभावें सदा लीन पायीं । महाराजांच्या ॥६७॥

तयेसी लिहूंही शिकविलें । तेव्हां कल्पलतेसी आरंभिलें । पाटीवरी लिहून द्यावें वहिलें । तिनें उतारा करावा ॥६८॥

पूर्व प्रकरणीं कहाण्या सर्व । सर्वांसी गोड लागती अपूर्व । परी उत्तर प्रकरणीं स्वानुभव । अर्थ शुध्द वेदांत ॥६९॥

ऐसीं पूर्वोत्तर अठरा प्रकरणें । एकाहुन एक सलक्षणें । सर्वांसीहि ते प्रियचि होणें । आबालज्ञानियां ॥७०॥

रुपकानेंचि सर्व विषय । अधिकारियांसी बाणे प्रत्यय । ऐसें देखिलेंचि नाहीं यथान्वय । भूत कीं वर्तमानीं ॥७१॥

असो चातुर्मासाचा नेम होता । परी आठ मास लोटले तत्त्वतां । पुढें उदगार होता जाला चित्ता । कीं बाळोबासहित जावें ॥७२॥

तेव्हां आम्ही त्रिवर्गी जाऊन । साष्टांग घातिले लोटांगण । जी जी आमुची उपेक्षा करुन । जाऊं नये सर्वथा ॥७३॥

बहुतेक प्रकारें विनविलें । परी कृपावचनें नाहीं आश्वासिलें । तेव्हां सदृढ निश्चयें पाय धरिलें । कीं न सोडूं सहसा ॥७४॥

ऐसा निर्धार आमुचा पाहुन । स्वामी बोलते जाले कृपावचन । आम्हांसी अति आवडतसे वन । तरी राहूं उपवनीं ॥७५॥

मागुती विनविलें आम्ही । स्थळ करित असो अनुक्रमीं । तों काळ येथेंचि असावें स्वामी । म्हणती त्वरा करा ॥७६॥

एक बहिणानामें अंधळी । भ्रतारेंही त्यागिली दुबळी । ते येवोनि पडली चरणकमळीं । कीं मंत्र -उपदेश द्यावा ॥७७॥

तंव बोलती हंस समर्थ । आम्हां ठाउक नाहीं लोक परमार्थ । बहुत गुरु असती जनां सनाथ । करावया भूमीवरी ॥७८॥

गुरु शिष्य ना मंत्र तंत्र । कर्म धर्म ना पूजा पवित्र । आम्हांपासीं नाहीं अणुमात्र । तरी गुरुत्व केवीं करावें ॥७९॥

ऐसें ऐकतां दीनवदन । करुणा भाकितसे अनुदिन । तेणें कृपा उदभवली पूर्ण । तेव्हां उपदेश दिधला ॥८०॥

मग तयेचें पाहुनि कित्येक । उपदेशा सिध्द जाले लोक । तेधवां मानसीं जाले साशंक । कीं हें विहित नव्हे ॥८१॥

मंत्र -यंत्रादि हे उपदेश नव्हे । गुरुशिष्यत्वहीं तेथें न संभवे । या रीती आम्ही लोकांसी बोलावें । तेंचि करावें आम्ही कैसें ॥८२॥

ऐसें होत्साता कुंठित मन । तंव मागील जाली आठवण । कीं सर्वाभूती द्यावें भोजन । दान तरी सप्तात्रीं ॥८३॥

तैसें सर्वासी मंत्रजप भजन । अधिकारिया उपदेशावें ज्ञान । मंत्रादि -अनुष्ठानाविण । ह्रदयशुध्दि कैची ॥८४॥

मग निश्चयचि असे केला । मंत्र सांगावा येईल तयाला । असो मंत्रउपदेश नाहीं वंचिला । कवणासीही ॥८५॥

पूर्ण ज्ञानाचें सत्र घातिलें । तेथें मंत्र तरी असती केतुले । प्रबोधशक्तीचे कल्लोळ उठिले । मुखांतुन मेघा ऐसे ॥८६॥

परी घ्यावया कवणा शक्ति । आम्हीं पडिलों कीं मंदमति । सदगुरु हंसचि जरी कृपा करिती । तरी स्वानंदसुख उमटे ॥८७॥

असो एके दिनीं मज पाचारुन । बागामाजीं केलें गमन । तें स्थळ पाहिलें तेव्हांचि वचन । बोलती की येथें राहूं ॥८८॥

मग म्यां विनवून राममंदिर । आणोनि दाखविलें सुंदर । तेथें बैसोनिया क्षणमात्र । मज आज्ञा करिते जाले ॥८९॥

या स्थळीं कल्याणमहाराज । राहिले असती ससमाज । तरी हें पवित्र स्थळ सहज । असे रहावया योग्य ॥९०॥

या जोशी मंडळीनीं पहिली । राममूर्ति नव्हती स्थापिली । ते समयीं हे जागा होती पाहिली बैसलों होतों मुहूर्त एक ॥९१॥

येथें स्थळ व्हावें इच्छा ऐसी । गुप्त उदभवली होती मानसीं । असो तेंचि पुढें करिते जाले जोशी । स्थळ हें मंदिररुप ॥९२॥

येथें रहावें ऐसी होय स्फूर्ति । परी जोशी माझी माझी म्हणती । तेथें आपण केंवि रहावें निश्चिती । मग म्यां विनंति केली ॥९३॥

हे जोशी यांची जागा सोडून । पाठीमागें करुं वसतें स्थान । मग चतुरालागी पाचारुन । सर्व सांगितलें ॥९४॥

तेणेंहि वंदोनि विनविलें । कीं तूर्त येथें येऊनि पाहिजे राहिलें । म्हणजे स्थळहि होईल वहिलें । बहु बरें ह्मणती स्वामी ॥९५॥

जोशियासीहि कळलें वर्तमान । तेणेंही राहविलें प्रार्थून । ते दिवशीच राहिले येऊन । मंदिरामाजीं ॥९६॥

मागें स्थळासी काम लाविलें । परि तें सिध्दिस नाहीं गेलें । असो राममंदिरीच असती राहिले । बाळोबासहित ॥९७॥

तेव्हां बाबा जोशियें मंत्र घेतला । त्यामागें आण्णा जोशीहि घेता जाला । नंतर पूजा -भजनाचा मार्ग घालुन दिधला । तया उभयतांसी ॥९८॥

मज आणि बहिरभंटासी । आणि आण्णाभट जोशियासी । आज्ञा करिते जाले वेगेंसी । कीं सादर असावें ॥९९॥

आरती दासबोध पंचपदी । करीत जावी मिळोनि मांदी । मार्ग घातिला त्या रीती विशदी । आम्हीहि तत्पर सेवेसी ॥१००॥

सखारामबावाही शहराहुनी । आले तेंही संतोष मानिला मनीं । कांहीं काळ डोमगांवीं राहुनी । शहरा गेले मागुती ॥१०१॥

तयाची एक सांप्रदायी । देशमुखाची जानकीबाई । तेही येउनि राहिली ते समयीं । स्वामीचिये चरणीं ॥१०२॥

तेंही सर्व लज्जासी त्यागुन । करिती जाली भिक्षाटण । बाळोबा तंव मधुकरी आणुन । सेवा पूर्ण करितसे ॥१०३॥

असो राममंदिरासी पाठीमागें । गुंफेसी आरंभ केला वेगें । लोकही साहाकारी जाले वेगें । यथाशक्तीनें ॥१०४॥

सर्व तत्त्वांची रचना जितुकी । जडचचंळकोशादि अनेकी । गुंफेसी योजिली असती तितुकी । समजून पहावी ॥१०५॥

असो गुंफेपुढें मारुती केला । रामचंद्र पोतदार एक सांप्रदायी जाला । तयाचिये हातीं स्थापविला । यथाविधि मंत्रें ॥१०६॥

आणिकही स्त्रिया अथवा पुरुष । घेते जाले मंत्र -उपदेश । दर्शनाही येती करोनि अवकाश । ग्रामवासी जन ॥१०७॥

रामसन्मुख एक मारुती स्थापिला । विठ्ठल शंकर उभय बाजूला । ज्ञानवापी नाम कुवाला । ठेविलें आवडी ॥१०८॥

आणीकही स्थळाची रचना केली । पुढील कर्तव्यता संकेतें दाविली । असो भजनासी मंडळी लागली । नित्यनैमित्तिकरुपें ॥१०९॥

अर्चन भजन हें नित्यात्मक । जयंत्यादि हें नैमित्तिक । मार्ग लाविला असे सकळिक । लोकरीतीचा लोकां ॥११०॥

परी आपण उपाधींत न पडती । कवणासी आज्ञाही न करिती । होय तितुके सहजगती । नव्हेल तरी न हो ॥१११॥

आम्हां भाविकांसी मार्ग लावावे । म्हणोनि आम्हा हातींच सहज करवावें । आपण तरी निवांत असावें । हर्षविषाद रहित ॥११२॥

असो राममंदिरांत आलियावरी । चुडालाख्यान केलें निर्धारी पदें अभंगही स्वानुभवानुकारी । वेदनामाचीं पै केलीं ॥११३॥

एवं प्रथम गुरुभक्तिसार । संकेत कुबडी आगमसार । सदाचार कल्पलतेचा विस्तार । त्यापुढें चुडालाचरित्र ॥११४॥

वैराग्यग्रामीं एक जंगम । तो शिवभजनीं तत्पर परम । तयाप्रीत्यर्थ शिवगीतेवरी सुगम । टीका आरंभिली ॥११५॥

शिवगीतेसि जेव्हां आरंभ करिता । मजसीहि आज्ञापिलें तत्त्वतां । कीं आरंभ करी मुमुक्षूच्या हिता । गुरुहंसपध्दतीसी ॥११६॥

असो अमुचें महद्राग्य उदेलें । कीं हंसस्वामी कृपेनें राहिले । त्याहीवरी भेटिलागी पातले । लक्ष्मणहंसगुरु ॥११७॥

आम्ही सर्वत्रीं प्रार्थना करुन । चातुर्मास घेतले ठेवून । तो परमानंद गहन । अवर्ण्य चहूंवाचें ॥११८॥

पुढें चातुर्मास लक्ष्मणहंस राहून । आम्हां बाळकांस आनंदवून । स्वग्रामासि गेले परतोन । आतां पुढें अवधारा ॥११९॥

दीक्षित काशिनाथबावा यानीं । सद्रुरु नारायणहंसा प्रार्थुनि । वाक्यवृत्तिवरी टीका पदबोधिनी । अत्यंत रसाळ करविली ॥१२०॥

लछमनप्रसाद गौड ब्राह्मण । तेणें सदगुरुहंसांचा उपदेश घेऊन । प्रार्थिलें ईशावस्य उपनिषद पूर्ण । सटीका दासा असावें ॥१२१॥

तयाचा मनोगत आणि भाव पाहून । ईशावास्य टीका केली पावन । वेदाज्ञा तें ठेउनि नामाभिधान । तेणें समाधान तीव्रांचें ॥१२२॥

असो संप्रदाय वाढला थोर । शिष्यहि उपदेशी जाले अपार । परी अपरोक्षानुभूतीचा प्रकार । आम्हां दोघांसी बाणला ॥१२३॥

बाळाबावाचें दृढ समाधान । परी प्रबोधाचें नसे लक्षण । या देहाचें प्रारब्ध गहन । प्रबोधचिन्ह परी अवैराग्य ॥१२४॥

ऐसें पाहुनिया स्वामी । विचार करिती अंतर्यामीं । दोघांस दोन व्यंगें अनुक्रमीं । तरी कैसें करावें ॥१२५॥

वंशदीप दोघे खरेचि । परी वाढ खुंटली ज्ञानपरंपरेची । इतका संकल्प मनीं येतांचि । एक अदभुत वर्तलें ॥१२६॥

रत्नागिरीकडील एक ब्राह्मण । रघुनाथपंत ज्यासी अभिधान । रोजगारी अंतरीं विरक्त पूर्ण । परी सदगुरुवीण तळमळी ॥१२७॥

तात्या रामोपाध्ये आणि मी । एकदां गेलों करमाळें ग्रामीं । रात्रौ कीर्तनप्रसंगसंगमीं । बहुत जन मिळाले ॥१२८॥

रोजगारी मंडळी आली । त्यांत हेही व्यक्ति पातली । ज्ञानचर्चा परम रसाळली । तेणें आनंद समस्तां ॥१२९॥

परी हा भस्मचर्चित पुरुष भोळा । माझिये सन्मुख होता बैसला । कीर्तनप्रसंगीं नेत्रीं घळघळा । अश्रु याचे म्यां देखिले ॥१३०॥

कीर्तनप्रसंग आटोपतां । सर्व घरासी गेले आंतौता । येणें मजसी धरुनि हाता । नेले एकांती ॥१३१॥

मजसी नमुनी बोले सुवाणी । माझी सार्थकता होईल कैसेनी । मग म्यां पूर्ण मुमुक्षु जाणोनी । परंड्यासी या सांगितलें ॥१३२॥

तेथें सदगुरु नारायणहंस । जगदुद्वारार्थ करिती वास । तुमचें जें का इष्ट मानस । पुरेल तये ठायी ॥१३३॥

ऐसी खूण सांगुनि तया । म्यां येणें केलें परांडिया । वृत्तांत निवेदिला सदगुरुपायां । तेणें सदगुरु आनंदले ॥१३४॥

पुढें अल्पदिनीं रघुनाथपंत । आवडीं परंड्यांत येत । साष्टांग घालुन प्रणिपात करित । बैसत हंसाज्ञेनें ॥१३५॥

तयाची चर्या पाहुनि हंस । मनीं पावती परम उल्हास । म्हणती बापा सांगें बहुवस । आजवरी काय काय केलें ॥१३६॥

ऐसी आज्ञा होता क्षणीं । विनविता जाला हात जोडुनी । जी जी मी नरतनुसी येउनी । भूमीभार जाहलों ॥१३७॥

माता पिता बंधू पावले मरण । स्त्री मात्र वयस्कर नूतन । चित्त प्रपंचीं कंटाळलें वमन । प्राय वाटती विषय ॥१३८॥

दासबोधग्रंथ संग्रहासी । तेणें कांहीं उपशमन मनासी । ब्रह्मैक शाश्वत अखंडैकरसी । सर्व मिथ्या वाटे ॥१३९॥

परि हा अनुभव नाहीं मजला । पुरश्वरणादि आचरिले खटपटीला । निष्कामबुध्दी शिवआराधिला । सदगुरु भेटावें म्हणुनी ॥१४०॥

ऐसी चार वरुषें लोटलीं । परि न ये सदगुरु माउली । शेवटीं दृष्टांत जाला कीं अल्पकाळीं । भेटी होईल कीं तुज आमुची ॥१४१॥

ऐसें बोलोनि दुपेटा पिवळा । हातीं देऊन बोले स्वलीळा । तुझे मनोरथ शुक्लचंद्रकळा । परी वर्धती येथुनी ॥१४२॥

तुवां कष्ट केलें बहुत । परी आम्ही कठिण केलें चित्त । आतां सव्याज तुझें तुज वित्त । दिधलें जा हो सुखी ॥१४३॥

अंतर्धान पावला तत्क्षणीं । मग तळमळ अत्यंत लागली मनीं । धांव दयाळा किती अझुनी । अंत पाहसी दासाचा ॥१४४॥

ये गोष्टीसी लोटला एक मास । येणें जालें श्रीचरणांस । आतां संचितप्रारब्धादिकांस । जाळून टाकावें गुरुवर्या ॥१४५॥

माझें निजरुप तें कोणतें । तें माझें मजसी द्यावें समर्थें । बहु विनवावया बाळकातें । सामर्थ्य नाहीं स्वामिया ॥१४६॥

ऐसें ऐकोनि स्वामी उत्तर । बोलती तुझा तूंचि गुरु निर्धार । विश्वामाजी विश्वंभर । एकपणेंचि अससी ॥१४७॥

परी सदगुरुरुप यथार्थ कळावें । तरी संगत्यागें लागे भेटावें । मग समाधान पावावें । स्वानुभावें आपुलिया ॥१४८॥

पलंगी राजा निजेला । तो स्वप्नीं भीक मागूं लागला । तैसा निजांगें गुरुचि असतां भला । तूं आम्हां गुरु म्हणसी ॥१४९॥

असो भ्रमें न होऊन भासलें । तें ज्ञानेविण न जाय निरसलें । ज्ञान होतांचि मिथ्यात्त्व आलें । संचितादिकां ॥१५०॥

इतुकें बोलूनिया हंस । निवांत बैसले स्थिरमानस । नंतर आज्ञा घेऊनि करमाळ्यास । रघुनाथपंत गेले ॥१५१॥

सदगुरुहंस काशीनाथबावासी । म्हणती एके दिनीं सायासी । कसून पहावें यया अधिकारियासी । अल्पमात्र ॥१५२॥

तीव्रबुध्दि कांहींसा दिसे । परी अनन्यत्त्व कैसें असे । तें पाहिलें पाहिजे मानसें । बावा तथास्तु म्हणती ॥१५३॥

पुढें कसुनही पाहतां । यथार्थ उतरला कसा तत्त्वतां । वाक्यवृत्तिचिया ग्रंथा । उतरुन घ्यावया आज्ञापिलें ॥१५४॥

बहु बरें म्हणिनि पंतानें । लिहविलें वाक्यवृत्तिकारणें । वत्सासी जैसे कामधेनूनें । आपणचि येउनि पाजावें ॥१५५॥

तैसें सदगुरुहंस एके दिनीं । आपणचि विचारिते जाले मनीं । जाउनि याच्या ग्रामालागुनि । निजसुख याचें या द्यावें ॥१५६॥

मग बोलाउनि रघुनाथासी । कथिलें आम्हां येणें तुझ्या ग्रामासी । तेणें जो आनंद जाला त्यासी । तो खरा गुरुपुत्र जाणे ॥१५७॥

वर्णन जरी त्याचें करावें । तरी मज वर्णवेना स्वभावें । असो हंसें बावासह रहावें । तेथें पांचपक्षपर्यंत ॥१५८॥

संपूर्ण विवेचन आणि अभ्यास । अन्वयव्यतिरेकें दाविले त्यास । लयसाक्षित्व मात्र प्रतीतीस । यावयाचें राहिलें ॥१५९॥

पुन : एक पक्ष परंड्यांत । सकुटुंब राहिले रघुनाथपंत । लयसाक्षित्व बाणलें सप्रचीत । तेणें हर्ष स्वामींसी ॥१६०॥

एके दिनीं बाबासह स्वामी । बैसले असतां स्वसुखविश्रामीं । म्हणती रघुनाथ बोले अनुक्रमीं । बाणलेला अनुभव ॥१६१॥

तेव्हां रघुनाथ बध्दांजलि । नम्रवचनें बोले मुखकमळीं । जागृतीची होय होळी । स्वप्नामाजीं ॥१६२॥

स्वप्नीही नसे सुषुप्तींत । एवं ऐकांत एक लोपत । म्हणून अवस्था मिथ्याभूत । साच तो एक आत्मा ॥१६३॥

असज्जड जागृती काळीं । सच्चिदानंदता स्वप्नासि आली । तेहि असज्जड जाली । सुषुप्तिमाजीं ॥१६४॥

कार्य मिथ्या ऐसें कळतां । कारण मिथ्याचि मिथ्या तत्वतां । तस्मात सुषुप्तीसि असज्जडता । न बोलतां आली ॥१६५॥

जागृति स्वप्न आणि सुषुप्ति । हे नाहींतचि नाहीं आदिअंती । आदि अंतीं नसतां निश्चिती । मध्यें नाहींच नाहीं ॥१६६॥

म्हणोनि विश्व तैजस प्राज्ञ अभिमान । ययासि मिथ्यात्व सत्यप्रमाण । एक आत्मा स्वयमेव आपण । आत्मत्वें विलसे ॥१६७॥

स्थूळ मिथ्या कळतां निश्चय । दृश्य अकाराचा जाहला क्षय । लिंग देह अनात्मा येतां प्रत्यय । भास उकाराचा निमाला ॥१६८॥

अज्ञान तो नाहींच नाहीं । म्हणोनि मकार कारण निमालें आही । चिन्मात्र ज्ञप्तिलयासी पाही । कांहीं उपकरण नसतां ॥१६९॥

लय वृत्तीचा जेणें पाहिला । तोचि चिद्रूपत्वें संचला । होता म्हणून पाहता जाला । हेंच सद्रूप ॥१७०॥

वृत्तीसी प्रियता जरी असती । तरी उपेक्ष्य द्वेष्य प्रिय कां होती । हे व्यभिचारलक्षणें आत्मत्वीं नसती । तस्मात प्रिय आत्मा ॥१७१॥

देशादि परिच्छेद पाहतां । वृत्तीसीच संभवती तत्वतां । याविरहित जया राहणें स्वतां । तोच आत्मा आपण ॥१७२॥

आतां मुंगीपासुन ब्रह्मादिकांत । गुरुचि आत्मरुपें विलसत । ऐसे बोल ऐकतां हर्षभरित । ह्रदय झालें हंसांचें ॥१७३॥

मग पाठीं थापटुन म्हणती भला । अनुभवाचा ध्वज उभारिला । आमचा उपदेश सफळ केला । तुवां शिष्यराया ॥१७४॥

जैसा पुत्र जालियावरी । पितृऋण फिटे निर्धारी । तैसा ज्ञानपरंपरा -चालविता शिष्य जरी । तरी गुरुऋणापासव मुक्त ॥१७५॥

आतां आमुचे मनोरथ । पूर्ण तुझेनि झाले यथार्थ । तुझा अनुभव वाढो तिथीनें तिथ । आमुचे आशीर्वादें ॥१७६॥

आतां सुखें प्रपंच करी । अथवा परमार्थी राहे निर्धारी । सुखचि वाढेल तुज परोपरी । जा तूं अभय अससी ॥१७७॥

मात्र एक त्वां करावें । हंससांप्रदाया चालवावें । उदास वस्त्र मेखला बाळगावें । उध्दवस्वामींचे संप्रदाया ॥१७८॥

हे समर्थाची आज्ञा अवश्य । तुवां चालवावी विशेष । योगदंडधारण असावें नि :शेशः । दत्तात्रेयाचे आज्ञेनें ॥१७९॥

नागनाथमहाराजांची सैली । आजवरी आम्ही होती चालविली । आतां तुजसी दिधली वहिली । पंत नाम तुज असो ॥१८०॥

चिमण्या विनवी श्रोतयांसी । सदगुरु नारायणहंस चरित्र तुम्हांसी । यथामति निवेदिलें मानसीं । हंसप्रसादेंकडुनी ॥१८१॥

आदिनारायणापासून ओघ । नारायणहंसापावेतों आला अमोघ । पुढें कोठें प्रगटला अनघ । तेंही ध्वनितार्थे सांगितलें ॥१८२॥

आतां अष्टम अष्टकामाझारी । निरोपिजेल हंसदासाची परी । जेणें श्रवणें क्रिया निर्धारी । पालटून जाय ॥१८३॥

अनधिकारी ते अधिकारी होती । अधिकारी ते समाधान लाहती । सप्तमाष्टक आठवें प्रकरण निश्चिती । येथून समाप्त जहालें ॥१८४॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । नारायणहंसाख्यान निगुती । अष्टम प्रकरणीं ॥८॥

एकंदर ओ . सं . १००९ .

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP