रुद्रारामहंसाख्यान - तुंगणीमठीं स्थापना

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


श्रीमत्सदगुरु माधवहंसीं । रुद्रारामाची पूर्णता पाहतां मानसीं । अति संतोषून म्हणती त्यासी । अन्य स्थळीं स्थापावें ॥१॥

झाडाखालीं झाड न वाढे । पुढें ज्ञानमार्ग चालावा मज आवडे । ठेवून बोलती न उघडें । हा अंतरिचा भाव अंतरी ॥२॥

एकदां माधवस्वामींचा शिष्य संपन्न । प्रवृत्तिनिवृत्तीसा योग्य समान । तुंगणी त्याचें वसतिस्थान । तो दर्शनासी आला ॥३॥

तेणें सर्वमंडळींसहित । माधवस्वामींसी प्रार्थून त्त्वरित । आपुले निजग्रामासी असे नेत । कीं सत्संग घडावा ॥४॥

तयाचा भावार्थ पूर्ण पाहुनी । स्वामी प्रसन्नत्त्वें गेले त्याचे सदनीं । शिष्य रुद्रारामादिकरुनी । समागमें गेले ॥५॥

तो परमभावार्थयुक्त । गुरुसेवेसी अक्षयी रत । आदर करितसे अदभुत । चित्तवित्तप्रमाणें ॥६॥

कांहीं काळ तेथें राहिले । मग इंदूरा जावें असें वाटलें । तया शिष्याप्रति बोलते जाले । कीं जाऊं स्वस्थानासी ॥७॥

येरु म्हणे जी महाराजा । हा ठिकाणा काय असे दुजा । माझा मनोरथ पुरवावा वोजा । अक्षयी द्यावी पदसेवा ॥८॥

मजसी आज्ञा जी करुन । रहावें येथें मठ बांधोन । मज सेवा घडेल निशिदिन । दीना वियोग न साहे ॥९॥

माझा पूर्ण करावया मनोरथ । असा सदगुरु श्रीसमर्थ । उपेक्षूं नये मी अनाथ । अंकित दास ॥१०॥

तेव्हां तयाप्रति स्वामी म्हणती । तुझी विनंति मान्य असे अम्हांप्रति । परी स्वामीनें स्थापिलें ज्या स्थानावरुती । तें स्थळ सोडूं नये ॥११॥

तुझाहि मनोरथ पूर्ण व्हावा । आमुचाही संकल्प सिध्दीसी जावा । ऐसा विचार सांगतो ऐकावा । भावार्थ बळें ॥१२॥

हा आमुचा आवडता रुद्राराम । हा मीचि कीं असें परम । याची सेवा करिं तूं मजसम । यासी आम्ही ठेवून जातों ॥१३॥

हे गोष्टी शिष्या मानली । म्हणे मज गुरुसेवेची प्राप्तिजाली । हंसमाय मजवरी वोळली । अक्षयी संग दिला ॥१४॥

जेवीं मज आपण गुरु स्वामि । तेवींच रुद्राराम गुरु आरामीं । सेवा करीन अंतर्यामी । दुजा भाव नाणितां ॥१५॥

ऐसा भावार्थ जाणोनि तयाचा । रुद्रारामासी बोलती वाचा । तुवां येथें राहुन जगाचा उध्दार करावा ॥१६॥

ऐसी गुरुआज्ञा होतांक्षणी । रुद्राराम मस्तक ठेवी चरणीं । तथास्तु म्हणतसे सुवाणी । आज्ञा प्रभुची ॥१७॥

मग उभयतांसी पुसुनी । माधवहंस गेले इंदुरालागुनी । इकडे मठ केला ग्रामीं तुंगणी । तया शिष्यवरें ॥१८॥

तया मठीं राहिलें रुद्रहंस । तया शिष्यासी सेवेचा हव्यास । आणिकही शिष्य जाले बहुवस । सेवाधार गुरुचे ॥१९॥

कवणियाहि शिष्याप्रति । राममंत्रचि उपदेशिती । भजनपूजनादि साधन लाविती । अधिकारिया श्रवणीं ॥२०॥

ऐसे शिष्य उदंड जाले । परिपूर्ण ज्ञान नागनाथा लाधलें । तया नागनाथ हंसाचें असे कथिलें । कथन पंचमाष्टकीं ॥२१॥

असो रुद्रहंसांची वर्तणूक । परहस्तें होत सकळिक । शास्त्रीय अथवा लौकिक । स्वत : नाहीं ॥२२॥

कोणी बोलवितां बोलावें । पुसेल तितुकें उत्तर द्यावें । बोध करितां मात्र उपदेशावें । नानायुक्तीं श्रुत्यर्थे ॥२३॥

इतर क्रिया जे देहाची । परापेक्षया होय साची । स्वतंत्रत्त्वें करणें कांहीचि । कदा असेना ॥२४॥

परापेक्ष स्नान भोजन । परापेक्ष मंचकी शयन । शिष्य सेवेसी असती सन्निधान । दिन आणि निशीं ॥२५॥

भस्मचर्चन सर्वांगासी । रुद्राक्ष शोभती कंठीं शिखेसी । करीं दंडी आणि कर्णांसी । कुंडलें रुद्राक्षांचीं ॥२६॥

हुरुमुजी वस्त्र एक ठेवावें । आडवें त्रिपुंड्र गंध लावावें । हरघडी मुखें उच्चारावें । हरहर शिवशिव ॥२७॥

जडत्त्वासी जड्भरत । वैराग्याविषयीं शुक विख्यात । ज्ञान तरी पाहतां मूर्तिमंत । वसिष्ठचि दुसरा ॥२८॥

चर्या पाहतां भोला शंकर । तैसा स्वता असे उदार । तेज पाहतां जेवीं दिनकर । शांत शीतल मृगांक ॥२९॥

प्रबोधासी जैसा वर्षे घन । इंद्रियदमासी पंचानन । जयाचें सहज अवलोकन । आल्हादकर जनां ॥३०॥

ऐसा श्रीमत्सदगुरु हंस । अवतरला जगदुद्वारास । देह असतां अलिप्त जेवीं आकाश । निश्चल निर्विकारी ॥३१॥

सच्छिष्याचिये कृपेसाठीं । देह धरण्याची आटाआटी । येर्‍हवीं साकाराची गोष्टी । सर्वथा बोलूं नये ॥३२॥

एवं रुद्रहंसस्वामींचे कथन । यथामति केलें निरुपण । तया अर्थामाजी बाळ चिमणें । बुडी देऊन खेळे ॥३३॥

आतां पुढील अष्टकामाजी गहन । नागनाथ हंसांचें आख्यान । हंससदगुरुच करील कथन । घालोनि नाम माझें ॥३४॥

इति श्रीमद्वंसगुरुपध्दति । ग्रंथरुपें ज्ञानाभिव्यक्ति । रुद्रहंसाख्यान निगुती । अष्टम प्रकरणीं ॥८॥

एकंदर ओ . सं . ३११ .

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP