मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग तिसरा|
अभंग २६५५ ते २६६०

गोसावी - अभंग २६५५ ते २६६०

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


२६५५

लावूनियां अंगा राख । म्हणती सुख आम्हांपाशीं ॥१॥

भोळे भाविका भोंदिती । भलते मंत्र तयां देती ॥२॥

म्हणती आम्हां करा गुरु । उपचारु पूजेचा ॥३॥

एका जनार्दनीं तैं मैंद । नाहीं गोविंद तयांपाशीं ॥४॥

२६५६

अंगा लावुनियां राख । करी भलतेंची पाप ॥१॥

मेळवी शिष्यांचा मेळा । अवघा भांगेचा घोंटाळा ॥२॥

नानापरी सांगे मंत्र । नेणें विधीं अपवित्र ॥३॥

न कळे ज्ञानाची हातवटी । सदां परदार राहाटी ॥४॥

एका जनार्दनीं सोंग । तेथें नाहीं पांडुरंग ॥५॥

२६५७

आम्हीं जाहालों गोसावी । आमची विभूत चालवावी ॥१॥

भांग भुरका हें साधन । शिष्य मिळाले चहुकोन ॥२॥

हें तों सोंगाचे साधन । राजी नाहीं जनार्दन ॥३॥

एका जनार्दनीं भाव । भाव तेथें वसे देव ॥४॥

२६५८

आम्हीं योग साधियेला । भांग भुरका तो आणला ॥१॥

योग कळे तयां मूढा । साधन काय तें दगडा ॥२॥

आंत काळा बाहेर काळा । माप नाहीं अमंगळा ॥३॥

एका जनार्दनीं ते पामर । साधन साधिती ते खर ॥४॥

२६५९

अंगासी राख ढूंगासी लंगोटी । गोसावे हातवटी मिरविती ॥१॥

अल्लख म्हणोनि भिक्षा मागताती । अलखाची गती न कळे मूढां ॥२॥

भांगेचा सुकाळ चेले करी मूढ । यम तया दृढ दंड करी ॥३॥

अलक्ष अलक्ष आलख कळेना । जगीं विटंबना उगीच करिती ॥४॥

एका जनार्दनीं नको ऐसें सोंग । तेणें पांडुरंग अंतरेल ॥५॥

२६६०

संसाराचा धाक घेऊनियां पोटीं । जाहला हटतटी गोसावी तो ॥१॥

पहिल्या परीस यातायाती मागें । शिणला उद्योगें भाक मागूं ॥२॥

उठोनियां पहाटें अलख मागावे । परतोनी यावेअं झोपडीसी ॥३॥

नाहीं तेथें कोणी दिसे केविलवाणा । मग म्हणे नारायणा व्यर्थ जिणें ॥४॥

जरी असतों घरबारी स्त्री पुत्र असती । आतां ही फजीती नको देवा ॥५॥

टाकूनियां वेष स्त्री करुं धांवे । तों आयुष्याचें हावेंक ग्रासियेला ॥६॥

राहिली वासना संसार करणें । एका जनार्दनीं म्हणती जन्म घेती ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP