• Register

प्रदक्षिणा कशी व कोणत्या देवास किती घालावी ?

839 views
asked Dec 17, 2015 in Hindu - Traditions by TransLiteral (11,160 points)

1 Answer

0 votes
 
Best answer
षोडशोपचार पूजेतील एक उपचार. ‘ प्रगतं दक्षिणमति ’ = पूज्य व्यक्तीला किंवा देवतेला उजवे ठेवून तिच्याभोवती फ़ेरी घालणे याला प्रदक्षिणा असे म्हणतात. कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्या, याविषयी कर्मलोचनात पुढील श्लोक दिला आहे.
एकं देव्यां रवौ सप्त त्रीणि कुर्याद्विनायके ।
चत्वारि केशवे कुर्यात् शिवे चार्घप्रदक्षिणम् ॥
अर्थ - देवीला एक, सूर्याला सात, गणपतीला तीन व विष्णूला चार प्रदक्षिणा कराव्या व शिवाला अर्धी प्रदक्षिणा करावी.
शिवाच्या अर्ध्या प्रदक्षिणेची रीत अशी - शिवाच्या अभिषेकाचे जल गाभार्‍यातून ज्या नालीने बाहेर सोडले असेल, तिथवर प्रदक्षिणा करावी आणि ती नाली न ओलांडता परत फ़िरून देवापुढे यावे. हिला सोमसूत्री प्रदक्षिणा असेही म्हणतात.
प्रदक्षिणा कशी करावी, त्याविषयी कालिकापुराणात पुढील श्लोक दिला आहे -
प्रसार्य दक्षिणं हस्तं स्वयं नम्रशिर: पुन: ।
दक्षिणं दर्शयन् पार्श्व मनसापि च दक्षिण: ॥
अर्थ - उजवा हात पुढे पसरून व नतमस्तक होऊन आलले दक्षिण अंग देवाला दाखवीत आणि मनानेही दक्षिन म्हणजे ऋजू वृत्तीचे राहून प्रदक्षिणा करावी.
ज्या देवाला प्रदक्षिणा घालता येत नसेल, त्या स्वत:भोवती वर्तुळ भ्रमण करून प्रदक्षिणा घालतात. पण अशा प्रदक्षिणेत देवाला पाठ दाकविली जाते; त्यामुळे अशी प्रदक्षिणा शक्यतो टाळावी, असे सांगितले आहे.
प्रदक्षिणचे माहात्म्य वराहपुराणात सांगितले आहे ते असे -
प्रदक्षिणां यें कुर्वन्ति भक्तियुक्तेन चेतसा ।
न ते यमपुरं यान्ति यान्ति पुण्यकृतां गतिम् ॥
अर्थ - जे भक्तियुक्त अंत:करणाने देवाला प्रदक्षिणा करतात, त्यांचा यमलोक टळतो व ते पुण्यवंतांच्या गतीला जातात.
काही माणसे पुत्रादि कामना मनात धरून अश्वत्थाला, औदुंबराला, दत्ताला किंवा उपास्य देवतेला नित्य नियमाने प्रदक्षिणा घालतात.
answered Dec 17, 2015 by TransLiteral (11,160 points)
selected Jan 5, 2017 by TransLiteral Admin
...