• Register

मकर संक्रांति हिंदू सण असूनही १४ जानेवारीला का साजरा करतात?

651 views
asked Jan 28, 2014 in Hindu - Traditions by anonymous
recategorized Feb 1, 2014 by TransLiteral Admin

1 Answer

0 votes
 
Best answer
सूर्याचा मकरराशीत प्रवेश ही खगोलीय घटना २१ डिसेंबरला होते, पण भारतात मकर संक्रांत धार्मिक व चांद्रस्थितीवर असल्यामुळं १४ जानेवारीला असते. असं का होतं?

जगात दोन प्रकारची राशीचक्र प्रचलित आहेत, सायन( Tropical )  व निरयण ( Sidereal ). सायन राशीचक्राचा आरंभबिंदू सूर्याच्या वसंतसंपात बिंदूशी जोडलेला आहे. पृथ्वीचा कललेला अक्ष हा स्थिर नसून, तो हळूहळू फिरत साधारणतः २६ हजार वर्षात एक फेरी पूर्ण करतो. त्यामुळं सूर्याचा वसंतसंपात बिंदूसुद्धां हळूहळू मागं सरकत असतो. तो एका वर्षात साधारणतः ०.०१४ अंश इतका मागं सरकतो. म्हणजेच सायन राशीचक्राचा आरंभबिंदू सुद्धा एका वर्षात ०.०१४ अंश इतका मागं सरकतो. सायन राशीचक्राचा वापर पाश्चात्त्य कॅलेंडर मध्ये केलेला असतो. निरयन राशीचक्राचा आरंभबिंदू मात्र वसंतसंपात बिंदूसोबत न सरकता तो आकाशातल्या एका स्थिर तार्‍याशी जोडलेला असतो. म्हणजेच सायन व निरयन या दोन राशीचक्रांमध्ये दर वर्षी ०.०१४ अंश इतकं अंतर पडत आहे. भारतीय कालगणनेमध्ये निरयन राशीचक्राचा वापर केलेला असतो. साधारणतः १ हजार ७०० वर्षांपूर्वी या दोन्ही राशीचक्रांचा आरंभबिंदू एकच होता. सायन राशीचक्र दरवर्षी ०.०१४ अंश इतक्या गतीनं १ हजार ७०० वर्षात २४ अंश मागं सरकलेलं आहे; म्हणून हल्लीच्या काळात सायन व निरयन राशीचक्रांमध्ये २४ अंशाचं अंतर पडलेलं आहे. सूर्य राशीचक्रात रोज एक अंश सरकतो, त्यामुळं दोन्ही राशीचक्रांमध्ये हे २४ दिवसांचं अंतर पडलेलं आहे. त्यामुळं पाश्चात्य कालगणनेप्रमाणे सूर्याचं मकर संक्रमण २१ डिसेंबरला होतं व भारतीय कालगणनेप्रमाणे मकरसंक्रमण १४ जानेवारीला होतं. हाच तो २४ दिवसांचा फरक. यावरून हे सुद्धां लक्षांत येते की हा जो ०.०१४ अंशाचा फरक आहे, त्यामुळेच कांही वर्षांपूर्वी संक्रांत १३ जानेवारी किंवा आधी येत होती आणि काही वर्षांनंतर १५ जानेवारी व नंतर अशी सरकत जाईल. हाच तो ०.०१४ अंशाचा फरक.

Ref : मिलींद जोशी, पुणे.

Ref : http://blog.khapre.org/2014/01/blog-post_14.html
answered Jan 28, 2014 by anonymous
selected Jan 31, 2014 by TransLiteral Admin
...