• Register

ब्राह्मण कोणाला म्हणावे? ब्राह्मणाची कर्में कोणती?

27 views
asked Jul 15 in Hindu - Philosophy by TransLiteral (11,160 points)

1 Answer

0 votes
हिंदू धर्मा प्रमाणे जे चार वर्ण आहेत, ब्राह्मण,वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र या चातुर्वर्ण्यापैकी पहिला वर्ण ब्राह्मण. ब्रह्म या शब्दाचा अर्थ मंत्र किंवा स्तोत्र असाही होतो. मंत्र व स्त्रोत्र रचणारे व म्हणवणारे आणि म्हणवून घेणारे ते वर्णाने ब्राह्मण होत. ‘ब्रह्म जानाति स: ब्राह्मण: - जो कोणी परब्रह्माला जाणतो तो ब्राह्मण. या व्याख्येत, आध्यात्मिक साधना परिपूर्ण होऊन आत्मज्ञानी होणे हे ब्राह्मण्याचे लक्षण सांगितले आहे. त्या अर्थाने प्रत्येकच प्रगतीशील जीवाची ब्राह्मण्याकडे वाटचाल चालू असते. महाभारतात ब्राह्मण्याची लक्षणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत - जो जातकर्मादि संस्कारांनी (पाहा - संस्कार) सुसंस्कृत झालेला आहे, जो शुद्ध व वेदाध्ययसंपन्न आहे, जो षट्‍कर्मे (पाहा - षट्‍कर्मे) करतो, आचरण शुद्ध ठेवतो, यज्ञ करुन उरलेले अन्न जो सेवन करतो, सद्‍वर्तनामुळे जो गुरुला प्रिय असतो, जो नियमशील, सत्यनिष्ठ, दानशील, अद्रोही, दयाळू, सलज्ज, दुष्कृत्यांची घृणा करणारा व तपस्वी असतो, त्यालाच ब्राह्मण म्हणावे. एकंदरीत सदाचार हेच ब्राह्मण्याचे लक्षण होय. वर्ण या अर्थाने जो अध्ययन (स्वत: शिकणे), अध्यापन (दुसर्‍यांना शिकविणे), यजन (स्वधर्मरुपी यज्ञ करणे), याजन (यज्ञ करवून घेणे), योग्य कारणासाठी दान देणे, प्रतिग्रह (योग्य कारणासाठी दान स्वीकारणे) ही कर्मे करतो तो ब्राह्मण. सद्‍बुद्धीचे, ज्ञानाचे संरक्षण करण्याचे ब्राह्मणाचे कर्तव्य आहे.
answered Jul 17 by TransLiteral (11,160 points)
...