• Register

विनायकी आणि संकष्टी चतुर्थीबद्दल शास्त्रार्थ सांगावा.

670 views
asked Jul 24, 2015 in Hindu - Puja Vidhi by TransLiteral (9,340 points)

1 Answer

0 votes
 
Best answer

प्रत्येक महिन्याच्या वद्य पक्षांत येणार्‍या चतुर्थीला गणपति उपासनेच्या संदर्भांत संकष्टी चतुर्थी किंवा संकष्टी म्हणतात. अशी संकष्टी मंगळवारीं आली तर तिला विशेष मह्त्त्व असून अशा संकष्टीला अंगारिका किंवा अंगारकी म्हणतात.

गणेशोपासनेंत वद्य चतुर्थीप्रसाणेंच शुद्ध चतुर्थीलाहि महत्त्व आहे. या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात. गणेशाचे जे दोन मुख्य उत्सव गणेशचतुर्थी व गणेशजयंती ते अनुक्रमे भाद्रपद व माघ महिन्यांत पण शुद्ध चतुर्थीलाच साजरे होत असतात.

शुद्ध चतुर्थीला-विनायकीला संपूर्ण उपवास असतो. याचें पारणें दुसर्‍या दिवशीं पंचमीला करावयाचें असतें. परंतु वद्य चतुर्थी संकष्टीवावत मात्र महाराष्ट्रांत जुन्या काळापासून दोन भिन्न मतें आहेत. या दोन पक्षांना मोरगांव ( पुणे, महाराष्ट्र) सांप्रदायी आणि चिंचवड ( पुणे, महाराष्ट्र) सांप्रदायी असे संबोधलें जातें. मोरगांव संप्रदायाचे मत संकष्टीला रात्रीं उपवास सोडूं नये, भोजन करूं नये असा आहे; तर चिंचवड संप्रदाय संकष्टीला रात्रीं चंद्रोदयानंतर लगेच भोजन करून संकष्टीचें पारणें करावयास हवें. अशा मताचा आहे. महाराष्ट्रांतील गणेशोपासक व गणेशस्थानें यांचा विचार करतां बहुसंख्या चिंचवड संप्रदायाप्रमणेंच चालणारी आढळते. या दोन संप्रदायांच्या मतांचा समन्वय सांप्रदायिक नसलेल्या सर्वसामान्य लोकांच्या मार्गदर्शनासाठीं सोलापूरचे पंचांगकर्ते श्री. दाते यांनीं घालण्याचा प्रयत्न केला आहे. या विविध मतांची कल्पना येणासाठीं त्याविषयींची माहिती पुढें दिली आहे.

चिंचवड-संकष्टी चतुर्थी मातृविद्धा संप्रदाय

मातृविद्धा व नागविद्धा असे दोन संप्रदाय असून त्यांपैकीं चिंचवड येथील संप्रदाय मातृविद्धा चतुर्थी संप्रदाय म्हणून विशेष महत्त्वाचा आहे. हा चतुर्थी संप्रदाय म्हणून विशेष महत्त्वाचा आहे. हे चतुर्थीं तृतीयायुक्त व चन्द्रोदयव्यापिनी ग्राह्म मानतात. एखादे वेळीं जर चतुर्थी तिथीस चन्द्रोदयाला चतुर्थी नसेल तर आदले दिवशीं चतुर्थी करतात. आदले दिवशीं तृतीयेंत चन्द्रोदय होऊन जर चतुर्थी तिथि १ किंवा २ तासानें लागत असेल तर तोंपर्यंत थांबून नंतर श्रीमंगलमूर्तीस महानैवैद्य समर्पण करून चन्द्राला अर्ध्यप्रदान इत्यादि करण्याची व त्या दिवशीं रात्रीं उपवास सोडण्याची चिंचवडची वहिवाट आहे. याचें मुख्य कारण असें की चतुर्थीन्नत गणेशपूजन व चन्द्राला अर्ध्य या कर्माला महत्त्व देऊन केलें जातें. याविषयीं संकष्टी चतुर्थी निर्णय सर्व शास्त्रीमंडळींनीं पुणें येथें करून चिंचवड येथील वे. मू. कृष्णंभट पंढरपुरे यांचे घरीं तो
(निर्णयाची नक्कल) ठेवलेला आहे.

मोरगांव - योगींद्र मठ नागविद्धा संप्रदाय

दोन्ही चतुर्थ्या शुद्ध आणि वद्य अवश्य कर्तव्य असून दोन्ही चतुर्थ्यांचा पूर्ण उपवास करावयाचा असतो; पंचमीस पारणा करावयाची असते. शुद्ध चतुर्थीस मध्यान्हकालीं श्रीगणेशाचें महापूजन करून कृष्ण चतुर्थींस चंद्रोदयीं महा पूजा करावयाची असते. चतुर्थीचे दोन प्रकार असतात. एक तृतीयायुक्त-हिला मातृविद्धा चतुर्थी म्हणतात. दुसरा प्रकार-पंचमीयुक्त चतुर्थी. हिला नागविद्धा म्हणतात. शुद्ध गणेशभकांनीं श्रीब्रह्मणस्पतीच्या उपासकांनी नागविद्धा म्हणजे पंचमीयुक्त चतुर्थी करावी. पंचमीच्या दिवशीं घटका जरी चतुर्थी असली तरी ती नागविद्धा होते. मात्र मध्यान्हकालीं किंवा चंद्रोदयीं जर पूर्ण चतुर्थी असली तर मग हा प्रश्नच येत नाहीं. तिला तर शुद्धच म्हणतात. पण जर एखादे वेळीं दिवसभर तृतीया आणि चंद्रोदयानंतर किंवा चंद्रोदयीं चतुर्थी असेल तर किंवा दुसरे दिवशीं पण चंद्रोदयीं चतुर्थी असेल तर अशा वेळीं दुसरे दिवसाचीच चतुर्थी करावी.

पूर्व दिवशीं तृतीया तिथीवर चन्द्रोदय होत असला तरी नंतर मध्यरात्रीपर्यंत जेव्हां चतुर्थी सुरू होईल तेव्हां अर्ध्यप्रदान करून भोजन करावें. चन्द्रोदयकालीं चतुर्थी असावी हें सर्वंमुख असूनहि अशा वेळीं पूर्वदिवशीं म्हणजे तृतीयाविद्ध चतुर्थी घ्यावी असा चिंचवड सांप्रदायिकांचा आग्रह आहे.

उदाहरणार्थ -
शके १८८७ पौष कृष्ण चतुर्थी दि. १०-१-१९६६ सोमवारीं पंचांगांत दिली असतांना दि. ९ रविवारीं चतुर्थी झाली. त्या दिवशीं रात्रीं १२ वाजून ९ मिनिटांपर्यंत तृतीयेवरच होता. असें असूनहि चतुर्थीव्रत केलें गेलें व रात्रीं १२ वाजून ९ मिनिटांनंतर जेवण केलें. असें करण्यांत दोन दोष येतात. पंचप्रहरात्मक व्रत असतांना त्याचें उल्लंघन होतें व अकालीं भोजन झाल्यानें तें असुरकर्म होतें. शिवाय धर्मशास्त्राज्ञेच्या उल्लंघनाचाहि दोष येतोच. अशा वेळीं परदिवशीं हें व्रत करावयास पाहिजे. कारण परदिवशीं सूर्योदयापासून चतुर्थी असते. म्हणजेच मुख्य उपोषण चतुर्थींत होतें
(‘दिनद्वये चन्द्रोदयव्याप्त्यभावे परैव ।’ धर्मसिन्धु)

मोरगांव (योगींद्रमठ) संप्रदाय म्हणजे नागविद्धा चतुर्थी घेणें. याचा खुलासेवार शास्त्रर्थ मुद्नलपुराणाच्या चतुर्थ खंडाच्या चौथ्या अध्यायांत आहे. टीकेंत पंचमीवेध कसा होतो वगैरे स्पष्ट दिलें आहे. दोनहि दिवशीं चन्द्रोदयाला चतुर्थी असतां पूर्वदिवशीं व्रत करावें असें धर्मशास्त्र सांगतें. (‘चतुर्थी गणनाथस्य मातृविद्धा प्रशस्यते ।) पण अशा वेळीं मोरगांव संप्रदायवाले दुसरे दिवशीं व्रत करतात. कां तर ती नागविद्धा होते. पण वस्तुत: ती नागविद्धा नाहीं कारण चन्द्रोदयानंतर सहा घटी (त्रिमुहूर्त) चतुर्थी असावी लागते. सहा घटी चतुर्थीनंतर पंचमी सुरू होणें याला पंचमीवेध म्हणतात. (‘एवं परदिने चतुर्थ्यां चन्द्रोदयस्तदनंतरं चतुर्थी त्रिमुहूर्तमात्राचेत्परा कार्या चन्द्रोदयस्तदनंतरं चतुर्थी त्रिमुहूर्तमात्राचेत्परा कार्या चन्द्रोदयस्तदनंतरं चतुर्थी त्रिमुहूर्तमात्राचेत्परा कार्या चन्द्रोदयात्परं चतुर्थी विशेषलाभात्‌ ।’ मुद्‌गल टीका) परदिवशीं अशी चतुर्थी असेल तरच ती नागविद्धा होते. अशी चतुर्थी येणें व्कचित्‌ शक्य आहे. एरवीं मातृविद्धाच करावी असें मुद्‌गल पुराण टीकेंत स्पष्ट आहे.
(उभयदिनेपितत्सत्वे तृतीयायुक्तैव नानास्मृतिप्रमाण्यात्‌ ।’) तशी नाग विद्धा नसतांनाहि ती नागाविद्धा आहे असें समजून परदिवशीं चतुर्थी करणें म्हणजे. व्रतहानि करून घेणें आहे. विनायकी चतुर्थी मात्र केव्हां केव्हां नागविद्धा होणें संभवनीय आहे.

धर्मशास्त्रीय निर्णय : संकष्ट चतुर्थी चन्द्रोदयव्यापिनी घ्यावी. दुसर्‍या दिवशींच चन्दोदयव्यापिनी घ्यावी. दुसर्‍या दिवशींच चन्द्रोदयकालीं व्याप्ति असेल तर दुसर्‍या दिवसाचीच करावी. दोन दिवशीं चन्द्रोदयला व्याप्ति असेल तर तृतीयायुक्तच घ्यावी. दोनहि दिवशीं चन्द्रोदयकालीं व्याप्ति नसेल तर दुसर्‍या दिवसाचीच करावी. या धर्मशास्त्राच्या निर्णयानुसार पंचांगांत संकष्ट चतुर्थीचा दिवस लिहिलेला असतो.


अक्षांश-रेखांशानुसार गांवोगांवाच्या चन्द्रोदयाच्या वेळा बदलतात हें संकष्टीव्रताच्या संदर्भांत लक्षांत धेणें अवश्य असतें.

 

 

answered Jul 24, 2015 by TransLiteral (9,340 points)
selected Jan 3, 2017 by TransLiteral Admin
...